सॉल्झबरी, विल्यम : ( सु. १५२०–१५८४). इंग्लंडमधील एक वेल्शभाषिक कोशकार आणि अनुवादक. जन्म डेन्बीशर मधील के दू येथे ( आता हे ठिकाण क्ल्यूअड ह्या भागात ). शिक्षण ऑक्सफर्ड आणि लंडन येथे. ‘द होल सेन्स ऑफ ए वेल्शमन्स हेड’ (सु. १५४६, इं. शी.) हा वेल्श म्हणींचा संग्रह, ए डिक्शनरी इन इंग्लिश अँड वेल्श (१५४७) हा शब्दकोश आणि बायबलच्या ‘नव्या करारा’चे वेल्शमध्ये केलेले भाषांतर (१५६७) हे त्याचे मुख्य वाङ्‌मयीन ग्रंथकर्तृत्व. ‘नव्या करारा ’चे भाषांतर त्याने रिचर्ड डेव्हिस ह्या बिशपच्या सहकार्याने केले. ह्या भाषांतरात त्याचा सिंहाचा वाटा होता. रिचर्ड डेव्हिसच्या नावावर मोडणाऱ्या बुक ऑफ कॉमन प्रेअर च्या अनुवादातही (१५६७) त्याचा सहभाग दिसतो. वेल्श लोकांना प्रार्थनेसाठी अशा पवित्र ग्रंथांची आवश्यकता होतीच तथापि ह्या अनुवादातून वेल्श भाषेलाही सामर्थ्य प्राप्त होण्यास साहाय्य झाले.

डेन्बीशर परगण्यातील लानर्वस्ट येथे त्याचे निधन झाले.

अवचट, प्र. प्र.