ग्रामसंस्था : स्वतंत्र रीत्या अगर सामूहिक रीत्या स्वतः कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला ग्राम असे सामान्यतः म्हटले जाते. शेती करण्याची कला किंवा तंत्र मानवाला अवगत झाले, तेव्हापासून ग्राम किंवा खेडेगाव हे अस्तित्वात आले. अन्नधान्याच्या शोधार्थ मानव भटकत होता, तेव्हा त्याला एकाच ठिकाणी कायम वस्ती करून राहणे शक्य नव्हते. म्हणून खेडेगावाचे कायम स्वरूप, हे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांच्या अन्नधान्याच्या किमान गरजा भागवण्याइतकी उत्पादनक्षमता असलेली जमीन उपलब्ध असण्यावर अवलंबून असे. जमिनीची अशी क्षमता ही मूलतः जमिनीचा गुण आणि जमीन कसण्याकरिता उपलब्ध असलेले ज्ञान आणि अवजारे यांवर अवलंबून असते. जमीन चांगली असेल किंवा जमीन लागवडीखाली आणण्याचे तंत्रज्ञान प्रगत असेल, तेथे वस्ती मोठी असणे स्वाभाविक आहे. खेडेगाव हे मुळातच शेतजमिनीवर आधारित असल्यामुळे व स्वतः कसत असलेल्या शेताजवळ राहण्याची मानवाची सहजप्रवृत्ती असल्यामुळे, त्याच्या आकारावर साहजिकच मर्यादा पडतात. म्हणून खेडेगाव हे नगरापेक्षा किंवा शहरापेक्षा आकाराने लहान असते. खेडेगावाचे स्वरूप हे (१) भौगोलिक, प्रादेशिक किंवा परिस्थितिविज्ञानात्मक, (२) सामाजिक रूपरचनात्मक, (३) सामाजिक संस्थात्मक आणि (४) सांस्कृतिक असे चतुर्विध आहे.

खेडेगावाचे प्रादेशिक स्वरूप : खेड्यातील लोकांची घरे एकमेकांच्या अगदी निकट आहेत, की एकमेकांपासून अलग किंवा लांब आहेत, यांवरून हे स्वरूप ठरते. जगात दोन्ही प्रकारची गावे आढळतात. भोवताली शेतजमिनी पसरलेल्या आणि मध्ये दाटीवाटीने वसलेली घरे, हे खेडेगावाचे स्वरूप सर्वांच्या परिचयाचे आहे. प्रत्येकाचे घर जेव्हा स्वतःच्या शेतजमिनीने किंवा फळबागांनी वेढलेले असते, तेव्हा साहजिकच घराघरांमध्ये अंतर असणे अपरिहार्य ठरते. वस्तीचा तिसरा एक प्रकार डोंगराळ भागात किंवा शेतजमीन अपुरी वा कमी असल्यास दिसून येतो. डोंगराळ भागांत दऱ्याखोऱ्यांतून अगर माळरानावर शेतीकरिता सलग आणि मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध नसते. जी जमीन एकत्र उपलब्ध असते, ती सर्वसाधारणपणे दोन–चार कुटुंबाना पुरणारी असते. म्हणून अशा प्रदेशात दोन–चार कुटुंबांची घरेच एकत्र दिसतात. बहुतेक मैदानी प्रदेशात सर्वांची घरे एकत्रित वा केंद्रीकृत असलेली गावे अधिक दिसतात आणि नदीकाठी, नदीच्या मुखाजवळील प्रदेशात किंवा भातशेतीच्या प्रदेशात तुरळक वस्तीची गावे दिसतात. अमेरिकेत प्रथम वसाहतीस आलेल्या गोऱ्या लोकांची गावे ही या नियमाला अपवाद होत. लागवडीलायक जमीन मुबलक असल्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे घर हे त्याच्या मालकीच्या शेताच्या मध्यभागी होते. म्हणून घराभोवती प्रत्येकाची शेतजमीन पसरली असल्यामुळे त्यातून केंद्रीकृत गाव निर्माण होणे शक्यच नव्हते. त्याचप्रमाणे ब्रिटिश बेटांवरील सर्वच भागांत (इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड व आयर्लंड) अलग अलग पसरलेली वस्तीच प्रामुख्याने दिसून येते. इतर पाश्चिमात्य देशांत दोन्ही प्रकारांची गावे प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार दिसून येतात.

भारतात सपाट मैदानी प्रदेशात केंद्रीकृत गावेच दिसून येतात. याच गावांना भारतीय ग्रामीण जीवनाचे प्रातिनिधिक स्वरूप आलेले आहे. बहुसंख्य भारतीय गावे याच प्रकारची आहेत. परंतु हिमालयाच्या पायथ्याशी व अन्य डोंगराळ भागांत सलग लागवडीलायक जमीन कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे महसूलाच्या हिशेबाने एकाच गावाखाली येणाऱ्या लहान लहान अशा अनेक वस्त्या दिसतात. एकाच गावाखाली येणाऱ्या अशा वस्त्यांना महाराष्ट्रात वाड्या किंवा पाडे म्हणतात. डोंगराळ भागातील काही गावांच्या वीस ते पंचवीसपर्यंतही वाड्या आहेत. अशा वाड्या मैदानी भागातील गावांच्याही आहेत परंतु आकाराने त्या डोंगराळ भागातील वाड्यांपेक्षा सरासरीने मोठ्या आहेत. गावातील प्रत्येक घर भातशेतीने अगर फळबागांनी वेढलेले असल्याने, दक्षिण बंगाल, दक्षिण पंजाब, कोकणपट्टी आणि मलबार प्रदेश या ठिकाणी अशी घरे अलग पडलेली गावे दिसून येतात. या भागांत रस्त्याचे दुतर्फा अशा घरांची रांगच दिसते आणि एक गाव कोठे संपते व दुसरे कोठे सुरू होते, हे सहसा कळत नाही.

ग्रामवस्तीचे हे भिन्न प्रकार मुख्यतः भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि शेतीविषयीची अर्थव्यवस्था यांवर अवलंबून आहेत, असे म्हटले जाते. भौगोलिक परिस्थितीत भूपृष्ठाची वर निर्देशिलेली वैशिष्ट्ये, जमिनीचे गुणदोष, पाण्याची सोय इ. बाबी येतात. जेथे नद्यांच्या महापुराचा धोका असेल, तेथे उंचवट्यावर सर्वांची घरे एकत्रित असलेली दिसतात. त्याचप्रमाणे लागवडीलायक अशी जमीन सलग असली, तरी केंद्रीकृत गावे अधिकतर दिसून येतात. पाण्याची पुरेशी सोय नसल्यास विहीर, तलाव, झरा इत्यादींच्या लगत सर्वांची घरे एकत्रित असणे अधिक फायदेशीर ठरते. परंतु वस्तीच्या स्वरूपाबाबत पाण्याची सोय ही तितकीशी निर्णायक ठरत नाही, असेही दिसून आले. सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात गावकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता आणि मालमत्तेची व्यवस्था ह्या प्रामुख्याने उल्लेखिल्या जातात. एकाच कुळीचे वा वंशाचे किंवा समान संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहतात, असे काहींचे म्हणणे आहे. या बाबतीत एकवाक्यता दिसून येत नाही. काही ठिकाणी भिन्नभिन्न वंशांचे लोकही एकत्र राहत आले आहेत. समान संस्कृती ही एकत्र राहण्याची व त्यायोगे येणाऱ्या अन्योन्य संबंधांची परिणती होऊ शकते. समान व्यवसायांच्या गरजाही समान असतात. त्यांत एकमेकांची मदत घेणे अपरिहार्य ठरते. मदतीची अन्य साधने उपलब्ध नसल्यास समान व्यवसायांतील लोकांनी एकत्र राहून आपल्या समस्या सोडविणे आवश्यक ठरते. शेतीव्यवसायात नांगराचा वापर सुरू झाल्यापासून एकमेकांच्या मदतीची आवश्यकता अधिक भासू लागली आणि त्यामुळे एकत्र राहणे अपरिहार्य ठरले, असे काहींचे म्हणणे आहे. वन्य जनावरांपासून किंवा उपद्रवकारक टोळ्यांपासून संरक्षण मिळावे आणि प्रसंग पडल्यास इतरांची मदत मिळावी, म्हणूनही केंद्रीकृत गाव हे आवश्यक ठरले असावे, असा काहींचा तर्क आहे. पंरतु सर्वच केंद्रीकृत गावे ही या उद्दिष्टाने अस्तित्वात आलेली नाहीत. लागवडीखाली आणलेल्या सर्व सलग जमिनीचा मालक एकच असला, तर तो आपल्या अनेक कुळांवर नियंत्रण ठेवणे सुलभ व्हावे, कोणीही आपल्या ताब्यातून फुटून जाऊ नये, म्हणून सर्वांची वस्ती एकत्रच असणे पसंत करतो, असे म्हटले जाते. परंतु काही ठिकाणी सर्व कुळे एकत्र आली तर आपली सत्ता कदाचित झुगारून देतील, या भीतीने कुळांना अलग अलग ठेवल्याची उदाहरणेही आहेत. अशारीतीने वरील एक किंवा अनेक कारणांमुळे केंद्रीकृत गावे अस्तित्वात आली असण्याची शक्यता आहे. त्यांच्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण अमुक अशा एकाच कारणाच्या आधारे करता येत नाही.


