सीझर, ज्यूलिअस गेयस : (१२ किंवा १३ जुलै १००— ४४ इ. स. पू.). ग्रीको-रोमन जगाच्या इतिहासाचा ओघ निर्णायकपणे बदलून टाकणारा थोर रोमन सेनापती, हुकूमशहा आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म रोम शहरी झाला मात्र नेमक्या कोणत्या साली झाला याबद्दल वाद आहेत. तथापि इ. स. पू. १०० हे परंपरेने स्वीकारलेले साल आहे. सीझरचे कुटुंब ‘पट्रिशन’ वर्गातले होते. पट्रिनशन म्हणजे श्रेष्ठी. पट्रिशन हा विशेषाधिकार असलेला वर्ग होता. तो कसा निर्माण झाला ह्याबाबत वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली जातात. त्यांपैकी एक असे : आरंभी रोममध्ये राजसत्ताक पद्घती होती तथापि श्रेष्ठ सभा (सीनेट) होती आणि राजा हा श्रेष्ठ सभेने नेमलेला कारभारी असतो, अशी धारणा होती. टार्क्विनस स्युपर्बस हा इ. स. पू. ५३४ मध्ये गादीवर आला. तो अत्यंत जुलूमी होता. श्रेष्ठ सभेला तो जुमानत नव्हता. इ. स. पू. ५०९ मध्ये श्रेष्ठ सभेने त्याला पदच्युत करुन रोमन प्रजासत्ताकाची स्थापना केली. राजाच्या जागी दर वर्षी निवडणुकीने ‘प्रेटर’ (पुढे कॉन्सल) ह्या पदावर येणाऱ्या दोन व्यक्तींची योजना करण्यात आली. तसेच राजेशाहीत अस्तित्वात असलेल्या श्रेष्ठ सभेचे स्थान कायम राहिले. इ. स. पू. ५०९ च्या ह्या क्रांतीच्या पूर्वी किंवा त्यावेळी प्रत्यक्ष रोममध्ये वा भोवतालच्या प्रदेशात भरपूर जमीनजुमला बाळगून असलेल्या काही सरदार कुटुंबांचामिळून हा श्रेष्ठींचा वर्ग तयार झालेला होता. इ. स. पू. ५०९ नंतर वा त्या वेळी जी घराणी ह्या वर्गात होती, त्यांखेरीज इतरांना ह्या वर्गात थारा मिळेनासा झाला. इतर ‘प्लिबीअन’ कनिष्ठ ठरले.
कनिष्ठांना श्रेष्ठींकडून फार जाच होत असे. कनिष्ठ हे गुलाम वा दास नव्हते पण दैनंदिन व्यवहारांत त्यांना श्रेष्ठींवर अवलंबून राहावे लागत असे. श्रेष्ठींचे विशेषाधिकारही त्यांना नव्हते. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यासाठी एका वर्षासाठी निवड झालेला ‘ट्रिब्यून’ हा अधिकारी असे. श्रेष्ठ आणि कनिष्ठ वा लोकपक्ष ह्यांच्यात सत्तासंघर्ष होता आणि रोमच्या अंतर्गत राजकीय जीवनातील तो एक प्रमुख प्रवाह होता.
सीझरचे घराणे श्रेष्ठींपैकी असले, तरी श्रीमंत, नामांकित वा प्रभावशाली नव्हते. रोमन सरदाराला रोमच्या राजकीय जीवनात पुढे येण्यासाठी निरनिराळ्या सरकारी अधिकारपदांवर निवडून येणे आवश्यक असे आणि कॉन्सलपद प्राप्त करणे हे फार मोठे यश मानले जात असे (कॉन्सलची मुदत एक वर्षासाठी असली, तरी त्याचे अधिकार मोठे असत. न्यायदान आणि लष्कर त्याच्या अधिकारक्षेत्रात येत असे). हे सर्व करण्यासाठी पैसा आणि प्रभाव ह्यांचे पुरेसे पाठबळ जरी सीझरजवळ नसले, तरी त्याने राजकीय जीवनाचा स्वीकार हेतुतःच केला होता, असे दिसते. केवळ स्वतःला मानसन्मान मिळावेत ह्यासाठी नव्हे, तर अव्यवस्थित प्रशासन असलेल्या रोमला आणि ग्रीको-रोमन जगाला स्वतःच्या कल्पनांप्रमाणे अधिक चांगली व्यवस्था प्राप्त करुन द्यावी म्हणून त्याने राजकीय जीवनाच्या धकाधकीत पडायचा निर्णय घेतला असण्याचा संभव आहे.
