सामाजिक संघर्ष : (सोशल कॉन्फ्लिक्ट). ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीजे सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे मात्र संघटनात्मक व विघटनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा माणसामध्ये दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सद्गुण असतात, तद्वतच काही दुर्गुणही असतात. या दुर्गुणांमुळे (राग, लोभ, मत्सर) त्याची वृत्ती संघर्षमय होते. सामान्यतः समाजात विविध व्यक्ती आणि समूह परस्परसमाधानकारक अशा पायावर आपल्या संबंधांचे समायोजन करीत असतात. जेथे स्पर्धा आणि संघर्ष मोठ्या प्रमाणावर चालू असतो, अशा आधुनिक समाजात परस्परविरोधाची प्रक्रिया नेहमीच प्रत्ययास येते. आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या भूमिकांतून विरोध होत असतो, असे दिसून येते. एकाच व्यक्तीच्या अंतरंगात किंवा कुटुंबातसुद्घा अहम् ( इगो ) दुखविला गेल्यामुळे परस्परविरोधी अशा निष्ठांचा संघर्ष होऊ शकतो. सामाजिक संबंधांतून जर हा संघर्ष होत असेल, तर ती एक सामाजिक प्रक्रियाच म्हणावी लागेल. सहकार्य हीसुद्घा एक सामाजिक प्रक्रियाच आहे. सहकार्याच्या सामाजिक प्रक्रियेत विविध व्यक्ती आणि सामाजिक गट कोणताही संघर्ष न करता एकत्रितपणे विशिष्ट कार्य करीत असतात मात्र जेव्हा त्यांच्या हितसंबंधांना आव्हान दिले जाते किंवा विरोध होतो, तेव्हा संघर्ष उद्भवतो. परस्परविरुद्घ अशी उद्दिष्टे, ध्येये, प्रवृत्ती, भावना ही जेव्हा समाजात मोठ्या प्रमाणावर जागृत होतात, त्यावेळी सामाजिक संघर्ष उद्‌भवतात. तो समाजातील दोन वर्गांत, गटांत, भिन्न राजकीय प्रणालींत वा पक्षांत तसेच भिन्न धर्मियांमध्ये, भिन्न जाती, भिन्न वर्णांत आणि संघटनांतर्गत गटागटांत-संप्रदायांत आढळतो. समूहात जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा सामाजिक संघर्ष अटळ ठरतो. सामाजिक संघर्षाची कारणे अनेक आहेत तथापि सामूहिक असंतोष, द्वेष, सुडाची भावना ही प्रमुख व मूलभूत होत.

दरोडा, सामूहिक बलात्कार, लूटमार इ. कृत्ये एकट्यादुकट्या व्यक्तीने शक्यतो केली जात नाहीत तर त्यामध्ये संघटित प्रयत्न असतात. या सामाजिक संघर्षाच्या काही वैयक्तिक घटना असल्या, तरी त्यांतून स्वार्थलोलूप व्यक्तींची विकृत मानसिकता दिसून येते. सामाजिक संघर्षाची समूहात्मक उदाहरणे अनेक आहेत. भिन्न मतप्रणाली असणाऱ्या राजकीय पक्षांची सत्ता हस्तगत करण्यासाठी सदैव धडपड चाललेली असते. मतभिन्नतेतून किंवा पक्षापक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण होऊन संघर्ष उद्‌भवतो. कधीकधी निदर्शने किंवा तात्त्विक मतभेदांचे रू पांतर हाणामारीत होते. काही वेळा पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण होऊन दोन गटांत संघर्ष निर्माण होतो आणि पक्षाच्या एकजुटीला तो बाधक ठरतो. हीच गोष्ट भिन्न धर्मियांच्या बाबतीत घडते. हिंदू , जैन, बौद्घ, इस्लाम, पारशी, ज्यू, नवबौद्घ, ख्रिस्ती वगैरे अनेक धर्मीयांत सामान्यतः सामंजस्य आढळते आणि सहकार्याची भावना दृष्टोत्पत्तीस येते परंतु एखादी धार्मिक घटना ( उदा., धर्मसुधारणा आंदोलन, धर्मांतर, पॅलेस्टाइनचे स्वामित्व, अयोध्येतील राममंदिर इ.) अशी घडते की, त्याचे अनुयायी बिथरतात आणि त्यांच्या भावना दुखावल्याचे निमित्त होऊन दोन्ही धर्मांच्या अनुयायांमध्ये सामाजिक संघर्षाबरोबर दंगली उद्भवतात. चळवळ आणि संघर्षाचे स्वरूप हिंसात्मक होते. कधीकधी त्याचे मूळ मागील शेकडो वर्षांच्या अन्यायात मूलतत्त्ववादी शोधण्याचा प्रयत्न करतात. पुढे दंगलीचे दुष्परिणाम बराच काळ टिकून राहतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे फाळणीनंतरचा (१९४७) हिंदु-मुसलमानांचा कडवा संघर्ष होय. अनेक वेळा धर्मांतर्गत पंथात किंवा संप्रदायात सामाजिक संघर्ष निर्माण होतो आणि देशांतर्गत विकासाच्या कामात अडथळा निर्माण होऊन शांततेचा भंग होतो. ख्रिस्ती धर्मातील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट, इस्लाम धर्मातील शिया आणि सुन्नी पंथ, बौद्घ धर्मातील हिंदू आणि नवबौद्घ ही याची काही उदाहरणे फार बोलकी आहेत. मालक आणि कामगार किंवा मजूर तसेच शासन आणि शासकीय कर्मचारी ह्यांतील विशेषतः कामगारांच्या-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भातील असंतोषातून उद्भवणारा वाद सुरू झाल्यावर तो सामोपचाराने मिटत नसेल, तर कामगार-कर्मचारी सामूहिक विचाराने वा एकमताने पूर्णतः किंवा अंशतः काम थांबविण्याचा वा नाकारण्याचा निर्णय घेऊन संपावर जातात आणि रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, निदर्शने करतात व कधीकधी हिंसक मार्गांचा अवलंब करतात. हा संघटित सामाजिक संघर्षाचाच एक भाग होय. भ्रष्टाचार, महागाई, बेकारी यांविरुद्घ छेडली गेलेली आंदोलने विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी असली, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक संघर्षाचाच संदर्भ असतो.

