सुरमई : या माशाची ‘तोवर’ व ‘इसवान’ अशी इतर नावे आहेत. त्याचा समावेश स्काँबेरोमोरिडी मत्स्यकुलात करतात. या कुलातील स्काँबेरोमोरस कॉमरसन व स्काँ. गटॅटस या दोन्ही जाती सुरमई या नावाने ओळखल्या जातात. स्काँ. कॉमरसन या जातीचा प्रसार इंडोपॅसिफिक प्रदेशांत असून भारताच्या सर्व समुद्रांत ती आढळते. तिचा रंग पाठीवर रुपेरी निळा आणि उदर रुपेरी व पांढरे असते. लांबी सु. १५२ सेंमी. पर्यंत असते. स्काँ. गटॅटस ही जाती सर्वसामान्य असून भारताच्या सर्व समुद्रकिनाऱ्यांभोवती ती आढळते. ह्या जातीच्या माशाच्या शरीरावर मानेपासून शेपटीच्या बुडापर्यंत लांबट ठिपक्यांच्या तीन ओळी असतात. प्रौढ माशात पाठीवरील पर काळा, तर पिलात तो अंशतः पांढरा असतो. लांबी सामान्यतः १२२ सेंमी.पेक्षा जास्त परंतु कधीकधी १८३ सेंमी.पेक्षाही जास्त तर वजन सु. २७·२२ किग्रॅ.पेक्षा जास्त असते.
सुरमई माशाच्या वरील दोन्ही जाती वेगाने पोहणाऱ्या असून झुंडीत राहतात. ते मांसाहारी असून सार्डिनासारख्या लहान माशांच्या झुंडीतील मासे, पांढरे आमिष इत्यादींवर उपजीविका करतात. ते उत्तम क्रीडा मत्स्य असून धोक्याची जाणीव झाल्यास मोठ्या माशांवरही हल्ला करतात. ते चवीला स्वादिष्ट असल्याने खाण्यासाठी त्यांना भरपूर मागणी असते. स्काँ. गटॅटस ही जाती खारविण्यासाठी योग्य असते.
अरबी समुद्रात स्काँ. कॉमरसन, स्काँ. गटॅटस व स्काँ. लिनिओलॅटस या तीन जाती आढळतात. भारतात दरवर्षी सु. २,००० टन सुरमई मासे पकडले जातात. हे प्रमाण भारतातील माशांच्या एकूण उत्पादनाच्या सु. २०% आहे. सुरमई पकडण्यासाठी गिल नेटचा (फास जाळ्याचा) वापर केला जातो.
जमदाडे, ज. वि.
“