खेडेगावाचे सामाजिक रूपरचनात्मक स्वरूप : सामाजिक रूपरचनेत सामाजिक व्यवच्छेदन किंवा प्रभेदन (डिफरेन्शिएशन), स्तरीकरण (स्ट्रॅटिफिकेशन) आणि गतिशीलता (मोबिलिटी) हे विषय येतात आणि ते विशेषतः केंद्रीकृत ग्रामसमुदायाशी संबंधित आहेत. व्यवच्छेदन हे गावात जे अलग अलग गट निर्माण होतात व त्यांच्या सदस्यांमध्ये जो आपपरभाव अनेक सामाजिक संबंधांतून व्यक्त होतो, त्यांवरून दिसून येते. या सामाजिक गटांच्या प्रभेदनाच्या मुळाशी सर्वसामान्यपणे पुढील कारणे असतात : (१) रक्तसंबंध, वंशसंबंध किंवा समाईक पूर्वज यांत लोकांच्या समजुतीला महत्त्व असते. त्यातील खरेखोटेपणाला नाही. (२) विवाहसंबंध. (३) समान धर्म, श्रद्धा, कर्मकांड इत्यादी. (४) भाषा, बोली आणि लोकनीतीतील सधर्म्य. (५) जमिनीची समाईक मालकी आणि तिचा वापर. (६) प्रादेशिक सामीप्य किंवा एकमेकांच्या शेजारी राहणे. (७) सामाजिक हक्क-कर्तव्यांच्या व शासकीय व्यवस्थेच्या बाबतीतील समाईक जबाबदारी. (८) व्यावसायिक हितसंबंध. (९) अनेक प्रकारचे आर्थिक हितसंबंध. (१o) समाईक सत्तेखाली वावरणे. (११) एकाच धार्मिक, शासकीय, शैक्षणिक किंवा इतर सामाजिक संस्थांशी संलग्न असणे. (१२) समाईक संरक्षणाची यंत्रणा. (१३) समाजजीवनातील परस्पर साहाय्याचे सातत्य. (१४) जीवनाची सर्वसामान्य पद्धत, अनुभव आणि सामाजिक व्यवहार हे समान, समाईक किंवा एकत्रित असणे. या कारणांपैकी रक्तसंबंध, धर्म, विवाह, भाषा आणि जमिनीची समाईक मालकी यांमुळे निर्माण झालेले गट अधिक घनिष्ट संबंधांचे असतात. ग्रामीण समुदायात यांमुळे निर्माण झालेले छोटेमोठे गट असतात. कुटुंब आणि सगेसोयरे यांचा गट हा या दृष्टीने अतिमहत्त्वाचा ठरतो. परंतु समुदाय हाच एक मोठा गट असतो. कारण त्याच्या मागे वर उल्लेखिलेली सर्वच कारणे असतात. ग्रामीण समुदाय हा या दृष्टीने एक मोठा परंतु नागरी समाजाच्या तुलनेने कितीतरी लहान असा प्राथमिक गट असतो. नित्य-नैमित्तिक व्यवहारांतील अनेक अन्योन्य संबंधांच्या धाग्यांनी तसेच इतिहास, परंपरा व अनुभव यांच्या साधर्म्याने व समाईकतेने आणि शासकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाच्या स्वयंपूर्णतेने समुदायाच्या सदस्यांमध्ये आपल्या समुदायाबद्दल आपुलकी निर्माण झालेली असते. कुटुंबात जन्मलेले मूल ज्याप्रमाणे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्यातील परस्परसंबंध यांचे सातत्य गृहीत धरते त्याप्रमाणे ग्रामीण समुदायाचा सदस्य हा त्यातील सामाजिक संबंध हे चिरंतन स्वरूपाचे आहेत, असे समजून वागतो. त्याला काही पर्याय असू शकेल, याची कल्पनादेखील त्याच्या मनाला शिवत नाही. म्हणून प्रचलित सामाजिक संबंध हे त्याच्या दृष्टीने अंतिम स्वरूपाचे बनतात. हे संबंध टिकविणे हेच त्याचे कार्य ठरते. सामाजिक संबंध हे त्याच्याकरिता साधन न बनता साध्य बनतात. वर उल्लेखिलेल्या कारणांमुळे जवळीक अधिक निर्माण झालेल्या व्यक्तींचा औपचारिक वा अनौपचारिक गट बनतो. त्या गटापुरता संबंधित व्यक्तींच्या मनात आपलेपणा असतो आणि इतर गटांतील व्यक्तींबद्दल परकेपणा असतो. समुदाय सर्व दृष्टींनी स्वयंपूर्ण असेल, म्हणजे समुदायाच्या व समुदायातील व्यक्तींच्या सर्व गरजा ह्या बाह्य संपर्काशिवाय भागविल्या जात असतील आणि समुदायातील व्यक्तींचे व गटागटांचे संबंध हे कायम स्वरूपाचे असतील, तर समुदाय हाच महत्त्वाचा गट ठरतो. अशा समुदायातील भेदात्मक इतर गट हे सामुदायिक जीवनास पूरक म्हणून राहतात किंबहुना गटाधिष्ठित जीवनावरच सामुदायिक जीवन आधारलेले असते.

ग्रामीण समुदायातील सामाजिक स्तर हे त्यातील व्यक्तींच्या जमिनीशी असलेल्या संबंधांवर आधारित असतात. जगभरच्या ग्रामीण समाजांच्या पाहणीवरून त्यांतील सामाजिक स्तरांची प्रतवारी पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते : केवळ कायद्याच्या दृष्टीने व्यवस्थापकाच्या करवी शेतजमिनीची व्यवस्था पाहणारे मोठे जमीनदार, हे उच्च स्तरावर असतात. त्याखालोखाल ही व्यवस्था स्वतःच्या देखरेखीखाली पाहणारे मोठे जमीनदार, मजूर लावून स्वतःची शेती करणारे शेतकरी, कूळ म्हणून गैरहजर असलेल्या मालकाच्या जमिनी करणारे शेतकरी, स्वतःची जमीन कसणारे लहान शेतकरी व शेतमजूर असे वर्ग येतात. यांपैकी शेवटच्या तीन स्तरांवरील लोकांत कौटुंबिक सदस्यही शेतकामात भाग घेतात. वरच्या वर्गात कुटुंबाकडे बहुधा देखरेखीचे काम असते. बिगरशेती कारागीर हे आपल्या सामाजिक महत्त्वास अनुसरून खालच्या तीनही स्तरांमध्ये मोडतात.

स्थलीय किंवा व्यावसायिक गतिशीलतेचा अभाव हे बहुधा सर्वच प्राचीन ग्रामीण समुदायांच्या स्तरीकरणाचे लक्षण होते आणि आधुनिक ग्रामीण समुदायातही ते बव्हंशी टिकून आहे. व्यावसायिक साधने ही दीर्घकाळपर्यंत अपरिवर्तित व अविकसित राहणे, व्यवसायाचे स्वरूप कौटुंबिक असणे म्हणजे कुटुंबातील सर्वच या ना त्या रीतीने त्यात सहभागी होणे, व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न हे सर्व कुटुंबाला पुरेसे असणे, बुद्धि-कौशल्य-कारागिरीसहित व्यवसायाची सर्व साधने कुटुंबातील पुढच्या पिढीच्या हातात सोपविणे शक्य असणे, हे सगळ्याच कुटुंबांच्या बाबतीत घडत असल्याने कुटुंबाकडे व्यवसायाची मक्तेदारी असणे किंवा त्याविषयी इतरांकडून स्पर्धा नसणे, अन्य नव्या व्यवसायांची भर न पडणे किंवा नव्या व्यवसायांचे स्वरूपही याच प्रकारचे असणे आणि वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा स्थिर राहणे, या कारणांमुळे एकच एक व्यवसाय पिढ्यान् पिढ्या कुटुंबात टिकतो आणि कौटुंबिक अस्मिता व परंपरा ही त्या व्यवसायाशी निगडित अशी बनते.  कौटुंबिक परंपरा सोडून वागणे हे आवश्यक नसते आणि शक्यही नसते. कौटुंबिक हितसंबंध हे व्यवसायाशी निगडित असतात. व्यावसायिक हितसंबंध हेच आर्थिक हितसंबंध बनतात आणि या आर्थिक हितसंबंधांनुसार शासकीय वा राजकीय हितसंबंधांचे गट बनतात. यांमुळे कौटुंबिक, आर्थिक व राजकीय हितसंबंध व सामाजिक संबंध हे समरूप बनतात. कुटुंबाशिवाय व्यवसाय नाही आणि व्यवसायाशिवाय सामाजिक स्थान नाही, अशा परिस्थितीत कुटुंबाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. स्तरीकरणाच्या बाबतीत, म्हणूनच कुटुंबाचा दर्जाच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला मिळतो. सामाजिक स्थान वा दर्जा यांच्या बाबतीत व्यक्तीला स्वातंत्र्य राहत नाही. म्हणून गतिशीलता ही अशा समुदायात अभावानेच तळपते. असे असूनही शेतमजूर हा लहान शेतकरी झाल्याची व लहान शेतकरी मोठा शेतकरी झाल्याची तुरळक उदाहरणे सापडतात.

खेडेगावाचे सामाजिक संस्थात्मक व सांस्कृतिक स्वरूप : ग्रामीण सामाजिक संस्थांमध्ये कुटुंब ही मध्यवर्ती संस्था आहे. सर्व सामाजिक संबंधांमध्ये कुटुंबाचे वर्चस्व आणि कौटुंबिकता (फॅमिलिझम) प्रकर्षाने आढळून येते. इतर सर्व संस्थांवर कुटुंबाचाच प्रभाव पडलेला असतो. इतर संस्था ह्या कुटुंबातूनच उगम पावतात आणि मुख्यतः कौटुंबिक हितसंबंधांचे रक्षण व नियमन करण्याकरिता कार्यान्वित असतात. कुटुंबातील सदस्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, धार्मिक, नैतिक, मानसिक, शारीरिक आणि व्यावसायिक दृष्टींनी त्यांना सुसंस्कृत बनविणे इ. कामे नागरी कुटुंबापेक्षा ग्रामीण कुटुंब अधिक यशस्वीपणे करू शकते. ग्रामीण कुटुंबातील पतिपत्नी आणि मातापिता व मुले यांच्यातील संबंध हे अधिक टिकाऊ आणि घनिष्ट असतात. नागरी कुटुंबापेक्षा ग्रामीण कुटुंब हे विस्तारित स्वरूपाचे असते. लांबचे नातेवाईक त्याचे सदस्य असू शकतात. या दृष्टीने ग्रामीण कुटुंब हे कुटुंबाच्या सदस्यांतच नव्हे, तर आप्त-स्वकीयांमध्येही घनिष्ट संबंध निर्माण करते. सदस्यांमध्ये अधिक एकोपा दिसून येतो. वैयक्तिक आवडीनिवडीपेक्षा कौटुंबिक ऐक्याला व सातत्याला अधिक महत्त्व दिले जाते. कौटुंबिक परंपरा आणि अस्मिता यांचा पगडा सदस्यांच्या मनावर अधिक असल्याने त्यातील सदस्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण साचेबंद होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे वैयक्तिक वैशिष्ट्यांपेक्षा कौटुंबिक अस्मितेचे प्रातिनिधिक वळण घेते. कुटुंबप्रमुखाची सत्ता बव्हंशी अनिर्बंध असते. कुटुंबातील श्रम-विभाजन आणि अधिकाराचे वितरण हे लिंगभेद आणि वय यांस अनुसरून केलेले असते. स्त्री-पुरुषांची कामे वेगवेगळी असून स्त्रियांपेक्षा पुरुष आणि लहानांपेक्षा वयस्कर यांच्या हातात सत्ता असते.


व्यवसाय हा कुटुंबाच्या हातात असल्यामुळे, अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग ह्या प्रक्रिया कुटुंबाकडूनच होतात. नाणेव्यवहाराच्या आधी वस्तूंची खरेदीविक्री ही विनिमयाच्या आधारेच होत असे. एकच व्यवसाय पिढ्यान् पिढ्या करीत राहिल्यामुळे आणि व्यवसायाचे स्वरूप, एकूण व्यवसायांची संख्या, गिऱ्हाइके किंवा उत्पादित वस्तूंकरिता असलेली मागणी ही कायम स्वरूपाची असल्यामुळे या प्रक्रियासुद्धा अनौपचारिकपणे संस्थात्मकच बनल्या होत्या. आर्थिक फायद्यापेक्षा उत्पादक आणि त्याला मदत करणारी इतर माणसे यांच्या उपजीविकेकरिता, पालनपोषणाकरिता उत्पादन होत असे. म्हणजे उत्पादनादी घटक हे सामाजिक संबंध टिकविण्याचे एक साधन होते. अर्थव्यवस्थेत कुटुंबास असलेल्या महत्त्वामुळे उत्पादक व उपभोग्य मालमत्ता ही व्यक्तीच्या हातात न राहता कुटुंबाच्या मालकीची बनलेली असे.

