सान मारीनो : यूरोपातील एक लहानसे स्वतंत्र प्रजासत्ताक तसेच यूरोपातील सर्वांत जुना देश.व्हॅटिकन सिटी, मोनाको व नाऊरू खालोखाल हा जगातील चौथ्या क्रमांकाचा लहान देश आहे. नैर्ऋत्य-ईशान्य विस्तार १३·१ किमी., आग्नेय-वायव्य विस्तार ९·१ किमी. व क्षेत्रफळ ६१·२ चौ. किमी. असून देशाची लोकसंख्या ३२,१९३ (२०११) असून सानमारीनो (लोकसंख्या ४,४१४–२००५) हे राजधानीचे ठिकाण आहे. इटलीच्या भौगोलिक सीमांतर्गत या देशाचे स्थान असून सरहद्दीची एकूण लांबी ३९ किमी. आहे. द्वीपकल्पीय इटलीच्या ईशान्य भागात एड्रिॲटिक समुद्रकिनाऱ्यापासून २० किमी. अंतरावर इटलीतील रिमिनीच्या दक्षिणेस हा देशआहे.
भूवर्णन : सान मारीनोची भूमी पर्वतीय आहे. इटलीतील ॲपेनाईन्स पर्वताचा विस्तार सान मारीनोमध्ये असून त्यातील मौंट तितानो (७३९ मी.) हा चुनखडीयुक्त पर्वत देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. या पर्वताची येथे तीन शिखरे असून त्यांवर किल्ले आहेत. मौंट तितानोपासून बाहेर पसरलेल्या टेकड्या प्रामुख्याने नैऋर्त्येस आणि ईशान्येस गेलेल्या आहेत. ईशान्येस पसरलेल्या टेकड्या रोमांगा मैदान व एड्रिॲटिक समुद्राकडे मंदपणे उतरत गेलेल्या आहेत. मौंट तितानोमधील सिलूएट भागात तीन टेकड्या असून त्यांभोवतालची प्राचीन तिहेरी तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सान मारीनोचे बरेचसे क्षेत्र मारेक्क्या या नदीच्या उपनद्यांच्या खोऱ्यात आहे. या देशातून एड्रिॲटिक समुद्राला मिळणाऱ्या मारानॉ, आउसा तसेच सान मारीनो (मारेक्क्याची उपनदी) या नद्या देशातून वाहत जातात. सान मारीनोधील मृदा खडकाळ व कमी सुपीक आहेत.
सान मारीनोचे हवामान भूध्य सागरी प्रकारचे आहे. हिवाळे थंड व कोरडे तर उन्हाळे उबदार व सौम्य असतात. उन्हाळ्यातील कमाल तापमान २६० से. तर हिवाळ्यातील किमान तापमान–७० से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९० से. असून तो प्रामुख्याने हिवाळ्यात पडतो. भूमध्य सागरी प्रकारचे वनस्पतिजीवन येथे आढळत असून त्यात उंचीनुसार तफावत आढळते. ऑलिव्ह, पाइन, ओक, ॲश, पॉप्लर, कर, एल्म हे वृक्ष प्रकार तसेच अनेक प्रकारचे गवत व फुलझाडे येथे आढळतात. छछुंदर, जाहक, कोल्हा, बिजू, मार्टिन, वीझल, ससा हे प्राणी व पक्ष्यांच्या विविध जाती येथे पहावयास मिळतात.
इतिहास व राजकीय स्थिती : इ. स. चौथ्या शतकात सेंट मारीनस व काही ख्रिस्ती लोकांनी छळाला कंटाळून या ठिकाणी येऊन वसती केली. पुढे या ठिकाणालाच सान मारीनो असे नाव पडले. इ. स. पू. १००० च्या सुमारास सान मारीनो एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून उदयास आले. हंगेरियन, सारासेन व नॉर्मनांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी मौंट तितानोभोवती तटबंदी बांधण्यात आली. बाराव्या शतकात सान मारीनोचे कम्यूनमध्ये रूपांतर होऊन त्याचे प्रशासन कम्यूनच्या कायद्यानुसार व अधिकाऱ्याकडून (कॉन्सल) चालत असे. सोळाव्या ते अठराव्या शतकांत व्हॅटिकन फौजांनी काही वेळा सान मारीनोचा ताबा घेतला होता. नेपोलियनने १७९७ मध्ये इटलीवर आक्रमण केले त्यावेळी त्याने या प्रजासत्ताकाच्या हक्कांचा आदर करून त्यांच्या प्रदेशाच्या विस्तारास मान्यता दिली. इ. स. १८१५ मध्ये व्हिएन्ना काँग्रेसनेही या स्वतंत्र प्रजासत्ताकास मान्यता दिली. इ. स. १८६१ मध्ये हा इटलीचा एक भाग होता. मार्च १८६२ मध्ये या प्रजासत्ताकाने इटलीशी सीमाशुल्क, जकात इ. बाबींसह मैत्री व सहकार्याचा करार केला. चोहोबाजूंनी इटलीने वेढले असूनही सानमारीनोचे स्वातंत्र्य आजपर्यंत अबाधित राहिले आहे. दुसऱ्या महायुद्घात सान मारीनो तटस्थ राहिला असला तरी तो काही काळ जर्मनांनी काबीज केला होता.
