सामाजीकरण : ( सोशलायझेशन ). सामाजिक नियंत्रणाचे सात्मीकरणात परिवर्तन वा रूपांतर करणारी एक प्रक्रिया होय. सामाजीकरण ही सर्वसाधारण संज्ञा असून ती आंतरक्रि येची ( अन्योन्य संबंधांची) प्रक्रिया होय. या प्रक्रियेद्वारे व्यक्ती आपल्या समाजगटातील भाषा, लोकांचे स्वभाव, विश्वास आदी गुणविशेष आत्मसात करते. मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सामाजीकरण निरंतर चालू असते. कोणताही मानवप्राणी जन्मतः संस्कृतीचा, व्यक्तिमत्त्व व सामाजिक नियमनाचा वारसा घेऊन आलेला नसतो. तो जन्मतः स्वतंत्र, निर्भय, अकृत्रिम व परिस्थितीचा परिणाम न झालेला मानवी प्राणी असतो. त्याच्याकडे मानवाचे जैविक गुणधर्म असतात. सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे प्रगल्भ बुद्घी. या जैविक बाबींचा समाजमान्य वापर कसा करावयाचा ही गोष्ट मात्र त्याला शिकावी लागते व इतरांनी शिकवावी लागते.

समाजालादेखील नवजात अर्भकाला सामाजिक प्राणी म्हणून समाजात समाविष्ट करून घेणे अत्यावश्यक असते. त्याशिवाय समाजाचेही अस्तित्व निरंतर राहणे कठीण असते. समाजात कसे वागावे, केव्हा कोणती कृती करावी, कोणत्या गोष्टी चांगल्या, कोणत्या वाईट, आपण नेमकी कोणती भूमिका पार पाडावी यांचेही ज्ञान होणे व्यक्तीला आवश्यक असते. नवजात अर्भकाकडे जर संस्कृतीचे संक्र मण झाले नाही, तर थोड्याच काळात समाज व संस्कृती या दोन्ही गोष्टी लयास जातील.

सामाजीकरणाच्या प्रक्रियेत कुटुंबीय, अन्य अनेक व्यक्ती आणि परिसर नवजात अर्भकाला अनेक गोष्टी शिकवितात. ही शिकविण्याची प्रक्रिया कधी जाणीवपूर्वक, तर कधी अजाणतेपणी पण सातत्याने होत असते. नवजात अर्भकदेखील त्याच्या अंगभूत सुप्त गुणांमुळे शिकविलेले ग्रहण करते, साठवते, स्मरते व त्याचा उपयोग करते. जर त्याच्याकडे ही जैविक क्षमता नसती, तर त्याला शिकविता येणे कठीण झाले असते. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत व्यक्ती संस्कृती व सामाजिक नियमने आत्मसात करते. त्यामुळे ती त्या समाजाची क्रि याशील सदस्य बनते. त्या समाजातील सामाजिक पर्यावरणाशी ती अनुकूलन साधते. समाजातील लोकांशी भाषेच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करते. ही भाषा शिकणे हा सामाजीकरणाचाच एक भाग असतो. याच प्रक्रियेत व्यक्तीच्या ‘स्व’ चा विकास होतो.

सामाजीकरणाची उद्दिष्टे : व्यक्तींवर शिस्तीचे संस्कार करणे, हे सामाजीकरणाचे पहिले महत्त्वाचे उद्दिष्ट होय. शिस्त म्हणजे स्वयंनियंत्रण. समाजाच्या अपेक्षांनुसार स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवून वागणे म्हणजे शिस्तबद्घ वर्तन होय. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागू लागली, तर समाजात गोंधळ आणि अस्थैर्य निर्माण होईल, समाजव्यवस्था टिकून राहणार नाही, म्हणून सामाजीकरणात शिस्तीच्या नियमांचे आंतरीकरण (इंटर्नलायझेशन) घडवून आणण्यावर भर दिला जातो. भावनावेगामुळे व आपल्या गरजांची ताबडतोब पूर्तता करण्याच्या प्रयत्नामुळे बेशिस्त वर्तन घडते, म्हणून या प्रक्रियेत प्रारंभी शारीरिक गरजा नियंत्रित करण्यास व पुढे भावनिक आवेगांवर नियंत्रण ठेवण्यास शिकविले जाते. सामाजीकरणाच्या प्रक्रियेत शिस्तीबरोबर विविध आकांक्षाही व्यक्तीच्या मनात रुजविल्या जातात. उदा., पुढे तुला शिक्षक, वैमानिक, शास्त्रज्ञ इ. व्हावयाचे आहे. त्याजबरोबर तुला एक जबाबदार नागरिक व्हायचे आहे, एक आदर्श व्यक्ती व्हायचे आहे, अशा सर्वसामान्य स्वरूपाच्या मूल्यांना बिंबवणे हे सामाजीकरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होय. अशी मूल्ये मनात रुजवून एक प्रकारे समाजातील विविध स्थाने प्राप्त करण्यासाठी व्यक्तींना प्रेरणा दिली जाते. यासाठी समाजात आधी होऊन गेलेल्या पराक्र मी, नीतिमान, सदाचारी, चतुर, आदर्शवत व्यक्तींच्या गोष्टी सांगितल्या जातात.