कुटुंबास असलेले महत्त्व आणि कौटुंबिक हितसंबंधांचे कायम स्वरूप यांमुळे ग्रामसमुदायाची शासकीय व्यवस्था ही कुटुंबाधिष्ठित आणि तीमधील सत्तास्थाने ही आनुवांशिक स्वरूपाची बनली. ग्रामशासनातील प्रमुखपद आणि त्याच्या सल्लागार मंडळातील सदस्यत्व हे पिढ्यान् पिढ्या ठराविक कुटुंबाकडेच राहिले.

अर्थव्यवस्थेत व शासकीय व्यवस्थेत लिखित कायदे किंवा नियम यांपेक्षा परंपरा, लोकरूढी, लोकनीती इत्यादींना अधिक महत्त्व होते. औपचारिकतेपेक्षा अनौपचारिकपणा हे ग्रामीण व्यवस्थेचे वैशिष्ट्य होते.

अनेक वर्षे स्थिर स्वरूपाचे सामाजिक जीवन जगल्याने आणि बाह्य संपर्काच्या अभावाने ग्रामीण समुदायातील आचारविचार हे अपरिवर्तनीय बनतात. त्यांना धार्मिक श्रद्धेचे स्वरूप प्राप्त होते. समाजजीवनातील सर्वच दालनांत धर्माचा अंमल चालतो. विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट ज्ञानाच्या व हत्यारांच्या आधारे रूढ केलेले श्रमविभाजन आणि अर्थव्यवस्था ही वंशपरंपरेने अभेद्य बनते. एकच एक व्यवसाय वंशपरंपरेने करीत राहिल्यामुळे व्यवसायातील अंदाज-आडाखे, खुबी-कारागिरी, श्रद्धा-संकेत हीदेखील परंपरागत बनतात. समुदायाचा इतिहास हा गतानुभवांतील श्रद्धा-समजुती, आख्यायिका-दंतकथा, पोवाडे-लोकगीते यांनी गुंफलेला असतो. यांमुळे ग्रामसमुदायाला एक विशिष्ट व्यक्तिमत्त्व लाभते. समुदायाचे मूलनिवासी किंवा पूर्वज यांची स्मारके उभारणे, त्यांची पूजा करणे, त्यांचे वार्षिक उत्स साजरे करणे हे समुदायाच्या एकोप्याचे व अस्मितेचे रक्षण करणारे ठरते. त्याचप्रमाणे निसर्गाची पूजाही अनेक रूपे धारण करून रूढ होते. ग्रामीण खेळ-मनोरंजनाच्या प्रकारांतही अनौपचारिकपणा, साधेपणा यांबरोबरच, परंपरा टिकविण्याचा प्रयत्न दिसून येतो. एखाद्या घराचा परिसर, गावातील मध्यवर्ती ठिकाण, गावप्रमुखाच्या घरापुढील अंगण किंवा एखादे देऊळ या ठिकाणी बैठे खेळ वा करमणुकीचे कार्यक्रम होतात. मैदानी खेळांत कृत्रिम साधने अत्यल्प वापरली जातात. निसर्गातून सहजपणे मिळणारी साधनेच अधिकतर वापरली जातात. पुष्कळ खेळांमध्ये साधने लागतही नाहीत.

पिढ्यान् पिढ्या एकाच व्यवसायामध्ये एकाच ठिकाणी राहिल्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती, वास्तू वा ठिकाण, स्वतःचे घर, शेतजमीन, विहीर, आंबराई, पार, पाळलेली जनावरे इत्यादींबद्दल ग्रामीण लोकांत आपुलकी निर्माण झालेली असते. लहानपणापासूनचे अनेक अनुभवांचे धागे त्यांभोवती गुंतलेले असतात. नाजूक अशा भावना त्यांच्याशी निगडित झालेल्या असतात. ही आपुलकी, ह्या भावना म्हणजे स्थिर जीवनाची देणगी आहे. नागरी जीवनातील अस्थिर व क्षणिक अशा संबंधांतून ही आपुलकी वा भावना निर्माण होणे कठीण असते.

भारतीय ग्रामसंस्था : परंपरागत भारतीय खेडे हे केंद्रीकृत स्वरूपाचे मानले जाते. भारतात बहुतेक भागांत केंद्रीकृत खेडीच अधिक दिसून येतात. या खेड्यांभोवती खेड्यातील रहिवाश्यांच्या जमिनी पसरलेल्या असतात. जमिनी फारच लांब असल्या अगर रोज जाण्यायेण्याला, शेतावर देखरेख ठेवण्याला अडचण होत असली, तर अशा जमिनीचे माल किंवा शेतकरी आपापल्या जमिनींजवळच घर करून राहतात. परंतु व्यवहाराच्या दृष्टीने त्यांचा संबंध संपूर्णपणे मुख्य गावाशी येतो. अशा संदर्भात मुख्य गाव आणि त्याच्या इतस्ततः विखुरलेल्या वाड्या या सर्वांना मुख्य गावाचे नावच प्राप्त होते. काही वेळा या वाड्यांनाही नावे असतात. भारतीय खेडे हे सामाजिक व्यवहाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण घटक आहे. ही स्वयंपूर्णता बाह्य संपर्काच्या अभावाने व लोकांच्या किमान गरजांनी लादलेली आहे. या स्वयंपूर्णतेने आणि गावातील सर्वांचे सामाजिक संबंध हे गावापुरतेच मर्यादित राहिल्याने गावातील व्यक्तींमध्ये समुदायभावना संपर्णूपणे भिनलेली आढळते.

सामाजिक प्रभेदन हे भारतीय समाजाचे, त्यातही ग्रामसमुदायाचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते गावातील वेगवेगळ्या कुटुंबांना घरांकरिता मिळालेल्या जागेवरूनही दृष्टोत्पत्तीस येते. गावाभोवती वेस असणे आणि गावात प्रवेश करावयाचा मुख्य रस्ता वेशीच्या दरवाजातून जाणे, हे भारतीय गावाचे वैशिष्ट्य आहे. या दरवाजाच्या आत अगर बाहेर मारुतीचे अगर ग्रामदेवतेचे देऊळ असते. गावात प्रवेश केल्यावर प्रथम गावप्रमुखाचे घर अगर चावडी असते. ही इमारत बहुधा इतर घरांपेक्षा भक्कम असते. पाटलाचे (गावप्रमुखाचे) घरही इतरांच्यापेक्षा त्याच्या स्थानमानास अनुसरून भक्कम आणि प्रशस्त असते. मध्य प्रदेशामध्ये पाटलाच्या घराला गढी म्हणतात व त्याच्या घराचे स्वरूपही गढीसारखेच असते. पाटलाच्या घरालगत अगर अशाच मध्यवर्ती ठिकाणी ग्रामपुरोहिताचे तसेच गावातील प्रतिष्ठित अशा इतर लोकांची घरे असतात. पाटलाचे घराणे परंपरागत असल्याने त्याचे आप्तस्वकीयही गावात पुष्कळ असण्याची शक्यता असते. प्रथमतः एकाच कुटुंबातील आणि कालांतराने वेगळी झालेली ही मंडळी असल्याने त्या सर्वांची घरे एकमेकांना लागून असण्याची शक्यताही असते. अशा रीतीने एका एका कुळीची घरे एकत्र येऊन त्यांचीच एक स्वतंत्र आळी बनलेली असते. व्यवसायपरत्वेही कुटुंबांची घरे अलग पडतात आणि काही लोकांची घरे वेशीच्या बाहेरही असतात. अर्थातच गावात मध्यभागी राहणारे हे अधिक प्रतिष्ठित आणि गावठाणाच्या सीमेवर राहणारे कमी प्रतिष्ठेचे व गावाबाहेर राहणारे हीन दर्जाचे असेही घरांचे पृथक्करण झालेले असते. गावातील रहिवाशांचे आणि पर्यायाने त्यांच्या घरांचे प्रभेदन हे मूलतः हिंदू धर्माने शिक्कामोर्तब केलेल्या अगर पुरस्कारलेल्या चातुर्वर्ण्याच्या व जातिव्यवस्थेच्या कल्पनांवर आधारलेले आहे. चातुर्वर्ण्यात उल्लेखिलेले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र आणि चातुर्वर्ण्याबाहेरील अतिशूद्र किंवा पंचम हे सरसकट याच नावांनी भारतीय गावांमध्ये ओळखले जात नाहीत. पुरोहित वा जोशी म्हणून एखादे आणि परंपरागत गावकामगारांपैकी कुळकर्णी-पटवारी-शानभोग इ. नावांनी ओळखले जाणारे शासकीय हिशेबनीसाचे दुसरे, अशी ब्राह्मणांची दोनतीन कुटुंबेच सर्वसामान्यपणे गावात दिसून येत असत. उरलेल्यांत बहुसंख्य वर्ग हा शेतकऱ्यांचा असावयाचा. महाराष्ट्रातील मराठे-माळी गुजरातमधील पाटीदार कर्नाटकातील लिंगायत-वक्कलिग तमिळनाडूमधील नाडर आंध्रमधील रेड्डी केरळमधील नायर पंजाबमधील जाट इ. जाती यांत येतात. या जाती चातुर्वर्ण्याच्या नियमाप्रमाणे वैश्य या नावास अधिक पात्र आहेत. परंतु परंपरेने या जातींनी स्वतःस क्षत्रिय म्हणवून घेतले आहे आणि सर्वसामान्यपणे त्यांना क्षत्रिय समजण्यात येते. परंतु क्षत्रिय नावाची जात क्वचित पाहवयास मिळते. शेतकऱ्यांच्या खालोखाल सुतार, लोहार, कुंभार, सोनार इ. हस्तव्यावसायिकांच्या जाती येतात. न्हावी, परीट, गुरव इ. सेवाकार्याच्या जाती ह्या शूद्र समजल्या जातात. त्या खाली चांभार, महार, मांग  इ. अतिशूद्र किंवा अस्पृश्य समजलेल्या जाती येतात. शेतकऱ्यांच्या खाली दुकानदारी, सावकारी करणाऱ्या जातींना वैश्य समजले जाते. गावातील घरांची मांडणी व जातींनुसार वा त्यांच्या वर्णांनुसार केलेली दृष्टीस पडते. गावप्रमुख हा सर्वसामान्यपणे शेतकरी वर्गातील असतो. याव्यवतिरिक्त काही गावांत मुसलमान आणि क्वचित ख्रिस्ती कुटुंबेही असतात. मुसलमानांची घरेही सलग परंतु इतरांपासून अलग असतात.