इ. स. पू. ८४ मध्ये सीझरने ल्यूशस कॉर्नेलिअस सिन्ना ह्याची कन्या कॉर्नेलिआ हिच्याशी विवाह करुन उघड उघड लोकपक्षाच्या बाजूची भूमिका घेतली. सिन्ना हा रोमन सेनानी आणि राजकारणी गेयस मेरिअस (१५७— ८६ इ. स. पू.) ह्याचा पाठीराखा होता. मेरिअसने रोमची मोठी सेवा केली होती. लष्करी पराक्रम गाजविले होते. त्यामुळेच सलग सहा वेळा त्याची कॉन्सलपदी निवड झालेली होती तथापि तो शिरजोर होऊ नये, म्हणून श्रेष्ठ सभेने त्याला त्याच्या प्रतिस्पर्धी सेनानींचे साहाय्य घेऊन विरोध केला होता. त्यातूनच ल्यूशस कॉर्नेलिअस सला (१३८— ७८ इ. स. पू.) हा सरदारपक्षाचा सेनानी आणि मेरिअस ह्यांच्यात वितुष्ट आले होते. वस्तुतः हा दोन व्यक्तींमधला संघर्ष नसून, श्रेष्ठ सभा आणि लोकपक्ष ह्यांच्यातील संघर्ष होता. ह्या पार्श्वभूमीवर सीझरने सिन्नाच्या मुलीशी केलेला विवाह सलाला रुचणे शक्य नव्हते. कॉर्नेलिआला घटस्फोट देण्याचा आदेश त्याने सीझरला दिला पण सीझरने तो मानला नाही. ह्या आज्ञाभंगासाठी आपल्याला आपली मालमत्ताच नव्हे, तर आपला जीवही गमवावा लागेल, हे लक्षात घेऊन सीझर इटलीतून बाहेर जाऊन आशिया प्रांतात (रोमन प्रांत आणि आशिया मायनरच्या पश्चिमेकडील भाग) आणि सायलीशियात लष्करी सेवेसाठी गेला.
इ. स. पू. ७८ मध्ये सला मरण पावल्यानंतर सीझर रोमला परतला आणि त्याने आपली राजकीय कारकीर्द ठरावीक पद्घतीने म्हणजे सरकारी अभियोक्ता म्हणून सुरु केली परंतु त्यात त्याला आरंभीच अपयश आले. त्यानंतर वक्तृत्वशास्त्राचा उत्तम अभ्यास करण्यासाठी तो त्या शास्त्रातील त्यावेळचा ख्यातनाम गुरु मोलोन ह्याच्याकडे गेला. तेथे जात असताना वाटेत त्याला चाच्यांनी पकडले आणि खंडणी मागितली. सीझरने खंडणीची रक्कम उभी केली पण स्वतःची सुटका झाल्यानंतर त्याने स्वतःचे एक नाविक दल उभारले आणि त्या चाच्यांना पकडून वधस्तंभावर चढविले. हे त्याने हातात कोणतीही सत्ता वा अधिकारपद नसताना केले. पुढे पॉन्टसचा राजा मिथ्रिडेटीझ, सहावा यूपेटर ह्याने इ. स. पू. ७४ मध्ये बिथिनियावर आक्रमण करुन रोमशी युद्घ सुरु केले, तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी सीझरने खाजगी सैन्य उभारले होते.
