सायरेनेइका : उत्तर आफ्रिकेतील लिबिया देशाच्या पूर्व भागातील एक प्राचीन इतिहासप्रसिद्घ प्रदेश. क्षेत्रफळ ३,३०,२५८ चौ. किमी. उत्तरेस भूमध्य समुद्र, पूर्वेस ईजिप्त, दक्षिणेस सहारा वाळवंटी प्रदेश व पश्चिमेस ट्रिपोलिटेनिया प्रदेश यांदरम्यान याचा विस्तार होता. १९६३ पर्यंत हा एक स्वतंत्र प्रांत होता. या प्रदेशाच्या सागरकिनारी भागात देशातील बेंगाझी, अल्मार्ज, देर्ना, टोब्रुक ही प्रमुख शहरे असून उत्तर भागात जेबेल अल् अख्दार (ग्रीन हिल्स) हे ६००मी. उंचीचे पठार आहे. या पठारात मुख्यत्वे पशुपालन हा व्यवसाय चालतो. शिवाय ९१० मी. उंचीचे बार्क हे दाट लोकवस्तीचे वालुकामय पठार आहे. या प्रदेशातील बहुतेक लोक अरबी भाषिक मुसलमान असून काही ख्रिश्चन व ज्यू धर्मीय आहेत.

इ. स. पू. सातव्या शतकापासूनचा या भूप्रदेशाचा इतिहास उपलब्ध असून ग्रीक वसाहतवाल्यांनी इ. स. पू. ६४० मध्ये सायरेनेइकाच्या उत्तर भागात वसाहत स्थापन केली आणि हे हेस्पेरिडीस (बेंगाझी), बार्क (अल्-मार्ज), सायरीनी (शाहहाट), ॲपोलिनिया (मार्सा सूरायकाह) आणि टेन्चिरा (टूर्का) ही पाच स्वतंत्र नगरे वसविली. त्यांना पाच नगरे या अर्थी ‘पेन्टॅपलस’ म्हणत. त्यानंतर अलेक्झांडर द ग्रेट (इ. स. पू. ३५६–३२३) याने हा प्रदेश जिंकून घेतला आणि प्रशासकीय व्यवस्थेसाठी तेथे क्षत्रप नेमला. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ईजिप्तमधील टॉलेमी-सोटर या क्षत्रपाने सायरेनेइका प्रदेश पादाक्रांत करून तेथे टॉलेमी घराण्याची सत्ता स्थापन केली व हा प्रदेश ईजिप्तमध्ये समाविष्ट केला. पॉम्पी या रोमन सेनापतीने सायरेनेइका जिंकून तो प्रदेश इ. स. पू. ९६ मध्ये रोमच्या आधिपत्याखाली आणला. प्रशासनाच्या सोयीसाठी याचा क्रीटमध्ये समावेश करून रोमन उपसम्राटाच्या देखरेखीखाली स्वतंत्र प्रांत करण्यात आला होता परंतु नंतर तो लिबिया सुपीरिअर नावाने स्वतंत्र करण्यात आला. इ. स. ११५-११६मध्ये येथे ज्यू वसाहतकऱ्यांचे अयशस्वी बंड झाले होते. रोमनांच्या पतनानंतर अमर इब्न अल् अस याच्या नेतृत्वाखाली अरबांनी ६४२ मध्ये हा प्रदेश काबीज केला. त्यावेळी अलेक्झांड्रिया व अल् कर्यवान या दोन व्यापारी नगरांमधील मार्गावर हा प्रदेश असल्यामुळे त्यास महत्त्व प्राप्त झाले आणि बार्क हे त्याचे प्रमुख केंद्र होते. तेथे अरबी मुस्लिम संस्कृती विकसित झाली. पुढे ते काही काळ ईजिप्तच्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या अंमलाखाली होते. त्यानंतर त्यावर स्पॅनिश हल्लेखोरांनी आणि ऑटोमन तुर्कांनी आक्रमणे केली. पंधराव्या शतकात ते ऑटोमन तुर्कांच्या अंमलाखाली आले. तुर्की सैन्यातील एक तडफदार नेता अहमद कारामान्ली याने तुर्की राज्यपालाचा खून करून सत्ता आपल्या हाती घेतली (१७११). त्याच्या घराण्यातील राज्यपालांनी १८३५ पर्यंत सायरेनेइकावर अधिसत्ता गाजविली. ऑटोमन सम्राट दुसरा सुलतान मुहंमद याने स्फाहीझ नावाच्या कडव्या सैन्यदलाच्या मदतीने कारामान्लीला हाकलून दिले मात्र त्याच्या अमदानीत काही प्रगती झाली नाही. त्यामुळे सनूसी बंधुत्ववादाची (एक मुस्लिम धर्मपंथ) सायरेनेइकात वाढ झाली. हे बंधुत्ववादी अनुयायी तुर्कांच्या विरोधात संघटित झाले. त्याच सुमारास इटली-तुर्की युद्घात (१९११-१२) तुर्कांचा पराभव झाला आणि इटलीच्या अखत्यारीत सायरेनेइका प्रदेश गेला. पहिल्या महायुद्घकाळात इटलीने तेथे बस्तान बसविले मात्र त्यांना सनूसी बंधुत्ववादी चळवळीशी दीर्घकाळ सामना करावा लागला. एकाच गव्हर्नर जनरलच्या अंमलाखाली सायरेनेइका आणि ट्रिपोलिटेनिया या दोन स्वतंत्र वसाहती होत्या. बाल्बो या गव्हर्नर जनरलच्या कारकीर्दीत येथे काही सुंदर वास्तू, रस्ते, रुग्णालये, विद्यालये यांचे बांधकाम झाले. पुढे या दोन वसाहती एकत्र करून (१९३४) लिबिया ही बृहत वसाहत करण्यात आली व इटलीचा तो अविभाज्य भाग झाला (१९३९). दुसऱ्या महायुद्घात इटलीचा पराभव झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या (यूनोच्या) ठरावानुसार ग्रेट ब्रिटनच्या प्रशासकीय अंमलाखाली सायरेनेइका आला. पुढे १९५१ मध्ये सनूसी बंधुत्ववाद संघटनेतील प्रमुख अमीर महंमद इद्रिस अल् सनूसी याची सायरेनेइकाचा नियोजित राज्यप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. अमीरने लिबिया स्वतंत्र झाल्याची औपचारिक घोषणा केली व सायरेनेइका, ट्रिपोलिटेनिया आणि फेझान हे तीन स्वतंत्र प्रांत एकत्र होऊन लिबिया हे एकात्म संघराज्य उदयास आले.