सान मारीनोच्या संविधानानुसार येथे संसदीय पद्घतीची शासनव्यवस्था आहे. देशाचे संविधान बरेच क्लिष्ट आहे. सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पाच वर्षांसाठी निवडून आलेले ६० सदस्य ग्रँड व जनरल कौन्सिलचे सदस्य असतात. संसदेला वैधानिक व प्रशासकीय अधिकार असतात. संसद सदस्यांमधून दोन सदस्यांची सहा महिन्यांसाठी कॅप्टन रीजन्ट म्हणून नेमणूक केली जाते. त्यांना पुढील तीन वर्षे पुन्हा निवडणूक लढविता येत नाही. ग्रँड व जनरल कौन्सिलचे प्रमुख म्हणून तसेच देशाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून ते कारभार पाहतात. ग्रँड व जनरल कौन्सिलच्या सदस्यांमधून निवडलेल्या १० सदस्यांचे मंत्रीमंडळ असते. दोन रीजन्ट व १० सदस्यीय मंत्रिमंडळाच्या हातात कार्यकारी सत्ता असते. १९३० पासून स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. संयुक्त संस्थानात राहत असलेल्या सान मारीनोच्या नागरिकांना टपालाद्वारे मतदान करता येते. लष्करी सेवा सक्तीची नसली, तरी शिक्षक व विद्यार्थी वगळता १६ ते ५५ वयोगटातील नागरिक सेनादलात जाऊ शकतात.
आर्थिक स्थिती : सान मारीनोची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कारखानदारी, वित्तीय सेवा व पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे. चलन, जकात संघ, व्यापार व कामगार गतिशीलता या माध्यमांद्वारे सान मारीनोचे इटलीशी आर्थिक संबंध आहेत. उद्योगांमध्ये इलेक्ट्रॉनिकी साहित्य, रंग, सिमेंट, कापड, कागद, जडजवाहिर, सौंदर्यप्रसाधने, चामडी उद्योग हे महत्त्वाचे आहेत. मृत्तिकाशिल्प, घडीव लोखंडी वस्तू व फर्निचर या येथील परंपरागत कारागिरीतून निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तू आहेत. औद्योगिक उत्पादने प्रामुख्याने देशांतर्गत वापरासाठी घेतली जातात. सान मारीनोला इटलीकडून विद्युत्पुरवठा केला जातो. दगडाच्या खाणींमध्येही बरेच लोक काम करतात. मौंट तितानोमधील दगडाचे गेल्या अनेक शतकांपासून उत्खनन करण्यात येत आहे. पोस्टाच्या सुंदर तिकीट छपाईसाठी हा देश प्रसिद्घ असून त्यापासून देशाला चांगला महसूल मिळतो. पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. सन २००४ मध्ये २·८१ द. ल. पर्यटकांनी सान मारीनोला भेट दिली होती.
सौम्य हवामान व पुरेसा पर्जन्य यांमुळे शेतकऱ्यांना विविध कृषि-उत्पादने घेणे शक्य होते. देशातील ७५ टक्के क्षेत्र कृषियोग्य आहे. शेतीतून गहू, बार्ली, मका, चेस्टनट, द्राक्ष, भाजीपाला व फळेही उत्पादने घेतली जातात. येथील पशुपालन व दुग्धव्यवसायही महत्त्वाचा आहे. गुरे, डुकरे, रेशमी किडे व मधुक्षिकापालन केले जाते. उपभोग्य वस्तू व खाद्यपदार्थांची आयात, तर बांधकामाचा दगड, चुनखडी, वाईन, कापड, लोकरी वस्त्रे, व्हार्निश, फर्निचर, मृत्तिकाशिल्प व बेकरी उत्पादने यांची निर्यात केली जाते.
जानेवारी २००२ पासून सान मारीनोने यूरो हे राष्ट्रीय चलन म्हणून वापरात आणले.देशाचे २००३ चे अंदाजपत्रक २८२·४ द.ल.युरो उत्पन्नाचे व २५७·८ द.ल.खर्चाचे होते.द इन्स्टिट्यूटो दी केडिटो सॅरीनीज (स्था.१९८६) ह्यामध्यवर्ती बँकेशिवाय व्यापारी,कृषी व औद्योगिक बँका येथे आहेत. देशातील एकूण २०,५३० कामगारांपैकी ६,२४७ निर्मिती उद्योगांत व २,९०१ ठोक आणि किरकोळ व्यापारात गुंतले असून ४७३ व्यक्ती नोंदणीकृत बेरोजगार आहेत (२००६). येथे दोन कामगार संघटना आहेत.