प्रत्येक व्यक्ती समाजातील विविध समूहांची सभासद असते आणि त्यात तिला विविध भूमिका वठवाव्या लागतात. उदा., कुटुंबात पती, पिता, कुटुंबप्रमुख तर महाविद्यालयात प्राध्यापक तसेच इतर समूहात त्या त्या स्थानाप्रमाणे भूमिका वठवाव्या लागतात. तसेच त्या त्या भूमिकांशी संबंधित मूल्येही आत्मसात करावी लागतात.

समाजाचा सभासद म्हणून जीवन जगण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये व्यक्तीजवळ असणे अत्यावश्यक असते. काही कौशल्ये तर केवळ सामाजिक असतात. जी कौशल्ये समाजातील इतरांशी वागण्यासाठी व्यक्तीला उपयुक्त ठरतात, ती सामाजिक कौशल्ये होत. उदा., वयाने मोठ्या व्यक्तींशी कसे बोलावे व वागावे, बरोबरीच्या व्यक्तींशी कसे वागावे, लहानांना कशी वागणूक द्यावी, बोलताना कोणते शब्द वापरावेत, ते कसे उच्चरावेत इत्यादी. अशी कौशल्ये सामाजीकरणात व्यक्तीला शिकविली जातात. काही कौशल्ये इतरांचे निरीक्षण व अनुकरण करून अजाणतेपणीही शिकली जातात. सामाजिक कौशल्यांबरोबरच निरनिराळी व्यावसायिक कौशल्ये संपादन करणे, हीदेखील आधुनिक समाजातील एक महत्त्वाची बाब होय. आधुनिक औद्योगिक समाजात निरनिराळ्या भूमिकांचे कमालीचे विशिष्टीकरण झालेले आहे समाजात अशा व्यावसायिक कौशल्यांच्या शिक्षणाची सोयही असते. उदा., औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये, संगणक प्रशिक्षण संस्था इत्यादी.

सामाजीकरण प्रक्रियेतील अवस्था : सामाजीकरण ही टप्प्याटप्प्याने गुंतागुंतीची होत जाणारी एक प्रक्रिया आहे. कुटुंबासारख्या सापेक्षतः कमी गुंतागुंतीच्या समूहातून ती अधिक गुंतागुंतीच्या समाजात घडून येते. सामाजीकरणात अनेक गोष्टी व्यक्तीला शिकविल्या जातात. सिग्मंड फ्रॉइडनी व्यक्तिमत्व विकासाच्या कुमारावस्थेपर्यंतच्या अवस्था विशद केल्या आहेत. हेन्री जॉन्सननी त्यांना सामाजीकरणाच्या अवस्था मानून त्याचे विश्लेषण केले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या सामाजीकरणात कोणत्या अवस्था दिसतात व त्याहून नेमके काय शिकता येते, त्या अवस्था पुढीलप्रमाणे :

मौखिक अवस्था : मुलाच्या जन्मापासून ते सुमारे एक वर्षापर्यंत ही अवस्था मानली जाते. जन्माला येण्यापूर्वी मूल मातेच्या गर्भाशयात आवश्यक तेवढय उबदार आणि आरामदायी अवस्थेत असते पण जन्मल्यानंतर मात्र त्याला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ताणतणावाला तोंड द्यावे लागते. सामाजीकरणाच्या दृष्टीने या अवस्थेतील महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे मौखिक परावलंबन प्रस्थापित करणे हे होय. या अवस्थेत मूल आपल्या विविध शारीरिक गरजांच्या पूर्ततेसाठी इतरांचे अवधान आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करते. ⇨सिग्मंड फ्रॉइडच्या मते या अवस्थेत मुलाचे आईशी फक्त ‘प्राथमिक पातळीवरील तादात्म्यीकरण’ झालेले असते.

