आशौच: आशौच म्हणजे आपल्या नातलगाच्या जन्मामुळे वा मृत्युमुळे आपणास येणारी अशुद्धी. या अशुद्धीचे दोन प्रकार आहेत : (धार्मिक कर्मे करण्याचा अधिकार नाहीसा होणे व (अस्पृश्यत्व येणे. पहिल्यात केवळ श्रौत, स्मार्त वा अन्य अशा धार्मिक कर्मांचा अधिकार नाहीसा होतो व दुसऱ्यात धार्मिक कर्मांचा अधिकार नाहीसा होऊन अस्पृश्यत्वही येते. ज्या कारणाने आशौच येते, त्यास आशौचाचे निमित्त म्हणतात. पहिल्या चार महिन्यांतील गर्भस्राव, पाचव्या व सहाव्या महिन्यांत होणारा गर्भपात, बालकाचा जन्म, नातलगाचे मरण आणि अस्पृश्याशी संसर्ग अशी आशौचाची पाच निमित्ते होत. प्रत्येक निमित्ताने येणाऱ्या आशौचाच्या कालमर्यादा भिन्न असतात. त्याचप्रमाणे जवळचे व दूरचे नातलग यांच्यातील जवळदूरपणाच्या योगानेही कालमर्यादा कमीजास्त होते. जन्मलेले बालक किंवा मेलेली व्यक्ती यांच्या पितृकुलातील नातलगांचे सपिंड, सोदक आणि सगोत्र असे तीन प्रकारचे नातलग आशौचाचे अधिकारी असतात. सपिंड म्हणजे समान असे मातापित्यांचे संततीत उतरणारे देहांश ज्याच्यात असतात तो. सोदक म्हणजे जिवंत असलेला नातलग, ज्याला मृत झाल्यावर श्राद्धात पाणी देतात तो. सगोत्र म्हणजे समान गोत्रातील. पितृकुलात सात पिढ्यांपर्यंत सापिंड्य असते व ते आशौचास कारण होते. दहा पिढ्यांपर्यंतचेही सापिंड्य कारण होते, असे काहींचे मत आहे. आशौचाच्या संदर्भात मातृकुलाकडचे सापिंड्य लक्षात घ्यावयाचे नसते. अविवाहित स्त्रियांना पितृकुलाकडील सापिंड्यामुळे आशौच येते परंतु ते तीन पिढ्यांपर्यंतच मानायचे असते. विवाहित स्त्रियांना नवऱ्याच्या कुलाकडून सात पिढ्यांपर्यंतचे सापिंड्य आशौचास कारण होते. आठ ते चौदा पिढ्यांपर्यंतचे नातलग सोदक होत आणि पंधरा ते एकवीसपर्यंतच्या पिढ्या सगोत्र होत, हे आशौचाच्या संदर्भात लक्षात ठेवणे जरूर आहे.

गर्भस्रावनिमित्ताने मातेला तीन दिवस आशौच असते. मात्र चौथ्या महिन्यातील गर्भस्रावामुळे ते चार दिवस असते. बाकीच्या सपिंड नातलगांना ह्या स्रावामुळे जे आशौच येते, ते स्नान केले असता जाते. गर्भपातनिमित्त आशौच मातेला मासानुक्रमाने पाच वा सहा दिवस असते. सपिंडांना धार्मिक कर्मांचा अधिकार तेवढा तीन दिवस नसतो. स्रावाशौच व पाताशौच सर्व वर्णांना सारखेच असते.

जननाशौच म्हणजे बालकाच्या जन्माने येणारे आशौच. जननाशौचाला मराठीत ‘वृद्धी’ किंवा ‘सोयेर’  म्हणतात. सपिंड असलेल्या ब्राह्मणांना दहा दिवस, क्षत्रियांना बारा दिवस, वैश्यांना पंधरा दिवस, शूद्रांना व संकर जातींना तीस दिवस संपूर्ण आशौच पाळावे लागते. अस्पृश्यता व कर्माचा अनधिकार या दोन गोष्टी या आशौचात असतात. यापेक्षा कमी दिवसांचे म्हणजे असंपूर्ण आशौच सोदकांना तीन दिवस व सगोत्रांना एक दिवस असते. मृत शिशूचे जनन, नालच्छेदनापूर्वी मरण तसेच नालच्छेदनानंतर दहा दिवसांत मरण झाले असेल, तर सपिंडांना अनुक्रमे संपूर्ण, तीन दिवस व संपूर्ण असे आशौच असते आणि बाळंतिणीला संपूर्ण जननाशौच असते. बाळंतिणीला मरणाशौच नसते.

सपिंड, सोदक व सगोत्र यांना जननाशौचाची जितकी कालमर्यादा तितकीच मृताशौचाची आहे, असे समजावे. मृताशौचास मराठीत ‘सुतक’ म्हणतात. सुतकांत धार्मिक कर्मांचा अधिकार रहात नाही व अस्पृश्यत्व येते. जो नातलग नसतो त्याला आशौचाचा अधिकार नसतो तथापि त्याने शवाला स्पर्श केला, स्मशानयात्रेत भाग घेतला, खांदा दिला, मृताकरिता रडला आशौच असलेल्यास स्पर्श केला, त्याचे अन्न खाल्ले, अंत्यक्रिया केली इ. कारणांमुळे त्याला अस्पृश्यत्व येते. आशौचाचा काळ जननाच्या किंवा मरणाच्या क्षणापासून सुरू होतो. जे नातलग दूर राहतात, त्यांना वार्ता समजल्यापासून आशौच सुरू होते व ते मागे सांगितलेल्या दिवसांपर्यंतच राहाते. मागे सांगितलेल्या दिवसांनंतर मरणाची वार्ता समजली, तर जवळच्या नातलगांना आशौच येते. हे नातलग म्हणजे माता, पिता, पुत्र, पती व पत्‍नी हेच होत. त्यांना ते संपूर्णच असते.

एका जननाशौचाच्या काळात दुसरे जननाशौच आले, तर ते पहिल्या जननाशौचाच्या कालमर्यादेपुरतेच राहते परंतु जननाशौचाच्या काळी मरणाशौचाचे निमित्त झाले, तर मरणाशौच मात्र विहित कालमर्यादेपर्यंत राहतेच. मरणाशौचकाळी दुसरे मरणाशौचाचे निमित्त झाले, तरीही पहिल्या मरणाशौचाच्या कालावधीपुरते दुसरे राहते. याला मराठीत ‘वृध्दीत वृध्दी फिटते’  व ‘सुतकात सुतक फिटते’ असे म्हणतात.

ब्रह्मचारी, वानप्रस्थ व संन्यासी यांना जननाशौच किंवा मरणाशौच नसते. राज्यकारभार करणारा राजा किंवा चिकित्सा करणारा वैद्य यांनाही आशौच नसते. युद्धात मृत झालेला, आत्महत्या केलेला, वीज पडून मेलेला, फाशी गेलेला गुन्हेगार यांचे आशौच नसते.

संदर्भ : () कमलाकर भट्ट, निर्णयसिंधु, निर्णयसागर प्रेस, मुंबई,१९०१.

             () काशिनाथोपाध्याय, धर्मसिंधु, वेंकटेश्वर प्रेस, मुंबई, १९०७.

             () श्रीधराचार्य, स्मृत्यर्थसार, आनंदाश्रम, पुणे, १९१२.

जोशी, लक्ष्मणशास्त्री