साधुसंत : ईश्वरनिष्ठ, पुण्यशील, सदाचरणी, निर्वैर, निरपेक्ष, निःसंग, त्यागी आणि निष्काम अशा व्यक्ती. संत म्हणून प्रसिद्घ असलेल्या व्यक्तींच्या जीवनांकडे पाहता हे सद्गुण दिसून येतात. संतांची जीवने आदरणीय आणि अनुकरणीय मानली जातात. धर्मसंस्थापकांना–उदा., गौतम बुद्घ आणि येशू ख्रिस्त–त्यांनी स्थापन केलेल्या धर्मांमध्ये असलेले त्यांचे अनन्य साधारण स्थान पाहता, ते संतांपेक्षा वेगळे ठरतात. संत ह्या धर्मसंस्थापकांबाबत आदर बाळगतात आणि त्यांच्या जीवनांपासून प्रेरणा घेऊन आपली जीवने घडवितात. त्याचप्रमाणे कोणत्याही धर्मात संत म्हणून मान्यता पावलेल्या व्यक्ती, त्या धर्मातील सर्वोच्च मूल्यांचे आविष्कार आपल्या जीवनांतून घडवीत असतात. संत हे अनुकरणीय मानले गेले असले, तरी त्यांची अनुकरणीयता आणि त्यांचे अनुकरण करण्याच्या आपल्या क्षमतेच्या मर्यादा ह्यांतील ताण सामान्यांना जाणवत असतो. अनेक संत लोकांत मिसळतात. आपल्या संतत्वाचा गर्व न वाहता त्यांच्या सुखदुःखांशी समरस होतात, तेव्हा एकीकडे सामान्यांना ते आपल्यासारखेच वाटतात पण दुसरीकडे संतांचे आपल्याहून वेगळेपणही त्यांना जाणवत राहते. अनेक संत आपल्या हयातीतच संत म्हणून मान्यता पावत असले, तरी कोणत्याही संताचे संतपण काळाच्या कसोटीवर टिकून राहावे लागते. ईश्वर आणि मानव ह्यांच्यातील मध्यस्थ म्हणूनही संतांकडे कधीकधी पाहिले जाते.
पवित्र जीवन जगणाऱ्या व्यक्तींना सर्वच धार्मिक समाज संतत्व बहाल करतात असे नाही तसेच संतांना ईश्वर आणि मानव यांच्यातील मध्यस्थ मानतात असेही नाही. ज्यू धर्माला व्यक्तीपेक्षा संपूर्ण ज्यू समाजाचेच तारण व्हावे असे वाटत असल्याने देव आणि मानव ह्यांच्यात कोणी पवित्र व्यक्ती मध्यस्थ असावी, ही कल्पना मान्य नाही. ज्यू विद्वान वा धार्मिक ग्रंथ, तत्त्वे शिकवणारा ⇨राब्बी केवळ शिक्षकच असतो शिवाय ज्यू धर्मात कोणत्याही माणसाची पूजा निषिद्घ मानलेली आहे. ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथाचा भर व्यक्तीने स्वतः मुक्ती प्राप्त करून घेण्यावर आहे आणि ही मुक्ती फक्त ईश्वराच्या कृपेनेच प्राप्त होते, अशी या पंथाची धारणा आहे. तथापि ज्यू आणि प्रॉटेस्टंट पंथ यांच्या काही प्रकारांत संतांना मान्यता दिलेली आढळते. उदा., बेश्त (इझ्राएल बेनएलिएझर) हा हेझिडिझमचा धार्मिक-आध्यात्मिक नेता आणि ख्रिश्चन सायन्स चर्चची संस्थापक मेरी बेकर एड्डी. आर्ष, आदिम धर्मांची प्रवृत्ती त्यांच्या समाजांत काही विशिष्ट भूमिका बजावणाऱ्या–उदा., ⇨शामान (आदिम समाजातले वैद्य) यांना–पवित्र मानण्याची आहे.
