सुरकोटडा : गुजरातमधील भूजच्या ईशान्येस १६० किमी. अंतरावर असलेले, कच्छ विभागातील हडप्पा संस्कृतीचे स्थळ. १९७० पासून येथे भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने उत्खनन सुरु केले आहे. उत्खननात एकूण तीन कालखंडांतील वस्त्यांचे अवशेष सापडले. या तिन्ही वस्त्या हडप्पा संस्कृतीच्याच होत्या परंतु तिसऱ्या कालखंडात सुरकोटडा येथे दुसऱ्या संस्कृतीचेही लोक वस्तीस आले, असे दिसून आले. १ अ या पहिल्या कालखंडात हडप्पा व हडप्पापूर्व संस्कृतींची सरमिसळ दिसून येते. किल्ला आणि नागरी वस्ती यांच्या भोवती विटांची भक्कम तटबंदी होती. नागरी वस्तीत हडप्पा संस्कृतीची बहुतेक वैशिष्ट्ये दिसून आली मात्र हडप्पा संस्कृतीहून भिन्न दफनपद्घती प्रचलित असल्याचे येथे आढळले. १ ब या कालखंडात हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्येच चालू राहिली, तरी तटबंदीची डागडुजी आणि कमी चित्रकारी असलेल्या नव्या धर्तीच्या मृत्पात्रांचा वापर, ही या कालखंडाची वैशिष्ट्ये दिसून आली. १ क या तिसऱ्या कालखंडात हडप्पा मृत्पात्रांव्यतिरिक्त काळ्या आणि तांबड्या रंगांच्या व पांढऱ्या रंगाने काढलेल्या मृत्पात्रांचा वापर, तटबंदीची दगडाने पुर्नबांधणी आणि विविध कोरीव नक्षीच्या तांबड्या रंगाच्या मृत्पात्रांचा वापर ही वैशिष्ट्ये दिसून येतात. या तिसऱ्या कालखंडात घोड्याचा वापर व रागीची लागवड हीही खास वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. सुरकोटडा व कच्छमधील इतर हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या समन्वेषणानुसार सिंधू संस्कृतीचे लोक सौराष्ट्र-गुजरात भागांत भूमार्गे आले असावेत, असे उत्खनक सांगतात.
संदर्भ : Archaeological Survey of India, Government of India, Indian Archarology 1971-72 : A Review, New Delhi, 1975.
देव, शां. भा.