सिनॅगॉग : ज्यू धर्मीयांचे प्रार्थनामंदिर तसेच धार्मिक शिक्षण, पतितांना मार्गदर्शन, सामाजिक सेवा इत्यादींचे केंद्र. सिनॅगॉग हा शब्द Synagein ह्या ग्रीक शब्दावरुन आलेला आहे. ‘एकत्र आणणे’ हा ह्या शब्दाचा अर्थ. सिनॅगॉगमध्ये ज्यू वा यहुदी लोक प्रार्थनेसाठी एकत्र येतात, हे ह्या शब्दाच्या मूळ अर्थाशी सुसंगतच आहे. ज्यूंचा ह्या प्रार्थनास्थळांच्या अस्तित्वाचा मिळणारा पुरावा इ. स. पू. तिसऱ्या शतकापासूनचा असला, तरी त्या आधीही ती अस्तित्वात होती याविषयी उल्लेख आढळतात. इझ्राएलचा थोर राजा ⇨ सॉलोमन (इ. स. पू. दहावे शतक) ह्याने जेरुसलेम येथे बांधलेले ⇨ येहोवाचे महामंदिर इ. स. पू. सहाव्या शतकात उद्ध्वस्त झाल्यानंतर सिनॅगॉग अस्तित्वात आले, असे काही अभ्यासकांना वाटते. त्या काळात ज्यूंनी आपल्या खाजगी निवासस्थानांचा वापर एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी तसेच धार्मिक शिक्षण देण्यासाठी काही काळ केला होता. सिनॅगॉगच्या उभारणीच्या इतिहासाबाबत अभ्यासकांची काहीही मते असली, तरी ही प्रार्थनामंदिरे ज्यूंच्या धार्मिक जीवनाचा केंद्रबिंदू ठरली हे निश्चित. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील साहित्यात पॅलेस्टाइन, ग्रीस, ईजिप्त, बॅबिलोनिया, आशिया मायनर तसेच रोम शहरात अनेक सिनॅगॉग उभारले गेले असल्याचे निर्देश मिळतात.

आधुनिक सिनॅगॉगमध्ये प्रार्थना, ⇨ शब्बाथ सारख्या सणाच्या तसेच धार्मिक उत्सवांच्या प्रसंगी विशेष उपासना इ. पूर्वीचे कार्यक्रम होत असले, तरी आधुनिक काळाशी सुसंगत असे सामाजिक, मनोरंजनात्मक तसेच परोपकारी उपक्रमही हाती घेतले जातात. सिनॅगॉगची व्यवस्था लोकशाही पद्घतीने सांभाळली जाते. प्रार्थना आणि पवित्र ग्रंथांचा अभ्यास ह्यांतून ईश्वराला प्राप्त करुन घेणाऱ्या ठिकठिकाणच्या ज्यू जमातींनी सिनॅगॉग आणि त्यांची व्यवस्था उभी केलेली असते. इथे यज्ञयाग, आहुती देणे हे काही नसते. प्रत्येक सिनॅगॉग ही एक स्वायत्त संस्था असते. तिथले ⇨ राब्बी (ज्यू विद्वान तसेच धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकवणारे) अधिकारी हे करीत असलेल्या सेवेतून स्थानिक ज्यू जमातीच्या इच्छा प्रतिबिंबित होत असतात.

सिनॅगॉगमध्ये प्राचीन यहुदी धर्मपरंपरांच्या द्योतक अशा काही प्रतीकात्मक वस्तू असतात. त्यांत मुख्यत्वेकरुन ‘तोरा’ची एक पेटी असते. तोरा म्हणजे बायबल च्या ‘जुन्या करारा’चे पहिले पाच भाग (बुक्स) : (१) जेनिसिस, (२) एक्सोडस, (३) लेव्हिटिकस, (४) नंबर्स, (५) ड्यूटेरॉनॉमी. ज्यूंच्या दृष्टीने हे पाच भाग ⇨ मोझेसला थेट ईश्वराकडून प्राप्त झालेले असून, ज्यू ते अत्यंत पवित्र मानतात. सिनॅगॉगमध्ये वर्षभरात तोराचे पठण केले जाते. तोराच्या पेटीवर मोझेसला सिनाई पर्वतावर प्रत्यक्ष येहोवाकडून (ज्यू जमातीचा देव) प्राप्त झालेल्या (बायबल-एक्सोडस-२०) दहा आज्ञांपैकी प्रत्येकीचे पहिले दोन शब्द कोरलेला एक काष्ठलेख असतो. बायबलच्या एक्सोडस -४० ह्या प्रकरणात वर्णन केलेल्या मेणबत्त्यांच्या दिव्यांची स्मृती म्हणून सिनॅगॉगमध्ये सात वा नऊ मेणबत्त्या ठेवण्याच्या शाखांची दिवादाणी असते. तिला ‘मेनोरा’ (Menorah) असे म्हणतात. तोराच्या पेटीपुढे तेलाचा दिवा अखंड तेवत असतो. आराधना करणाऱ्याचे तोंड पूर्वेस राहील अशी सिनॅगॉगची रचना असते. बऱ्याच सिनॅगॉगमध्ये वेदी ही मध्यभागी असते. प्रार्थना म्हणणारा ‘कॅन्टॉर’(गायकवृंदातला मुख्य गायक) तिथे उभा राहतो व तो धर्मगुरु नसून आराधकांपैकी एक आहे, हे याने सुचविले जाते. प्राचीन सिनॅगॉगच्या भिंतींवर सिंहाच्या आकृत्या आढळतात. ह्या आकृत्या म्हणजे ज्यूंचा राजा ⇨ डेव्हिड (इ. स. पू. सु. १०१६— सु. ९७२) ह्याच्या कुलाची प्रतीके होत. अलीकडे बांधल्या जाणाऱ्या सिनॅगॉगच्या भिंतींवर बायबल मधील दृश्ये किंवा पाम वृक्षांच्या फांद्यांसारखी पवित्र दिवसांची चिन्हे असलेली चित्रे काढली जातात.

