सामवेद : चार वेदांमधला तिसरा वेद. ज्या ऋचांवर साम (गान) म्हणावयाचे, अशा ऋचांचा संगह म्हणजे सामवेद. अशा ऋचा ⇨ ऋग्वेदातून निवडलेल्या आहेत. पुनरावृत्ती टाळून सामवेदाच्या एकंदर ऋचा १,६०३ आहेत. त्यांतील ९९ ऋचा सांप्रतच्या ऋग्वेद संहितेत सापडत नाहीत. ह्या ऋचा लुप्त झालेल्या ऋग्वेद शाखेतील असण्याची शक्यता आहे. ह्या ऋचांवर म्हणावयाची गाने स्वतंत्र गानग्रंथात समाविष्ट केलेली आहेत. सामाचे पुष्कळ प्रकार आहेत. सामवेदाच्या तेरा शाखांच्या नावांचा उच्चा र सामवेदी हे सामतर्पणात करतात परंतु ह्या वेदाच्या कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय ह्या तीन शाखाच आज उपलब्ध आहेत. ‘सहस्रवर्त्मा सामवेदः’ (सामवेदाचे सहस्रमार्ग) असा निर्देश पातंजल महाभाष्यात आहे. मार्ग म्हणजे शाखा, असा अर्थ केला जातो परंतु मार्ग म्हणजे ‘गानप्रकार’ असाच अर्थ करणे युक्त होय. कौथुम, राणायनीय आणि जैमिनीय ह्या शाखांमध्ये केवळ पाठभेद, उच्चा रभेद आणि स्वरभेद आहेत परंतु मूळ ऋचा मात्र समान आहेत.

ज्या ऋचेवर गानप्रकार गायचा असतो, त्या ऋचेस ‘योनि’ म्हणतात. एकाच योनीवर अनेक सामे म्हणता येतात व एकच गानप्रकार कोणत्याही ऋचेवर म्हणता येतो. कौथुम व राणायनीय ह्या शाखांत २,७२२ इतके गानप्रकार सांगितले असून जैमिनीय शाखेत ३,६८१ गानप्रकार सांगितले आहेत. सात स्वरांचे स्वरमंडल होय. ह्या स्वरांची नावे तैत्तिरीय प्रातिशाख्यात पुढीलप्रमाणे दिली आहेत : (१) कुष्ट, (२) प्रथम, (३) द्वितीय, (४) तृतीय, (५) चतुर्थ, (६) मन्द्र आणि (७) अतिस्वार्य. विनत, प्रणत, उत्स्वरित आणि अभिगीत असे चार अवान्तर स्वरही सांगितले आहेत. स्वरसप्तक आणि हे अवान्तर स्वर गात असता उद्गात्याने – म्हणजे सामगायकाने – बोटांच्या विशिष्ट हालचाली करुन तो तो स्वर दाखवायचा असतो. स्वरांमध्ये मृदू, मध्या, आयना, दीप्ता व करुणा अशा श्रुती सांगितल्या आहेत.

सामगायनाची परंपरा ऋग्वेदरचनेच्या काळी होती. सामगायनाचे उल्लेख ऋग्वेदात अनेकदा आले आहेत. भद्र, अर्क, श्लोक, गायत्र, बृहत्, रथंतर, रैवत, वैरुप इ. सामप्रकारांचे नामनिर्देश ऋग्वेदात येतात. ⇨यजुर्वेदात आणि ⇨अथर्ववेदातही सामांची अनेक नावे निर्दिष्ट केलेली आहेत.

ह्या वेदाच्या कौथुम व राणायनीय ह्या शाखांचे ब्रा ह्मणग्रंथ एकच आहेत : तांड्‌य ( ह्याचे पंचवीस अध्याय असल्यामुळे यास पंचविंश ब्राम्हण असेही म्हणतात.), षड्‌विंश, सामविधान, दैवत, मंत्र, वंश, आर्षेय, संहितोपनिषद.

जैमिनीय शाखेचे जैमिनीय ब्राम्हण असून त्याला तलवकार ब्राम्हण असेही म्हणतात.

छांदोग्योपनिषद आणि केनोपनिषद ही सामवेदाची उपनिषदे होत. जैमिनीय उपनिषद्‌ब्राह्मणात केनोपनिषद अंतर्भूत आहे. छांदोग्योपनिषद हे तांड्‌य ह्या सामवेदाच्या ब्राह्मणाचे एक आरण्यकच असावे, असे त्याच्या रचनेवरुन वाटते.