वर्णभेद आणि जातिभेद यांच्यावर आधारलेली समाजरचना आर्थिक, व्यावसायिक, राजकीय व अन्य प्रकाराचे सामाजिक व्यवहार यांत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली आहे. गोरे पश्चिमी लोक व कृष्णवर्णीय आफ्रिकी निग्रो  असे दोन वंश अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दिसतात आणि त्यावरू न तेथील समाजव्यवस्थेत उच्चनीच भावदर्शक रचना निर्माण झालेली आहे. हा काळा हा गोरा हा ⇨वर्णविद्वेष अमेरिका, ग्रेट ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण ऱ्होडेशिया यांत विशेषकरून एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत तीव्रतर होता. गोऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही कायदेही (अपार्थाइट) त्यावेळी संमत करण्यात आले होते. त्यांतूनच सामाजिक संघर्षाची अनेक उदाहरणे घडली, दंगेधोपे झाले, खून पडले. स्पृश्य-अस्पृश्य हा जातिभेद भारतासह म्यानमारपासून (ब्रह्मदेश ) जपानपर्यंतच्या अतिपूर्व देशांमध्ये रुढ असल्याचे दाखले प्राचीन वाङ्मयातून मिळतात. आधुनिक सुधारकांच्या मानवतावादाने जातिसंस्थेचे विसर्जन करण्याचा प्रयत्न ⇨राजा राममोहन रॉय, ⇨ महात्मा  जोतीराव फुले, ⇨छत्रपती शाहू महाराज प्रभृतींनी केला तर ⇨भीमराव आंबेडकर, जगजीवन राम आदींनी अस्पृश्यांच्या सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला. त्याचे फलित म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानानेच अस्पृश्यता नष्ट केली तथापि काही राज्यांतून अजूनही सवर्ण व दलित यांमधील सामाजिक संघर्ष चालू असल्याचे दिसते. तरीसुद्घा दलितांनी या सामाजिक संघर्षातून स्वतःचे अस्तित्व, शासकीय नोकऱ्या, राजकीय पदे यांमधील आरक्षण इ. गोष्टी प्राप्त करून घेतल्या आहेत तर अन्य मागासवर्गीय जातींनी सामाजिक सुधारणांसाठी आणि राजकीय सत्ता मिळविण्यासाठी त्यांच्या जातीचे संघटन केले आहे व त्याकरिता राजकीय पक्ष स्थापन केले असून दक्षिण भारतातील मागासवर्गीयांनी आधी जस्टीस पार्टी आणि नंतर द्रविड मुन्नेत्र कळघम असे पक्ष स्थापन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक संघर्षाचे स्वरूप महिला, शेतमजूर, शेतकरी संघटना, चिपको आंदोलन यांसारख्या चळवळींमधून व्यक्त होताना दिसते मात्र या चळवळींची संघटनात्मक बांधणी, कार्यक्रम आणि कार्यपद्घती यांत सुसूत्रता नसल्यामुळे संघटनांतर्गत मतभेदांतून गट तयार होतात. त्यामुळे सामाजिक संघर्षाची धार बोथट होते आणि रास्त मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होते. हुकूमशाही, जुलमी राजवट, पारतंत्र्य, आणीबाणी इत्यादींविरुद्घ स्वातंत्र्यलढे जगभर झाले व आजही होत आहेत. या सामाजिक संघर्षाचे कार्यक्षेत्र मोठे असते.

सर्वत्र प्रसृत झालेला दहशतवाद मूलतत्त्ववादी तालिबान व त्याच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या मुजाहिदिन-तयैबांसारख्या आतंकवादी संघटना इस्लामीकरणाच्या अट्टाहासापोटी करीत आहेत. त्यांचा सामाजिक संघर्ष धर्मनिष्ठ असून त्यांना विरोध करणारे सर्व काफिर म्हणजे इस्लामचे शत्रू होत. याउलट नक्षलवादी हे गोरगरीब, आदिवासी-वनवासी यांच्या अस्तित्वाकरिता आणि न्याय्य हक्कांसाठी आपण सामाजिक संघर्ष करीत आहोत, असा दावा करतात आणि त्यांचा विरोध सामान्य जनतेला नसून शासनाला, त्याच्या धोरणाला आहे. या दोन्ही संघटनांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे व प्रशिक्षित युवक-युवतींच्या पलटणी आहेत. त्यांची कार्यपद्घती समान असून त्यांतून सामान्य लोकांचे तसेच पोलिसांचे बळी पडत आहेत.

संदर्भ : 1. Cozer, Lewis, The Function of Social Conflict, New York, 1956.

    2. Kriesberg, Louis, Social Conflicts, Englewood Cliffs ( N. J.), 1982.

    ३. शहा, घनश्याम, अनु. चिकटे, प्राची, भारतातील सामाजिक चळवळी, पुणे, २००८.

देशपांडे, सु. र.