इ. स. पू. ६९ वा ६८ मध्ये सीझर ‘क्वेस्टर’ म्हणून निवडला गेला. रोमच्या राजकीय जीवनाचा सोपान चढण्यासाठी असलेली ही पहिली पायरी. क्वेस्टर हा राज्याच्या कोषागारावरचा अधिकारी असे. त्याची निवड एक वर्षासाठी लोकांकडून केली जाई. सीझरने फार्दर स्पेनमध्ये (आजचा अँडालूसीया आणि पोर्तुगाल) क्वेस्टर म्हणून काम केले. त्याला इ. स. पू. ६५ मध्ये ‘कुरुले ईडिल’ (Curule Aedile) ह्या पदावर निवडण्यात आले. हे पद दंडाधिकाऱ्याचे असून हा अधिकारी सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करी. रोम शहरातील देवळे, इमारती, बाजारपेठा, खेळ आणि धान्यपुरवठा हे विषय त्याच्या अधिकारकक्षेत येत. ह्या पदावर असताना त्याने पैशाची भरपूर उधळपट्टी केली. त्यासाठी त्याने कर्जे काढली. ह्या उधळपट्टीत लोकरंजनासाठी होणारा खर्च बराच असे. सार्वजनिक जीवनात यशस्वी होण्यासाठी तो हे करीत होता. पुढेइ. स. पू. ६३ मध्ये ‘पाँटिफेक्स माक्सिमस’ ह्या पदावर निवडून गेल्यावरही त्याने हेच धोरण ठेवले होते. रोममधील हे प्रमुख धार्मिक पद होते. ह्या पदाच्या माध्यमातून रोमच्या राजकारणात महत्त्व प्राप्त होण्यास बरीच मोठी संधी होती. रोमच्या सामाजिक राजकीय जीवनात सीझर पुढे येत चालला होता. देखणे, सुसंस्कृत आणि लोभस व्यक्तिमत्त्व असलेल्या सीझरने रोमन समाजावर आपली छाप पाडली होती परंतु तो वादग्रस्तही होत चालला होता. पाँटिफेक्स माक्सिमस हे पदही त्याने सरळपणे मिळविलेले नव्हते, असे म्हटले जाते. इ. स. पू. ६३ मध्ये कॅटिलिन प्रकरण उद्भवले. कॅटिलिन हा विपन्नावस्थेला पोहोचलेला एक श्रेष्ठी होता. नैतिक मूल्यांचा फारसा विचार न करणाऱ्या आणि दारिद्र्यामुळे अगतिक झालेल्या कॅटिलिनने बंडाळी करुन रोममध्ये सत्ता प्राप्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता (इ. स. पू. ६५). इ. स. पू. ६३ मध्ये त्याने रोममध्ये पुन्हा एकदा अराजक माजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सिसरो (१०६— ४३ इ. स. पू.) कॉन्सल होता. त्याने हा प्रयत्न हाणून पाडला. सीझर आणि त्याचा राजकीय मित्र मार्कस लिसिनिअस क्रॅसस (मृत्यू इ. स. पू. ५३) ह्या दोघांवर कॅटिलिनच्या बंडात काही सहभाग असल्याचे आरोप झाले होते. कॅटिलिनला दया दाखवून मृत्युदंडाऐवजीअन्य कोणती तरी शिक्षा द्यावी, असा प्रस्ताव सीझरने श्रेष्ठ सभेत मांडलेला होता. पण तो फेटाळला गेला.
इ. स. पू. ६२ ह्या वर्षासाठी सीझर प्रेटरपदी निवडला गेला. नंतर इ. स. पू. ६१-६० साठी फार्दर स्पेनचे गव्हर्नरपद त्याला मिळाले पण कर्ज बरेच झालेले असल्यामुळे त्याचे सावकार त्याला रोम सोडून जाऊ देईनात. अखेरीस त्याचा श्रीमंत मित्र क्रॅसस हा त्याच्या एक चतुर्थांश कर्जासाठी त्याला जामीन राहिला आणि त्यानंतरच त्याला रोमबाहेर जाता आले. गव्हर्नर झाल्यानंतर त्याच्या सत्तेखालील प्रांताच्या वायव्य हद्दीपलीकडील प्रदेशात लष्करी मोहीम चालवून त्याने स्वतःसाठी आणि आपल्या सैनिकांसाठी बरीच लूट जमा केली आणि लुटीचा काही भाग सरकारी खजिन्यांसाठी शिल्लक ठेवला. आर्थिक बाजू अशा प्रकारे अनुकूल झाल्यामुळे इ. स. पू. ६० मध्ये रोमला परतल्यानंतर तो इ. स. पू. ५९ ह्या वर्षासाठी कॉन्सलच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकला. श्रेष्ठ सभेला सीझर कॉन्सल व्हायला नको होता. त्यामुळे लाचलुचपतीच्या मार्गाने जाणे त्याने स्वीकारले. कॉन्सलच्या दोन पदांपैकी एका पदावर सीझरच्या एका विरोधकाला निवडून आणण्यात श्रेष्ठ सभा यशस्वी झाली परंतु दुसऱ्या पदावर सीझर निवडून आला. यानंतर सीझरने त्याच्या मनातील एक कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. तो स्वतः, पॉम्पी आणि क्रॅसस अशा तिघांनी संयुक्तपणे रोमचा राज्यकारभार करण्याची ही कल्पना होती.
