सातारा जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी. लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११). राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सु. ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सु. २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुकमे १७ ० ५ ´ उ. ते १८० ११´ उ. अक्षांश व ७३० ३३´ पू. ते ७४० ५४´ पू. रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे, पूर्वेस सोलापूर, दक्षिणेस सांगली, पश्चिमेस रत्नागिरी आणि वायव्येस रायगड हे जिल्हे आहेत. जिल्ह्याची उत्तर सरहद्द नीरा नदीने, तर पश्चिम सरहद्द सह्याद्रीने सीमित केली आहे. जिल्ह्याचे दक्षिणोत्तर कमाल अंतर १२० किमी. असून पूर्व-पश्चिम कमाल अंतर १२८ किमी. आहे. जिल्ह्याचा बराच भाग कृष्णा नदीच्या खोऱ्यात, तर काही भाग भीमा नदीच्या खोऱ्यात मोडतो. सातारा (लोकसंख्या १,५७,०००–२००१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून ते पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ४) वसले आहे.
भूवर्णन : पर्वत व डोंगररांगा आणि त्यांच्या कुशीतील उंच पठारी प्रदेश व टेकड्या, उंच सखल भूमी, सपाट मैदानी प्रदेश अशी सातारा जिल्ह्याची प्राकृतिक विविधता आढळते. पश्चिमेकडील सह्य पर्वतरांगांचा प्रदेश (सह्याद्री), कृष्णा नदीखोऱ्याचा प्रदेश, नीरा नदीखोऱ्याचा प्रदेश आणि पूर्वेकडील टेकड्यांचा व माळरानाचा प्रदेश असे जिल्ह्याचे चार स्वाभाविक विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर उत्तरेस पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीपासून दक्षिणेस सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत सह्याद्रीचा विस्तार आहे. कृष्णा नदी खोऱ्याचा दुसरा स्वाभाविक विभाग सु. ३२ किमी. रुंदीचा व साधारण सपाट असून याच्या या स्वाभाविक मध्यातून कृष्णा नदी वाहते. वाई, सातारा व कराड हे तालुके कृष्णा नदीखोऱ्याच्या प्रदेशात येतात. येथील जमीन काळी, कसदार व पिकाऊ आहे. नीरा नदी खोऱ्याच्या प्रदेशात खंडाळा व फलटण तालुक्यांचा बहुतांश भाग अंतर्भूत होतो. कृष्णा नदी खोऱ्याच्या पूर्वेकडील चौथा स्वाभाविक प्रदेश कमी पावसाचा आणि बहुतांश माळरानाचा आहे. येथील जमीन हलकी, वैराण आणि कमी प्रतीची आहे. कमी पावसामुळे या भागात वारंवार अवर्षणांची परिस्थिती निर्माण होते. खटाव व माण तालुक्यांचा बहुतांश भाग या स्वाभाविक विभागात येतो.
जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर सह्याद्रीची मुख्य रांग असली, तरी सह्याद्री व महादेव (शंभू महादेव) डोंगररांगांचा जटिल प्रदेश, तसेच त्यांचे फाटे (सोंडी), त्यांदरम्यानची नद्यांची खोरी, एकाकी टेकड्या इ. भूमिस्वरुपे जिल्ह्यात सर्वत्र आढळतात. मुख्य सह्याद्री रांगेची जिल्ह्यातील लांबी सु. ९७ किमी. असून सर्वसाधारण उंची सस.पासून सु. ९१५ ते १,२२० मी. च्या दरम्यान आढळते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अनेक उंचशिखरे आहेत. घाटमाथ्यावरचे महाबळेश्वर हे जिल्ह्यातील सर्वोच्च ठिकाण असून येथील सिंदोला टेकडीची सस.पासूनची उंची १,४३५.६ मी. आहे. जिल्ह्यातील मुख्य सह्याद्री रांगेत प्रतापगड (१,०८१मी.) व मकरंदगड (१,२३६ मी.) हे दोन प्रमुख गड आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील कोकण किनारपट्टीच्या बाजूचा उतार तीव्र, तर पूर्वेकडील पठारी भागाकडील उतार काहीसा मंद आहे.