हिंदू धर्मात अनेक पंथोपपंथ आहेत तथापि शैव आणि वैष्णव हे मुख्य पंथ होत.दक्षिण भारतात ⇨नायन्मार आणि ⇨आळवार संत होऊन गेले. नायन्मार संत शैव, तर आळवार संत वैष्णव होते. दक्षिण भारतातील त्रेसष्ट तमिळ शैव संतांना नायन्मार ही संज्ञा लावली जाते. समाजाच्या वेगवेगळ्या थरांतून आलेले हे सिद्घ व संत होते. तमिळ साहित्याच्या तिसऱ्या संघमपासून अकराव्या शतकापर्यंतच्या काळात हे संत होऊन गेले. त्यांनी शिवभक्तिपर विपुल काव्यरचनाही केली आहे. आळवारांच्या काळाबाबत विद्वानांत मतभेद आहेत पण ऐतिहासिक आणि इतर अंतर्गत पुराव्यांवरून सर्वसाधारणपणे त्यांचा काळ इ. स. ५०० ते ८५० च्या दरम्यानचा मानला जातो. आळवारांनी तमिळ भाषेत सु. ४,००० पद्ये रचली आहेत. भारतीय संतपरंपरेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांच्या ईश्वरभक्तीचा आणि संतत्वाचा आविष्कार काव्याच्या माध्यमातून केला. तेराव्या शतकातील श्रीज्ञानदेवांपासून संत तुकारामांपर्यंत मराठी संतांची जी परंपरा निर्माण झाली, त्या परंपरेचेही हे एक वैशिष्ट्य राहिले. ह्या संतांनी आपल्या काव्यरचनांमधून विठ्ठलाची भावपूजा तर केलीच पण मराठीचा अभिमानही प्रकट केला आणि आपल्या मातृभाषेला समृद्घी प्राप्त करून दिली. समर्थ रामदासांची दासबोध आणि अन्य रचनाही पद्यमय आहे. बंगाल, ओदिशा आणि व्रजमंडळ (मथुरेच्या आसपासचा प्रदेश) ह्या प्रदेशांत उदयाला आलेल्या ⇨चैतन्य संप्रदाय ह्या वैष्णव संप्रदायाचे संस्थापक मानले गेलेले ⇨चैतन्य महाप्रभु (१४८५–१५३३) हेही एक थोर संत होते. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी बंगालचे साहित्य, संस्कृती किंबहुना बंगाली जनांचे अवघे भावजीवन संस्कारित केले. स्वतः चैतन्य महाप्रभूंनी कोणत्या ही ग्रंथाची वा काव्यकृतीची रचना केली नसली, तरी ⇨कृष्णदास कविराज (१५१७–१६१४) याने रचिलेल्या चैतन्यचरितामृत ह्या त्यांच्यावरील पद्यमय चरित्रात तत्त्वदर्शन, भक्तिनिरूपण आणि काव्य ह्यांचा अपूर्व मिलाफ झाला आहे. गुजरातमध्ये ⇨नरसी मेहता (सोळावे शतक), राजस्थानमध्ये ⇨मीराबाई (सु. १४९८– सु.१५४७) ह्यांची काव्यरचनाही भारतीय संतकवितेचा अमूल्य ठेवा आहे. रामाच्या अनन्यभक्तीवर अधिष्ठित असलेला भक्तिमार्ग दाखविणारे ⇨तुलसीदास (१५३२–१६२३) हे संत तर होतेच परंतु युगप्रवर्तक हिंदी महाकवीही होते. अवधी बोलीत त्यांनी रचिलेले रामचरितमानस हे त्यांचे महाकाव्य तर प्रसिद्घ आहेच पण त्यांची इतर काव्यरचनाही विपुल आहे.
कर्नाटकातील पुरंदरदास, उत्तरेकडे जयदेव, कबीर, रविदास, दादू दयाळ हे अन्य काही संत होत. आधुनिक काळातही संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, गुरुदेव रा. द. रानडे, आचार्य विनोबा भावे यांसारखे संत होऊन गेले आहेत.संतांनी उच्च नीतिमत्तेचे आदर्श समाजापुढे ठेवले. ह्या जगातल्या आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊन परमार्थ साधावयाचा असेल, तर सुखोपभोगांत मग्न न होता, त्यागाचे आणि सेवेचे जीवन जगले पाहिजे. तसेच चिंतन आणि नामस्मरण यांच्या योगे ईश्वराच्या सान्निध्यात राहिले पाहिजे, हे संतांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे. संतांनी समतेची शिकवण दिली, कर्मकांडे नाकारली. संत कसा असला पाहिजे, याविषयी संत तुकारामांनी आपल्या अभंगांतून आपले विचार मांडले आहेत. दुःखितांना जो आपले मानतो, तोच साधू होय आणि अशा माणसाच्या ठायी देवही असतो. माणसाने माणसाला माणूस म्हणून वागवावे आपल्या संततीला जे प्रेम द्यावयाचे, तेच घरातल्या नोकरचाकरांना ही द्यावे भेदाभेदाची कल्पना अमंगल आहे, अशा आशयाचे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत.