देशात २५२ किमी. लांबीचे सार्वजनिक आणि ४० किमी. लांबीचे खाजगी रस्ते, ३२, २६३ प्रवासी मोटारी व ५,९०७ व्यापारी वाहने आहेत (२००६). सान मारीनो– यांदरम्यान बससेवा उपलब्ध आहे. लगतच्या इटलीतील प्रमुख ठिकाणांशी सान मारीनो रस्त्यांनी जोडले आहे. रिमीनी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथून तीन प्रमुख दैनिक वृत्तपत्रे प्रसिद्घ होतात (२००६).
लोक व समाजजीवन : इतिहासपूर्व व रोमन काळापासून या प्रदेशात मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळत असले, तरी मौंट तितानो व त्याच्या उतारावरील वस्ती वाढली ती प्रामुख्याने सेंट मारिनस व त्यांच्या अनुयायींच्या येथील आगमनापासूनच. सान मारीनो नागरिक किंवा सॅरायनीज लोक देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के आहेत. उर्वरित बहुतांश इटालियन आहेत. हजारो सॅरायनीज परदेशात प्रामुख्याने इटली, संयुक्त संस्थाने,फान्स व अर्जेंटिनात राहतात. देशातील ९० टक्के नागरिक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. इटालियन लोकांप्रमाणेच येथील लोकांच्या चालीरीती आहेत. इटालियन ही येथील अधिकृत भाषा आहे. दीर्घकालीन आपले स्वातंत्र्य टिकवून ठेवल्याचा येथील लोकांना विशेष अभिमान आहे.
देशातील सु. ९४ टक्के लोकसंख्या नागरी असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ४९० आहे (२०१२). येथील दर हजारी जन्मप्रमाण ८·९ व मृत्युमान ८·६ असून वार्षिक लोकसंख्या वाढ ०·९ टक्के आहे (२००२–२०१२). बालमृत्युन दर हजारी चार आहे (२०१२). प्रतिस्त्री प्रसवक्षमता १.४ असून हा दर बराच कमी आहे (२०१२). सरासरी आयुर्मान ८३·०७ वर्षे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या २००४ च्या आरोग्य अहवालात येथील लोकांच्या सर्वसाधारण निरोगी आरोग्याबाबत जपाननंतर सान मारीनोला दुसरा क्रमांक दिला. ज्या नागरिकांनी सामाजिक सुरक्षा वर्गणी भरली आहे त्या सर्वांना मोफत, बहुसमावेशक उच्च दर्जाच्या आरोग्यविषयक तसेच आजारपण, अपघात, वृद्घापकाळातील मदत व कुटुंब भत्ता दिला जातो.
सान मारीनोध्ये १४ वर्षे वयापर्यंतच्या सर्वांना शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. देशातील १५ शिशुविहारांध्ये १,०५४ बालके व १४१ शिक्षक, १४ प्राथमिक विद्यालयांत १,४९७ विद्यार्थी व २४५ शिक्षक, तीन कनिष्ठ माध्यमिक विद्यालयांत ८०५ विद्यार्थी व १४४ शिक्षक, एका माध्यमिक विद्यालयात १,२८९ विद्यार्थी व ७७ शिक्षक आहेत. येथे सान मारीनो हे विद्यापीठ (स्था. १९८५) आहे. उच्च शिक्षणासाठी बरेचसे विद्यार्थी इटलीत जातात. साक्षरतेचे प्रमाण ९६ टक्के आहे.
सान मारीनो हे देशाच्या राजधानीचे शहर मौंट तितानो पर्वताच्या पश्चिम उतारावर वसले आहे.मध्ययुगीन काळात त्याचा विकास घडून आला. त्याच्याभोवती उंच दगडी तटबंदी व तीन मनोरे आहेत. मनोऱ्यांवरून सभोवतालचा देशाचा संपूर्ण प्रदेश दिसतो. शहरात किल्ले, राजवाडा, चर्च इ. जुन्या वास्तू आहेत. त्यांपैकी किल्ले भव्य व प्रेक्षणीय आहेत. त्यांतील दहाव्या शतकातील एका किल्ल्याची चौदाव्या शतकात पुनर्बांधणी करण्यात आली. येथील एका मूळ वास्तूच्या भग्नावशेषाच्या जागेवर नवसनातनवादी बॅसिलिका असून त्यात सेंट मारीनसच्या गुहिकेचाही समावेश आहे. पर्वत उतारापासून खाली असलेले बोर्गो मॅगीओर हे अनेक शतकांपासून सान मारीनोचे व्यापारी केंद्र आहे. सेर्रव्हाल्ले हे येथील दुसरे महत्त्वाचे नगर असून ते कृषी व औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. सिगिसमाँडो, मालाटेस्टा यांच्या विरोधात मदत केल्याबद्दल पॉप पीयुस दुसरे यांनी सेर्राव्हाल्ले नगर १४६३ मध्ये सान मारीनोला दिले होते. (चित्रपत्र).
चौधरी, वसंत
“