पॉम्पी हा सलाचा सहकारी आणि पाठीराखा. सलाबरोबर आफ्रिका, सिसिली आणि आशिया मायनर येथील बंडाळ्या मोडून रोमन सत्ता स्थिरस्थावर करण्यात त्याचा मोठा वाटा होता, शिवाय त्याने सहाव्या मिथ्रिडेटीझकडून सिरिया आणि पॅलेस्टाइन हे प्रदेश पुन्हा जिंकून घेतले होते. तथापि सलाच्या मृत्युनंतर त्याने वेगळा मार्ग स्वीकारला होता. सीझरची बायको कॉर्नेलिआ निधन पावल्यानंतर (इ. स. पू. ६९ वा ६८) सीझरने पॉम्पीची दूरची नातलग असलेल्या पॉम्पीआशी विवाह केला होता (पुढे त्याने तिच्याबरोबर घटस्फोट घेतला). मार्कस लिसिनिअस क्रॅसस हाही सलाचा सहकारी. स्पार्टाकसच्या नेतृत्वाखालील गुलामांचे बंड चिरडून टाकण्यात पॉम्पी आणि क्रॅसस ह्या दोघांचा मोठा वाटा होता (इ. स. पू. ७१), त्यामुळे त्या दोघांना कॉन्सलपदी नियुक्त करण्यात आले होते (इ. स. पू. ७०). तथापि क्रॅससचे पॉम्पीशी असलेले संबंध फारसे सलोख्याचे नव्हते. पॉम्पीच्या मार्गात क्रॅसस नेहमीच अडथळे आणीत असे. सीझर मात्र ह्या दोघांशीही चांगले संबंध ठेवून होता. त्यामुळे पॉम्पी आणि क्रॅसस ह्यांच्यासह रोमचा कारभार संयुक्तपणे चालविण्याची त्याची कल्पना मूर्त स्वरुपात येऊ शकली. हे शासकत्रय (ट्रायमव्हरेट) इ. स. पू. ६०— ४९ ह्या काळात संयुक्तपणे रोमचा राज्यकारभार पाहत होते. पॉम्पीने रोमसाठी मोठा पराक्रम गाजविलेला असला, तरी इटलीला परतल्यानंतर (इ. स. पू. ६२) रोमच्या राज्यात स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी त्याने काहीच प्रयत्न केलेले नव्हते. परिणामतः नवीन घेतलेल्या जमिनी आपल्या सैनिकांना वाटून द्याव्यात, ही त्याची मागणी फेटाळून श्रेष्ठ सभेने त्याला अपमानित केले होते. इ. स. पू. ५९ मध्ये सीझर कॉन्सल झाल्यानंतर त्याने पॉम्पीच्या सैनिकांना जमिनी देण्याबाबतचा ठराव श्रेष्ठ सभेत संमत करुन घेतला. इ. स. पू. ५८ मध्ये सीझरने पॉम्पीची एकुलती एक कन्या ज्यूलिआ हिच्याशी विवाह करुन शासकत्रयाच्या निर्मितीसाठी पॉम्पीशी केलेली युती अधिक दृढ केली.
सीझरची कॉन्सलपदाची मुदत संपल्यावर त्याला सिसलपाइन गॉल, इलिरिकम आणि ट्रान्सअल्पाइन गॉल ह्या तीन प्रांतांचे गव्हर्नरपद मिळाले. सिसलपाइन गॉलमध्ये सत्ता प्राप्त झाल्यानंतर सीझरला लष्करभरतीची संधी मिळाली. ट्रान्सअल्पाइन गॉलमधल्या सत्तेमुळे सीझरला रोमच्या वायव्य सरहद्दीपलीकडील भागात लष्करी मोहिमा काढून विजय मिळविण्याची संधी मिळाली.