सह्याद्रीच्या मुख्य श्रेणीपासून पूर्वेस व आग्नेयीस गेलेल्या अनेक डोंगररांगा आहेत. त्यांमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे महादेव, कमळगड, वैराटगड, हातगेघर-आरळे, बामणोली-घेरादातेगड, भैरवगड-कांदूर या डोंगररांगा प्रमुख आहेत. त्यांपैकी महाबळेश्वरच्या उत्तरेस आठ किमी.वर सुरू होणारी कमी लांबीची कमळगड ही डोंगररांग असून तिच्यामुळे डावीकडील (उत्तरेकडील) वाळकी व उजवीकडील (दक्षिणेकडील) कृष्णा हे दोन प्रवाह एकमेकांपासून अलग झाले आहेत. वाळकी हा कृष्णेचा एक शीर्षप्रवाह आहे. वैराटगड ही डोंगररांग महाबळेश्वर पठारापासून सुरू होऊन पूर्वेस गेलेली आहे. या रांगेतूनच वाई-महाबळेश्वर हा घाटरस्ता जातो. वाईपासून आग्नेयीस १० किमी.वर या रांगेतील वैराटगड हा डोंगरी किल्ला आहे. या रांगेमुळे कृष्णा व कुडाळी नद्यांची खोरी अलग झाली आहेत. महाबळेश्वरपासून सुरू होऊन वैराटगडरांगेला साधारण समांतर आग्नेय दिशेने विस्तारित झालेली, हातगेघर-आरळे ही डोंगररांग असून तिच्यामुळे कुडाळी व वेण्णा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. कृष्णा-वेण्णा नद्यांच्या संगमस्थानापर्यंत हिचा विस्तार आढळतो. या रांगेत डोंगरी किल्ला नाही. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयाच्या पूर्व भागात, उत्तरेस महाबळेश्वरपासून सुरू होऊन दक्षिणेस सु. ६४ किमी. अंतरापर्यंत सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जवळजवळ समांतर गेलेली, बामणोली-घेरादातेगड ही सह्याद्रीची एक प्रमुख रांग आहे. तिच्यामुळे वेण्णा व कोयना नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेप्रमाणेच ही रांग उंच, जटिल आहे. या रांगेत छोट्या छोट्या काही खिंडी असून, त्यांमुळे मेढा व बामणोली येथून येणाऱ्या रस्त्यांनी ही रांग ओलांडता येते. या रांगेच्या अगदी दक्षिण भागात घेरादातेगड हे तटबंदीयुक्त शिखर आहे. बामणोली-घेरादातेगड रांगेपासून पूर्वेस व आग्नेयीस मैदानी भागातून सातारा, केळवली-सोनापूर व जळू-वसंतगड या तीन मुख्य सोंडी गेलेल्या आहेत. पैकी सातारा ही सोंड केळघर येथून सुरू होऊन सातारा शहरापासून तशीच पुढे उरमोडी-कृष्णा या नद्यांच्या संगमापर्यंत पसरली आहे. या सोंडेमुळे वेण्णा व उरमोडी या नद्यांची खोरी विभागली गेली आहेत. या रांगेत सातारा शहराजवळ सातारा किंवा अजिंक्यतारा (१,००२ मी.) हा तटबंदीयुक्त किल्ला आहे. केळवली-सोनापूर ही दुसरी सोंड कमी लांबीची व काहीशी विखुरलेली व अनियमित स्वरूपाची आहे. बामणोलीच्या दक्षिणेस १३ किमी.वर केळवली येथून ही सुरू होते. तिच्यामुळे उरमोडी व तारळी नद्यांची खोरी अलग झाली आहेत. या रांगेतील एका सोंडेवर सज्जनगड (सस.पासून ९०९ मी.) हा किल्ला आहे. जळू-वसंतगड ही तिसरी सोंड केळवलीच्या दक्षिणेस १४ किमी.वर बामणोली-घेरादातेगड रांगेपासून सुरू होऊन दक्षिणेस पाटणपर्यंत गेलेली आहे. पाटणच्या ईशान्येस ३ किमी.वर ही रांग आग्नेयीकडे कराडजवळील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमाच्या दिशेने गेली आहे. तिच्या काही भागाने तारळी व केरा नद्यांची खोरी तसेच कृष्णा व तिची उपनदी मांड आणि कोयना खोरे विभागली गेली आहेत. या रांगेच्या अगदी आग्नेय भागात कराडच्या वायव्येस ६ किमी.वर वसंतगड हा किल्ला आहे. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य व दक्षिण भागात सांगली-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दी लगत भैरवगड-कांदूर ही डोंगररांग आहे. तिचा बराचसा भाग सांगली जिल्ह्यात असून, काही फाटे सातारा जिल्ह्यात ईशान्य व पूर्वदिशेत पसरले आहेत. त्यांपैकी कोयना व मोरणा या नद्यां दरम्यानचा गुणवंत गडफाटा, मोरणा-कोळे (वांग) नद्यांच्या दरम्यानचा काहीर-किरपा फाटा आणि कोळे नदी-नांदगाव ओढा यांदरम्यानचा काळेगाव-जखीणवाडी फाटा हे तीन फाटे महत्त्वाचे आहेत.
सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील महादेव डोंगररांगा आणि त्यांचे फाटे विशेष महत्त्वाचे आहेत. मुख्य महादेव रांगेच्या उत्तरेस नीरा नदीचे, तर दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. ही डोंगररांग महाबळेश्वरच्या उत्तरे ससु. १६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुरू होऊन संपूर्ण जिल्ह्यात ती पूर्वेस किंवा आग्नेयीस पसरली आहे. महादेव डोंगररांगा बऱ्याच मोठ्या, उघड्या, खडकाळ असून त्यांमध्ये अनेक ठिकाणी काळ्या कातळातील उभे कडे निर्माण झालेले आढळतात. या श्रेणीची सु. ४८ किमी. अंतरापर्यंत म्हणजे खंबाटकी घाटाच्या पुढे काही अंतरापर्यंतची दिशा पश्चिम-पूर्व अशी आहे. त्यानंतर ती आग्नेयीकडे वळली असून सातारा जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीपर्यंत या डोंगररांगांचा विस्तार कमी-अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तडवळे गावापासून या रांगा अनियमित स्वरूपाच्या आहेत. महादेव डोंगररांगा काही ठिकाणी खंडित झालेल्या असून निरनिराळ्या भागांत त्या वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. पश्चिमेकडे त्यांना गांधार देव डोंगर, मध्यभागी म्हस्कोबाचे डोंगर तर पूर्वेकडे सीताबाईचे डोंगर म्हणून ओळखले जाते. महादेव श्रेणीच्या दक्षिणेकडे गेलेल्या फाट्यांवर जरी अनेक किल्ले असले, तरी तिच्या मुख्य रांगेवर केंजळगड किंवा घेरा-केळंजा अथवा केंजाळा (१,३०१ मी.), ताथवडा (संतोषगड) व वारुगड असे फक्त तीनच किल्ले आहेत. त्यांपैकी घेरा-केंजाळा किल्ला महाबळेश्वरच्या ईशान्येस २२ किमी.वर, ताथवडा किल्ला माण तालुक्यातील दहिवडीपासून वायव्येस ३२ किमी.वर, तर वारुगड दहिवडीच्या उत्तरेस १८ किमी.वर आहे. महादेव श्रेणीत अनेक लहानलहान खिंडी किंवा ग्रीवा असून त्यांतून महत्त्वाचे घाट मार्ग गेलेले आहेत. त्यांपैकी खंबाटकी घाटमार्ग साताऱ्याच्या उत्तरेस ४५ किमी. वर असून त्यातून पुणे-सातारा-बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र.४ गेला आहे. खंबाटकीच्या आग्नेयीस १९ किमी.वरील तडवळेजवळ असलेल्या घाटातून वाई-आदर्की व पुणे-सातारा हे दोन रस्ते गेलेले आहेत.
