सिंग, माधवेंद्र : ( ? १९४५– ). भारताचे माजी नौसेनाप्रमुख आणि एक निष्णात गोलंदाज. त्यांचा जन्म लष्कराची परंपरा असणाऱ्या कुटुंबात राजस्थानातील चोमू गावी (जि. जयपूर) झाला. त्यांचे वडील मेजर जनरल के. भगवती सिंग हे इंडियन मिलिटरी ॲकॅडेमीमधून उत्तीर्ण झालेल्या पहिल्या चमूतील (बॅच) एक कॅडेट होते. जयपूरमधील सेंट झेव्हिअर स्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमीत) त्यांनी लष्करी शिक्षण घेतले आणि १ जानेवारी १९६३ रोजी ते नौदलात कमिशन मिळवून प्रविष्ट झाले. अष्टपैलू कॅडेट म्हणून त्यांना दूरदर्शक भेट म्हणून मिळाला. शिवाय निष्णात आरमारी अधिकारी म्हणून मानाची प्रतिष्ठित तलवार देण्यात आली. गोलंदाजीतही त्यांनी विशेष कौशल्य दाखविले.त्यांनी गोलंदाजीतील अभ्यासक्रम युनायटेड किंग्डममधील रॉयल मिलिटरी कॉलेज ऑफ सायन्स (सायीव्हनम) मधून पूर्ण केला. वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. पुढे त्यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील नेव्हल वॉर कॉलेज (न्यूपोर्ट, ऱ्होड आयलंड) तसेच नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) मधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यांची कोचीनच्या नेव्हल ॲकॅडेमीत ‘तलवार ’ या क्षेपणास्त्रसज्ज लढाऊ जहाजावर मुख्य अधिकारी (कमांडंट) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ‘ विराट ’ या विमानवाहू लढाऊ जहाजावर त्यांनी काम केले. ‘विराट’, ‘रणवीर’, ‘तलवार’ या लढाऊ जहाजांचे त्यांनी प्रमुखपद (कमांडंट) भूषविले. याशिवाय त्यांनी अन्य महत्त्वाची पदे नौदल आणि लष्करात भूषविली. त्यांमध्ये पश्चिम नौदलाचे प्रमुख (चीफ कमांडंट), डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन) मधील प्रमुख प्रशिक्षक वगैरेंचा अंतर्भाव होतो. नौदलाच्या धोरणात्मक योजनेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या त्यांच्या कर्तृत्वाचा विचार करुन त्यांना २ जानेवारी १९९५ मध्ये पदोन्नती मिळाली आणि ते व्हाइस ॲड्मिरल झाले. त्यांच्याकडे लढाऊ जहाजांच्या उत्पादनाचे नियंत्रण खाते दिले. पुढे त्यांच्याकडे दक्षिणेकडील नौदलाची संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. माधवेंद्र यांनी गोव्याच्या लष्करी कारवाईत (१९६१) तसेच पाकिस्तानबरोबरच्या अनुक्रमे तिन्ही युद्घांत (१९६५, १९७१ आणि १९९९) सहभाग घेतला. कारगिल युद्घाच्या वेळी ते पश्चिम आरमारी दलाचे मुख्य कमांडर होते. याशिवाय त्यांनी १९८७ मध्ये श्रीलंकेत ‘ ऑपरेशन पवन ’ यामध्येही स्पृहणीय कामगिरी केली. त्यांची भारताच्या नौसेना प्रमुखपदी २९ डिसेंबर २००१ रोजी नियुक्ती झाली आणि त्या पदावरुन ते ३१ जुलै २००४ मध्ये निवृत्त झाले.
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केंद्र शासनाने परमविशिष्ट सेवा पदक आणि अतिविशिष्ट सेवा पदक देऊन केला. त्यांच्या पत्नीचे नाव कौमुदी असून त्यांना एक मुलगी व मुलगा आहे.
गायकवाड, कृ. म.