इ. स. पू. ५८— ५० ह्या काळात सीझरने गॉलवर मिळविलेला विजय ही त्याच्या आयुष्यातली एक संस्मरणीय घटना होती (गॉलप्रदेश : ऱ्हाईनच्या दक्षिण व पश्चिमेकडील तसेच आल्प्सच्या पश्चिमेकडील आणि पिरेनीजच्या उत्तरेकडील प्रदेश. आजचा फ्रान्स, बेल्जियमचे काही भाग, प. जर्मनी आणि उ. इटली). केल्टिक लोकांनी (गॉल प्रदेशातले रहिवासी म्हणून गॅलिक) हा प्रदेश व्यापलेला होता. त्यांचा रोमला सतत उपद्रव होत असे. इ. स. पू. १२४— १२१ मध्ये त्यांच्या विरुद्घ झालेल्या मोहिमेत रोमनांना आल्प्स आणि पिरेनीजच्या दरम्यान असलेल्या गॉलच्या प्रदेशाचा ताबा मिळालेला होता. इ. स. पू. ५८ मध्ये सीझरने गॉलचा उरलेला प्रदेश जिंकून घेतला. सीझरचा हा विजय आश्चर्यकारक होता कारण रोमनांचे लष्करी सामर्थ्य व साधनसामग्री गॅलिक लष्करापेक्षा अधिक श्रेष्ठ होती असे नाही उलट गॅलिक घोडदळ रोमनांच्या घोडदळापेक्षा अधिक सामर्थ्यवान होते. तथापि डावपेच, शिस्त आणि लष्करी संयोजन ह्यांत रोमनांचे श्रेष्ठत्व सामावलेले होते. गॉलवरील विजयामुळे सीझर हा राजकारणीच नव्हे, तर विलक्षण लष्करी प्रतिभेचा सेनानी आहे, हे दिसून आले तथापि सीझरच्या विजयामुळे शासकत्रयामध्ये राजकीय कलह निर्माण होऊ लागले. पॉम्पीचे मन सीझरबाबत संशयग्रस्त झाले आणि तो श्रेष्ठ सभेच्या बाजूला झुकला. गॉलमध्ये सीझर आपल्या सत्तेचा पाया बळकट करतो आहे, हे पाहणारा क्रॅसस मत्सरग्रस्त झाला. सीझर गॉलमध्ये अधिकारशाही वृत्तीने वागला, त्यामुळे तिथल्या जमातींमध्ये असंतोष निर्माण झाला त्याबद्दल त्याला जाब विचारावा आणि गॉलमधून त्याला परत बोलवावे, अशी हाकाटी सीझरच्या राजकीय शत्रूंनी सुरु केली होती.
शासकत्रय टिकविण्याच्या दृष्टीने इ. स. पू. ५६ मध्ये सीझर, पॉम्पी आणि क्रॅसस हे तिघे इटलीमधील ल्यूका ह्या शहरात एकत्र आले होते. परस्परांत देवाणघेवाण ठरली. तीनुसार पॉम्पी आणि क्रॅसस ह्यांना इ. स. पू. ५५ साठी कॉन्सलपद मिळावे सीझरला गॉलमध्ये आणखी पाच वर्षे सत्ता मिळावी क्रॅसस आणि पॉम्पी ह्यांना अनुक्रमे सिरिया आणि स्पेन येथे पाच-पाच वर्षांचा पदावधी मिळावा, असे ठरले. तात्पुरता सलोखा झाला. इ. स. पू. ५२ मध्ये गॉलमध्ये सीझरविरुद्घ बंड झाले पण सीझरने ते मोडून काढले. सीझर दीर्घकाळ रोमपासून दूर राहिल्यामुळे त्याची राजकीय ताकद काहीशी कमी झालेली होती तथापि आपल्या माणसांच्या मार्फत तसेच भरपूर पत्रव्यवहाराच्या मार्गाने तो रोमच्या संपर्कात राहिला होता. त्याच्या लष्करी मोहिमांतून जो आर्थिक फायदा झाला होता. त्याचा उपयोग त्याने रोममध्ये इमारती बांधण्यासाठी केला. त्याच्या मोहिमांनाही प्रसिद्घी देण्यात आली. लोकांवर तसेच सिसरोसारख्या नेत्यांवर प्रभाव टाकण्याचा हेतू त्यात होता. आपल्या मोहिमांबद्दल सीझरने लिहिलेल्या कॉमेंटरीज मध्ये त्याने स्वतःच्या कृतींचे समर्थन करण्यासाठी वस्तुस्थितीचा विपर्यासही केलेला दिसतो असे आधुनिक अभ्यासकांचे म्हणणे आहे. सीझरची राजकीय ताकद कमी झालेली असताना पॉम्पीने मात्र रोममध्ये राहून राजकीयदृष्ट्या स्वतःची स्थिती बळकट केली होती. त्यातच इ. स. पू. ५४ मध्ये पॉम्पीची कन्या म्हणजेच सीझरची पत्नी मरण पावली आणि सीझरचा पॉम्पीशी असलेला तो नात्याचा बंध तुटला. इ. स. पू. ५३ मध्ये क्रॅससचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे पॉम्पी आणि सीझर ह्यांच्यात सत्तासंघर्ष सुरु झाला.