घरांच्या मांडणीतील प्रभेदन हे धर्मकल्पनांवर आधारलेल्या स्तरीकरणावर अवलंबून असते. स्तरीकरण हे सामाजिक स्थानावर आणि त्या स्थानास समाजाकडून मिळणाऱ्या मोबदल्यावर अवलंबून असते. हा मोबदला संपत्ती, सत्ता व प्रतिष्ठ अशा त्रिविध स्वरूपांत असतो आणि प्रत्येक स्थानाचे समाजाला असलेले महत्त्व, त्या स्थानाकरिता उपलब्ध असलेले मनुष्यबळ इ. गुणविशेषांवर हा मोबदला अवलंबून असतो. सामाजिक स्थान हे मुख्यतः समाजाकरिता करावयाच्या कार्यावरून निश्चित होते. हे कार्य उत्पादक किंवा सेवाभावी असे दोन्ही प्रकारचे असू शकते. खेडेगावातील सर्वच कार्य कुटुंबामार्फत होते. भारतीय समाजातील जाती ह्या व्यवसायाच्या बाबतीतही एकमेकींहून भिन्न आहेत. प्रत्येक जातीकडे पारंपरिक असा व्यवसाय राहिलेला आहे. त्यात त्या त्या जातीची मक्तेदारी असते आणि इतरांना त्या व्यवसायात सहसा प्रवेश मिळत नाही. व्यवसाय हे समाजाकरिता करावयाचे कार्य होय. म्हणून प्रत्येक जातीचे समाजातील स्थान व पर्यायाने तिचा सामाजिक दर्जा निश्चित होतो. यामुळे सामाजिक स्तरीकरण हे जातीवर अवलंबून असते. याचा परिणाम म्हणून काही जाती उच्च आणि काही नीच असे स्तरीकरणास कायम स्वरूप प्राप्त झाले. व्यवसाय बदलणे ही दुःसाध्य गोष्ट असल्यामुळे गतिशीलताही फारशी अस्तित्वात नव्हती. प्रत्येक जातीचे सामाजिक स्थान हे एक प्रादेशिक वैशिष्ट्य होते. परक्या गावी जाऊनही, अगर व्यवसायांची चाकोरी एकाच स्वरूपाची असल्यास, सामाजिक दर्जात फारसा फरक पडत नसे. दुसऱ्या प्रदेशात गेल्यास कदाचित आहे त्याहूनही कनिष्ठ दर्जा मिळत असे. हे ब्राह्मणांच्या बाबतीत दिसून येते, तसेच हीन लेखलेल्या जातींच्या बाबतीतही दिसून येते.

भारतीय ग्रामीण समुदायाच्या व्यवहारात कुटुंबसंस्थेस अतीव महत्त्व प्राप्त झाले. अर्थव्यवस्थेचे आणि शासकीय व्यवस्थेचे अधिष्ठान कुटुंबात होते. कुटुंब हा केवळ सामाजिक गट नव्हता, तर आर्थिक आणि राजकीय गट होता. कुटुंब हा धर्माचरणाच्या बाबतीत एकमेव असा गट होता. ग्रामीण कुटुंब हे अधिक स्थिर आणि कौटुंबिक परंपरा टिकवणारे असल्याने हिंदू धर्म हा मुख्यतः खेड्यापाड्यांतून जोपासला गेला, असे म्हणता येईल. ग्रामीण विभागात हिंदू धर्म टिकवून धरण्याचे कार्य तेथील संयुक्त कुटुंबानेच अधिक यशस्वीपणे केले आहे, असे म्हटले जाते. परंतु त्याचबरोबर प्रादेशिक जीवनपद्धतीस अनुसरून काही विशिष्ट रूढीही धार्मिक स्वरूपाच्या बनल्या. व्यापक जनजीवनाला जवळ असलेल्या आणि जनतेला समजतील अशा हिंदू संस्कृतीच्या छोट्या आवृत्त्या खेड्यापाड्यांतील समाजात दिसून येतात. ग्रामीण कुटुंब हे अशा संस्कृतीचे आगर बनले. सामाजिक प्रक्रिया आणि जातिव्यवस्था यांमुळे व्यवसाय हा आनुवंशिक बनला. व्यावसायिक हितसंबंध हे कौटुंबिक हितसंबंध बनले.

अर्थव्यवस्था ही मुख्यतः कुटुंबावर आणि पर्यायाने जातिव्यवस्थेवर आधारित होती. कुटुंब हे कायम एकाच जातीत समाविष्ट होत असल्यामुळे कुटुंबाकुटुंबांतील सहकार्य हे जातिजातींतील सहकार्य ठरत असे. अर्थव्यवस्थेतील या सहकार्याला भारतीय ग्रामीण जीवनात महत्त्वाचे स्थान होते. आर्थिक सहकार्याच्या या पद्धतीला उत्तर भारतात ‘यजमानी’ किंवा ‘जजमानी’, महाराष्ट्रात ‘बलुतेदारी’ आणि कर्नाटकात ‘आयगार’ अशी नावे आहेत. ही भारतात सर्वत्र दिसून येणारी पद्धत आहे. महाराष्ट्रात, शेतकऱ्याच्या नित्याच्या गरजा पुरविणारे बारा बलुतेदार आणि नैमित्तिक गरजा पुरविणारे अठरा अलुतेदार होते. हे बारा बलुतेदार इतके महत्त्वाचे मानले गेले होते, की त्यांच्यापैकी काहींना शासकीय कागदपत्रांत गावकामगार किंवा गावातील महत्त्वाचे बिगरशेती कारागीर वा कामगार म्हणून स्थान मिळाले. बलुतेदारी पद्धतीत शेतकरी हा मध्यवर्ती असून इतर सर्व बिगरशेती कारागीर वा व्यावसायिक हे त्याच्या गरजा पुरविणारे ठरतात. जजमानी, आयगार वा बलुतेदारी पद्धत म्हणजे भारतीय आर्थिक सहजीवनाचे एक खास असे वैशिष्ट्य ठरले आहे. पारंपरिक आर्थिक सहकार्याने गावगाडा सुरळीतपणे आणि बिनबोभाट चालवणारी स्वयंचलित यंत्रणा म्हणून समाजशास्त्रज्ञांनी या पद्धतीचे कौतुक केले आहे [→ अलुते-बलुते].

भारतीय ग्रामीण शासकीय व्यवस्थेचे केंद्रस्थानही कुटुंबच होते. म्हणजे शासकीय व्यवस्थेतील सत्तास्थाने ही आनुवंशिकतेने व्यक्तीला मिळत असत. भारतातील ग्रामीण शासन हे बव्हंशी स्वयंपूर्ण व परंपरागत होते. या शासकीय व्यवस्थेची परंपरा वेदकाळापासून मानली जाते. कारण हिंदू धर्मग्रंथांपैकी वेद, धर्मसूत्रे, स्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र  यांपासून अकराव्या शतकातील शुक्रनीतिसारापर्यंत भारतीय ग्रामशासनासंबंधी दाखले सापडतात. शिवाय ऐतिहासिक पुरावेही उपलब्ध आहेत, म्हणून त्यांचा ऐतिहासिक आढावा घेणे क्रमप्राप्त ठरले.

ऐतिहासिक आढावा : सर चार्ल्स मेट्‍काफ याने १८३२ साली भारतीय ग्रामसंस्थेबद्दल पुढीलप्रमाणे लिहिले आहे : ‘भारतीय गावे ही लहान प्रजासत्ताक राज्ये होत. त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तू गावातच उपलब्ध होतात. परकी संबंधांपासून ते अलिप्त असतात. एकामागोमाग राज्य कोसळतात क्रांतीपाठोपाठ क्रांती होते हिंदू, पठाण, मोगल, मराठा, शीख, आंग्ल हे अदलूनबदलून राज्यकर्ते होतात पण ग्रामसंस्था पूर्वीच्याच कायम राहतात. संकटकाळी ग्रामीण लोक शस्त्रास्त्रे जमवितात व तटबंदी करून स्वतःचे संरक्षण करतात. शत्रू जवळपास आल्यास आपली गुरेढोरे वेशीच्या आत घेऊन त्यास उपद्रव न होता जाऊ देतात. जर शत्रू जास्त सबळ असला आणि त्याने लुटालूट केलीच, तर स्थिरस्थावर झाल्यावर लोक परत आपापले उद्योग करावयास लागतात. जर अशांततेचा काळ बराच मोठा असेल व खेडेगावात राहणे अशक्य असेल, तर तेवढा काळ विखुरलेल्या वा पांगलेल्या अवस्थेत राहून नंतर आपापल्या जागी परत येतात. एक सबंध पिढी जरी निघून गेली, तरी दुसऱ्या पिढीचे लोक परत येतात. परत गावाची तीच जागा घेतली जाते. मुले वडिलोपार्जित जागा घरासाठी घेतात, पूर्वीचीच शेते परत ज्याच्या त्याच्या मालकीची होतात. सर्वसाधारणपणे गावातील लोक लुटालूट व बंडाळीस तोंड देतात पण अगदीच अशक्य झाल्यास गाव सोडून बाहेर जातात’. मेट्‍काफचे हे मत प्रमाण मानले जाते. तसेच त्याच्या मते भारतात ग्रामसमूहांची जी लहानलहान राज्ये निर्माण झाली, त्यामुळेच अनेक क्रांत्या होऊनही भारताच्या लोकांचे वैशिष्ट्य टिकले आणि त्यांचे सुख, समाधान व स्वातंत्र्य हे अबाधित राहिले.

 

प्राचीन भारतीय ग्राम : वाल्मीकी रामायणात ‘घोष’ व ‘ग्राम’ अशा दोन प्रकारच्या खेड्यांचा उल्लेख आहे. त्यांवरील अधिकाऱ्यांना अनुक्रमे घोष-महत्तर व ग्राम-महत्तर म्हणत. घोष हे ग्रामापेक्षा लहान असे. रामायणात ग्रामणी नावाच्या अधिकाऱ्याचाही उल्लेख आहे. ग्रामणीचा मान व अधिकार मोठा असावा. कारण जेव्हा रामाने रावणाचा वध केला, तेव्हा देवांनी रामाची स्तुती करताना त्याची तुलना ग्रामणीशी केली होती. महाभारतातही घोष व ग्राम यांचा उल्लेख आहे. घोष म्हणजे गौळवाडा, हा साहजिकच जंगलाजवळ वसलेला असे. घोषाच्या रहिवाशांना गोप म्हणत असत. मनू मात्र गावच्या अधिकाऱ्यास ‘प्रग्रामिक’ म्हणून संबोधतो. ग्रामिकाने कर वसूल करून सर्वसामान्य प्रशासन करावयाचे असा संकेत होता. ग्रामिकाच्या वरचा अधिकारी ‘दशी’ हा दहा ग्रामांचा प्रशासकीय अधिकारी. वीस गावांचा अधिकारी ‘विशंतीश’, शंभर गावांचा अधिकारी ‘शती’ किंवा ‘शतग्रामाधिपती’. त्याच्यावरील एक सहस्र गावांचा प्रशासकीय अधिकारी सहस्र-ग्रामाधिपती म्हणून ओळखला जाई.


