सुबाभूळ : (कुबाभूळ गु. लासोबावळ, विलायती बावळ इं. ल्युसीना, व्हाइट पॉपिनॅक, लेड ट्री, हॉर्स टॅमॅरिंड लॅ. ल्युसीना ग्लॉका, ल्यु. ल्युकोसेफॅला कुल-लेग्युमिनोजी). ⇨बाभूळा च्या कुलातील ल्युसीना   प्रजातीमधील मोठे बिनकाटेरी क्षुप किंवा लहान वृक्ष भारतात सर्वत्र सपाट मैदानी प्रदेशांत आढळतो. तो मूळचा उष्णकटिबंधीय अमेरिकेतील व पॅसिफिक बेटांतील असून भारतात त्याचे स्वाभाविकीकरण झाले आहे. इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, मलेशिया आणि आग्नेय आशियातील इतर देश व आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड आढळते.  

सुबाभूळ : (१) पानांफुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) शिंबा (शेंगा). सुबाभळीची उंची सु. ९ मी. असून तिची मुळे खोलवर पसरतात. मुळांवर लहान गाठी तयार होतात, त्यांत नायट्रोजनाचे स्थिरीकरण करणारे सूक्ष्मजंतू असतात. ह्या वनस्पतीची वाढ फार जलद होते. खोडावरची साल गर्द तपकिरी व पातळ असून पाने दोनदा विभागलेली, संयुक्त, पिसासारखी व ७·५– १८ सेंमी. लांब असतात. पानांच्या व दलांच्या मध्यशिरेवर शेवटी बारीक नरम काटा असतो. दले (४–८ जोड्या) व प्रत्येक दल ५–९ सेंमी. लांब असते दलकांच्या १०–१५ जोड्या असून प्रत्येक दलक १० × ३ मिमी., रेषाकृती-आयत, निळसर हिरवे व तळाशी तिरपे असते. फुलोरे लहान गोलसर गुच्छासारखे  [स्तबक ⟶ पुष्पबंध] व पांढरट असून बाभळीसारखीच अनेक सूक्ष्म फुले गोलसर पुष्पासनावर चिकटून असतात. प्रत्येक फूल सु. ५ मिमी. व्यासाचे असते. फुले पिवळसर पांढरी, द्विलिंगी, पंचभागी व बिनदेठाची असून जुलै–ऑक्टोबरात येतात. फुलांचे गुच्छ पानांच्या बगलेत, एकाकी, क्वचित लहान झुबक्यांत असतात अथवा टोकास त्यांची मंजिरी असते. शिंबा सरळ, सपाट, गुळगुळीत, १२·५–१५×१·३–२ सेंमी. असून टोकास त्रिकोणी व तळाशी अरुंद होत जाते. बिया १५–२५, गर्द तपकिरी व चकचकीत असतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्यु मिनोजी (शिंबावंत) कुलातील मिमोजॉइडी उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. सुबाभळीचे स्वरुप सर्वसाधारणपणे बाभळीसारखेच असते.

सुबाभळीची रोपे उद्यानांत कुंपणाच्या कडेने तसेच अनेक देशांत रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता लावतात. लागवड केल्यास तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही व कष्टही कमी केले तरी तिचे उत्पादन चांगले येते. साधारणतः जेथे कमीत कमी हिमतुषार व सु. ६० सेंमी. चे पर्जन्यमान असते तेथे ही अवर्षण प्रतिकारक वनस्पती चांगली वाढते. यामुळे उतरणीवर, सीमावर्ती (साधारण पिकाऊ) जमिनीवर व दीर्घकाळ कोरडी हवा असलेल्या ठिकाणी ती वाढू शकते. त्यामुळे अनेक कारणांनी जंगलनाश झाला असता, तेथे पुन्हा जंगलाची किंवा सुयोग्य गवताळ प्रदेशाची निर्मिती करण्यास आवश्यक ती जमिनीची परिस्थिती घडवून आणण्यास सुबाभळीची लागवड करणे उपयुक्त असते. सुबाभळीच्या पानांत नायट्रोजन भरपूर असल्याने (दर हेक्टरी ६०० किग्रॅ. नायट्रोजन) व तो जमिनीत ⇨ह्यूमस स्वरुपात तसेच मुळांवरील गाठींत साठून प्रथम वनस्पतीला मिळत असल्याने व नंतर जमिनीत जात असल्याने जमिनीची सुपीकता वाढत जाते, तिची पाणी धारण करण्याची शक्ती वाढते व पोतही सुधारतो. त्यामुळे जमीनसुधारणा घडवून आणली जाते. लागवडीच्या दृष्टीने विचार केल्यास सुबाभळीच्या झाडांना दुमट जमीन चांगली मानवते. आजूबाजूस स्वैरपणे सहज पडलेल्या बियांपासून नवीन झाडांची उत्पत्ती जलद होते व तिचा प्रसार होत जातो. तथापि, एकूण जननक्षम बिया सु. १०% असतात. लागवडीपूर्वी त्वक्‌छेदनाने (बियांची साल चिंबवून) किंवा ७०° – ८०°से.पर्यंत तापविलेल्या गरम पाण्यात पाच मिनिटे बिया ठेवून वापरल्यास त्यांची अंकुरणक्षमता  वाढते.