गॉलचा प्रोकॉन्सल म्हणून सीझरचा पदावधी इ. स. पू. ५० मध्ये संपत होता. सत्तेचे संरक्षक कवच दूर झाल्यावर तो रोमचा एक साधा नागरिक झाला असता. तसे झाल्यास त्याच्या सत्तेच्या काळात त्याने केलेल्या अवैध कृतींबद्दल त्याच्यावर खटला भरला गेला असता, त्याचे विरोधक ह्यासाठी टपून होते. पॉम्पीचा श्रेष्ठ सभेवर मोठा प्रभाव निर्माण झालेला होता. सीझरला शिक्षा झाली असती. कदाचित जीवही गमवावा लागला असता. एखाद्या राजकीय विरोधकाला संपविण्याची रोमन प्रजासत्ताकात ही पद्घतच होती. सीझरला आपला राजकीय सर्वनाश घडू द्यायचा नव्हता. प्रोकॉन्सल असतानाच त्याला इ. स. पू. ४९ साठी कॉन्सल म्हणून निवडून यावयाचे होते. वस्तुतः इ. स. पू. ५२ मध्ये सीझरला कॉन्सलपदाची निवडणूक त्याच्या गैरहजेरीत (इन ॲबसेन्शिया) लढविण्याची अनुज्ञा देणारे विधेयक श्रेष्ठ सभेने मंजूर केले होते परंतु त्यामुळे कॉन्सलपद मिळेपर्यंत प्रोकॉन्सलपदी राहण्याचा अधिकार त्याला प्राप्त होत नव्हता. त्यामुळे त्याने गॉलमधली सत्ता सोडावी, असा आदेश श्रेष्ठ सभेने त्याला दिला. इ. स. पू. १ जानेवारी ४९ रोजी सीझरने श्रेष्ठ सभेला असे कळविले, की त्याच्याबरोबर पॉम्पीनेही सत्ता सोडावी. सीझरच्या या प्रस्तावाला पॉम्पीने विरोध केला तेव्हा सीझरने श्रेष्ठ सभेला आव्हान देऊन यादवी युद्घ सुरु केले. हे युद्घ श्रेष्ठ सभेच्या बहुसंख्य सदस्यांना नको होते पण सीझरचा सर्वनाश घडवून आणायला पुढे सरसावलेले काही थोडे सदस्य युद्घ करायचा निर्धार बाळगून होते. पॉम्पीच्या मनाची अवस्था द्विधा होती. त्याला यादवी युद्घ नको होते पण श्रेष्ठ सभेत त्याला प्राप्त झालेले प्रभावी स्थानही सोडायचे नव्हते. अखेरीस तो सीझरशी लढण्यासाठी उभा राहिला. सीझरच्या अनुभवी आणि चिवट सैन्यापुढे पॉम्पीचा टिकाव लागेना. इ. स. पू. ९ ऑगस्ट ४८ रोजी सीझरने यादवी युद्घात निर्णायक विजय मिळविला. पॉम्पी आधी ग्रीसमध्ये पळून गेला आणि नंतर ईजिप्तमध्ये टॉलेमीच्या आश्रयासाठी गेला. तेथे त्याचा खून झाला. सीझर आता रोमचा सर्वंकषसत्ताधारी झाला.
