सुएझ कालवा : अरबी नाव कनात ॲस-सुवेस. ईजिप्तच्या सुएझ संयोगभूमीतून खोदलेला एक कालवामार्ग. उत्तर-दक्षिण गेलेल्या १६२ किमी. लांबीच्या या कालव्यामुळे उत्तरेकडील भूमध्य समुद्र व दक्षिणेकडील सुएझ आखात-तांबडा समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत. तसेच या कालव्यामुळे आफ्रिका खंड आशिया खंडापासून अलग झाला आहे. कालव्याच्या पश्चिमेस नाईल नदीचा त्रिभुज प्रदेश तर पूर्वेस सिनाई द्वीपकल्पाची उंच, ओबडधोबड व शुष्क भूमी आहे. कालव्याच्या उत्तर टोकाशी पोर्ट सैद तर दक्षिण टोकाशी सुएझ (पोर्ट तौफीक) बंदर आहे. कालव्यातील पाण्याची पातळी दोन्ही बाजूंकडील समुद्रातील पाण्याच्या पातळीबरोबर ठेवण्यात आलेली असल्यामुळे त्यात जलपाशांचा वापर करावा लागत नाही. हा कालवा झाल्यामुळे जहाजांना अटलांटिक महासागरातून भूमध्य समुद्र, तांबडा समुद्र व अरबी समुद्रामार्गे थेट हिंदी महासागरात जाता येते. हा कालवा होण्यापूर्वी यूरोपकडून आग्नेय आशियाकडे जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होपमार्गे संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावे लागे. जगाच्या साधारण मध्यातून जाणाऱ्या या कालव्यामुळे प्रामुख्याने पश्चिम यूरोपीय देश आणि पूर्व आफ्रिका, आग्नेय आशिया, ओशिॲनिया यांदरम्यानचा जवळचा जलमार्ग उपलब्ध झाला आहे. केप ऑफ गुड होप सागरी मार्गाच्या तुलनेत या मार्गाने लंडन–मुंबई यांमधील अंतर सु. ७,१७८ किमी.ने कमी झाले आहे. साहजिकच इंधनाचा खर्च कमी झाला. वाहतुकीचे भाडे व वेळ वाचून व्यापाराची वृद्घी झाली.

सुएझ कालव्यातील वाहतूक : पोर्ट सैद येथील दृश्य

इसवी सन पूर्व विसाव्या किंवा एकोणिसाव्या शतकांत ईजिप्तच्या राजांनी नाईल नदी व तांबडा समुद्र यांना जोडणारा पश्चिम-पूर्व कालवा काढलेला होता परंतु तो दुरुस्तीअभावी निरुपयोगी झाला. त्यानंतर फेअरो नेको (इ. स. पू. सु. ६००), डरायस द ग्रेट (इ. स. पू. सु.५००) व दुसरा टॉलेमी (इ. स. पू. सु.२५०) वगैरे राजांनी या कालव्याच्या पुनःखुदाईचे काम हाती घेतले होते. पंधराव्या शतकात व्हेनेशियनांनी, तर सतराव्या शतकात फ्रेंचांनी, सुएझ संयोगभूमीतून भूमध्य समुद्र व सुएझ आखात यांना कालव्याने जोडता येईल, अशी कल्पना मांडली होती. परंतु त्याचा पाठपुरावा केला गेला नाही. पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस पहिला नेपोलियन (१७६९–१८२१) हा ईजिप्तच्या मोहिमेवर असताना त्याला तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र जोडण्याची कल्पना सुचली परंतु भूमध्य समुद्रापेक्षा तांबड्या समुद्रातील पाण्याची पातळी अधिक असल्याने या प्रस्तावित कालव्यातून जलपाशांशिवाय वाहतूक करणे शक्य होणार नाही, असा निष्कर्ष फ्रेंच अभियंत्यांनी व सर्वेक्षकांनी काढल्यामुळे ही योजना अव्यवहार्य ठरविली गेली. त्यानंतर वेगवेगळ्या अभियंत्यांनी या कालवा मार्गासंबंधी वेगवेगळ्या योजना सुचविल्या. त्यांपैकी काही प्रस्तावांमध्ये जलपाशांशिवाय हा कालवामार्ग शक्य असल्याचे सुचविले गेले. इ. स. १८३० च्या दशकात ईजिप्तमध्ये राजदरबारी असलेल्या फर्दिनान्द द लेसेप्स (१८०५–९४) या फ्रेंच मुत्सद्दी व अभियंत्याच्या प्रयत्नांनी या संकल्पनेस चालना मिळाली. त्याने ईजिप्तचे राज्यपाल सैद पाशा याजकडून दोन सवलती मिळविल्या आणि फ्रान्स हा कालवा बांधून देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानुसार सुएझ कॅनल कंपनीची स्थापना झाली (१८५८). तिच्याद्वारे कालव्याचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा कालवा सर्व देशांसाठी वाहतुकीला खुला ठेवावा आणि ९९ वर्षांच्या कराराने कंपनीने जकात कराचे उत्पन्न घ्यावे, असे ठरले. कालवा खणताना गुंतागुंतीच्या तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या. तसेच ग्रेट ब्रिटनसारख्या देशांनी काही राजकीय समस्या निर्माण केल्या पण या सर्वांवर मात करून लेसेप्स याच्या देखरेखीखाली अकरा वर्षांत (१८५९–६९) या कालव्याचे काम पूर्ण झाले. त्याच्या जलप्रवाहात मॅन्झाला, टिमसाह, ग्रेट बिटर व लिटल बिटर या मधल्या सरोवरांचा अभियंत्यांनी चपखल उपयोग करून घेतला आहे. या सरोवरांपैकी टिमसाह सरोवराकाठी असलेल्या इझमेअलिआ शहरात कालव्याची ( सुएझ कॅनल ऑथॉरिटी ) सर्व प्रशासकीय कार्यालये आहेत. हा कालवा पूर्ण होण्यास ९,२४,१४,००० डॉलर खर्च आला.