माहुलकर, दि. द. कुलकर्णी, अ. र.

वास्तुकला : सिनॅगॉग वास्तू प्रथमतः केव्हा बांधल्या गेल्या, ह्याचा निश्चित काळ उपलब्ध नाही. बॅबिलोनियन पारतंत्र्य काळात (इ. स. पू. सहावे शतक) काही सिनॅगॉग बांधली गेल्याचे उल्लेख आढळतात पण काळाच्या ओघात त्यांचा विध्वंस झाला. जेरुसलेम येथे इ. स. पू. पहिल्या शतकात सिनॅगॉग असल्याचा उल्लेख तेथील एका प्राचीन कोरीव लेखात आढळतो. प्राचीन काळातील एक चांगल्या स्थितीतील अवशिष्ट सिनॅगॉग वास्तू ही कॅपरनॉम येथील इ. स. दुसऱ्या शतकातील होती. ही दक्षिणाभिमुख असून ओबडधोबड दगडी बांधकामात होती. जेरुसलेच्या प्राचीन सिनॅगॉग मंदिरांतील वास्तुरचनेची काही वैशिष्ट्ये पुढील काळातही टिकून राहिली. त्यानुसार सिनॅगॉगमध्ये स्त्रियांसाठी वेगळे राखीव कक्ष ठेवले जात. इ. स. तिसऱ्या शतकापासून पुढे विथीच्या (गॅलरी) आकारात त्यांची रचना केली जाऊ लागली. खालच्या मजल्यावर पुरुषांसाठी व वरच्या मजल्यावर स्त्रियांसाठी अशी ही आसनव्यवस्था होती. सिनॅगॉगला सर्वरुढ, प्रचलित अशी विशिष्ट प्रमाणभूत वास्तुरचना वा वास्तुशैली नसली, तरी काही घटक सिनॅगॉगच्या वास्तूंध्ये सर्वत्र समान असल्याचे आढळून येते. सिनॅगॉगचे वास्तुविधान सामान्यतः आयताकृती असते व आराधना करणाऱ्या उपासकाचे तोंड पूर्वेकडे राहील, अशी त्याची वास्तुरचना असते. स्त्रियांसाठी वेगळे, वीथीच्या स्वरुपातले प्रार्थनाकक्ष हेही सिनॅगॉगचे सर्वत्र समान असे वैशिष्ट्य आढळून येते. तोराचे लेखपट असलेली काष्ठपेटी (आर्क) ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कमानदार कोनाडेवजा जागा वा कपाट आणि त्याच्या समोर धर्मोपदेशकाचे उच्च आसनपीठ, अशी रचना साधारणपणे सर्वच सिनॅगॉग वास्तूंमध्ये समान होती. मध्ययुगात सिनॅगॉग कमी प्रमाणात बांधली गेली तथापि ह्या काळापासून सिनॅगॉगमध्ये तोराच्या लेखपटाची काष्ठपेटी जेरुसलेमच्या दिशेला असलेल्या भिंतीच्या समोर ठेवण्याचा प्रघात पडला. पेटीसमोर अखंड तेवणारा दिवा (इटर्नल लाइट) हे सर्वच सिनॅगॉग वास्तूंचे लक्षणीय वैशिष्ट्य होते. ‘टॅबरनॅकल ’च्या (उपासनास्थान) वेदीवरील अखंड धगधगत्या अग्नीची स्मृती (लेव्हिटिकस : ६:६) तसेच चिरंतन श्रद्घेचे प्रतीक म्हणूनही हा दिवा सतत तेवत ठेवला जाई.