पॉम्पीचा खून झाल्यानंतर सीझर ईजिप्तमध्ये गेला. तेथे राजकीय अराजक माजल्याचे त्याने पाहिले. ईजिप्तच्या वारसा हक्काबद्दल तेथे संघर्ष उद्भवला होता. आपले वडील टॉलेमी बारावे ह्यांच्यानंतर आपला धाकटा भाऊ टॉलेमी तेरावा ह्याच्यासह गादीवर आलेली ईजिप्तची राणी ⇨ क्लीओपात्रा ( इ. स. पू. ६९?–३०) हिची आणि सीझरची भेट झाली. इ. स. पू. ४८ मध्ये तेराव्या टॉलेमीच्या पालकांनी क्लीओपात्राला गादीवरुन दूर करुन ईजिप्तची सत्ता आपल्या पाल्यासाठी ताब्यात घेतली होती. ह्याच वेळी सीझर ईजिप्तमध्ये आला होता. क्लीओपात्राच्या तो प्रेमात पडला. त्याने तिच्या विरोधकांचा पराभव करुन तिला पुन्हा गादीवर बसविले आणि तेरावा टॉलेमी बुडून मेल्यामुळे चौदाव्या टॉलेमीला क्लीओपात्राचा सहराज्यकर्ता म्हणून नेमले. इ. स. पू. ४७ मध्ये क्लीओपात्राने एका पुत्राला जन्म दिला. तो सीझरपासून झाल्यामुळे त्याचे नाव सीझेरियन असे ठेवले.
रोमचा सर्वंकष सत्ताधारी झाल्यानंतर सीझरने आफ्रिका, फार्दर स्पेन अशा ठिकाणी त्याला होणारा विरोध मोडून काढला आणि मग रोमला परत येऊन ग्रीको-रोमन जगाची त्याला अभिप्रेत असलेल्या कल्पनांप्रमाणे व्यवस्था लावण्याचे काम त्याने हाती घेतले पण ह्या प्रचंड कामासाठी एक वर्षाहूनही कमी काळ त्याच्या हाताशी होता, ह्याची त्याला कल्पना नव्हती. त्याला ठार मारण्याचे कारस्थान रचले जात होते. ह्या कारस्थानात साठजण सामील होते. त्यांत काही पूर्वीचे सीझरनिष्ठही होते.सीझरच्या राजवटीचे सतत वाढत जाणारे राजेशाही स्वरुप त्यांना मान्य नव्हते. सीझरला रोमच्या राजकारणातून नाहीसा केल्याने ह्यांतील काहींचा फायद्यापेक्षा तोटाच होण्याची शक्यता होती. सीझरने ज्याचे राजकीय भविष्य घडविले होते, अशाही व्यक्ती त्यांत होत्या. ह्याचे ठळक उदाहरण म्हणजे ⇨ मार्कस ज्यूनिअस ब्रूटस ( इ. स. पू. सु. ८५–४२). यादवी युद्घात ब्रूटस पॉम्पीच्या सैन्यातून सीझरशी लढला होता. तरीही यादवी युद्घ जिंकल्यानंतर सीझरने त्याला क्षमा करुन सिसलपाइन गॉलचा गव्हर्नर ( इ. स. पू. ४६) नेमले होते. त्याचप्रमाणे प्रेटरपदही दिले होते ( इ. स. पू. ४४) तथापि ब्रूटस हा प्रजासत्ताकवादी असल्यामुळे तत्त्वनिष्ठेने ह्या कटात सामील झालेला होता. सीझरला मारल्यानंतर रोमचे सरकार आपला प्रजासत्ताक चेहरा पुन्हा मिळविल, अशी त्यांच्यापैकी अनेकांची धारणा होती. सीझरला ह्या कारस्थानाचा पत्ता लागला नाही किंवा त्यासंबंधांतले इशारे त्याने ओळखले नाहीत. परिणामतः श्रेष्ठ सभेच्या गृहामध्ये मारेकऱ्यांनी त्याला भोसकून ठार मारले.त्याचे काही जुने मित्र आणि त्याने उपकृत केलेले काही लोक मारेकरी म्हणून समोर आलेले पाहून – विशेषतः ब्रूटसला त्यांच्यात पाहून – सीझर आश्चर्यचकित झाला होता.