मुख्य महादेव डोंगररांगेपासून चंदन-वंदन, वर्धनगड आणि महिमानगड असे तीन प्रमुख फाटे दक्षिणेस गेलेले आहेत. त्यांपैकी चंदन-वंदन फाटा खंबाटकीच्या पूर्वेस हरळीपासून सुरू होऊन दक्षिणेस ३५ किमी. पर्यंत कृष्णा-वसना नद्यांच्या संगमस्थानापर्यंत पसरलेला आहे. या डोंगर रांगेने कृष्णा व वसना या नद्यांची खोरी वेगळी झाली असून, चंदन-वंदन हे दोन डोंगरी किल्ले या रांगेच्या साधारण मध्यावर आहेत. वर्धनगड डोंगररांग खटाव तालुक्यातील मोळगावापासून सुरू होऊन दक्षिणेस ८० किमी. पर्यंत सांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावरील कुंडलपर्यंत गेलेली आहे. या रांगेने पश्चिमेकडील कृष्णेच्या वसना, वांगना व इतर उपनद्यांची खोरी पूर्वेकडील येरळा नदीखोऱ्यापासून अलग झाली आहेत. या रांगेत कोरेगावच्या पूर्वेस १३ किमी.वरील वर्धनगड (१,०६७ मी.) आणि कराड जवळील सदाशिवगड हे दोन किल्ले आहेत. वर्धनगड फाट्यास जेथून सुरूवात होते, त्या ठिकाणापासून पूर्वेस १४ किमी.वर महिमानगड डोंगर रांग सुरू होते. हिचा विस्तार आग्नेयीस सांगली जिल्ह्यातील खानापूर पर्यंत झाला आहे. या रांगेमुळे येरळा व माणगंगा नद्यांची खोरी अलग झाली आहेत. या डोंगररांगेवर तिच्या उत्तरेकडील आरंभस्थानापासून दक्षिणेस १६ किमी.वर महिमानगड (९८१ मी.) हा किल्ला आहे.
सातारा जिल्ह्यात, विशेषतः वाई, जावळी आणि पाटण तालुक्यांत, मुख्य सह्याद्रीचे आणि शंभू महादेवाच्या डोंगरांचे माथे पूर्वेकडून पश्चिमेकडे ते क्रमाक्रमाने एकामागून एक असे उंच होत गेलेल्या पठारी मालिकांच्या पृष्ठभागावरील किल्ल्यांप्रमाणे दिसतात कारण ते पृष्ठीय थर खडकाळ तटांमुळे तयार झालेले आहेत. पूर्वेकडून दख्खनच्या पठारी प्रदेशाकडून सह्याद्रीची उंची फार वाटत नाही परंतु कोकण भागाकडून सह्याद्रीचे कडे ठळकपणे दिसून येतात. काही ठिकाणी या कड्यांचा उतार प्रपाती असून तेथे त्यांची खोली ९०० मी. पेक्षा अधिक आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांची उंची पूर्वेस कमी कमी होत गेलेली आहे. महादेव डोंगररांगेचाही उत्तरेकडील नीरा नदीकडील उतार तीव्र असून दक्षिणेकडील कृष्णा खोऱ्यातील उतार त्यामानाने कमी आहे. सह्याद्रीच्या बहुतांश रांगा विदारित स्वरूपाच्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्री रांगेत व तिच्या फाट्यांवर अनेक टेकड्या व डोंगरी किल्ले आहेत. विशेषतः वाई, महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम व वनव्याप्त प्रदेश लक्षात घेता त्या परिसरात अनेक डोंगरी किल्ले उभारले आहेत. वाई व खंडाळा तालुक्यांत बालेघर, धामणा, हरळी, कमळगड, केंजळगड, मांढरदेव, पाचगणी, पांडवगड, पिपली, सोनजाई, वागदरा, वंदन, वैराटगड, येरुळी (वेरुळी) या महत्त्वाच्या टेकड्या आहेत. यांपैकी सोनजाई ही सर्वांत कमी उंचीची (१,००२ मी.), तर येरुळी ही सर्वाधिक उंचीची (१,३८१ मी.) टेकडी आहे. पाचगणी हे प्रसिद्घ थंड हवेचे ठिकाण आहे. वाईपासून पश्चिमेस १६ किमी. वरकमळगड (१,३७५ मी.), वायव्येस १८ किमी.वर केंजळगड (१,३०१ मी.),उत्तरेस ५ किमी. वरपांडवगड (१,२७३ मी.), आग्नेयीस १० किमी.वर वैराटगड (१,२०० मी.) . वरवंदन (१,१७४ मी.) हे डोंगरी किल्ले आहेत.
