सूरदास

सूरदास : (सु. १४७८–सु. १५६३). मध्ययुगीन प्रसिद्घ हिंदी भक्तकवी. त्याच्या चरित्राविषयी फारशी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. ⇨ वल्लभाचार्यांचा नातू गोकुलनाथ (१५५२–१६४०) याने वर्णिलेल्या व नंतरच्या काळात हरिराय याने विस्तारपूर्वक पुनर्लेखन केलेल्या चौरासी वैष्णवन की वार्ता या ग्रंथात सूरदासाच्या चरित्राविषयी थोडीफार माहिती मिळते. तसेच त्याच्या समकालीन कवींच्या काव्यावरुन व त्याच्या स्वतःच्या काव्यातील आत्मकथनपर उल्लेखांवरुन सूरदासाचे चरित्र मांडले जाते. सूरदासाचा जन्म सीही (दिल्लीपासून १३ किमी. अंतरावर असलेले खेडे) येथे गरीब सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. तो जन्मांध होता. बालपणापासूनच तो गानविद्येत अत्यंत कुशल होता. त्याला ज्योतिष व शकुनविद्या अवगत होती व त्यावर त्याने काही काळ उपजीविकाही केली पण पुढे वैराग्य आल्याने हा मार्गही त्याने सोडून दिला. कालांतराने यमुनाकाठी गौघाट येथे कुटी बांधून त्याने अध्यात्मसाधनेला प्रारंभ केला. त्याच ठिकाणी ⇨ पुष्टिमार्गाचे संस्थापक वल्लभाचार्य (१४७९–१५३१) यांचे शिष्यत्व त्याने स्वीकारले. वल्लभाचार्यांनी त्याला पुष्टिमार्गाची दीक्षा दिली व श्रीकृष्णभक्तीचा उपदेश केला. वल्लभाचार्यांनी त्याला गोकुळ येथे आणले व कृष्णभक्तिपर पदे रचण्याची आज्ञा दिली. साधारण १४९६ ते १५१० या काळात त्याचे वास्तव्य गौघाट येथे व त्यानंतर गोवर्धन येथे होते. त्याने उर्वरित आयुष्य वृंदावनातील श्रीनाथजींच्या (गोवर्धन पर्वतावर प्रकटलेल्या श्रीकृष्णाचे रुप) पूजाआर्चेत व भजन-कीर्तनात व्यतीत केले. त्याने श्रीकृष्णभक्तिपर सहस्रावधी पदे रचली. त्यांत मुख्यतः कृष्णाच्या बाललीला व यौवनातील शृंगारक्रीडा यांची वर्णने प्राधान्याने येतात. सूरदासाचे साधुत्व, गीतमाधुर्य व गानकौशल्य यांनी सहस्रावधी कृष्णभक्तांना मंत्रमुग्ध केले. अकबर बादशहाची व सूरदासाची भेट तानसेनाच्या मध्यस्थीने मथुरेत झाली, असा उल्लेख हरिरायने केला आहे. सूरदासाच्या पदांवर लुब्ध झालेल्या अकबराने आपली स्तुतिकवने रचण्याची आज्ञा सूरदासाला केली पण ‘मी केवळ कृष्णकीर्तन करतो, अन्य कुणाचे कीर्तिगान करणे मला रुचत नाही’ (‘नहिं न रह्यो मन में ठौर’ हे पद) असे परखड उत्तर सूरदासाने दिले. तसेच त्याच्या कवित्वावर व गानमाधुर्यावर खूष होऊन अकबराने त्याला इनाम दिलेली काही गावे व द्रव्यही सूरदासाने निस्पृहपणे नाकारले. तरीही अकबराने त्याचा रोष न मानता त्याची अनेक पदे फार्सीत अनुवादित करुन घेऊन त्यांचा आस्वाद घेतला, अशी आख्यायिका आहे.