हिंदू संतांनी ईश्वराशी सखा, प्रियकर, सेवक असे वेगवेगळे, उत्कट नातेसंबंध निर्माण केले. ईश्वर त्यांना कधीच दूरस्थ वाटला नाही. उलट अनेकदा ईश्वराने त्यांची सेवाही केली अशा आख्यायिका आहेत आणि त्या श्रद्घावंतांनी स्वीकारल्या आहेत. प्रत्यक्ष पांडुरंगाने संत जनाबाईंच्या घरी दळणकांडण करणे, त्यानेच संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या या नोकराचे रूप घेऊन त्यांची चाकरी करणे, ही अशा काही आख्यायिकांची उदाहरणे आहेत.
हिंदू धर्मातील संतांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या धर्मात ‘संत’ ही पदवी कुठल्याही धर्मपीठाकडून मिळत नाही, तर लोकच काही व्यक्तींना संत मानू लागतात. सूफी संप्रदाय हा इस्लामच्या अंतर्गत असलेला एक पंथ होय. सूफी साधुसंतांना मुस्लिम समाजात अत्यंत आदराने वागवले जाई. संत ⇨कबीर (सु. १३९८– सु.१५१८) हा उत्तर भारतात होऊन गेलेला प्रसिद्घ संत कवी. त्याचा जन्म, मृत्यू, जात, गुरुपरंपरा इत्यादींबाबत विद्वानांत मतभेद आहेत. तथापि इस्लाममधील सूफी पंथाचा त्याच्यावर प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. ख्रिस्ती धर्माचा संतांच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास असे दिसते की, काही व्यक्ती विशेष पवित्र असतात, ही जाणीव ख्रिस्ती धर्मेतिहासाच्या अगदी आरंभीच्या काळापासून दिसून येते. इ. स. च्या पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्मीयांचा छळ सुरू असताना अनेक ख्रिस्ती व्यक्तींनी आपला श्रद्घेय धर्म सोडून देण्यापेक्षा मरण पत्करले. धर्मासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या या व्यक्तीच संत म्हणून पहिल्यांदा मानल्या गेलेल्या व्यक्ती होत. ह्या व्यक्तींमध्ये अतिमानवी शक्ती असून त्यांनी मृत्यूवर विजय मिळविला आहे, त्यांना पवित्र मानलेच पाहिजे ही भावना अन्य ख्रिस्ती बांधवांमध्ये रुजली होती. इ. स.च्या तिसऱ्या शतकात ह्या हुतात्म्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जाऊ लागल्या. ह्या हुतात्म्यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले असून ख्रिस्ती म्हणून ज्यांचा छळ होईल, त्यांनीही तो आदर्श समोर ठेवून मरण स्वीकारावे अशी भावना दृढ केली गेली. इ. स.च्या तिसऱ्या शतकापासून ह्या हुतात्म्यांचे पुण्यस्मरणदिन रोममध्ये पाळले जाऊ लागले. त्यांच्या समाध्यांना भाविक लोक भेटी देऊ लागले. हे सर्व चर्चच्या पदाधिकाऱ्यांना दिसत होते. त्यांनी ह्या हुतात्म्यांना स्वर्गीय रक्षक मानून त्यांच्या समामध्यांचे रूपांतर वेदींमध्ये केले. हे हुतात्मे मृत्यूच्याही पलीकडे जाऊन स्वर्गात राहू लागले, ह्या श्रद्घेतून अशीही श्रद्घा निर्माण झाली, की त्यांच्या ठायी काही असामान्य सामर्थ्य आहे आणि श्रद्घाळू माणसांच्या हा केला ते धावून येतात. आपला आजार बरा करण्यासाठी, आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल क्षमा मागण्यासाठी, आपल्या शत्रूंपासून आपले संरक्षण करण्यासाठी, अशा निरनिराळ्या कारणांसाठी आपण त्यांचे साहाय्य मागू शकतो ही श्रद्घा होती. पुढे, इ. स.च्या चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्म हा रोममध्ये पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर ख्रिस्ती धर्मीयांचा छळ थांबला आणि ज्यांनी ह्यापूर्वी छळ सोसला, पण ज्यांना हौतात्म्य प्राप्त झाले नाही, ते संत, संन्यासी, एकांतवासी ह्यांच्या वर्गांत मोडू लागले. ह्यांनी स्वेच्छेने ख्रिस्ताचा आदर्श समोर ठेवला, प्रभूला समजून घेण्यासाठी ते जगापासून दूर राहिले. त्यांनी पैसा, वैवाहिक जीवन, माणसांचा सहवास टाळला. इतकेच काय, पण आपले संकल्प स्वातंत्र्यही सोडले आणि चिंतनशील जीवन जगण्यासाठी स्वतःला एकशिस्त लावून घेतली. ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये चिंतनशील जीवन हा पावित्र्याचा मूर्तिंमंत आदर्श मानला जाऊ लागला. ⇨ख्रिस्ती धर्मपंथांपैकी काहींनी लोकसेवा करणे हे संतांचे ध्येय मानले. संतांनी काही चमत्कार केले पाहिजेत, ते मरणोत्तर स्वर्गात वास करणार असल्याचा तो पुरावा मानता येईल, असाही विचार बळावला. त्यामुळे संतत्वाचा एक घटक म्हणून चमत्कार घडवून आणणे ह्या गुणावर भर दिला जाऊ लागला. असाध्य रोग संत बरे करतात, भूतबाधा नाहीशी करतात, भविष्यकथन करतात आणि निसर्गातील घटकांवर नियंत्रण ठेवू शकतात, असे मानले जाऊ लागले. संतत्व प्राप्त करू इच्छिणाऱ्यांच्या नैतिकतेवर ⇨रोमन कॅथलिक पंथ (चर्च) भर देत असले, तरी चमत्कार हा एखादी व्यक्ती स्वर्गात जाण्यास पात्र आहे याचा अंतिम पुरावा मानण्यात येतो. अशी माणसे स्वर्गाची अधिवासी झाली, की पृथ्वीवरच्या माणसांसाठी देवाकडे मध्यस्थी वा रदबदली करू शकतात, अशी भावना यामागे आहे.
