सिंधमधील शैलसमूह : पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील शैलसमूहांत मुख्यतः सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या तृतीय कल्पातील शैलसमूह, तसेच त्या आधीच्या सु. १४ ते ६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या क्रिटेशस कल्पातील थोडे शैलसमूहही येतात. यांपैकी तृतीय कल्पातील निक्षेपांची मोठी मालिका कीर्थर, लाकी, बुग्टी, सुलेमान इ. टेकड्यांच्या रांगांमध्ये नमुनेदार रीतीने उघडी पडली आहे. या निक्षेपांचा तेथे झालेला क्रमवार विकास हा असाधारण स्वरुपाचा आहे व त्याचा तपशीलवार अभ्यासही झाला आहे. यामुळे उर्वरित भारतातील या कल्पातील खडकांच्या पद्घतशीर अध्ययनासाठी तेथील शैलसमूह नमुना म्हणून स्वीकारले आहेत. सिंधमधील तृतीय कल्पातील खडकांच्या मालिकांची माहिती थोडक्यात पुढे दिली असून या मालिका वाढत्या वयानुसार पुढे दिल्या आहेत. यांपैकी पुष्कळ मालिकांची नावे तेथील टेकड्यांच्या मालिकांच्या नावांवरुन पडली आहेत. शेवटी सिंधमधील क्रिटेशस शैलसमूहांची माहिती दिली आहे.

मंचर संघ : या सु. ३,००० मी. जाडीच्या शैलसमूहाचे नाव मंचर सरोवरावरुन पडले आहे. यात खाली व वर करडे वालुकाश्म ⇨ पिंडाश्मांसह असून, मध्यभागी तपकिरी व नारिंगी शेल खडक व मृत्तिका आहेत. या संघाचे वय मध्य मायोसीन ते उत्तर प्लायोसीन किंवा पूर्व प्लाइस्टोसीन (सु. १·५ कोटी ते ३ लाख वर्षांपूर्वीच्या) काळाएवढे आहे. या वालुकाश्मात जीवाश्म (शिळारुप झालेले जीवावशेष) आढळत नाहीत. मात्र खालच्या पिंडाश्मांत मॅस्टोडॉन, डायनोथेरियम, गेंडे इत्यादींचे दात व सर्वांत खाली पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. मुख्यतः हे शैलसमूह नादेय (नदीच्या क्रियेने बनलेले) आहेत. मात्र दक्षिणेकडे ते नदीमुखीय व सागरी स्वरुपाचे होत गेलेले आढळतात.

गज मालिका : या सु. ४५० मी. जाडीच्या मालिकेत सागरी पिवळे चुनखडक व शेल, तसेच जीवाश्म असून हिच्या खालील भागात शेल, चुनखडक, मार्ल व वालुकामय चुनखडक आढळतात. हिचे वय पूर्व मायोसीन (सु. २ ते १ कोटी वर्षांपूर्वीचा) काळ आहे.

नारी मालिका : या सु. १,९०० मी. जाडीच्या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेचे खडक किर्थर मालिकेच्या खडकांवरील भासमान विसंगतीनंतर वसले आहेत [⟶ विसंगति, भूवैज्ञानिक]. हिच्या वरच्या भागात वालुकाश्माच्या जाड थरांत जीवाश्म नाहीत. हे वालुकाश्म अंशतः नादेय आहेत. नारी नदीच्या किनाऱ्यावर घेतलेल्या छेदात या खडकांचे प्रथम निरीक्षण करण्यात आल्याने मालिकेचे नाव नारी मालिका असे पडले आहे. या वालुकाश्मांत गोड्या पाण्यात तयार झालेले व सस्तन प्राण्यांचे जीवाश्म असलेले बुग्टी थर बलुचिस्तानात आहेत. या मालिकेच्या वरच्या व खालच्या भागांदरम्यान विसंगती असून, खालच्या भागात जीवाश्मयुक्त सागरी चुनखडक आहे. खालच्या भागाचे वय ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीचा) काळ तर वरच्या भागाचे वय पूर्व मायोसीन आहे.

कीर्थर मालिका : या सु. २,७०० मी. जाडीच्या मालिकेत सिंध मधील सर्व उंच टेकड्यांवरील टोपीसारखा संपुंजित, समांग व पांढरा न्युम्युलिटिक चुनखडक येतो. यात एकिनॉयडिया, फोरॅमिनीफेरा, बायव्हाल्‌व्हिया (शिंपाधारी ) व गॅस्ट्रोपोडा (शंखधारी) या वर्गांतील प्राण्यांचे विपुल जीवाश्म आढळतात. बलुचिस्तानाच्या पश्चिमेकडील चुनखडकांशी निगडित असलेली ही मालिका जगातील वैशिष्ट्यपूर्ण मालिका आहे. ही मालिका लाकी मालिकेवरील अल्पशा विसंगतीवर वसलेली असून तिचे वय उत्तर इओसीन (सु. ४·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीचा) काळ आहे.