गुदावस्था : पहिल्या वर्षाच्या अखेरीपासून ते मुलाच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ही अवस्था मानली जाते. या अवस्थेत एका नव्याच संघर्षमय व ताणतणावाच्या स्थितीला मुलाला तोंड द्यावे लागते. मल-मूत्रविसर्जनासंबंधीच्या शिस्तीच्या पालकाच्या अपेक्षा, हे या तणावाचे प्रमुख कारण असते. मल-मूत्र विसर्जनाविषयीच्या योग्य त्या सवयी लावण्यापासूनच मुलावर शिस्तीचे संस्कार केले जातात. वर्तनाविषयीच्या समाजाच्या अपेक्षा शिकविण्यास हळूहळू याच अवस्थेत प्रारंभ होतो. या अवस्थेत मुलाच्या दृष्टीने आईची भूमिका साहाय्यभूत असते.


ईडिपस अवस्था : सामान्यतः मुलाच्या वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षांपासून ते बारा-तेरा वर्षांपर्यंत ही अवस्था असते. यांपैकी चौथ्या-पाचव्या वर्षांपर्यंतचा काळ ‘ईडिपस अवस्थेचा काळ’ तर नंतरचा ‘सुप्तावस्थेचा काळ’(लेटन्सी क्रायसिस) म्हणून ओळखला जातो. ईडिपस अवस्थेत मुलाला आईचे अधिक आकर्षण वाटते आणि आपल्या वडिलांविषयी मात्र त्याच्या मनात मत्सराची भावना निर्माण होते, असे फ्रॉ इड यांनी म्हटले आहे. मुलाचे त्याच्या आईविषयीचे आकर्षण लैंगिक भावनेतून निर्माण होते असे ते म्हणतात. मुलगा ज्याप्रमाणे आईकडे आकृष्ट होतो, त्याचप्रमाणे मुलगी पित्याकडे आकृष्ट होते. मुलाच्या मनात अबोध पातळीवर चाललेला जो भावनिकमानसिक गुं ता असतो, त्याला फ्रॉइडने ‘ईडिपस गंड’ असे म्हटले आहे. मुलीच्या मनातदेखील आईविषयी मत्सराची भावना निर्माण होते. तिचा निर्देश करण्यासाठी फ्रॉइड यांनी ‘ईलेक्ट्रा गंड’ ही संज्ञा वापरली आहे.

सामाजीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे, या अवस्थेत ‘मुलगा’ किंवा ‘मुलगी’एकतर आपल्या ‘लिंगसापेक्ष भूमिका’ शिकतात, त्याचप्रमाणे इतर भावंडांच्या भूमिकांशी त्यांचे तादात्मीकरण झाल्यामुळे कुटुंबात ‘मूल’ म्हणून असलेली भूमिका शिकतात, तसेच संपूर्ण कुटुंबाशीही तादात्मीकरण झाल्यामुळे ‘कुटुंबाचा सभासद’ म्हणूनही असलेली भूमिका मुले शिकतात. थोडक्यात, कुटुंबातील सर्व भूमिकांचे संपादन होऊन या अवस्थेत मुले कुटुंबाची सभासद बनतात.

किशोरावस्था :सामान्यतः १३ ते १८-१९ वर्षापर्यंतची ( टीन-एजर) ही अवस्था मानली जाते. पौगंडावस्था म्हणूनही या अवस्थेला ओळखले जाते. हा लैंगिक परिपक्वतेचा कालखंड होय. मुलाच्या लैंगिक इंद्रियांची पूर्ण वाढ होऊन अनेक शारीरिक तसेच मानसिक बदल या कालखंडात घडून येतात. पालकांपासून अधिकाधिक स्वतंत्र होण्याच्या वृत्तीमुळे तसेच स्वयंनिर्णयक्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नात अनेक ताणतणावांना या वयातील मुलांना तोंड द्यावे लागते. एका बाजूला लैंगिक विकासाशी निगडित असे शारीरिक बदल आणि दुसऱ्या बाजूला स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनावे अशी पालकाची अपेक्षा, तर अनेकगोष्टींवर त्याला न आवडणारे नियंत्रण, यामुळे दोलायमान मानसिक अवस्था असणारे हे वय होय, म्हणून फारच कौशल्याने या वयातील मुलांचे सामाजीकरण घडवून आणावे लागते. वडीलधारी माणसे, विशेषतः पालक, शिक्षक यांनी या वयातील मुलांचा आत्मभाव न दुखावता अत्यंत हळुवारपणे, त्यांना समजून घेऊन, त्यांचे सामाजीकरण घडवून आणावे.