सामगायनाची खरी परंपरा आता जवळजवळ लुप्त झाली आहे पण सामवेद म्हणणारे ब्राम्हण अजूनही आहेत. स्वर, स्वरविकार व श्रुती ह्यांचे १, २, ३, ४, ५, ६, ७ हे अंक व ‘^’ ‘ ↑’ इ. प्रकारची चिन्हे दाखवून ताडपत्रावर लेखन केलेली सामवेदाची संहिता उपलब्ध झाली असून तिचे मुद्रण व प्रकाशनही अनेक वेळा झालेले आहे.

जोशी लक्ष्मणशास्त्री

साम, दान, दंड, भेद या चार राजनीतींमध्ये साम हा शब्द ‘गोड बोलणे’ या अर्थी वापरलेला आहे. सामवेदाची वाणी मधुर असावी हीच संकल्पना सामवेद यातील साम ह्या शब्दात अनुस्यूत आहे. सामवेद गानात्मक असल्याने गायनी कलादेखील त्यात अभिप्रेत आहे. गायनी कला, शब्द ( नाद ) रुपी बह्माची एक थोर विभूती आहे म्हणूनच भगवद्‌गीतेत सामवेदाला श्रीकृष्णाने ‘वेदानां सामवेदोऽस्मि’ (१०·२२) असे म्हणून विभूतियोगांत स्थान दिले आहे.

छांदोग्योपनिषदा त ‘सामान्येव मधुकृतः । सामवेद एवं पुष्पम्’ (३.३.१) म्हणजे साम या मधमाशा आणि सामवेद म्हणजे पुष्प, असे म्हटले आहे. या उपनिषदात अन्य वेदांनाही पुष्प म्हटले आहे. ‘गीतिरुपा मन्त्राः सामानि’ असा कात्यायनाने उल्लेख केला आहे. जैमिनी ऋषींनी ‘गीतिषु सामाख्या’ अशी सामांची ओळख करुन दिली आहे. ‘गानकर्मणः वाचकः सामशब्दः’ असा उल्लेख शबरस्वामींच्या मीमांसाभाष्यात येतो.

‘गीति’ म्हणजे क्रिया. ती क्रिया व्याकरणाच्या तंत्रात बसविलेली असते. अभ्यन्तर-प्रयत्नातून निर्माण झालेल्या स्वरविशेषांची जी अभिव्यंजक क्रिया, ती गीती. स्वर-मण्डल आणि आलाप यांच्या साहाय्याने संगीत पद्घतीने केलेले ऋचांचे उच्चरण म्हणजे साम.

सामवेदाचे नारदीय शिक्षेसारखे शिक्षा ग्रंथ उपलब्ध आहेत. स्वरांची मांडणी करुन ऋचांवर गायन करीत असताना ऋचांमध्ये काही फरक करणे आवश्यक ठरते. विकार, विश्लेष, विकर्षण, विराम, अभ्यास (पुनरुक्ती), आगम, लोप, स्तोभ, असे मूळ ऋचांमधील होणारे फरक नोंदविले गेले आहेत.

सामवेद म्हणजे केवळ गायिलेल्या गानांचा संग्र ह नव्हे, तर ज्यावर गायनाची आलापी अभिप्रेत आहे, ज्यांत उदात्तादी स्वर आहेत, अशा ऋक्-मंत्रांचा संग्र ह होय.

सामवेदाला फक्त पदपाठ आहे अन्य विकृतिपाठ नाहीत. अशा सामवेदाचे पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे दोन भाग आहेत. पूर्वार्चिकालाच छन्द-आर्चिक म्हटले जाते. ‘आरण्य’ या नावाने प्रसिद्घ असलेला भागसुद्घा यात अंतर्भूत आहे. पूर्वार्चिकामध्ये मुख्यतः अग्नी, इंद्र, सोम (पवमान) यांच्या स्तुतिपर मंत्रांचा समूह आहे. यावर आधारलेल्या गायनांच्या संगहाला ‘गामगेय’ किंवा ‘गेय-गान’ अशी संज्ञा आहे.

उत्तरार्चिकात, दशरात्र, संवत्सर, सत्र, एकाह, अहीन इ. यज्ञांत आवश्यक असलेल्या ऋचांचा संग्रह असून त्यावर आधारित गान ग्रंथांना ‘ऊह’ व ‘ऊह्य’ गान म्हणतात.

गान सामान्यतः तृचावर म्हणजे तीन ऋचांचे समूहावर गायिले जाते.

धर्माधिकारी, त्रि. ना.