ग्रामणी जरी राजाने नेमलेला असला आणि त्याला प्रशासकीय अधिकार असले, तरी ग्रामवृद्धांच्या (ग्रामपंचायतीच्या) साहाय्याने व सल्ल्यानेच तो कारभार करीत असे. हे ग्रामवृद्ध म्हणजे कुटुंबप्रमुखच असत. जर ग्रामणीने परंपरेविरुद्ध किंवा रूढ चालीरीतींच्या विरुद्ध वर्तन केले, तर त्यास सुधारण्याचे व शिकविण्याचे कार्य ग्रामवृद्ध करीत. राजा व प्रजा यांचे परस्परसंबंध ग्रामणी या अधिकारपदात पुरेपूर व्यक्त होत. ग्रामणी हा जरी राजाने नेमलेला असला, तरी तो लोकांमधीलच एक असल्याने तो त्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करीत असे. गावाचे रक्षण करणे, हे ग्रामणीचे पहिले कर्तव्य. त्याकरिता तो स्वयंसेवक व रक्षक यांचे एक पथक तयार करी. कर वसूल करून त्याची नोंद करून ठेवी. सर्व महत्त्वाचे कागद त्याच्याच अधिकारात असत व तो सर्वांच्या सहकार्याने कार्य करीत असे. ग्रामणीला काही न्यायाधिकारही असत.

न्यायदान हेसुद्धा गावाच्या पातळीवरच होत असे. राजाच्या दरबारी फक्त अपील होत असे.महाभारताच्या ‘शांतिपर्वा’त भीष्माने युधिष्ठिरास या न्याय देणाऱ्या संस्थांच्या कार्याबद्दल पुष्कळ माहिती सांगितली आहे. राजेशाहीच्या उदयापूर्वी अस्तित्वात असलेल्या स्थानिक न्यायसंस्थेस राजदरबारीही मान्यता होती. राजा हा कायदा बनवत नसे, तर परंपरेने रूढ झालेल्या नियमांचे तो फक्त पालन करी. म्हणून ग्रामीण न्यायसंस्थेच्या निर्णयाविरुद्ध राजाकडे अर्ज आला, तरी या नियमांस अनुसरूनच त्याचा विचार होई.

बुद्धकालीन भारतीय ग्राम : ख्रि. पू. पाचव्या शतकापासून बौद्ध व जैन धर्मग्रंथांत भारतातील शेतीव्यवस्थेबाबत व स्वयंपूर्ण ग्रामसंस्थेबाबत निर्देश आढळतात. बौद्ध साहित्यात गावे, नगरे व किल्ले यांच्या रचनेबाबत व व्यवस्थेबाबत बराच तपशील दिलेला आहे. गम, निगम, कुळ व नागरक यांच्याबद्दलही उल्लेख आहेत. जैनांच्या ग्रंथांत घोष, खेत, खर्वाट, ग्राम, पल्ली, पत्तन, संवाह, ऊआगर, मातंब, इ. प्रकारच्या वस्त्यांबाबत उल्लेख आलेला आहे. बौद्ध जातकांमध्ये सर्वसाधारण खेड्यात १,००० कुटुंबसंख्येपर्यंतची व्यवस्था वर्णिलेली आहे. गावातील घरे एकमेकांच्या इतकी जवळ असत, की एका घराला लागलेली आग संपूर्ण गावभर सहज पसरत असे. प्रत्येक गावास दरवाजा असे. त्यापलीकडे फळबागा व त्यानंतर शेतजमीन असे. ग्रामक्षेत्र असे. शेतसंरक्षक हा फासाच्या व कुंपणाच्या साहाय्याने पिकांचे हिंस्र पशुपक्ष्यांपासून संरक्षण करीत असे. ग्रामक्षेत्राच्या पलीकडे सार्वजनिक कुरण असे व श्रेष्ठकनिष्ठ हा भेद न करता गुराढोरांस चारण्याचा हक्क सर्वांना समान असे. जातकांत गावच्या गुराढोरांना कुरणात चारणाऱ्या गोपालकाबद्दल माहिती आहे.

गावातील शेतजमिनीची मालकी ही खाजगी स्वरूपाची असे. शेतांची सीमा नीट आखलेली असे. सहकारी पद्धतीने जलसिंचन चाले. बहुधा शेताच्या सीमा पाण्याच्या पाटांनी नक्की होत. पाण्याचा पुरवठा हा मुखियाच्या वा पाटलाच्या अधिकाराखाली येत असे.

गावाच्या कुरणावर व जंगलावर सर्वांचा समान हक्क असे. पडलेले जंगल-लाकूड विनामूल्य नेता येत असे. कुरणाच्या किंवा जंगलाच्या कुठल्याही भागाचा क्रय-विक्रय होत नसे, त्यावर आनुवंशिक मालकी हक्क सांगता येत नसे. राजाने इनाम म्हणून ब्राह्मणास किंवा इतर कुणास एखादे गाव बक्षीस जरी दिले, तरी गावजमिनीचा मालकी हक्क त्यास मिळत नसे.

मौर्यकालीन ग्रामसंस्था : गावाच्या सीमा नदी, पर्वत, जंगम, पाणवठे, तलाव, बांध, झाडे इत्यादींच्या आधारे नक्की कराव्यात, असे कौटिल्याने अर्थशास्त्रात म्हटले आहे. दोन गावांमधील अंतर एक किंवा दोन कोस असावे, म्हणजे मदतीच्या वेळेस एकमेकांना चटकन मदत करता येते. दहा गावांच्या संघटनेस ‘संग्रहण’, दोनशे गावांच्या संघटनेस ‘कर्वाटिक’, चारशे गावे असल्यास ‘द्रोणमुख’ आणि आठशे गावे असल्यास ‘महाग्राम’ म्हणत असत. महाग्रामास प्रशासकीय नाव ‘स्थतनुज’, असे होते. कदाचित स्थतनुजपासूनच आधुनिक ठाणे हा शब्द प्रचलित झाला असावा. आजच्या प्रमाणेच स्थतनुज हे व्यापाराचे व जत्रेचे केंद्र असे.

गावाचा प्रशासकीय नोकरवर्ग पुढीलप्रमाणे असे : (१) अध्यक्ष— गावचा मुख्य, (२) सांख्यक— हिशेब ठेवणारा, (३) स्थानिक— निरनिराळ्या श्रेणीचे अधिकारी, (४) अनिकस्त (पशुवैद्य), (५) जंधाकारिक (ग्रामदूत). यांशिवाय गावाच्या स्वच्छतेसाठी चिकित्सक व घोड्यांच्या देखरेखीसाठी अश्वदमक नावाचा अधिकारी असे. या सर्व अधिकाऱ्यांना करमुक्त जमीन मिळत असे, पण ती जमीन ते विकू शकत नसत किंवा गहाणही ठेवू शकत नसत.

सम्राट चंद्रगुप्ताच्या काळी (इ.स.पू. ३२२—२९८) लोकसंख्येनुसार, ज्येष्ठ, मध्यम व कनिष्ठ असे गावांचे वर्गीकरण करण्यात येत असे. त्यांचे आणखी विभाजन पुढीलप्रमाणे करण्यात येत असे : (१) ग्रामग्र — महसूल भरणारी गावे. (२) परिहारक — महसूल माफ असलेली गावे. ही गावे अध्यापकांस व पुजाऱ्यांस देण्यात येत. महसूल गोळा करून तो स्वतः वापरण्याची सवलत त्यांना होती. त्याबद्दल शिक्षणाचा प्रसार करणे व लोकांना धर्माप्रमाणे वागावयास मदत करणे, ही कर्तव्ये त्यांनी पार पाडावयाची असत. (३) आयुधुज — या गावांनाही कर माफ असे. त्याबद्दल युद्धाच्या वेळी सैनिक पुरविण्याचे कार्य या गावांचे असे. (४) काही गावे कर रोखीने न भरता वस्तूंच्या स्वरूपात भरत. शेतमाल, पशू, जंगलातील उत्पन्न, चांदी, सोने, माती, शंख, धातू, मजुरी इ. रूपाने ते कर भरीत असत.

दक्षिण भारतातील ग्रामसंस्था : दक्षिण भारतातील ग्रामसंस्था शतकानुशतके विकसित होत आलेली आहे. काही जुन्या ताम्रपटांवरून असे आढळून येते, की ग्रामप्रशासनाकरिता अनेक समित्या असत. उदा., वार्षिक समिती, मळा समिती, तलाव समिती, सुवर्ण समिती, न्याय समिती, पंचवर समिती इत्यादी. दहाव्या शतकातील काही ताम्रपटांवरून असे दिसून येते, की गावाच्या मालकीचे काही हातमाग असत व जे कोष्टी त्यांवर कपडा विणीत त्यांचा उदरनिर्वाह गावाच्या सार्वजनिक निधीतून चाले. इतर खाजगी हातमाग हे अधिकृत मानले जात नसत. १८१२ मध्ये ब्रिटिश संसदेच्या एका समितीच्या अहवालात गावाच्या अधिकाऱ्यांबद्दल व कार्याबद्दल पुढीलप्रमाणे निर्देश आढळतो : (१) गावप्रमुख — गावमहसूल गोळा करणे, गावातील तंटे मिटवणे व सर्वसाधारणपणे सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे. (२) हिशेबनीस— शेतीविषयक व तिच्याशी निगडित असलेल्या महसुलाचा हिशेब ठेवणे. (३) रखवालदार— हे दोन प्रकारचे असत : (अ) गुन्ह्यांबद्दलची माहिती गोळा करणे व एका गावातून दुसऱ्या गावास जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितपणे पोहोचविणे. (आ) शेतांचे रक्षण करणे व त्यांच्या मोजणीत मदत करणे. (४) सीमारक्षक-गावाच्या सीमेची नीट आखणी करून तीबाबतच्या तंट्यात साक्ष देणे. (५) तलाव व इतर पाणवठ्यांचे प्रमुख -जलसिंचन व पाणीवाटप यांवर देखरेख करणे. (६) पुजारी—गावातील धार्मिक देवळांची व्यवस्था पाहणे. (७) शिक्षक-मुलांना शिकवणे. यांशिवाय ज्योतिषी, सुतार, लोहार, परीट, न्हावी, गवळी, वैद्य, नर्तिका, कवी, संगीतकार इ. अनेक लोकांचा उल्लेख आहे. गावातील कामकऱ्यांना पगार म्हणून कर माफ असलेली जमीन किंवा पिकातील काही हिस्सा मिळत असे. कधीकधी जमीन व धान्याचा वाटा अशा उभयविध रूपाने त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था होत असे.


अशा प्रकारे भारतीय ग्रामसंस्था ही शतकानुशतके स्वयंशासित किंवा स्वायत्त राहिली. गावाच्या अधिकारक्षेत्रात गावातील घरे, रस्ते, बाजार, स्मशान, मंदिरे, विहिरी, तलाव, पडीक जमीन, शेतजमीन, जंगले इ. सर्वांचा समावेश असे. ग्रामपंचायतीच्या अधिकारकक्षेत गावाचे संरक्षण, सार्वजनिक बांधकामे, करवसुली इ. अनेक कामे येत. राज्य व केंद्र सरकारला आपली सर्व कामे या पंचायतींमार्फतच करून घ्यावी लागत. स्थानिक अधिकारी बहुतेक पिढीजात असल्याने ते केंद्रीय शासनव्यवस्थेचा घटक नसत व तंट्यांत ते गावाच्या बाजूने कौल देत. सैन्याची संघटना, परराष्ट्रीय धोरण इ. गोष्टी सोडल्यास बाकी सर्व कार्ये ग्रामपंचायतीमार्फत करून घेतली जात. गावे इतकी स्वायत्त व त्यांचे प्रभुत्व इतके मूलगामी होते, की राजाने नवीन बसविलेल्या करांपैकी किती वसूल होणे शक्य आहे, हेसुद्धा ग्राम-समित्या ठरवीत. ही शासकीय स्वायत्तता अर्थातच आर्थिक स्वयंपूर्णतेवर आधारलेली होती. जातिजातींतील आर्थिक सहाकार्याने गावरहाटीला बळकटी आली होती.

