सॉल्झबर्ग : ऑस्ट्रियातील अभिजात वास्तुशैलीसाठी प्रसिद्घ असलेले प्राचीन नगर. त्याचे रोमन नाव जूव्हेव्हम होते पण तेथील मिठागारांमुळे आधुनिक काळात त्यास सॉल्झबर्ग ( कॅसल ऑफ सॉल्ट) हे नाव पडले. त्याची लोकसंख्या १,४७,६८५ (२०१०) होती. ते म्यूनिकच्या आग्नेयेस, १०६ किमी.वर सॅल्झॅक नदीच्या खोऱ्यात आल्प्स पर्वतश्रेणींच्या उत्तरेकडील पायथ्याजवळ नदीच्या दोन्ही काठांवर वसले आहे. मूळचे हे सेल्टिक / केल्टिक लोकांच्या वसाहतीचे स्थान असून पुढे ते जूव्हेव्हम नावाने रोमन व्यापाराचे केंद्र बनले. सांप्रत येथे सॉल्झबर्ग संघराज्याची राजधानी आहे.

या शहरात ६९६ मध्ये सेंट रुपर्टने सेंट पीटरच्या स्मरणार्थ बेनिडिक्टाइन ॲबे ( आशीर्वादात्मक विहार ) आणि नॉनबर्ग ननरी (जोगिणींचा मठ ) या वास्तू बांधल्या. पुढे सेंट बोनिफेसने ७३९ मध्ये येथे बिशपचे पीठ स्थापन केले. तेच पुढे आर्चबिशपचे स्थान झाले (७९८). येथील आर्चबिशप हे १२७८ पासून पवित्र रोमन साम्राज्याचे अधिपती बनले आणि हे नगर धर्माधिष्ठित बलवान राजांची निवासभूमी बनली. या राजांनी अनेक वर्षे अधिसत्ता गाजविली. या आर्चबिशप राजांपैकी काही राजे सोडता उर्वरित सर्व जुलमी व एकतंत्री होते तथापि वुल्फडायट्र्यिच फोन रायटेनाऊ ( कार. १५८७–१६१२) याने इटालियन प्रबोधनकालीन वास्तुशैलीच्या काही इमारती बांधल्या तर ग्राफ फोन लॉड्रान (कार. १६१९– ५३) याने युनिव्हर्सिटीची स्थापना सॉल्झबर्ग येथे केली. अखेर हे शहर धार्मिक जाचातून १८०२ साली मुक्त झाले आणि व्हिएन्ना काँग्रेसनंतर (१८१५) त्यावर ऑस्ट्रियन शासनाची पूर्ण मालकी प्रस्थापित झाली.

येथील वास्तू मुख्यत्वे ख्रिस्ती धर्म आणि बिशप वर्गाच्या संबंधित आहेत. त्यांवर बरोक वास्तुशैली आणि प्रबोधनकालीन इटालियन प्रभाव आहे. त्यामुळे सॉल्झबर्गला ‘जर्मन रोम’ म्हणतात. शहरात मध्यभागी आर्चबिशपचा प्रासाद (१६१९), कॅथीड्रल (१६२८), पंधराव्या शतकातील गॉथिक कॉयर आणि बरोक चॅपेल, तसेच सेंट जॉर्जचे चर्च (१५०१), सॅन सिबॅस्तॅन चर्च (१५१२), होली ट्रिनिटी चर्च (१७०२) इ. धार्मिक वास्तू असून मोट्सार्ट या प्रसिद्घ संगीतकाराच्या नावे स्थापन केलेली मोट्सार्टियम म्यूझिक ॲकॅडेमी, संगीत जलसा सभागृह, मोट्सार्ट अभिलेखागार, मिरोबल किल्ला (१६०६), द कॉलेजियन चर्च (१७०७) इ. अन्य प्रेक्षणीय स्थळे आहेत. द कॉलेजियन चर्च ही बरोक शैलीतील योहान एलकी या वास्तुतज्ञाची उत्तम कलाकृती आहे. सॅल्झॅक नदीच्या पश्चिम किनाऱ्याजवळ मंक्स टेकडीवर सुस्थितीत असलेला भव्य किल्ला (१०७७) ही पर्यटकांची आकर्षणे आहेत कारण मध्य यूरोपात एवढा देखणा व सुस्थितीत अवशिष्ट असणारा तो एकमेव किल्ला आहे. अलीकडे जुन्या युनिव्हर्सिटीची पुनर्स्थापना १९६४ मध्ये करण्यात आली.

श्रेष्ठ ऑस्ट्रियन अभिजाततावादी संगीतरचनाकार आणि पियानोवादक ⇨ व्होल्फ्‌गांग आमाडेउस मोट्सार्ट (१७५६–९१) याची ही नगरी जन्मभूमी असून त्याच्या सन्मानार्थ १८४२ पासून दरवर्षी सांगीतिक जलसा भरतो. त्याला पश्चिम यूरोपमधून असंख्य रसिक जमतात. शिवाय १९२० पासून दरवर्षी ‘एव्हरीमॅन’ ह्या नीतितत्त्वपूर्ण नाटकाचा प्रयोग कॅथीड्रल चौकात करतात. संगीत जलसे व नाटके यांकरिता दोन भव्य ऑपेरागृहे व एक ओपन एअर प्रेक्षागृह आहे. याशिवाय मोट्सार्टच्या स्मरणार्थ मोट्सार्ट चौकात त्याचा अर्धपुतळा उभारला आहे. त्याच्या घरात वस्तुसंग्रहालय आहे.

सॉल्झबर्ग हे ऑस्ट्रियाचे वायव्येकडील प्रवेशद्वार असून रस्ते व लोहमार्गावरील प्रमुख स्थानक आहे. मॅक्सग्लॅन हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरात मद्यार्कनिर्मिती, संगीत वाद्ये, लोखंडी जड सामान, वस्त्रनिर्मिती, कातडी वस्तू निर्मिती इ. उद्योग येथे चालतात.

येथील निसर्गरम्य सृष्टिसौंदर्य आणि रोमन अभिजात वास्तुविशेष यांच्या विलक्षण संयोगामुळे ते जगातील एक सुंदर शहर मानले जाते. याशिवाय तेथील सांगीतिक जलसे यूरोपभर प्रसिद्घ आहेत. त्यामुळे पर्यटकांचे ते आकर्षण बनले आहे.

देशपांडे, सु. र.