कालव्याचे व्यापारी व राजकीय महत्त्व लक्षात घेऊन ग्रेट ब्रिटनने ईजिप्तच्या आर्थिक अडचणींची संधी साधून १८७५ मध्ये कंपनीचे समभाग विकत घेतले. त्यामुळे सुएझ कॅनल कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी ४३ टक्के भाग ब्रिटनकडे आले. त्यामुळे ब्रिटनचे व काही फ्रेंच भांडवलदारांचे वर्चस्व कंपनीवर प्रस्थापित झाले. परिणामतः इंग्लंडला आपल्या साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे सुलभ झाले. यानंतर १८८३ मध्ये ग्रेट ब्रिटनने ईजिप्तवरील आपले अधिराज्य जाहीर केले. त्याबरोबरच सुएझ कालव्यावर त्यांचे आपाततः वर्चस्व निर्माण झाले. कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथील यूरोपीय राष्ट्रांच्या १८८८ मधील परिषदेत झालेल्या एका करारान्वये हा कालवा शांततेच्या व युद्घाच्या काळात सर्व देशांच्या जहाजांना खुला राहील असे ठरले व त्याचे पालन करण्याची जबाबदारी ब्रिटनवर सोपविली. ईजिप्त स्वतंत्र झाल्यावरही १९३६ च्या अँग्लो-ईजिप्शियन तहान्वये कालव्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ब्रिटनने आपल्याकडेच ठेवली व त्यासाठी काही लष्करी तळ कालव्याच्या परिसरात निर्माण केले. दुसरे महायुद्घ संपल्यानंतर इंग्लंडने ईजिप्तवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ईजिप्तने चेकोस्लोव्हाकियाशी गुप्त लष्करी करार केला आणि रशियाबरोबरचे हितसंबंध व मैत्री वाढविली. या संधीचा फायदा घेऊन अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि ब्रिटन यांनी आस्वान धरणास देत असलेली आर्थिक मदत बंद केली. तेव्हा ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासर यांनी ९९ वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच जुलै १९५६ मध्ये कालव्याचे राष्ट्रीयीकरण करून त्याचे व्यवस्थापन ‘सुएझ कॅनल ऑथॉरिटी’ कडे सोपविले. तसेच जकात कराद्वारे मिळणारी रक्कम आस्वान धरणासाठी वापरण्याचा अध्यादेश काढला ( जुलै १९५६ ). त्यामुळे सुएझ प्रश्न उद्‌भवला. सुएझ कालवा आंतरराष्ट्रीय वाहतुकीस मुक्त राहावा, या सबबीवर इंग्लंड-फ्रान्स व इझ्राएल या देशांनी ईजिप्त वर नोव्हेंबर १९५६ मध्ये आक्रमण केले परंतु संयुक्त राष्ट्रांची मध्यस्थी आणि अमेरिका व रशिया यांच्या विरोधामुळे ह्या देशांना सैन्य मागे घेणे भाग पडले. ईजिप्तने कालव्याचे केलेले राष्ट्रीयीकरण सर्व देशांना मान्य करणे भाग पडले तथापि इझ्राएलला या कालव्यातून जहाजे नेण्यास मनाई केली गेली. तिसऱ्या अरब-इझ्राएल युद्घात (१९६७) इझ्राएलने बॉम्बवर्षाव करून कालव्याचे अतोनात नुकसान केले. सिनाई वाळवंटाचा भाग पादाक्रांत करून कालव्याच्या पूर्व किनाऱ्याचा ताबा घेतला, तेव्हा ईजिप्तने त्या भागातील वस्ती हलविली. कालवा १९६७ – ७५ दरम्यान वाहतुकीस पूर्णपणे बंद होता. ईजिप्त व इझ्राएल या दोन देशांदरम्यानच्या वाटाघाटीस अमेरिकेच्या मध्यस्थीने प्रारंभ झाल्यावर कालव्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस सुरुवात झाली. ईजिप्त-इझ्राएलमध्ये कँप डेव्हिड (अमेरिका) येथे अन्वर सादत व मेनाशेम बेगीन या दोन राज्यकर्त्यांत दोन करार होऊन २५ एप्रिल १९७९ रोजी शांततेचा तह झाला आणि प्रथम इझ्राएलच्या जहाजांना कालव्यातून सोडण्यात येऊन त्यांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली.