लाकी मालिका : या सु. १५० ते २५० मी. जाडीच्या मालिकेत वर जाड न्युम्युलिटिक चुनखडक असून त्यात खनिज तेलयुक्त थर आहेत. तसेच हिच्यातील मृण्मय व कॅल्शियमयुक्त शेल खडकांत दगडी कोळशाचे लहान थर आहेत. शिवाय हिच्यात अल्व्हीओलिना चुनखडक, वेडेवाकडे रंगीत पट्टे असलेला हिरवा शेल, मार्ल, लिग्नाइटयुक्त शेल, मऊ चुनखडक, मेटिंग चुनखडक व तळाशी जांभा खडक आढळतो. तेथे सपुष्प वनस्पतींच्या पानांचे ठसे, फळे, बीजे इ. अवशेष आढळतात. हिच्या तळाशी विसंगती असून तिच्याखाली राणीकोट मालिका येते. लाकी मालिकेचे वय मध्य इओसीन आहे.

राणीकोट मालिका : या सु. २०० मी. जाडीच्या मालिकेचे नमुनेदार क्षेत्र लाकी रांगेत राणीकोट येथे उघडे पडले आहे. हिच्या वरील भागात जीवाश्मयुक्त तपकिरी चुनखडक व शेल असून त्याचे वय पूर्व इओसीन आहे. खालील भागात वेडेवाकडे रंगीत पट्टे असलेले शेल आणि वालुकाश्म असून त्यात जिप्सम व कार्बन आहेत. या भागाचे वय सु. ६ कोटी वर्षे आहे. या मालिकेच्या खालील भासमान विसंगतीखाली कार्डिटा ब्यूमाँटी थर किंवा ⇨ दक्षिण ट्रॅ आहेत.

क्रिटेशस शैलसमूह : यांत पुष्कळ जीवाश्म आढळतात. यांपैकी उत्तर क्रिटेशस (सु. १६ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडक फक्त लाकी रांगांत आढळतात. यातील तळाच्या सु. ९० मी. जाडीच्या चुनखडकांत एकिनॉइड व मृदुकाय प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. यांपैकी मृदुकाय प्राण्यांची हिप्पुराइट ही प्रजाती जगभरातील क्रि टेशस कालीन खडकांची वैशिष्ट्यदर्शक आहे. पर्शियातील अधिक व्यापक हिप्पुराइट चुनखडकाचा हा स्थानिक प्रतिनिधी आहे. यानंतर वालुकाश्म व शेल गट असून पुष्कळदा त्यांत लोहाचे प्रमाण उच्च असते. यातील काही थरांत ॲमोनाइट जीवाश्म (उदा., इंडोसेरस, पॅचिडिस्कस) आढळतात. या गटावर जीवाश्महीन फ्लिश प्रकारचा अतिशय सूक्ष्मकणी, जाड वालुकामय शेल व वालुकाश्म येतात. वरच्या वालुकाश्म गटाला पाब वालुकाश्म म्हणतात आणि त्याच्या माथ्यालगतच्या थरांत तपकिरी हिरवा (ऑलिव्ह) शेल व मऊ वालुकाश्म आढळतात. कार्डिटा ब्यूमाँटी हा या शेलमधील सर्वांत सामान्य जीवाश्म आहे. हा अत्यंत गोल शिंपा असलेला शिंपाधारी प्राणी असून त्यावरुन या थराला कार्डिटा ब्यूमाँटी थर म्हणतात. यात सामथेरिआ, टरिटेला, नॅटिका तसेच प्रवाळे, एकायनोडर्म व मगरीसारखे पृष्ठवंशी प्राणी यांचेही जीवाश्म आढळतात. जीवाश्मांवरुन कार्डिटा ब्यूमाँटी थर सु. १४ कोटी वर्षांपूर्वीचे (क्रिटेशसचा सर्वोच्च काळ) असल्याचे मानतात. यावरील दक्षिण ट्रॅपच्या चादरीसारख्या थरांमध्ये सु. ३३ मी. जाडीचा एक थर बदामी कुहरयुक्त (पोकळ्यायुक्त) बेसाल्टाचा आहे.

पहा : शैलसमूह, भारतातील.

संदर्भ : 1. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

2. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

3. Pascoe, E. H. A Manual of The Geology of India and Burma, 4 Vols., Calcutta, 1962.

4. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.

ठाकूर, अ. ना.