सूरदासाच्या स्फुट पदांचा संग्रह सूरसागर या नावाने प्रसिद्घ आहे. ‘नागरी प्रचारिणी सभे’ने वाराणसी येथून आचार्य नंददुलारे वाजपेयी यांच्या संपादकत्वाखाली दोन खंडांत (१९४८ व १९५० मध्ये) हा ग्रंथ प्रकाशित केला. भागवत पुराणा च्या आधारे रचलेल्या या ग्रंथात कृष्णाच्या लीलांचे गुणगान कृष्णजन्मापासून ते ब्रजभूमीतील क्रीडा, मथुरागमन, द्वारकेला प्रयाण व पुन्हा कुरुक्षेत्रात ब्रजवासी लोकांची भेट, येथ पर्यंतच्या सर्व घटनांचे साद्यन्त, क्रमवार वर्णन आहे. त्यांतील विविध रागांतील अनेक पदे गेयतेमुळे फार लोकप्रिय झाली. तसेच त्यांतील ‘विनय पदे’ (प्रार्थनागीते) प्रसिद्घ आहेत. काही विद्वानांच्या मते ही पदे वल्लभाचार्यांकडून पुष्टिमार्गाची दीक्षा घेण्यापूर्वी सूरदासाने रचली असावीत तथापि या पदांतील प्रगल्भता, गांभीर्य, वैराग्याची ओढ इ. वैशिष्ट्यांमुळे ती प्रौढ वयात रचली असावीत, असेही एक मत आहे. सूरसागर मधील काव्यदृष्ट्या सर्वांत हृदयस्पर्शी भाग म्हणजे ‘भ्रमरगीत’ होय. कंसवधासाठी मथुरेला गेल्यानंतर श्रीकृष्णाने काळजीत पडलेल्या गोकुळवासीयांना आपले कुशल वर्तमान कळवण्यासाठी उद्घवाला तेथे धाडले. ज्ञानमार्गी उद्घव व प्रेमभक्तिमार्ग अनुसरणाऱ्या गोपी यांच्यातील पद्यसंवाद ‘भ्रमरगीता’त आहे. नाट्यात्मता, काव्यात्मता, सहजसुलभ शैली इ. वैशिष्ट्य त्यात उत्तम रीत्या प्रकटली आहेत. निर्गुण, निष्प्रेम अव्यक्त मार्गापेक्षा सगुण प्रेममय व्यक्त मार्गाची भक्ती सहजसाध्य व श्रेष्ठतम आहे, हा यातील प्रतिपाद्य संदेश आहे. मधुर व कोमल ब्रज भाषेत रचलेल्या या पदांत सूरदासाचा भक्तिभाव व तत्त्वचिंतन प्रभावीपणे प्रकटले आहे. सूरदासाच्या पदांत वात्सल्य व शृंगार या दोन रसांचा उत्कृष्ट परिपोष साधलेला आढळतो.

कृष्णभक्तिपर पदे रचणाऱ्या आठ भक्तकवींच्या ⇨ अष्टछाप कवि संप्रदायामध्ये सूरदास अग्रगण्य मानला जातो. कृष्णभक्तीचा प्रवाह जनताभिमुख करण्यात सूरदासाच्या पदांचा वाटा मोठा आहे. त्याच्या भक्तिकाव्यातून पुष्टिमार्गी संप्रदायाची तत्त्वे प्रभावीपणे व सोप्या पद्घतीने मांडली आहेत. श्रीकृष्ण हा सर्वश्रेष्ठ परमेश्वर असून त्याची भक्ती व अनुग्रह (पुष्टी) हाच मानवाच्या अंतिम कल्याणाचा श्रेष्ठतम मार्ग, हे या संप्रदायाचे तत्त्वज्ञान सूरदासाने सोप्या गेय पदांतून मांडले. गोस्वामी विठ्ठलनाथांनी सूरदासाचा ‘पुष्टिमार्गाचे जहाज’ या शब्दांत गौरव केला. सूरसागर मध्ये काव्य व संगीत यांचा उत्तम मिलाफ साधला आहे. त्याने ब्रज भाषेत पदे रचली. पदांची भाषा सहजसोपी व नादमधुर असून प्रसंगचित्रे प्रत्ययकारी आहेत. सूरसागर हा ग्रंथ निर्विवादपणे त्याचा मानला जातो तथापि अन्य काही ग्रंथांचे जनकत्व त्याला बहाल केले गेले असले, तरी त्याविषयी मतभेद आहेत. त्याचे बहुश्रुत, अनुभवसंपन्न, विवेकशील, चिंतनशील, भक्तिभावपूर्ण व्यक्तिमत्त्व त्याच्या काव्यातून प्रत्ययास येते. सख्यभक्ती, वात्सल्यभक्ती, माधुर्यभक्ती, विनोदवृत्ती हे त्याच्या काव्याचे विशेष मानले जातात. लौकिक व अलौकिक अशा उभयविध पातळ्यांवरील जीवनानुभूतींची प्रचिती त्याच्या काव्यातून एकाच वेळी येते. सूरदासाने ब्रज भाषेत रचलेल्या भक्ती व शृंगार रसांचा परिपोष साधणाऱ्या पदांनी ब्रज भाषेचे वाङ्‌मयीन सामर्थ्य व हिंदी साहित्याचे सौंदर्य वृद्घिंगत केले. सूरदासाला हिंदी साहित्यातील ‘सूर’ (सूर्य) म्हणून संबोधिले जाते.

संदर्भ : वर्मा, व्रजेश्वर, सूरदास, अलाहाबाद, १९७३.

इनामदार, श्री. दे.