जातिजातींतील सहकार्य हे व्यवसाय आनुवंशिक रीत्या कुटुंबात टिकण्याने आणि पर्यायाने जाती ह्या व्यावसायिक गट बनल्याने पिढ्यान् पिढ्या टिकून राहिले आणि त्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले. त्याचबरोबर कर्मवाद आणि पुनर्जन्म ह्या हिंदू धर्मातील मूल्यांनीही जातिव्यवस्थेतील आनुवंशिकतेला व गतिशीलतेच्या अभावाला बळकटी आणली. विशिष्ट जातीतील जन्म हा मागील जन्माच्या कर्मावर अवलंबून असतो आणि या जन्मी धर्मास अनुसरून वागल्याने, म्हणजेच जातीची परंपरागत कामे केल्याने, पुढचा जन्म उच्च जातीत होतो, नाही तर हीन जातीत होतो अशी कर्म आणि पुनर्जन्म या सैद्धांतिक मूल्याची भूमिका होती. त्यामुळे सहसा सामाजिक रूढींविरुद्ध बंड पुकारणाऱ्या शक्ती निर्माण होऊ शकल्या नाहीत. क्वचित कोणी तसे धाडस केले, तर त्यास शिक्षा व्हावयाची. खेडेगावातून हद्दपार करणे अथवा वाळीत टाकणे, अशा जबर शिक्षा दिल्या जात. कारण त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक, सामाजिक व आधिभौतिक गरजांची पूर्ती होऊ शकत नसे. अशा रीतीने ग्रामसंस्थेच्या स्थिर राहण्यात जातिसंस्थेने फार मोठी मदत केली. जात ही केवळ व्यावसायिक गटच नव्हे तर सामाजिक-सांस्कृतिक गटही बनल्यामुळे तसेच विवाहसंबंधांवर आणि जातीच्या चालीरीतींवर नियंत्रण ठेवणाऱ्या जात-पंचायतीमुळे आसपासच्या अनेक गावांतील समजातीयांचे संबंध वाढत. एक जात बऱ्याच गावांत पसरलेली असल्यामुळे त्या गावांचा एकमेकांशी संबंध येई. आर्थिक व्यवहार, बाजारपेठा, जत्रा इत्यादींसाठी बाहेरच्या जगाशी संबंध ठेवावे लागत. तसेच हिंदुस्थानच्या चारी दिशांना तीर्थस्थाने असल्याने व सरकारी कचेऱ्या, पोलीसठाणी इत्यादींशी संपर्क साधण्यासाठी गावच्या लोकांचा बाहेरच्या जगाशी संबंध येई.

गावाचे सामाजिक जीवन जातींच्या परस्परसंबंधांवरच अवलंबून असे. प्रत्येकास आपल्या गावाबद्दल अभिमान व आत्मीयता वाटे. कोणत्याही पाहुण्यास जे दोन प्रश्न प्रामुख्याने प्रथम विचारण्यात येत, ते सामान्यतः त्याच्या गावाबद्दल व जातीबद्दल असत. वेगवेगळ्या जातींचे लोक वेगवेगळ्या भागांत राहत असले, तरी संकटकाळी व बाहेरच्या गावांशी वागताना ते सर्व एक होत. बऱ्याच गावांत वार्षिक जत्रा भरत व त्यांत सर्व ग्रामवासी हिरिरीने भाग घेत.

गावाचे ऐक्य धार्मिक बाबतींतही दिसून येते. बहुतेक गावांत ग्रामदेवता असत. वर्षातून एकदा त्यांची जत्रा भरे. शिवाय प्रत्येक जातीच्या, प्रत्येक आळीत वेगवेगळ्या देवता असत. ग्रामदेवतेची जागा गावाच्या वेशीजवळ असे. सर्व प्रकारच्या रोगराईपासून रक्षण करण्यासाठी, पिकाच्या रक्षणासाठी ग्रामदेवतेची पूजा करण्यात येई. कधीकधी वेगवेगळ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना केली जाई. यांशिवाय वर्षातील धार्मिक सण सर्वजण पाळत. कोणत्या सणाच्या दिवशी जेवावयास काय करावयाचे, हेसुद्धा परंपरेने ठरलेले असे. शेती, पशुपालन आदी ग्रामीण जीवनाच्या प्रमुख अंगांशी निगडित असे अनेक धार्मिक सण व उत्सव असत. नित्यक्रमाने येणाऱ्या या सणांच्या व विवाहादी समारंभांच्या प्रसंगी प्रत्येक जातीची ठरलेली कामे त्या त्या जाती करीत असत. मांडव कोणी घालावयाचे, बोहले कोणी बसवावयाचे, वाटाघाटीत कोणी मदत करावयाची, पूजेला पाने-फुले कोणी आणून द्यावयाची इ. कामे परंपरेने जातीजातींत वाटून दिलेली असतात. हे सण-समारंभ कमीअधिक प्रमाणात सर्व भारतात पाळले जात. शिवाय वैयक्तिक जीवनातील जन्म, बारसे, जावळ, नहाण, विवाह, मृत्यू यांसारख्या प्रसंगी गावात जे धार्मिक समारंभ होत असत, त्यांच्याशी प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे सर्व गावकऱ्यांचा संबंध येई. अशा रीतीने धर्म व समाजजीवन एकमेकांशी निगडित होते.

अशा प्रकारे गावातील आर्थिक, सामाजिक व धार्मिक जीवनांचे धागेदोरे एकमेकांत गुंतलेले असतात. भारतीय ग्रामसंस्थेची अशी स्वतंत्र संस्कृती आहे आणि तिचा पुरातन भारतीय संस्कृतीशी घनिष्ठ संबंध आहे.

ब्रिटिश अंमल : ब्रिटिशांनी हिंदुस्थानात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीनदारी व रयतवारी पद्धत सुरू केली. त्यामुळे शेतजमिनीत खाजगी मालमत्तेची कल्पना प्रभावी ठरली. शिवाय पूर्वी शेतसारा धान्याच्या रूपाने दिला जाई, तो ब्रिटिशांनी पैशाच्या (रोखीच्या) रूपाने घ्यावयास सुरुवात केली. याचा परिणाम म्हणून शेतीचे ध्येय शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या नित्याच्या गरजा भागविणे, हे न राहता पैसा मिळविण्याकरिता शेती, असे झाले. उद्योगधंद्यांचा विकास झाल्याने ग्रामोद्योग मागे पडले व शेती करणाऱ्यांची संख्या वाढली. जमीन अपुरी पडू लागल्याने लोक शहरांकडे वळू लागले. तसेच ग्रामपंचायतीचे पारंपरिक अधिकार ब्रिटिश अमदानीत कमी झाले आणि केंद्रीय न्यायदान पद्धतीने परक्या ठिकाणच्या कोर्ट-कचेऱ्यांची परंपरा सुरू झाली. याशिवाय शिक्षणाचा व दळणवळणाचा प्रसार झाल्यानेही तयांचा ग्रामसंस्थेवर परिणाम झाला. ग्रामसंस्था पूर्वीप्रमाणे स्वयंपूर्ण राहिली नाही. कुटुंबसंस्था व जातिसंस्था यांवरही तिचा परिणाम झाला. कुटुंबसंस्थेत व्यक्तिवाद वाढला, स्थलांतर वाढले व वयोवृद्ध आणि आप्तजन यासंबंधीचा आदर कमी झाला. जातिसंस्थेच्या संदर्भात उद्योगव्यवसायांबाबत जास्त दृढता राहिली नाही, आंतरजातीय रोटीव्यवहाराची बंधने सैल झाली. जातिव्यवस्थेच्या चाकोरीबाहेरील व्यवसाय उदयास आले. यात शिक्षणाच्या आधारे कोणालाही प्रवेश मिळू लागला. व्यवसाय, संपत्ती व सत्ता ही जातीच्या अगर कुटुंबाच्या आधीन राहिली नाही. यामुळे जातीवर आधारित अशा उच्चनीच श्रेणीला अनेक ठिकाणी तडा गेला. अनेक कारणांनी लोक गाव सोडून जाऊ लागले आणि अन्यत्र उपजीविका चालवणे त्यांना शक्य झाले. यामुळे परंपरागत ग्रामपंचायतीची बंधनेही निष्प्रभ ठरली. पंचायतीचे निर्णय सर्व लोक मान्य करीनासे झाले. गावांची आर्थिक स्वयंपूर्णता नष्ट झाल्याने लोकांचे शहारांशी व्यवहार वाढले व सामाजिक नियंत्रण आणि ऐक्य त्या प्रमाणात ढिले झाले.

स्वातंत्र्योत्तर काळ : भारत स्वतंत्र झाल्यानंतर जमीनदारी नष्ट करण्यात आली. लोकशाही समाजव्यवस्था हे स्वतंत्र भारताचे ध्येय ठरले. त्यामुळे गावांत नवीन जागृती निर्माण झाली. पारंपरिक ग्रामसंस्था घुसळून निघाली. ग्रामविकासाच्या निरनिराळ्या योजना पुढे येऊ लागल्या. १९५२ साली सामूहिक विकास योजना सुरू झाली. तिच्या द्वारा शेतीची तंत्रे बदलणे, जलसिंचन वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे, भूसुधार कायदे संमत करणे इ. अनेक योजना पुढे आल्या. सामूहिक विकास योजनेचे प्रामुख्याने दोन उद्देश आहेत : (१) देशातील शेतीचे उत्पन्न वाढविणे आणि दळणवळण, आरोग्य,  शिक्षण यांचा प्रसार करणे (२) गावातील आर्थिक व सामाजिक जीवन बदलण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक परिवर्तनास मदत व मार्गदर्शक करणे. लोकशाही मार्गांनी हे उद्देश सफल करण्याच्या दृष्टीने स्थानिक पुढारी असणे व आपल्या विकासाबाबत त्यांनी निर्णय करून प्रशासन करणे फार आवश्यक मानले गेले आहे. सरकारने ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन केले व त्यातील सदस्यत्व हे प्रौढ मतदानाच्या आधारे निश्चित व्हावे असे ठरविले. त्यामुळे खालच्या जातींनाही पंचायतीत स्थान मिळाले व वरच्या जातीचे लोक निवडणुकीत मते मिळविण्याच्या दृष्टीने सर्व जातीच्या लोकांना बरोबरीची वागणूक देऊ लागले. जवळजवळ सर्व गावांत अस्पृश्य जातींनी सामाजिक दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने बरेच प्रयत्न केले. न्यायदानासाठी वेगळ्या न्यायपंचायतीही सुरू करण्यात आल्या आहेत.


