सालंमिश्री : (हिं. सलेप गु. सालम सं. जीवक, मुंजातक, बीजगन्ध लॅ. ऑर्किस लॅटिफोलिया कुल-ऑर्किडेसी). बाजारात या नावाने किंवा सलेप म्हणून मिळणारी वस्तू याच नावाच्या ओषधीय वनस्पतीची संस्कारित ग्रंथिल (गाठाळ) मुळे असतात. ही वनस्पती फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ऑर्किस प्रजातीतील असून तिच्यामध्ये सु. ३५ जाती आहेत. त्यांचा प्रसार यूरोप, समशीतोष्ण आशिया, उ. आफ्रिका, उ. अमेरिका व कानेरी बेटे इ.ठिकाणी झालेला आहे. भारतात तिच्या सु. १२ जाती (हरमेनगिल्ड सांतापाव यांच्या मते ६ जाती) असून त्यांपैकी ऑर्किस लॅटिफोलिया ही एक जाती आहे. हिमालयातील ओलसर व दमट ठिकाणी काश्मीर ते नेपाळ या भागांत सस.पासून २,५००–५,००० मी. उंचीवर ती आढळते तसेच द. भारतातही (निलगिरी येथे) आढळते. तिचे खोड ३०–९० सेंमी. उंच असून पानांच्या आवरकांनी ते कमी-जास्त वेढलेले असते. पानांवर ठिपके असतात. फुले जांभळी असून त्यांची संरचना व या वनस्पतीची इतर शारीरिक लक्षणे ⇨ ऑर्किडेसी (आमर) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ग्रंथिल मुळे चपटी, २– ५ हस्ताकृती, खंडयुक्त व मांसल असतात. चरकसंहितेत ‘मुंजातक’ असा उल्लेख असून त्याचा अंतर्भाव चित्रक, शतावरी व बेला यांसह शाकवर्गीय वनस्पतींत केला आहे. सुश्रुताचार्यांनीही ‘जीवक’ या नावे शाक वर्गात तिचा उल्लेख केला आहे.
ऑर्किस या आमराखेरीज इतर काही प्रजातीतील मुळेही ‘सलेप’ बनविण्यास वापरतात व ते सलेप बाजारात विकले जाते. भारतीय बाजारात ह्या वस्तूची इराण व अफगाणिस्तान आणि थोड्या प्रमाणात यूरोप येथून आयात होते. प्रत्यक्ष मुळे धुवून व भाजून सुकवितात त्यामुळे ती पिवळट किंवा भुरकट आणि गोलट, लंबगोल किंवा हस्ताकृती (०·५ × ४ सेंमी.), काहीशी सुरकुतलेली, शिंगासारखी कठीण व चिवट होतात आणि तीच ‘सलेप’ होत. त्यांत कडू पदार्थ व बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. त्यांचा फांट ⇨ औषधिकल्प घसा बसल्यावर वापरतात. पानांत लोरोग्लुसीन (C14H20O8) हे ग्लुकोसाइड असते. सफेत, चराख, लसणिया, पंजेदार व दूधमुसळी हे पाच प्रकार सालंमिश्रीत असतात.
सालंमिश्री (सलेप) काहीसे अर्धपारदर्शी, बेचव व गंधहीन असते. ते पिठूळ असून तंत्रिकातंत्रास (मेंदू व मज्जातंतूस) उत्तेजक, पौष्टिक आणि कामोत्तेजक असते. पाण्यात मिसळल्यावर तयार होणारे बुळबुळीत द्रव्य चांगले पौष्टिक असून त्याचा वापर रक्तपित्तव्याधी, अतिसार, आमांश व जुनाट मुरलेला ताप यांवर करतात. तसेच ते आजारानंतरचा अशक्तपणा लवकर कमी होण्यास मदत करते. साखर व मसाला घालून सलेपाचा काढा आजारी माणसास देतात. रेशीम उद्योगांत त्याचा वापर धाग्याला ताठरपणा आणण्यास करतात. सलेपाची भुकटी पांढरट व पिवळसर असून तिच्यात सामान्यतः १४% पाणी व ३%राख असते (रशियन औषधिकोशाप्रमाणे ). बनावट सलेपात बटाट्याचे पीठ व गोंद असते.
पहा : अमरकंद ऑर्किडेसी रास्ना.
संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi, 1966.
२. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतींचा इतिहास, नागपूर, १९७४.
३. देसाई, वा. ग. ओषधिसंग्रह, मुंबई, १९७५.
४. पदे, शं. दा.वनौषधी गुणादर्श, मुंबई, १९७३.
वर्तक, वा. द. परांडेकर, शं. आ.
“