प्रौढावस्थेतील सामाजीकरण : प्रौढावस्थेतही सामाजीकरण सुरुच राहते. या प्रक्रियेत प्रौढ व्यक्ती अनेक नवीन दर्जे व भूमिका शिकते. प्राथमिक सामाजीकरणाहून प्रौढ सामाजीकरण अनेक बाबतींत वेगळे असते. पहिली गोष्ट म्हणजे, ज्या प्रकियांद्वारे सामाजीकरण घडवून आणले जाते, त्यांविषयी मुलांपेक्षा प्रौढांना अधिक चांगली जाणीव असते. दुसरे असे की, ज्या पद्घतीने आपले सामाजीकरण घडून यावे असे मुलांना वाटते, तीवर प्रौढांचे अधिक नियंत्रणही असते व त्यामुळे अधिक उत्साहाने ते सामाजीकरण प्रक्रियेत सहभागी होतात. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लहानपणी शिकलेल्याच भूमिका त्यांना पुढे कराव्या लागतील असे नसल्यामुळे अनेक नव्या भूमिका त्यांना शिकाव्या लागतात.

वृद्घ वयातील सामाजीकरण : व्यक्ती वयाने वृद्घ झाली म्हणजे सामाजीकरण थांबते असे नाही. याही वयात नव्या भूमिका स्वीकाराव्या लागतात व अनेक समस्यांशी समायोजन साधण्यासाठी नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. नवीन पिढीशी जुळवून घ्यावे लागते. पिढीतील अंतरामुळे मुले, सुना व वृद्घ व्यक्ती यांच्यात मतभेद होतात. त्यांच्याशी वृद्घ व्यक्तींना जुळवून घेणे कठीण असले, तरी हे शिकावे लागते. संयुक्त कुटुंब असेल, तर आजी-आजोबांची भूमिका पार पाडावी लागते. औद्योगिकीकरण व नागरीकरणामुळे विभक्त कुटुंबपद्घतीत वाढ होत आहे.

सामाजीकरणाची साधने : समाजातील विविध समूहांकडून व्यक्तीचे सामाजीकरण घडवून आणले जाते. त्या समूहांना सामाजीकरणाची माध्यमे, साधने वा यंत्रणा असे म्हणतात. कुटुंब, शाळा, महाविद्यालये, समवयस्क मित्रांचे समूह, जनसंपर्क माध्यमे, विविध व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, निरनिराळ्या संघटना, मंडळे, राजकीय पक्ष इ. संस्थांकडून व्यक्तीचे सामाजीकरण घडून येते. सामाजीकरणाचे साधन म्हणून कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंब ही व्यापक समाजाची छोटी प्रतिकृतीच होय. मुलाचे प्राथमिक सामाजीकरण मुख्यतः कुटुंबातच होते. आई, वडील, मोठी भावंडे यांच्याकडून कुटुंबात मुलाचे सामाजीकरण होते. समाजातील शिस्तीचे नियम, इतर नियमने, मूल्ये यांचे ज्ञान कुटुंबात होते.

शाळा, महाविद्यालये आणि अन्य शिक्षणसंस्था हीदेखील आधुनिक-औद्योगिक समाजातील महत्त्वाची साधने होत. पूर्वी शिक्षण, व्यवसाय-शिक्षणाची जबाबदारी कुटुंबामार्फतच पार पाडली जाई पण आधुनिक गुंतागुंतीच्या औद्योगिक समाजात प्रौढपणीच्या विविध भूमिकांसाठी काही किमान शालेय औपचारिक शिक्षणाची गरज असते. त्यामुळे पुढच्या जीवनात उपयुक्त अशा ज्ञानाचा लाभ मुलाला शालेय सामाजीकरणातून होतो. आपल्या देशाची संस्कृती, इतिहास, भूगोल, देशात होऊन गेलेल्या थोरामोठ्यांची चरित्रे, त्यांचे तत्त्वज्ञान इ. विविध गोष्टींविषयींची माहिती शाळा, महाविद्यालयाच्या अभ्यासकमातून होते. शिवाय तर्कशुद्घ विचार, आधुनिक मूल्ये, शास्त्रीय ज्ञान इ. गोष्टीही शाळा-महाविद्यालयीन शिक्षणामुळेच मुलाला प्राप्त होतात.

सामाजीकरणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून समवयस्कांच्या समूहाचा उल्लेख करता येईल. घरातील वडीलधारी मंडळी व शाळेतील शिक्षक यांच्याहून गुणात्मकरीत्या वेगळ्या पद्घतीचे सामाजीकरण समवयस्क मित्रांच्या समूहाकडून घडून येते. घराशेजारील मुलाच्या वयाची इतर मुले, शाळेतील त्याच्या वर्गातील इतर मुले वा खेळाच्या मैदानावरील मुलाचे मित्र असे विविध ठिकाणी हे समूह तयार होऊ शकतात. वडीलधाऱ्या व्यक्तींशी मुले बरोबरीच्या नात्याने वागू शकत नाहीत पण समवयस्क मित्रांशी मात्र बरोबरीचे वा समानतेचे नाते प्रस्थापित होऊ शकते. त्यांच्या दृष्टीने ‘खासगी’ विषयावर ते चर्चा करू शकतात. मुलांना आपल्या वयाच्या व्यक्तींशी कसे वागावयाचे हे समजू शकते. त्यांच्याशी होणाऱ्या आंतरकियांतून मुलाची सामाजिकता वाढीस लागते. समूहात मुलाला नेता, अनुयायी, मध्यस्थ इ. भूमिका कराव्या लागतात. अशा भूमिकांचे शिक्षणही त्याला या समूहात मिळते. समवयस्क सोबत्यांच्या संगतीतच मुलाला आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या अस्तित्वाची जाणीव होते.

आधुनिक समाजातील सर्वच व्यक्तींच्या सामाजीकरणात जनसंपर्क माध्यमांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जनसंपर्क माध्यमे एकाच वेळी असंख्य लोकांपर्यंत पोहोचतात. वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके, रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट ही अशी प्रभावी जनसंपर्क माध्यमे होत. ही माध्यमे माहिती, मूल्ये, मते, चर्चा इ. गोष्टी व्यक्तींसमोर ठेवतात. व्यक्तींना समाजपरिवर्तनासाठी अनुकूल बनविण्याचे तसेच प्रेरित करण्याचे कामही या माध्यमांद्वारे होते. लोकांचे विचार, मते, मूल्ये, अभिरुची, ज्ञान या गोष्टींत भर टाकण्याचे वा ती बदलण्याचे सामर्थ्य त्यांत असते.

सामाजीकरणाचे समाजजीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक पिढी नव्या पिढीकडे आपल्या समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या समग्र  सामाजिक वंशाचा ठेवा हस्तांतरित करीत असते, म्हणजेच संस्कृतीचे संक्रमण घडून येते. सामाजिक नियंत्रणाचे प्रभावी साधन म्हणूनही ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. व्यक्तीमध्ये समाजाचा क्रियाशील सभासद बनण्याची पात्रता या प्रक्रियेद्वारे निर्माण होते. तसेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणण्याचे कार्य सामाजीकरणाच्या या प्रक्रियेद्वारे पार पाडले जाते. थोडक्यात, सामाजीकरण ही समाजजीवनातील केंद्रीय प्रक्रिया आहे. व्यक्तीच्या दृष्टीने तसेच समग्र समाजाच्या दृष्टीनेही सामाजीकरणाची काही महत्त्वाची कार्ये आहेत आणि त्यातच सामाजीकरणाचे महत्त्व सामावले आहे.

संदर्भ : 1. Bartlett, H. Stoodley, Ed. Society and Self, Glencoe, 1962.

    2. Fine, Gary A. With the Boys Little League Baseball and Preadolescent Culture, Chicago, 1987.

   3. Ghorpade, M. B. Essentials of Child Psychology, Bombay, 1979.

   ४. शरयू , बाळ सोहनी, भा. के. बालमानसशास्त्र, पुणे, १९६४.

   ५. साळुंखे, सर्जेराव, समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, पुणे, १९९६.  

केंद्रे, किरण