साल्हेर : महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्घ डोंगरी किल्ला. तो नासिक जिल्ह्यात पूर्वीच्या बागलाण भागात ⇨ मुल्हेर किल्ल्याच्या पश्चिमेस सटाणापासून १९·३१ किमी. वर आहे. हा महाराष्ट्रातील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असून, डांग-गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सहा व्यापारी मार्गांवर हेरगिरी करण्यास अत्यंत उपयुक्त असल्यामुळे सहाहेर (सहा वाटांचा हेर) यावरून ‘साल्हेर’ असे त्याचे नाव पडले असावे. या किल्ल्याचा उल्लेख मुल्हेर या किल्ल्यासोबत मध्ययुगीन कागदपत्रांतून आढळतो मात्र तो कोणी बांधला व केव्हा बांधला, यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. या किल्ल्याविषयीचा पहिला ऐतिहासिक उल्लेख तारिख-इ-फीरोझशाही या ग्रंथात असून त्यात म्हटले आहे, की इ. स. १३४० च्या सुमारास माणदेव नावाच्या किल्लेदाराच्या अखत्यारीत मुल्हेर व साल्हेर हे पर्वतीय (डोंगरी) किल्ले होते. त्यानंतरचा दुसरा उल्लेख अबुल फज्जलिखित अकबरनामा या ग्रंथाच्या आईन-इ-अकबरी (१५९०) या तिसऱ्या भागात आढळतो. त्यात मुल्हेर-साल्हेर हे बळकट किल्ले बागलाणात असल्याचे म्हटले आहे. अहमदनगरच्या मलिक अंबरच्या सुरतवरील आक्रमणास पायबंद घालण्यासाठी तेथील किल्लेदाराने ३,००० शिपायांची खडी फौज धरमपूर प्रांताच्या रामनगर येथे १६०९ मध्ये सुसज्ज ठेवली होती. फिंच नावाच्या इंग्रजी प्रवाशाने या किल्ल्यांचा सुरेखनगर असा १६१० च्या प्रवासवृत्तांतात उल्लेख केला असून, तिथे महमुदी नाण्यांची टांकसाळ असल्याचे म्हटले आहे. या किल्ल्याची वाट दुर्गम होती. दोन किंवा तीन माणसे वा एखादा हत्ती चढेल एवढाच रस्ता होता. औरंगजेब दख्खनचा सुभेदार असताना सय्यद अब्दुल वहाब खान्देशी याने त्याच्या आज्ञेवरून फेब्रुवारी १६३८ मध्ये मोगलांसाठी साल्हेर काबीज केला. साल्हेरमार्गेच छ. शिवाजी महाराजांनी सुरतवर हल्ला करून ती लुटली (१६६४). त्यानंतर साल्हेर त्यांच्या ताब्यात होता पण नंतर तो मोगलांनी घेतला. पुढे महाराजांनी १६७२ मध्ये साल्हेर पुन्हा घेतला. साल्हेर घेण्याचा मोगलांनी १६८२ मध्ये आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना तो जिंकता आला नाही. तेव्हा मुल्हेरचा सेनापती किल्लेदार नेखमखान याने साल्हेरच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला सोडण्यासाठी खटपट केली. पेशवाईच्या अस्तापर्यंत तो मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे तो ब्रिटिशांनी घेतला.

साल्हेर किल्ला परशुरामगडाच्या शिखराच्या उत्तरेस आहे. या किल्ल्यावरून कोकणाकडे पाहिले असता समोरच्या पहाडातील आरपार छिद्र फार सुरेख दिसते. रेणुकादेवीचे मंदिरही येथून जवळच आहे. साल्हेर किल्ल्यावरून अचला, अहिवंत, सप्तशृंग, मार्कंड, खळ्या, जावळ्या, धोडप, कचना, कोल, धैर, राजधैर, इंद्राई, चांदवड अशी किल्ल्यांची साखळी दिसते. अंकाई-टंकाई, रामसेज, म्हसगड असे अनेक किल्ले सहज दृष्टीस पडतात. सध्या किल्ल्यावर वास्तुअवशेषांव्यतिरिक्त एकही अवशिष्ट वास्तू सुस्थितीत नाही.

देशपांडे, सु. र.