सायरेनेइकात खनिज तेल व नैसर्गिक वायू यांबरोबरच लोहखनिज, पोटॅश, चुनखडक, संगमरवर, मॅग्नेशियम व पोटॅशियमची लवणे, मँगॅनीज, कोळसा, जिप्सम ही खनिज उत्पादने असल्यामुळे बहुतांश उद्योगधंदे खनिज तेल उत्पादनावरच आधारित आहेत. नैर्ऋत्य भागात अलीकडे युरेनियमचे साठेही उपलब्ध झाले आहेत मात्र कृषिव्यवसायात म्हणावी तशी प्रगती नसल्यामुळे अन्नधान्याची आयात करावी लागते. या प्रदेशातील बेंगाझी हे सर्वांत मोठे शहर व बंदर असून तेथे बहुतांश उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झाले आहे. येथे नैसर्गिक वायू द्रवीकरण कारखाना आणि मिथेनॉल, अमोनिया व यूरिया यांचे निर्मितिप्रकल्प आहेत. तसेच वस्त्रोद्योग, बांधकामाचे साहित्य व मूलभूत उपभोग्य वस्तुनिर्मितीचे उद्योगही चालतात. बेंगाझी येथे शेतमालाची मोठी बाजारपेठ असून येथे १९५५ मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. सुंदर पुळणी आणि कॅथीड्रल, सिनॅगॉग, वस्तुसंग्रहालय यांमुळे ते पर्यटनस्थळ बनले आहे.

पहा : लिबिया.

देशपांडे, सु. र.