सीझरचा खून झाला नसता, तर तो आणखी दहा-पंधरा वर्षे जगला असता. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षांत त्याला अपस्माराचे झटके येत असत पण एकंदरीने त्याची प्रकृती कणखर होती. त्याच्या अखेरच्या वर्षांत त्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे केली होती. त्याने श्रेष्ठ सभेच्या सदस्यांची संख्या ६०० पर्यंत वाढविली मतदानाचा हक्क अधिक लोकांना दिला, तसेच ठिकठिकाणी रोमच्या वसाहती निर्माण केल्या. इ. स. पू. ४६ मध्ये त्याने रोमन दिनदर्शिकेत सुधारणा केल्या. जुनी रोमन दिनदर्शका सदोष होती. त्याचा उपयोग राजकीय हेतूंसाठीही करण्यात येई. ज्यूलिअन दिनदर्शिका म्हणून ओळखली जाणारी सीझरची दिनदर्शिका ईस्टर्न ऑथ्रॉडॉक्स ख्रिश्चन देशांत अंशतः उपयोगात आणली जाते. पश्चिमी देशांत वापरली जाणारी ग्रेगरिअन दिनदर्शिका ही ज्यूलिअन दिनदर्शिका आहे. फक्त त्यात पोप ग्रेगरी तेरावे ह्यांनी थोडेसे बदल केलेले आहेत. सीझरच्या आधी होऊन गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी कार्थेज आणि कॉरिंथ ह्या शहरांचा विध्वंस केलेला होता. सीझरने त्यांचे पुनरुज्जीवन केले. परदेशी व्यक्तींना रोमचे नागरिक करुन घेण्यातही त्याने उदार भूमिका घेतली.
सीझरने लेखनही विपुल केले. सीझरची भाषणे, त्याची पत्रे, पुस्तपत्रे हे सर्व आता उपलब्ध नाही पण गॅलिक युद्घ आणि सीझरने पॉम्पीच्या सैन्याबरोबर केलेले यादवी युद्घ ह्यावर सीझरने लिहिलेल्या कॉमेंटरीज (मूळ नाव-कॉमेंतारी दे बेल्लो गॅलिको आणि कॉमेंतारी दे बेल्लो सिव्हिली) उपलब्ध आहेत. ह्या कॉमेंटरीजचे स्वरुप संस्मरणिकांचे आहे. नियंत्रित, कोरडेपणाने घटना सांगणारी आणि तृतीय पुरुषी निवेदनाच्या अलिप्त शैलीने ह्या संस्मरणिका लिहिलेल्या आहेत. त्यांच्या निवेदनात आत्मसमर्थन आहेच आणि त्यासाठी काही घटनांचा विपर्यासही त्याने केला आहे. तथापि युद्घामधल्या आपल्या सहकाऱ्यांचे समर्थन करणे हाही त्याचा एक हेतू आहे. ह्या लेखनाने सुबद्घ लॅटिन गद्याचा एक सुंदर नमुना निर्माण केला. सीझरची कार्यशक्ती केवळ आश्चर्यकारक होती. भोवती अनेक प्रक्षुब्ध घटना घडत असताना आणि त्या हाताळाव्या लागत असतानाही तो शांतपणे आपले लेखन करु शकत होता. सीझरने लोककल्याणाची कामे केल्यामुळे त्याच्या हुकूमशाहीला लोकांचा पाठिंबा होता. त्याने रोमचा राजा व्हावे, अशा सूचना श्रेष्ठसभेतून येत होत्या पण त्याने राजपद स्वीकारले नाही. ग्रीक चरित्रकार ⇨ प्लूटार्क (इ. स. सु. ४६?–१२०?) आणि रोमन लष्करी सेनानी स्विटोनिअस ह्यांनी सीझरचे चरित्र लिहिले आहे.
संदर्भ : 1. Adcock, F. E. Caesar as Man of Letters, 1956.
2. Duggan, Alfred, L. Julius Caesar : A Great Life in Brief, 1955, New Ed. 1966.
3. Gelzer, M. Caesar : Politician and Statesman, 1921, Trans. 1968.
4. Holmes, T. R. E. Caesar’s Conquest of Gaul, 1899, 2d Ed. 1911.
5. Taylor, Lily Ross, Party Politics in the Age of Caesar, 1949.
कुलकर्णी, अ. र.
“