सुरुवातीस कालव्याची पृष्ठभागावरील रुंदी ६० मी., तळाशी २२ मी. आणि खोली ८ मी. होती (१८७०) परंतु पुढे जहाजांचे आकारमान, प्रकार व क्षमता जशी वाढत गेली, तशी कालव्याची रुंदी व खोली क्रमाक्रमाने वाढविण्यात आली. आधुनिकीकरण व दुरुस्तीनंतर कालव्याची कमाल खोली २२·५ मी. व कमाल रुंदी ३६५ मी. झाली आहे (२०१०). कालव्याच्या उत्तर टोकाशी २२ किमी. लांबीचा अभिगम कालवा असून दक्षिण भागातील अभिगम कालव्याची लांबी ९ किमी. आहे. पुनर्बांधणी पूर्ण झाल्यानंतर त्यातून सर्व प्रकारची जहाजे प्रवास करु लागली. अल् बल्लाह येथे तसेच बिटर लेक येथे उपमार्ग असून त्यांचा उपयोग जहाजांना एकमेकांना ओलांडण्यासाठी (पासिंग फ्लेसिस) केला जातो. इस्लामिया कालव्याद्वारे सुएझ कालव्याच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत गोडे पाणी आणण्यात आले आहे.

सुएझ कालवामार्ग हा जगातील गजबजलेल्या जलमार्गांपैकी एक आहे. पर्शियन (अरेबियन) आखाती देशांतील खनिज तेल क्षेत्राकडून यूरोपकडे खनिज तेल वाहून नेणाऱ्या तेलवाहू जहाजांची संख्या सर्वाधिक असते. त्याशिवाय या मार्गावरुन उत्तरेच्या दिशेने प्रामुख्याने कोळसा, कच्ची खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया व इतर अवजड मालाची तर दक्षिणेकडे सिमेंट, खते, यंत्रसामग्री, तृणधान्ये व रिकामी तेलवाहू जहाजे यांची वाहतूक अधिक असते. कालव्यातून दररोज ५५ जहाजे वाहतूक करू  शकतात (१९९८) मात्र अवजड व फार मोठ्या जहाजांना केप ऑफ गुड होप मार्ग अवलंबावा लागतो. या कालवामार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांना कर द्यावा लागत असल्याने वाहतूक महाग पडते. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सोमालियन चाच्यांच्या वाढत्या त्रासामुळे वाहतुकीत घट झाली होती. २००४ मध्ये १६,८५० जहाजांद्वारे ६२१ द. ल. टन मालाची वाहतूक या मार्गे झाली. त्यापासून ३,०८५ द. ल. अमेरिकी डॉलर एवढे पथकर उत्पन्न ईजिप्तला मिळाले.

देशपांडे, सु. र.