जगभरातल्या सिनॅगॉगच्या इमारतींवर—विशेषतः त्यांची वास्तुरचना, सजावट व वास्तुकल्प या घटकांवर-प्रादेशिक व स्थानिक वैशिष्ट्यांचा प्रभाव जाणवतो. ज्या प्रदेशांत ही सिनॅगॉग बांधली गेली, तेथील स्थानिक घटक, वास्तुशैली इत्यादींचा सिनॅगॉगच्या वास्तुरचनेत वापर करुन घेतल्याचे दिसून येते. उदा., ॲलेक्झांड्रिया (ईजिप्त) येथील सिनॅगॉग प्रचलित बॅसिलिकाच्या आकारात बांधली गेली. उत्तर आफ्रिका व स्पेन येथील सिनॅगॉग वास्तूंवर मूर लोकांच्या ‘मूरिश’ वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. मध्ययुगीन ख्रिस्ती यूरोपमधील सिनॅगॉग वास्तू रोमनेस्क व गॉथिक शैलीत बांधल्या गेल्या. उदा., वर्म्झ (जर्मनी) येथील रोमनेस्क वास्तुशैलीतील सिनॅगॉग, प्रागमधील गॉथिक शैलीतील सिनॅगॉग आणि स्पेनमधील दोन सिनॅगॉग (त्यांचे पुढे ख्रिस्ती चर्चमध्ये रुपांतर झाले) उल्लेखनीय आहेत. पोलंडमध्ये एक खास वैशिष्ट्यपूर्ण व पृथगात्म असा सिनॅगॉगचा वास्तुप्रकार उदयाला आला. त्याची वास्तुरचना स्थानिक काष्ठमाध्यमात व चित्ररम्य शैलीत होती. उदा., वोल्मा, पोलंड येथील लाकडी बांधकामातील सिनॅगॉग वास्तू (१६५०) ही जर्मनांनी दुसऱ्या महायुद्घात नष्ट केली. प्रबोधनकाळाच्या उत्तरार्धातील वैशिष्ट्यपूर्ण सिनॅगॉग वास्तूंमध्ये ॲम्स्टरडॅम येथील सिनॅगॉग (१६७५) व लंडनच्या बेव्हिस मार्क्समधील सिनॅगॉग (१७००-०१) ह्यांचा उल्लेख करता येईल. लंडनच्या ड्यूक स्ट्रिट, अल्डगेट येथील ‘ग्रेट सिनॅगॉग’ ह्या भव्य वास्तूचे पुनर्बांधकाम करण्यात आले मात्र पुढे दुसऱ्या महायुद्घातील बाँबहल्ल्यात ती पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आली. एकोणिसाव्या शतकातील लंडन येथील ग्रेट पोर्टलंड स्ट्रिटवरील सिनॅगॉग वास्तू मूरिश शैलीत होती व अलीकडे ती जमीनदोस्त करण्यात आली. अमेरिकेतील सर्वांत जुनी सिनॅगॉग वास्तू (१७६३) न्यू पोर्ट, ऱ्होड आयलंड येथे आहे. पारंपरिक सिनॅगॉग वास्तूंमध्ये काष्ठपेटी, धर्मपीठासन यांच्याबरोबरच अनेक शाखांनी युक्त अशा दोन मेणबत्ती-दिवादाण्या, साधकांना बसण्यासाठी पाठीचे लांबट बाक, सिनॅगॉगलगतच विधियुक्त स्नानाची जागा इ. घटक असतात. आधुनिक काळातील सिनॅगॉग-संकुलांत ग्रंथालय, पाठशाळा, सभास्थाने, व्यायामादी सोयीसुविधा उपलब्ध असतात. प्राचीन जेरुसलेम महामंदिराच्या विध्वंसाच्या (इ. स. पू. ५८६) दुःखद स्मृतींची निशाणी म्हणून सिनॅगॉगमध्ये सर्व वाद्यसंगीत परंपरेने निषिद्घ ठरविण्यात आले होते. तथापि ज्यू सुधारणावादी चळवळींमुळे एकोणिसाव्या शतकात सिनॅगॉगमध्ये ऑर्गन हे वाद्य दाखल करण्यात आले व ऑर्गनवादन रुढ झाले. सुधारणावादी सिनॅगॉग मंदिरांत पठणकर्त्याचे व्यासपीठ (बिमाह) मध्यभागापासून पुढे दर्शनी भागात हलवण्यात आले असून, तेथे स्त्रीपुरुष एकत्रित उपासना करतात. (चित्रपत्र).

अविशिष्ट प्राचीन सिनॅगॉग (२ रे शतक), कॅपरनॉम, इझ्राएल

क्फार बिरिम सिनॅगॉग, दर्शनी भाग (तिसरे शतक), इझ्राएलवम्र्झ (जर्मनी) येथील सिनॅगॉगचा अंतर्भाग (११ वे शतक)

इनामदार, श्री. दे.