सुरु : (हिं. सरु, सरा क. सरुबुके सं. सुराव्ह इं. मेडिटरेनियन सायप्रस लॅ. क्युप्रेसस सेंपरव्हिरेन्स कुल-क्युप्रेसेसी). शंकुमंत (शंकूच्या आकाराचे प्रजोत्पादक इंद्रिय असलेल्या) गणातील [⟶ कॉनिफेरेलीझ] सुरु ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व शोभेकरिता फार पूर्वीपासून लागवडीत असलेल्या क्षुपांचा व वृक्षांचा समावेश क्युप्रेसस प्रजातीत केला जातो तसेच जूनिपेरस, टेट्रॅक्लिनिस, थुजा, क्युप्रेसस, कॅमीसायपेरिस इ. सुमारे १९ प्रजातींचा अंतर्भाव क्युप्रेसेसी ह्या कुलात होतो. ह्या वनस्पती एकत्र किंवा द्विभक्तलिंगी व राळयुक्त असून त्यांची पाने संमुख किंवा मंडलित व बहुधा खवल्यांसारखी असतात तसेच त्यांच्या शंकूतील खवल्यांची मांडणीही तशीच असते. पुं-शंकूतील केसरदलाच्या खालच्या बाजूस ३–६ परागकोश व स्त्री-शंकूच्या किंजदलावर दोन ते अनेक सरळ बीजके असतात. परिपक्व शंकू (फळे) कठीण अथवा कधी मांसल असून बियांना पर्णदले असतात.

सुरु

क्युप्रेसस प्रजातीतील जाती बहुधा सदापर्णी असून पाने लहान खवल्यांसारखी, समोरासमोर व खोडावर सपाट चिकटल्यासारखी (आलग्न) कोवळेपणी काहीशी सुईसारखी शंकू एकाकी, कोवळ्या फांद्यांच्या टोकावर, दुसऱ्या वर्षी पिकणारे व गोलसर किंवा लांबट गोल खवले ३– ७ जोड्या, छत्राकृती व कठीण असतात. प्रत्येक खवल्यावर ६–२० अरुंद पंखाची सपाट बीजे असतात.

सुरु (क्यु. सेंपरव्हिरन्स ) मूळचा इजीअन प्रदेशातील असून द. यूरोप व प. आशियात फार पूर्वीपासून लागवडीत आहे. वायव्य भारतात या वृक्षाचा स्ट्रिक्टा हा प्रकार फक्त लागवडीतच आढळतो. त्याला ‘इटालियन सायप्रस’ म्हणतात ग्रीक व रोमन लोकांचा हा आवडता वृक्ष असून द. यूरोपात याची भरपूर लागवड केलेली आढळते. ह्याच्या फांद्या उभट असून वृक्षाचा आकार रुंद होत गेलेल्या स्तंभासारखा असतो. भूमध्य सागरी प्रदेशातील सायप्रसच्या फांद्या आडव्या फुटलेल्या असल्यास त्याला पिरॅमिडसारखा आकार प्राप्त होतो व तो विशिष्ट प्रकार (हॉरिझाँटेलिस) मानतात. भारतात क्युप्रेससच्या आणखी ३-४ जाती आढळतात त्यांपैकी एकाला हिमालयन सायप्रस (क्यु. टोऱ्यूलोजा ) अथवा ‘देवदार’ म्हणतात [⟶ देवदार].

सुरु वृक्ष ३०–३२ मी. उंच वाढतो. पाने गर्द हिरवी, विशालकोनी पुं-शंकू ४–८ मिमी. व स्त्री-शंकू २५–४० मिमी. लंबगोल, कोवळेपणी हिरवे व पक्वावस्थेत पिवळट राखी खवले ८–१४ व प्रत्येकावर अणकुचीदार उंचवटा आणि बिया ८–२० असतात. लाकूड व फळे स्तंभक आणि कृमिनाशक लाकूड लालसर, कठीण आणि टिकाऊ असते. पाने व लाकूड यांतील बाष्पनशील तेल सुगंधी द्रव्यांत घालतात, साबणासही उपयुक्त तसेच डांग्या खोकल्यावर देतात. सुरु वृक्षांची बागेतील रांग शोभिवंत असते ती मोगल उद्यानांत विशेषेकरुन आढळते. नवीन लागवड बियांनी करतात. ते रेताड-दुमट जमिनीत चांगले वाढते.

जपानमधील ‘हिनोकी’ (इं. जापनीज सायप्रस, सन ट्री, फायर ट्री ) नावाच्या वृक्षाचे लाकूड सुगंधी व सर्व प्रकारच्या हवामानास टिकणारे असून त्या वृक्षाची लागवड शोभेकरिताही केली जाते. त्याचा अंतर्भाव कॅमीसायपेरिस प्रजातीत केला जातो.

पहा : जूनिपर थुजा देवदार.

संदर्भ : Tutin, T. G. and others, Eds., Flora Europaea, 1, Cambridge,1964.

जमदाडे, ज. वि.