रोमन कॅथलिक पंथात एखाद्या थोर अशा मृत व्यक्तीस संतत्व हे चर्चकडून अधिकृतपणे दिले जाते. संत आणि संन्यासी ह्यांच्या मूर्तीही ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चने आपल्या प्रार्थनामंदिरांतून ठेवलेल्या आहेत. अनुयायांच्या घरांतूनही त्यांना स्थान दिलेले आहे. सोळाव्या शतकात ⇨मार्टिन ल्यूथरने (१४८३–१५४६) कॅथलिक पंथावर आणि काहींना संत मानण्याच्या धोरणावर हल्ला केला. त्याच्या मते ही एक प्रकारची मूर्तिपूजाच होती. प्रॉटेस्टंट हा ख्रिस्ती धर्मपंथ सामान्यतः संतांच्या संदर्भात ल्यूथरचाच विचार मानतो. [⟶ ख्रिस्ती धर्मपंथ ख्रिस्ती संत].
ज्या धर्मात कोणाला संत मानले जात नसले, तरी ⇨अबाहम, ⇨मोझेस यांसारख्या व्यक्तींबद्दल अत्यंत आदराची भावना बाळगली जाते. ज्यू लोकांच्या, नागरी कायदा आणि धर्मशास्त्र या विषयांवरील बायबलला पूरक असलेल्या, ⇨टॅलमुड वा तलमूद या प्राचीन ग्रंथात मृत वा जिवंत अशा कोणत्याही मनुष्याच्या पूजेअर्चेला मान्यता देण्यात आलेली नाही. तरीही थोर राब्बींच्या प्रसिद्घ समाध्यांना प्राचीन व मध्ययुगीनल काळात अनेक ज्यू यात्रेकरू भेट देत असत, मध्य पूर्वेतील ज्यू अद्याप भेट देतात.
बौद्घ धर्मातील ⇨महायान पंथाने ⇨बोधिसत्त्वाच्या संकल्पनेचा खूपच विकास केला आणि प्रज्ञावंत, सात्त्विक, लोकोपकारक व महाकारुणिक अशा अलौकिक सद्गुणांचा एक आदर्श पुरुषोत्तमच बोधिसत्त्वाच्या रूपाने त्यांनी लोकांपुढे ठेवला. बोधिसत्त्व संपूर्ण मानवतेच्या निर्वाणासाठी प्रयत्न करीत असतो. असा बोधिसत्त्व या पंथातील एक संतच मानता येईल.
इ. स. पू. ५५१–४७९ या काळात होऊन गेलेला चीनचा सर्वांत प्रभावी आणि पूज्य समजला जाणारा तत्त्ववेत्ता ⇨कन्फ्यूशस ह्याचे तत्त्वज्ञान मानवतावादावर अधिष्ठित होते. जो माणसावर प्रेम करतो, स्वतःबरोबर इतरांचेही शील उन्नत करतो, तोच सज्जन असे त्याचे म्हणणे होते. कन्फ्यूशस दाखवीत असलेला मार्ग माणुसकीचा आणि प्रेमाचा होता. ज्ञानसंपादन करावे, वासनांवर नियंत्रण ठेवावे, सद्गुणसंपादन आणि शांततेचा ध्यास घ्यावा, असे त्याचे विचार होते. त्यांत संतत्वाचे सार आलेले आहे.
कुलकर्णी, अ. र.