सिन्नर : महाराष्ट्र राज्याच्या नासिक जिल्ह्यातील एक नगर व त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. त्याचा सिंदिनगर, सिंदिनेर, सेऊणपूर, श्रीनगर वगैरे नावांनी उल्लेख आढळतो. लोकसंख्या ६५,२५१ (२०११). ते पुणे— नासिक रस्त्यावर नासिकच्या आग्नेयीस सु. २७ किमी.वर वसले आहे. मध्ययुगात नगराभोवती मातीची तटबंदी होती पण ती आता जवळजवळ नामशेष झाली आहे. सिन्नरचा उल्लेख १०६९ च्या ताम्रपटात सिंदिनेर असा आढळतो. गवळी राजा राव शिंगुणी याने हे नगर वसविले, अशी एक परंपरागत कथा आहे. तोच ताम्रपटातील सेऊनेन्डू असावा. याचा अंतर्भाव सेऊण देशात होत असल्यामुळे त्यावर यादव (सेऊण) वंशाची (११८५— १३१८) सत्ता होती व बाराव्या शतकापर्यंत सिन्नर (श्रीनगर) हे यादवांच्या राजधानीचे स्थळ होते. सतराव्या शतकात मोगलांची सत्ता या नगरावर होती व त्यांच्या चौदा ठाण्यांपैकी हे एक लष्करी ठाणे होते. अमृतराव देशमुख हा त्याचा मुख्य सरदार होता आणि त्यानेच ही मातीची तटबंदी बांधली व नदीला धरण बांधले. त्याच्या वाड्याचे अवशेष अद्यापि अवशिष्ट आहेत. मराठ्यांनी त्यावर १७९० मध्ये वर्चस्व मिळविले. पेशवाईच्या अवनतीनंतर (१८१८) ते इंग्रजी अंमलाखाली स्वातंत्र्यपूर्व काळात होते.
शिव आणि सरस्वती या नद्यांमुळे शहराच्या आसमंतातील जमीन ओलिताखाली आली आहे. या दोन नद्यांचा संगम जवळच आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गहू , बाजरी, तंबाखू, ऊस, भुईमुग ही काही प्रमुख पिके होत. याशिवाय विड्याची पाने व भात यांचे उत्पादन घेतले जाते. सिन्नर हे जिल्ह्यातील एक प्रमुख विणकाम केंद्र असून शहरात अनेक यंत्रमाग आहेत. त्यांपैकी काही विणकरांनी सहकारी उद्योगसमूह स्थापन केले आहेत. एके काळी शहरात विडी वळण्याचा उद्योग तेजीत होता. विड्या वळण्याचे पाचहून अधिक कारखाने असून, त्यावेळी अनेकांना रोजगार उपलब्ध झाला होता. येथील विड्या कर्नाटक व गोव्यात विशेष प्रसिद्घ होत्या.
नगरपालिकेची स्थापना (१८६०) झाल्यानंतर शहरात आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, जलनिःसारण वगैरे बाबींबरोबर प्राथमिक शाळा व नगरपालिकेमार्फत चालविले जाणारे रुग्णालय इ. सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भूमिगत जलनिःसारण योजना येथे कार्यान्वित आहे. शहरात पाच माध्यमिक विद्यालये असून तीन महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांपैकी दोन कला, वाणिज्य व शास्त्र विषयांची असून एक व्यवस्थापन व संगणक अभ्यासक्रमाचे आहे.
शहरात लहान मोठी काही मंदिरे असून त्यांपैकी दोन मंदिरे प्रेक्षणीय आहेत आणि एक भव्य गणपतीची मूर्ती आहे. या मंदिरांपैकी गोंडेश्वराचे मंदिर हे शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून त्याला तीन द्वारे आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. मंदिर नागरशैलीत— विशेषतः माळव्यात प्रचलित असणाऱ्या ‘भूमिज’ या उपशैलीत— बांधले आहे. ही शैली मूळ नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून तीत स्थानिक वैशिष्ट्ये डोकावतात. शिखराची घडण आणि मंदिराच्या पायाची आखणी यांत कलाकाराने समतोल साधला आहे. यादवकालीन शिखरांपैकी हे एक उभट पिरॅमिडप्रमाणे आकाशाकडे झेपावणारे सुरेख, भव्य व नमुनेदार शिखर असून छायाप्रकाशाचा समतोल त्यात साधला आहे मात्र शिखराचा वरचा भाग तुटला आहे. स्तंभ व मंडोवरावर काही देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. शहराच्या वायव्येला ऐश्वरेश्वर मंदिर असून ते चालुक्यशैलीत बांधले असले, तरी त्यांत नागरशैलीत आढळणारे स्तंभशीर्षांचे ज्ञापक सर्वत्र आढळते आणि सांप्रत त्याचे गर्भगृह व काही स्तंभच अवशिष्ट आहेत. स्तंभांवर तुळ्या आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस स्तंभ आहेत. स्तंभशीर्षावर सिंहाकृती असून मधल्या कंगोऱ्यात अनेक मूर्ती कोरल्या आहेत. त्यात कामशिल्पे आढळतात. भिंतीच्या तळाशीही शिल्पांकन आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर गजलक्ष्मी, शेषशायी विष्णू व सप्तमातृका यांच्या प्रतिमा आहेत. वितानात (छत) अष्टदिक्पालांच्या मूर्ती असून द्वाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपालांच्या मूर्ती आढळतात, तसेच समोरच्या भिंतीतील स्तंभांवर ब्रह्मा व विष्णू यांच्या सुरेख मूर्ती आहेत. प्राकारातील स्तंभ चौकोनी, षट्कोनी व अष्टकोनी असून त्यांवर विष्णूचे अवतार आणि नृत्यांगनांच्या सुंदर मूर्ती आहेत. त्याच्या वास्तुशैलीवरुन तज्ञांच्या मते ते अकराव्या शतकातील असावे.
अलीकडे येथे एक भूविज्ञानविषयक संग्रहालय स्थापन करण्यात आले असून, ते झिओलाइट खनिजासाठी प्रसिद्घ आहे.
संदर्भ : 1. Deshpande, S. R. Yadava Sculpture, Delhi, 2006 (Reprint).
2. Majumdar, R. C. Ed. Struggle for Empire, Bombay, 1998 (Reprint).
निगडे, रेखा