 रोपे लागवडीपेक्षा ती छाट कलमे व ठोंब लावून करतात त्यामुळे वाढ अधिक जलद होते. छाटणीनंतर वाढ जोमाने चालू राहते. सोसाटयाच्या वाऱ्यापासून संरक्षण देण्याकरिता व जमिनीची धूप थांबविण्यास जंगलातील मोकळ्या जागेत सुबाभूळ लावतात. तसेच चहा, कॉफी, कोको, रबर, सिंकोना, साग, साल आणि पानमळ्यांतही हिची लागवड करणे सावली व निवारा यादृष्टीने फायदेशीर असते.

सुबाभळीची पाने, फांद्या व बियांची पूड खताकरिता वापरतात. गुरे, शेळ्या व मेंढ्या हिचा पाला, शेंगा व बिया आवडीने खातात कोंबडयांनाही पाला पूरक अन्न म्हणून देतात. काही देशांत कोवळा पाला व कच्च्या शेंगा तसेच माणसेही बिया भाजून खातात. बियांचा वापर माळांकरिता आणि टोपल्या, पिशव्या व दागिने इत्यादींत गुंफण्याकरिता करतात. मानव, घोडे, डुकरे, ससे इ. रवंथ न करणाऱ्या प्राण्यांना ह्या वनस्पतीच्या अतिसेवनाने विषबाधा होते व त्यांचे केस गळून पडतात तसेच मेंढयांनी अतिसेवन केल्यास लोकर गळून पडते हे खाद्य सोडल्यास पूर्ववत केस वा लोकर टिकून राहते असे दिसून आले आहे. विषबाधा होण्याचे कारण त्यातील ‘ल्युसीनीन’ हे अल्कलॉइड असते. खाद्यात लोहाचे (क्षार) मिश्रण अधिक केल्यास ही विषबाधा टाळता येते. सालीत सु. १६·३% टॅनीन असून आसामात शरीरातील वेदना कमी करण्यासाठी तिचा पोटात घेण्यास उपयोग करतात गर्भपात होणे व गर्भधारणा होऊ न देणे हे तिच्यातील गुण महत्त्वाचे ठरले आहेत. साल कृमिनाशक व मत्स्यविष आहे. कातडीस समाधानकारक रंग येत नाही. त्यामुळे कातडी कमाविण्यास तिचा वापर करीत नाहीत. सुबाभळीचे लाकूड कठीण, मजबूत व घट्ट असते ते घरबांधणीत किरकोळ उपयोगाचे असते परंतु जळणास व कोळसा बनविण्यास चांगले असते. बियांतील डिंक (सु. २५%) सौंदर्यप्रसाधने व काही अन्नपदार्थ बनविण्याच्या उद्योगांत उपयुक्त ठरला आहे. बिया, शेंगा व साल यांपासून काढलेल्या विविध रंगांचा उपयोग कापडधंद्यात करतात. कागद निर्मितीत लगद्याकरिता लाकडाचा उपयोग होतो.

सुबाभळीच्या प्रजातीतील काही प्रकारांच्या व जातींच्या संकराने इष्ट गुणसंपन्न नवीन वाण (उदा., कनिंगहॅम) ऑस्ट्रेलियात बनविले आहे. भारतात काही कृषिप्रधान व वनविद्या संस्थांत निर्दोष वाण संकराने शोधून काढले आहेत. ल्यु. ल्यूकोसेफॅला चे खुजे प्रकार ‘पेरु’ व ‘हवाईयन’ नावाचे असून ‘सॅल्व्हॅडोर’ प्रकार उंच वृक्षाप्रमाणे असतो. हवाई व फिलिपीन्स येथे आढळलेले ‘हवाईयन जायंट्स ‘ हे वृक्ष अतिशय जलद वाढणारे असून ६–८ वर्षांत त्यांची उंची सु. २० मी. पर्यंत झाली असल्याचे समजते. त्यांच्या दाट लागवडीच्या क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात लाकडाचे उत्पादन होते. फुलोरे जलद येणे व भरपूर बियांची उत्पत्ती ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे ‘हवाईयन’ झुडपांत आढळतात, तर ‘सॅल्व्हॅडोर’ प्रकारात सु. २० मी. पर्यंतची उंची हे वैशिष्ट्य आहे. पहिले दोन प्रकार गुरांना खाण्यास फार आवडतात आणि त्यामुळे त्यांच्या मांसाच्या व दुधाच्या संदर्भात ल्युसीना च्या उपयुक्ततेला अधिक महत्त्व आले आहे.  

पहा : बाभूळ लेग्युमिनोजी.

संदर्भ : 1. Arora s. S. Leucaena-An Unexploited But Promising Leguminous Crop, Science Reporter, June, 1979.

    2. Cook, T. Flora of the Presidency of Bombay, Vol. I, Calcutta, 1958.

    3. C. S. I. R. The wealth of India, Raw Materials, Vol. VI and  VII, New Delhi, 1962 and 1966.

    4. Vietmeyer, N.D. Leucaena : New Hope for the Tropics, 1979.

परांडेकर, शं. आ.