सितापराइट : हे मँगॅनीज-लोह ऑक्साइडयुक्त खनिज असून याचे रा. सं. (Mn, Fe)2O3 असे आहे. मोस मापक्रमानुसार याची कठिनता ७ आणि वि. गु. ५ असते. याचे ⇨ पाटन चांगले असून याचा रंग काशाच्या गडद रंगासारखा व कस काळा असतो. हे दुर्बल चुंबकीय असून सामान्यपणे याचे स्फटिकीभवन क्वचितच होते. काही ठिकाणी रायोलाइट खडकाच्या पोकळ्यांमध्ये याचे घनाकार व काळे स्फटिक आढळले आहेत. भारतात हे ⇨ धारवाडी संघाच्या खडकांत आढळणाऱ्या मँगॅनिजाच्या धातुकांमात (कच्च्या रुपातील धातूत) आढळते. छिंदवाडा जिल्ह्यातील सितापार येथे हे प्रथम आढळल्याने याचे नाव सितापराइट ठेवले आहे. बिक्सबिआइट व पॅट्रिडगाइट ही याची पर्यायी नावे आहेत.
ठाकूर अ. ना.