येवले : महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण आणि तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या २८,३४४ (१९८१). सस.पासून सु. ९५० मी. उंचीवर दौंड–मनमाड लोहमार्गावर मनमाडच्या दक्षिणेस २९ किमी. आणि मुंबईच्या ईशान्येस सु. २६० किमी. अंतरावर ते वसलेले आहे. गावाच्या पश्चिमेस मालेगाव-अहमदनगर हा महत्त्वाचा रस्ता आहे. हे शहर वसविले, त्यावेळी ते दिल्लीच्या बादशहाकडे होते. नंतर ते सातारच्या छत्रपतींच्या ताब्यात आले. माधवराव पेशव्याने ते विंचूरकरांना (विट्ठल शिवदेव) जहागीर म्हणून दिले. पूर्वी या शहरासभोवती मातीची तटबंदी होती. १६६७ साली येथील रघोजी नाईक या गावपाटलाने शामदास वालजी या गुजराती व्यापाऱ्याच्या साहाय्याने रेशमी वस्त्रोद्योगाची सुरुवात केलीउत्कृष्ट कारागिरांना येवला येथे निमंत्रित करुन प्रोत्साहन दिले. पेशव्यांच्या काळात रेशमी वस्त्रे व जर यांच्या निर्मितीची मक्तेदारी या गावाकडेच होती. चीन, बंगाल, इराण इ. भागांतून येथे कच्चा माल येतो. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धातील एक सेनानी तात्या टोपे यांचे हे जन्मगाव. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात या गावाचा क्रियाशील सहभाग होता.

येथे दर मंगळवारी अन्नधान्यांचा व गुरांचा मोठा बाजार भरतो. १८५८ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. गावात माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय आणि ‘सार्वजनिक’ व ‘अकबरी’ अशी दोन वाचनालये आहेत. गावात महाजनी वाड्‌यातील जुने मुरलीधराचे मंदिर त्यातील कलात्मक लाकडी स्तंभ व कमानी यांसाठी प्रसिद्ध आहे. मुरलीधराचेच दुसरे नवे मंदिर टिळक चौकात १९३५ साली बांधण्यात आले. पार्श्वनाथाचे मंदिर जैन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. उत्तम प्रकारचे सुती व रेशमी कापड येथे विणले जाते. येथील पैठण्या प्रसिद्ध आहेत. गावात हातमाग व यंत्रमाग असून बऱ्याच लोकांचा त्यांवर निर्वाह चालतो.

कारखानीस, नयना