सीताफळ : ( हिं. शरीफा गु. अनुरम क. अमृतफल, दुरगी सं. बहुबीजक, कृष्णबीज, सीताफल इं. कस्टर्ड ॲपल, स्वीट सॉप, शुगर ॲपल लॅ. ॲनोना स्कॅ्वमोजा कुल-ॲनोनेसी ). फुलझाडांपैकी [ → वनस्पति, आवृतबीज उपविभाग ] एक सुपरिचित फळ किंवा लहान वृक्ष. ह्याच्या ॲनोना या प्रजातीत सु.१२० जाती असून त्यांपैकी सहा जाती भारतात आढळतात. त्यांपैकी तीन मूळच्या भारतातील असाव्यात व तीन बाहेरुन आणून लावलेल्या असाव्यात. सुमारे ६·५० मी. उंच असलेला हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटिबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून पंधराव्या शतकाच्या अखेरीस याची आयात भारतात पोर्तुगीजांनी केली आहे. त्याचे देशीयभवन झाले आहे. भारतात सर्वत्र लागवडीत असून उत्तर कारवारच्या सीमेवर व धारवाडमधील जंगलांतही आढळतो. पक्ष्यांनी व मनुष्यांनी टाकलेल्या बियांपासून चहूकडे मोठा प्रसार होऊन हा जणू काही भारतीयच आहे अशी समजूत होते. फळांच्या प्रतिमा ⇨अजिंठा लेणी व ⇨भारहूत स्तूपामध्ये सापडतात, त्यावरुन तो एतद्देशीय असावा असे कोणी मानतात. हे मत ग्राह्य वाटते कारण अजिंठा लेण्यांचा काळ इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. ५०० पर्यंतचा होता.
सीताफळाच्या फांद्या पसरट, परंतु अनियमित असून कोवळेपणी त्या लोश ( लवदार ) असतात पाने साधी, ५–१० सेंमी. लांब, पारदर्शक ठिपक्यांनी युक्त, आयत-कुंतसम ( भाल्यासारखी ), लहान देठाची, गर्द हिरवी व लोश असून जून पानावर फक्त खालच्या बाजूस लव असते. फुले एकाकी व पानासमोर, क्वचित २–४ एकत्र व हिरवट रंगाची असून मे – जुलैमध्ये येतात. फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ॲनोनेसी (सीताफल ) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. पाकळ्या व त्याखालची दले बहुधा तीन-तीन आणि फळ (७·५ x १० सेंमी.), सर्व किंजदले शेवटी एकत्र जुळून गोलसर, मगजयुक्त, गोड व पिवळसर बनते. बिया सपुष्क (रेषाभेदित गर्भाबाहेरील अन्नांश असलेल्या ), काळ्या, कठीण, गुळगुळीत व टोकदार असतात. फळावर साधारण गोलसर ‘ डोळे ’ व खरबरीत साल असून पांढरा मगज असतो. लॅटिन नावातील गुणनामवाचक शब्द सालीला अनुलक्षून व इंग्रजी नावे मगजावरुन दिली आहे.
सीताफळाचे महत्त्व फार आहे. मगजापासून उत्तेजक पेय बनवितात किंवा पक्व फळे तशीच खातात त्यात क – जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. ती थंड, पौष्टिक, रुचकर व रक्तवृद्घीस उपयुक्त पित्तविकारावर व वांतीवर गुणकारी असतात. पाने, बियांचे चूर्ण तसेच अपक्व फळांची पूड ढेकूण व इतर कीटकांचा नाश करण्यास आणि बियांच्या चूर्णाचे मलम डोक्यावरील उवा मारण्यास उपयुक्त असते. पानांचे पोटीस गळवे व व्रण यांवर बांधतात पान चुरुन मिठाबरोबर बांधल्यास पुवाळण्यास मदत होते नारुवरही पाने चुरुन बांधल्यास तो बाहेर पडतो. अर्बुदे पुवाळण्यास पक्व फळातील मगज मिठाबरोबर त्यावर बांधतात. मूळ तीव्र रेचक (पोट साफ करणारे) बी दाहक ( आग करणारे ), गर्भपात करणारे व मत्स्यविष आहे साल स्तंभक ( आकुंचित करणारी ) असून तिच्यापासून हलक्या प्रतीचा धागा बनवितात. बियांपासून अस्फटिकी अल्कलॉइड, विषारी राळ व तेल मिळते डोळ्यांच्या पापण्या व बुबुळाचा भाग यांना बियांच्या चूर्णापासून फार आग होते. बियांची पूड चण्याच्या पिठात मिसळून लावल्यास केस स्वच्छ होतात. गुरांच्या जखमांतील कीड मारण्यास बियांची पूड वापरतात. बियांतील तेल (३०%) साबण बनविण्यास उपयुक्त व त्यांची पेंड खतासारखी उपयुक्त असते.
फळांच्या मगजात प्रतिशत प्रमाणात पाणी ७३·२ ग्लुकोज १४·५ सॅकॅरोज १·७ व प्रथिने ०·८ इ. घटक असतात. भिन्न प्रतवारीप्रमाणे खाद्य भाग २९·७२% असून त्यामध्ये शर्करा १२·४–२१·५% ॲस्कॉर्बिक अम्ल ४·२५–०·६५% प्रथिने १·२% असतात.
वैद्य, प्र. भ. परांडेकर, शं. आ.
लागवड व संवर्धन : भारतात महाराष्ट्र, बिहार, आंध्र प्रदेश इ. राज्यांत सीताफळाची खाद्य फळाकरिता लागवड करतात. या फळझाडाला गरम कोरडी हवा व सौम्य हिवाळा मानवतो. डिसेंबर– फेब्रुवारीत पाने झडून वसंत ऋतूत पालवी फुटून फुले येतात. यास ५०– ७५ सेंमी. पाऊस चांगला असतो. झाडाभोवती पाणी साचणे अपायकारक असते. जमिनीखालील पाण्याचा ताण झाडे सहन करु शकतात. रेताड, मध्यम जमिनीत झाडे चांगली वाढतात. साधारण हलक्या व उथळ जमिनीत लागवड करतात.
पावसाळ्यात सुरुवातीस हलक्या जमिनीत ४·५ मी. व मध्यम जमिनीत ६ मी. अंतरावर खड्डे करुन ते गाळ व राखेने भरुन त्यांच्यामध्ये बिया लावतात. या फळझाडांना बहुतेक खत देत नाहीत परंतु ३% नायट्रोजन, १०% फॉस्फोरिक अम्ल व १०% पोटॅश असलेले खतमिश्रण दिल्यास फायदा होतो.
फळझाडांना ५-६ वर्षांनंतर फळे येतात. फळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तयार होतात. दरवर्षी प्रत्येक झाडापासून ११३–२२६ ग्रॅ. वजनाची ६०– ७० फळे मिळतात. कृत्रिम परागण करुन हे उत्पन्न वाढविता येते. याच्या पानांत विशिष्ट प्रकारचे अल्कलॉइड असल्याने गुरे ती खात नाहीत. सीताफळावर सहसा रोग व कीड पडत नाही. ही झाडे १५–२० वर्षे जगतात.
पहा : ॲनोनेसी.
संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I, New Delhi, 1984.
चौधरी, रा. मो.
“