ग्रामपंचायती, तालुका पंचायती व जिल्हा परिषदा यांचे अधिकार वाढविण्यात आले आहेत. लोकशाही योजनांची सुरुवात समाजाच्या वरून खाली न होता खालून (गावापासून) वर गेली पाहिजे, अशी भावना यामागे आहे. सर्व प्रकारच्या विकासयोजनांमुळे ग्रामसंस्थेच्या सामाजिक, राजकीय व आर्थिक जीवनात आमूलाग्र असा फरक होत आहे. जातिजातींचे स्तरीकरण नष्ट व्हावे व सर्वांना बरोबरीने विकास साधण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. खेड्यांतून शहरांकडील धाव वाढतच आहे. उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण व्हावे, छोटी नगरे स्थापन व्हावीत व त्यांद्वारा खेड्यांतील परिवर्तनास जास्त चालना मिळावी, असे प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे खेडे व नगर यांचे परस्परसंबंध जिव्हाळ्याचे व्हावेत, शेती आधुनिक शास्त्रीय पद्धतीने व्हावी, ग्रामोद्योगांस चालना मिळावी, शहरांतील लोकांनी खेड्यांत जाऊन रहावे, या दृष्टींनीही प्रयत्न होत आहेत.

या प्रक्रियेतून भारतीय ग्रामसंस्था कोणते रूप घेऊन बाहेर पडेल, हे आज सांगणे कठीण आहे परंतु तिचे पूर्वीचे स्वायत्त, पारंपरिक, रूढिबद्ध व जातिबद्ध स्वरूप तसेच राहणार नाही, हे निश्चित.

महाराष्ट्रातील ग्रामसंस्था : महाराष्ट्रातील ग्रामसंस्था ही भारतीय ग्रामसंस्थेचे एक प्रदेशविशिष्ट रूप आहे. महाराष्ट्रात तीन प्रकारची खेडी प्रामुख्याने दिसतात. पहिला प्रकार म्हणजे बीजात्मक किंवा केंद्रीय गाव. ही गावे आसपासच्या शेतांमुळे अगदी अलग दिसून येतात. दख्खनच्या पठारी प्रदेशात ही गावे आहेत. असल्या गावांची शेते दुसऱ्या गावांच्या शेतांना लागून असतात व बहुतेक गावांना दाखविण्याजोग्या सीमा नसतात. दुसऱ्या प्रकारची गावे पश्चिम किनाऱ्यावर कोकणात आढळतात. बहुतेक रस्त्यांच्या दोन्ही बाजूंस लंबरेषेत गावे पसरलेली असतात. प्रत्येक घराच्या आवारात नारळी-पोफळीची झाडे असतात व घरांना कुंपण असते. अरबी समुद्रात मिळणारे ओढे एका गावास दुसऱ्या गावापासून वेगळे करतात. जेथे असे ओढे नसतात, तेथे एका गावाची हद्द संपून दुसऱ्या गावाच्या हद्दीत गेल्याचे परक्या माणसास कळत नाही. या गावात दोन प्रकारची शेती होते : बागायती व भातशेती. नारळी, सुपारी, केळी, फणस, काजू इत्यादींची झाडे घराजवळच कुंपण घालून लावतात, तर भाताची शेते बहुधा घरापासून दूर असतात. तरी शेतांची जागा व घरांची जागा यांत फरक केला जात नाही. तिसऱ्या प्रकारची गावे नैर्ऋत्येस सातपुड्याच्या डोंगरांत आहेत. तेथील शेतात दोन किंवा तीन घरे आढळतात. ही घरे नातेवाईकांचीच असतात वडील आणि विवाहित मोठी मुले किंवा विवाहित भाऊ या झोपड्यांतून राहतात. दुसरा घरांचा गट सु. अर्ध्या किमी. अंतरावर असतो. एका गावातील काही घरे दुसऱ्या गावातील घरांच्या जास्त निकट असतात. लागवडीची जमीन व घरे यांत फारसे अंतर नसते. त्यामुळे गावाचे अंगीभूत ऐक्य किंवा स्वतंत्र घटक असलेली गावे येथे सापडत नाहीत. महसूल खात्याने दगडांच्या ढिगाऱ्यांच्या साहाय्याने गावांच्य सीमा निश्चित केल्या आहेत तेवढ्याच.

केंद्रीकृत खेड्यांत गावातील रस्ते व बाहेरगावी जाणारे रस्ते वेगळे आढळतात. गावातील रस्त्यांना आळी, गल्ली किंवा बोळ म्हणतात. एका जातीची किंवा व्यावसायिकांची घरे असलेली आळी (ब्राह्मणआळी, तांबटआळी इ.), गल्ली किंवा बोळ म्हणजे अरुंद रस्ता. गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या वस्तीस वाडी म्हणतात. शासन, आर्थिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक व्यवहार या दृष्टींनी ही वाडी गावाचाच एक भाग असते. गावात पाटलाचे व इतर वंशपरंपरागत ग्रामसेवकांची घरे असतात. वाडीत कधीकधी एक मोठे कुटुंब आपले नातलगांसह राहत असते. कधीकधी मुख्य घरे गावात असतात, तर वाडीत हंगामी स्वरूपाच्या झोपड्या असतात. कधीकधी वाडीत फक्त एकाच जातीची वसाहत असते. एखाद्या जातीस व्यवसायासाठी जितकी जागा लागते, ती गावात उपलब्ध होत नाही म्हणून ते वाडी करून राहतात. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस धनगरांच्या बनगरवाड्या आहेत. त्यांना आपल्या शेळ्या-मेंढ्या ठेवण्यास जास्त जागा लागते. वाडी बहुधा जातीच्या, कुळाच्या किंवा जमातीच्या नावाने असते. उदा., रामोशीवाडी, शिंदेवाडी, ब्राह्मणवाडी इत्यादी.

सामान्यतः एका जातीचे लोक एकाच ठिकाणी वस्ती करून राहतात. गावाच्या टोकास व कधीकधी गावापासून दूरही अस्पृशांची वस्ती असते. यांना संस्कृतमध्ये अंतेवासी व मराठीत वेसकर (वेशीजवळ राहणारे किंवा वेशीचे रक्षण करणारे) म्हणतात. त्यांच्या वस्तीस वाडा या नावाने संबोधतात. उदा., महारवाडा, मांगवाडा, कुंभारवाडा, कोळीवाडा इत्यादी. बाहेर राहणारे सगळेच अस्पृश्य असतात, असे नाही. काही व्यावसायिकांना जास्त जागा लागते म्हणूनही ते गावाच्या वेशीजवळ किंवा दूर राहतात. पश्चिमेची शुद्ध हवा मिळावी म्हणून बऱ्याच ठिकाणी अस्पृश्यांची घरे पूर्वेस असतात. तसेच त्यांचे पाणवठेही नदीच्या खालच्या बाजूला असतात.

पूर्वी गावाचे आर्थिक जीवन हे बलुतेदारी पद्धतीने चालत असे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार हे कारागीर असल्याने त्यांचा हक्क जास्त मानला जातो. हे सर्व बलुतेदार एकाच गावात असतात असे नाही. याशिवाय इतर काही जातींच्या लोकांनाही बलुते दिले जाते. कोणाला बलुते म्हणून धान्य द्यावे किंवा नाही, हे गावकरी ठरवतात. गावातील बहुसंख्य कुटुंबे, म्हणजे ६o ते ७o टक्के लोक मुख्यत्वे शेतीचा धंदा करतात. ह्यांपैकी काही जमिनीचे मालक असतात, तर काही खंडाने शेती करतात. गावात एकदोन दुकानदार असतात. शिवाय चांभार, वाजंत्री व ताशेवाले, खाटिक, देवळाचा पुजार, धनगर, सुतार रामोशी इत्यादींची एकदोन कुटुंबे असतात. काही फिरत्या टोळ्या दरवर्षी पावसाळ्यानंतर गावात येतात, काही दिवस राहून गावकऱ्यांपुढे तमाशा, कसरतीचे खेळ, नाच, माकडांचे किंवा अस्वलांचे खेळ करतात किंवा भांड्याकुंड्यांची दुरुस्ती करून धान्य अथवा पैसे मिळवतात. पुष्कळदा धंदे करणाऱ्या जातींच्या मालकीचीही काही जमीन असते पण ती बहुधा खंडाने दिलेली असते. जमीनमालक व खंडकरी सुतार, लोहार, महार इत्यादींना दरवर्षी त्यांच्या कामाबद्दल बलुते म्हणून धान्य देतात. ह्यांतच न्हावी, मांग, सुतार, चांभार, पुजारी, कुळकर्णी, महार इत्यादींचा समावेश होतो. इतर व्यावसायिकांना — उदा., गोंधळी, कीर्तनकार, देवीच्या उत्सवांत नाच-गाणी करणारे लोक ह्यांना — काही पैसेही देण्याची प्रथा आहे. गावातील लोक थोडे सधन असले, तरच तेथे सोनार आढळतो. त्याला रोख पैसेच देतात व घरात लग्नकार्य किंवा इतरही काही समारंभ असेल, तर त्याला जेवायलाही बोलावतात. सर्वसाधारणपणे ग्रामीण लोकांपैकी सु. १५ टक्के लोक विशेष प्रकारच्या कौशल्याचे काम (उदा.,  सुतार, सोनार, कुंभार) करतात असे दिसून येते.


गावाचे समाजजीवन जातीजातींतील परस्परसंबंधांनी ठरविले जाते. समाजजीवनाचा व स्तरीकरणाचा जवळचा संबंध असतो. गावाबद्दल आपुलकी असली, तरी रोजच्या व्यवहारात लोक आपापले स्तर सोडून सामाजिक संबंध ठेवीत नाहीत. बलुतेसंबंध मात्र पाळले जातात. एकमेकांच्या बैलगाड्या किंवा बैल शेतीसाठी वापरले तरी चालते. कोणी कोठे बसावे, कोणाबरोबर चिलीम ओढावी इ. गोष्टीही ठरलेल्या असतात.

बहुतेक व्यक्तींचे जीवन सग्यासोयऱ्यांमध्येच व्यतीत हाते. प्रत्येक जातीची एक नियंत्रण यंत्रणा असते. मराठा, ब्राह्मण, गुरव यांत ही यंत्रणा अनौपचारिक स्वरूपाची असते. विवाहादी कार्यात लोक जातिनियमनांच्या उल्लंघनांची चर्चा करतात व तीतून मार्ग काढतात. कुंभार, न्हावी, परीट, चांभार, महार, मांग इ. जातींत मात्र पंचायतींची औपचारिक यंत्रणा आढळून येते.

गावात मुलकी पाटील व पोलीस पाटील असे दोन पाटील असतात. यांशिवाय गावचे व प्रत्येक जातीचे पुढारी असतात.

