सुगरण : प्लोसीइडी या कुलातील एक पक्षी. याच्या दोन-तीन जातींपैकी प्लोसियस फिलिप्पिनस ही जाती भारतात सर्वत्र आढळते. या पक्षाचा आकार चिमणीएवढा असतो. नर व मादी या दोघांचाही रंग पिंगट-तपकिरी असून पंख आणि शेपटी गडद तपकिरी रंगाची खालचा भाग पिंगट चोच जाड व निमुळती असते. उन्हाळ्यात नराच्या डोक्याच्या दोन्ही बाजू , हनुवटी व गळा काळसर-तपकिरी रंगाचा आणि छाती व डोक्याचा उरलेला भाग चकचकीत पिवळा होतो.
सुगरण पक्ष्यांचे थवे कापणी झालेल्या शेतात आणि शेतीभोवतालच्या प्रदेशांत नेहमी आढळतात. तसेच तलावांच्या काठावरील झुडपांत किंवा लव्हाळ्यांच्या बेटांत हे रात्री विश्रांती घेतात. धान्य आणि किडे हे यांचे भक्ष्य आहे. यांचा आवाज चिमणीसारखाच चिवचिव असा असतो.
सुगरण पक्षाचा विणीचा हंगाम मे–सप्टेंबर असा असतो. या काळात नर सुंदर घरटे विणतो. विणीच्या हंगामात नर जमावाने घरट्यांकरिता जागा असतात. कित्येकदा उंच वृक्षांवर पानांच्या टोकाशी ती असतात. घरटे पालथ्या चंबूसारखे असून गवत, केळी व काथ्या इत्यादींच्या धाग्यांनी विणून तयार केलेले असते. सुरूवातीला फांदीभोवती धागे घट्ट विणून लहानसा मजबूत लोंबता दोर तयार करतात. याच्या आधाराने घरटे फांदीवरून खाली लोंबत असते. नंतर दोराच्या मोकळ्या टोकातील धाग्यात दुसरे धागे गुंतवून हळूहळू घरट्याचे रुंद बूड तयार करतात. त्याचा आकार घंटेसारखा असतो. बूड चांगले रुंद व मोठे झाल्यावर त्याचे दोन भाग केल्यावर पहिला भाग बंद करून त्याला फुग्यासारखा आकार दिला जातो. हा अंडकक्ष होय यातच मादी अंडी घालते. दुसरा भाग विणून लांब व रुंद नळीसारखा बनविलेला असतो हा भाग लोंबता असून त्याचे खालचे टोक उघडे असते ते घरट्या त शिरण्याचे दार होय. अंडकक्षाच्या आतील बाजूस ओल्या चिखलाचे लिंपण केलेले असते.
अंडकक्ष पूर्ण होण्याच्या सुमारास माद्यांचा थवा तेथे येतो. नर घरटे तयार करत असतानाच मादी घरट्यावरून नराची निवड करते आणि त्यावेळेपासून तो नर तिचा जोडीदार होतो. त्यानंतर लवकरच नर घरट्याचा बाकीचा भाग पुरा करतो आणि आतील भाग मादी नीटनेटका करते. घरटे पूर्ण झाल्यावर मादी अंडकक्षात २–४ पांढरी शुभ्र अंडी घालून ती उबविण्याचे काम सुरू करते, याच दरम्यान नर दुसरे घरटे तयार करून आणखी एका मादीशी जोडा जमवितो. अशा तऱ्हेने एकच नर तीन-चार माद्यांबरोबर जोड्या जमवितो. अर्धवट तयार झालेले घरटे कोणत्याही मादीने पसंत केले नाही, तर नर ते पुरे करीत नाही. अशी अपुरी घरटी पुष्कळ ठिकाणी आढळतात.
भारतात आढळणाऱ्या सुगरणीच्या जाती : (१) रेषांची सुगरण : हिचे शास्त्रीय नाव प्लो. मान्यार असे आहे. या पक्षाच्या नराची छाती तांबूस असून पाठीवर काळ्या रेषा असतात. डोक्यावर चकाकणारा पिवळ्या रंगाचा तुरा असतो.
(२) काळ्या गळ्याची सुगरण : हिचे शास्त्रीय नाव प्लो. बेंघॅलेन्सिस असे आहे. या जातीतील नराचा तुरा सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो. गळा पांढरा असून छाती काळ्या रंगाची असते.
जलाशयाच्या आसपास असलेल्या गवतात किंवा वेतांच्या वनात या दोन्ही जातींच्या पक्ष्यांची घरटी आढळतात.
पहा : घरटे.
कर्वे, ज. नी.
“