सिलोमेलेन : मँगॅनिजाचे महत्त्वाचे खनिज. शुद्घ रुपात याचे समचतुर्भुजी स्फटिक आढळतात [ ⟶ स्फटिकविज्ञान]. सामान्यपणे हे अस्फटिकी दिसते. हे संपुंजित, गुच्छाकार वा वृक्काकार (द्राक्षाच्या घडासारखे), स्तंभाकार, मातकट वा पुटांच्या रुपांत आढळते. कठिनता ५-६ वि. गु. ३·७-४·७ रंग लोखंडासारखा काळा किंवा पोलादासारखा गडद काळा कस उदसर काळा चमक उपधातवीय ते मंद अपारदर्शक रा. सं. Mn9O16(OH)4. यांतील मँगॅनिजाच्या जागी मॅग्नेशियम, कॅल्शियम, निकेल, कोबाल्ट वा तांबे ही मूलद्रव्ये येऊ शकतात. हे अगलनीय असून बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. इतर मँगॅनीज खनिजांपेक्षा हे अधिक कठीण असून यात स्फटिकरचना दिसत नाही. काळ्या कसामुळे हे लिमोनाइटाहून वेगळे ओळखू येते. हे पायरोल्यूसाइट, गोएथाइट, लिमोनाइट, हॉस्मनाइट, ब्राउनाइट, वाड इ. खनिजांबरोबर आढळते. पुष्कळदा मँगॅनस कार्बोनेट वा सिलिकेट खनिजांमध्ये बदल होऊन गडद करडे वा काळे सिलोमेलेन तयार होते. याचे मोठे अवशिष्ट निक्षेप तयार होऊ शकतात. तळी व दलदली यांमध्ये हे स्तरित निक्षेपांच्या वा मृत्तिकेच्या रुपांत विपुलपणे आढळते. तसेच कॅल्शियमी वा डोलोमाइटी खडकांत प्रतिष्ठापित रुपातील याचे साठे विपुलपणे आढळतात.

भारत, ब्राझील, अमेरिका, रशिया, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, स्कॉटलंड, स्वीडन इ. ठिकाणी आढळणाऱ्या मँगॅनिजाच्या धातुकांमध्ये (कच्च्या रुपातील धातूंमध्ये) हे एक प्रमुख खनिज म्हणून आढळते. भारतात धारवाडी संघातील गोंडाइट व कोडुराइट मालांत यांचे निक्षेप आढळतात. असे निक्षेप मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांत आहेत. महाराष्ट्रात हे खनिज नागपूर, भंडारा, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांत आढळते. मँगॅनीज धातूचे हे सामान्य खनिज तिचे महत्त्वाचे धातुकही आहे. या खनिजाचा पृष्ठभाग काळा व गुळगुळीत असतो, म्हणून टक्कल किंवा गुळगुळीत आणि काळा या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरुन याचे सिलोमेलेन हे नाव पडले आहे.

पहा : मँगॅनीज वाड.

सहस्रबुद्घे, य. शि. ठाकूर, अ. ना.