गावातील सण, उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम गावच्या एकात्मतेस मदत करतात. यांत इतर गावांचे लोकही पाहुणे म्हणून भाग घेतात. बाहेरच्या लोकांसमोर गावाची वैशिष्ट्ये व एकता दिसावी, असा प्रयत्न केला जातो. होळी, दसरा यांसारख्या सणांच्या वेळी गावाचे सर्व लोक त्यांत भाग घेतात. याशिवाय प्रत्येक जातीचे सण आणि त्या त्या जातीतील इतर धार्मिक समारंभ वेगवेगळे असतात. महाराष्ट्रातही लोकाचाराचे विशिष्ट नमुने आहेत. त्या अनुषंगाने धार्मिक पद्धतींतही फरक पडतो.

ब्रिटिशांच्या आगमनापासून महाराष्ट्राच्या ग्रामसंस्थेतही बरेच बदल होत आले. आर्थिक व्यवहारांत बलुतेदारी जवळजवळ मोडकळीस आली आहे. महाराष्ट्रातील जातिनिष्ठ धंद्यांत शिंप्याचा धंदा बहुतेक सर्व जातींनी उचललेला आहे. काही गावांतून सुताराचा धंदा स्थानिक महार करताना दिसतात. अर्थात ज्या गावात सध्या जातीचा सुतार नाही, तेथेच असे घडलेले आहे. बलुतेदारी मोडत चालली असली, तरी पूर्वीचे जातिव्यवस्थेतील धंदे त्या त्या जातींच्याच हातात अजूनही आहेत. गावांचा शहरांशी संबंध वाढल्याने, गावांत साखर कारखाने इत्यादींची भरभराट झाल्याने तसेच विकास-गट, नवीन ग्रामपंचायती व निवडणुका यांमुळे गावांचे आर्थिक व सामाजिक जीवन आमूलाग्र बदलले आहे. जातिपंचायतींचा प्रभाव कमी झाला आहे. अस्पृश्य लोकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे तसेच अनेक अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे खूप जागृती झाली आहे. अजून गावाचे ऐक्य धार्मिक सणांच्या वेळी दिसून येते. जातीजातींतील उच्चनीचतेच्या भावना कमी झाल्या आहेत व आपापसांतील सामाजिक संबंध सुधारत आहेत. दळणवळण व शिक्षणाचा प्रसार वाढल्याने तसेच नवे नेतृत्व पुढे येत असल्याने ग्रामसंस्थेच्या अलगपणाच्या जुन्या कल्पना बदलत चालल्या आहेत.

कारखानदारीची वाढ झाल्याने तसेच शेतीवर अवलंबून असणारांची संख्या वाढल्याने शहरांकडे धाव वाढली आहे. विशेषतः ज्या अस्पृश्य लोकांना आपला सामाजिक दर्जा सुधारून घ्यावयाचा आहे, त्यांना शहरात येऊन राहणे सोयीचे वाटते. शेतीची तंत्रे सुधारल्याने शेतकरी अधिक प्रगत स्थितीत आहे. एकत्र कुटुंबसंस्थेच्या जागी केंद्र कुटुंबांचा प्रादुर्भाव होत आहे. जातिसंस्थेतील स्थित्यंतरांचा सर्वांत मूलभूत परिणाम ग्रामसंस्थेवर होत आहे. ग्राम हा सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र घटक राहील, की प्रादेशिक संस्कृतीचा घटक बनेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ग्रामीण समुदाय आणि नागरी समाज हे समाजव्यवस्थेचे विरुद्ध टोकाचे दोन नमुने आहेत. ग्रामीण समुदाय हा मुख्यत्वे शेती आणि तत्संबंधीच्या जोडधंद्यांशी अधिक निगडित असतो, तर नागरी समाज हा बिगरशेती उत्पादनाशी व सेवाभावी व्यवसायांशी अधिक निगडित असतो. ग्रामीण समुदाय हा आकाराने लहान असतो त्याचप्रमाणे भाषा, संस्कृती, परंपरा या दृष्टींनी एकजिनसी, प्राथमिक स्वरूपाच्या व्यवसायात गुंतलेला, बाह्यसंपर्कापासून अलिप्त आणि बाहेरील लोकांना आत घेण्यापेक्षा गावातील लोकांना बाहेर पाठविणारा असा असतो. ग्रामीण समुदायात व्यवसाय आनुवंशिक बनण्याची शक्यता अधिक असते, यामुळे स्तरीकरणही आनुवंशिक बनते. यामुळे कुटुंबाचे व कुटुंबप्रमुखाचे महत्त्व अधिक असते. याउलट नागरी समाज हा आकाराने मोठा आणि भाषा, संस्कृती, परंपरा या दृष्टींनी बहुजिनसी असतो. प्रत्येक व्यवसाय तेथे मोठ्या प्रमाणावर चालतो कारण त्या व्यवसायाचा फायदा त्या त्या नगरात राहणाऱ्या लोकांकरिताच नव्हे, तर दूरवर पसरलेल्या लोकांनाही व्हावयाचा असतो. काही व्यवसाय असे असतात, की त्यांचे उत्पादन हे जागतिक बाजारपेठांकरिता होत असते. नागरी उत्पादन व्यवसायांत आधुनिक काळात यंत्रतंत्रांचा वापर अधिक होऊ लागला आहे. उद्योगव्यवसायांचा वाढता आवाका, यंत्रतंत्रांचा वापर आणि गुणानुक्रमाने मिळणारे काम व सामाजिक स्थान यांनी कुटुंबाला दुय्यम स्थान प्राप्त झाले. व्यवसाय कौटुंबिक राहिला नाही. त्यामुळे व्यावसायिक हितसंबंध आणि कौटुंबिक हितसंबंध यांची फारकत झाली आहे. अर्थव्यवस्थेत कुटुंबाऐवजी व्यक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक हितसंबंधांवरून राजकीय हितसंबंधांचे स्वरूप ठरत असल्याने शासकीय वा राजकीय व्यवस्थेतही कुटुंबाला विशेष स्थान राहिलेले नाही. सर्व हितसंबंध अशा रीतीने नागरी समाजात कुटुंबनिरपेक्ष बनत चालले आहेत. यामुळे व्यक्तींची सामाजिक गतिशीलताही वाढली आहे. कुटुंबावरून व्यक्तीचे सामाजिक स्थान न ठरता व्यक्तीवरून कुटुंबाचे स्थान ठरते. यामुळे एकत्र कुटुंबपद्धतीचे विघटन होत चालले आहे.

ग्रामीण समुदायाचे पूर्वीचे प्रादेशिक स्वरूप आता कमी होत चालले आहे. सामूहिक संरक्षणाची आवश्यकता कमी झाल्याने, दळणवळणाची यांत्रिक साधने उपलब्ध असल्याने व वीज, पाणीपुरवठा, रस्ते यांची सोय असल्यामुळे मुख्य गावठाण सोडून आपल्या शेतावर जाऊन राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शेती-उत्पादन हे बहुधा ग्रामीण रहिवाशांच्या उपभोगापेक्षा बाजारपेठांकरिता होत असल्याने शेतकऱ्यांचा शहरांशी व शहरी बाजारपेठांशी अधिकाधिक संबंध येत असून गावकऱ्यांशी असलेला पूर्वीचा संबंध नष्ट होत चालला आहे. गावकऱ्यांचे सामाजिक संबंध हल्ली पूर्वीसारखे वारंवार येत नसल्याने व त्यांचे संबंध अपरिहार्य राहिले नसल्याने, गावकऱ्यांत पूर्वीची एकात्मता राहिलेली नाही. शेतीबरोबर इतर अनेक जोडधंदे निघाले आहेत. या निमित्ताने तसेच व्यापाराकरिता व शासकीय व्यवस्थेच्या निमित्ताने गावात अनेक नागरी रहिवाशांचा प्रवेश झाला आहे. त्या गावाबद्दल अगर गावाच्या परंपरेबद्दल आत्मीयता नसलेल्या लोकांचा प्रवेश गावात होत असल्यामुळे व गावातील लोक शहरांतून आपल्याबरोबर शहरी संस्कृतीचे संस्कार आणीत असल्यामुळे गावातील पूर्वीचा सांस्कृतिक एकजिनसीपणा नष्ट होत आहे. गावातील शेतीनिष्ठ संस्कृती लोप पावत असून, त्या जागी उद्योगधंद्याची व्यापारी संस्कृती उदयास येत आहे.

पूर्वीचे प्रभेदन व स्तरीकरण यांनाही पूर्वीसारखे आनुवंशिक स्थान राहिले नाही परंतु भारतात मात्र जातिव्यवस्थेमुळे अजूनही घरांची मांडणी जातीवरच आधारलेली दिसते. याचे कारण आज तरी आर्थिक किंवा व्यावसायिक नसून धार्मिकच आहे.

पूर्वीच्या सामाजिक संस्थाही आज मोडत चालल्या आहेत. अर्थव्यवस्था व शासनव्यवस्था यांची ताबेदारी आता विशिष्ट कुटुंबाकडे राहिलेली नाही. शिक्षण सर्वांना खुले केल्यामुळे आणि त्या शिक्षणाच्या आधारे परंपरा सोडून कोणताही व्यवसाय पतकरण्याची मुभा सर्वांना असल्याने पूर्वीची स्तरीकरणाची चाकोरी सैल होऊन गतिशीलता वाढलेली आहे. परिणामतः जुन्या पारंपरिक ग्रामसंस्थेचे स्वरूप झपाट्याने बदलत चालले आहे.

पहा : कुटुंबसंस्था कृषि कृषिविकास, भारतातील ग्रामदैवते ग्रामपंचायत ग्रामराज्य ग्रामीण विकास ग्रामीण शिक्षण ग्रामोद्योग जातिसंस्था वतनसंस्था.

संदर्भ :  1.  Altekar, A. S.  Village Communities in Western India, Bombay, 1927.

    2. Baden-Powell, B. H.The Indian Village Community, London, 1896.

    3. Chiva, I. Rural Communities : Problems, Methods and Types of Research UNESCO, 1958.

    4. Desai, A. R. Ed. Rural Sociology in India, Bombay, 1961.

    5. Dube, S. C. Indian Village, London, 1959.

    6. Dube, S.C. India’s changing Villages, London, 1963.

    7. Loomis, Charles Beagle, Rural Sociology, The Strategy of Change, Englewood-Cliffs, 1964.

    8. Maine, Sir Henry, Village Communities in the East and West, London, 1972.

    9. Malaviya, H. D. Village Panchayats in India, New Delhi, 1956.

   10. Marnott, Mukim, Ed. Village India, Chicago, 1960.

           11. Majumdar, D. N. Caste and Communication in an Indian Village, Bombay, 1962

  12. Orestein, Henry, Gaon : Conflict and Cohesion in an Indian Village, Princeton, 1965.

  13. Redfield, Robert, Peasant Society and Culture, Chicago, 1956.

  14. Sanderson, Dwight, Rural Sociology and Rural Social Organization, New York, 1942.

  15. Sorokin, P. A. Zimmerman, C. C. Galpin, C. J. A Systematic Source Book in Rural

       Sociology, Vol. I—III, New York, 1965.

  १६. आत्रे, त्रिं. ना. गांव-गाडा, मुंबई, १९५९.

  १७. कर्वे इरावती, हिंदूंची समाजरचना, नागपूर, १९६४.

कुलकर्णी, मा. गु. मुटाटकर, रामचंद्र