महाबळेश्वरवजावळी तालुक्यांत महाबळेश्वर, मकरंदगड, प्रतापगड आणि वासोटा ही उंच ठिकाणे असून त्यांपैकी महाबळेश्वर हे थंड हवेचे प्रसिद्घ गिरिस्थान, तर बाकीचे तीन डोंगरी किल्ले आहेत. महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस ११ किमी.वर मकरंदगड, दक्षिणेस २६ किमी.वर सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर वासोटा (१,१७२ मी.), तर नैर्ऋत्येस १३ किमी.वर इतिहास प्रसिद्घ प्रतापगड (१,०८१ मी.) किल्ला आहे.
सातारा विभागातील प्रमुख टेकड्यांत अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड, पेटोवा, घाटाई, पाटेश्वर आणि शूळपाणी यांचा समावेश होतो. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशीच सातारा शहर आहे. साताऱ्यापासून नैर्ऋत्येस सु. १० किमी.वर सज्जनगड (परळी-सज्जनगड) किल्ला आहे. कोरेगाव तालुक्यात हर्णेश्वर, चवणेश्वर, जरंडा, नांदगिरी आणि चंदन या पाचटेकड्या आहेत. त्यांपैकी नांदगिरी, चंदन व जरंडा हे डोंगरी किल्ले असून ते साताऱ्यापासून अनुक्रमे ईशान्येस १९ किमी., उत्तरेस २४ किमी. व पूर्वेस १३ किमी. अंतरावर आहेत. पाटणच्या परिसरात चांदली, दातेगड, गुणवंतगड (मोरगिरी), भैरवगड व जंगली-जयगड या प्रमुख पाच टेकड्या असून त्यांपैकी चांदली वगळता उर्वरित चार टेकड्यांवर तटबंदी आहे.
कराड परिसरात आगाशिव, पाल, सदाशिवगड व वसंतगड या चार टेकड्या आहेत. कराडच्या नैर्ऋत्येस सु.१० किमी.वर असलेल्या आगाशिव टेकडीचा माथा टोकदार असून तेथील खडकांत काही बौद्घ लेणी आहेत. पाल खेड्यापासून आग्नेयीस तीन किमी.वर पाल नावाची घुटाकार टेकडी आहे. कराडच्या पूर्वेस पाच किमी.वर छ. शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला सदाशिवगड हा डोंगरीकिल्ला आहे. वर्धनगड श्रेणीच्या पश्चिमेकडील एका फाट्याच्या टोकावर हा किल्ला आहे. कराडच्या वायव्येस सहा किमी.वर वसंतगड आहे.
माण तालुक्यात वारुगड, खोकडा, शिखर-शिंगणापूर, ताथवडा (संतोषगड), जिरे-पठार, कुळकजाई आणि महिमानगड या प्रमुख टेकड्या आहेत. त्यांपैकी वारुगड, ताथवडा व महिमानगड टेकड्यांवर गडाची तटबंदी आहे. दहिवडीच्या ईशान्येस २१ किमी.वर शिखर-शिंगणापूर टेकडी असून तिच्या मध्यावर शिंगणापूर खेडे व महादेवाचे मंदिर आहे. खटाव तालुक्यात सोलकनाथ, भापशाह, वर्धनगड आणि भूषण गड्या चार टेकड्या आहेत. वडूजच्या उत्तरेस २९ किमी.वर सोलकनाथ टेकडी असून त्यात येरळा नदी उगम पावते. वडूजच्या पश्चिमेस २२ किमी.वर वर्धनगड आहे. या गडाची टेकडी महादेव श्रेणीचाच एक भाग असून तिचा माथा गोलाकार आहे. टेकडीच्या दक्षिणेकडून सातारा–पंढरपूर रस्ता जातो. वडूजच्या नैर्ऋत्येस १८ किमी. वर सपाट माथ्याचा, पण प्रपाती उताराचा खडकाळ भूषणगड किल्ला आहे.
सह्याद्रीत काही ठिकाणी खिंडी किंवा ग्रीवा आढळतात. त्यातून घाटमार्ग काढलेले आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही घाट महत्त्वाचे ठरले आहेत. खंबाटकी (पुणे–बंगलोर महामार्ग), पसरणी (वाई–महाबळेश्वर), आंबेनळी व पारघाट (महाबळेश्वर–महाड), कुंभार्ली (कराड–पाटण–चिपळूण) हातलोट आणि वासोळ्याच्या दक्षिणेस असलेला उत्तर तिवरा घाट हे जिल्ह्यातील प्रमुख घाट आहेत.
जिल्ह्यातील जमिनीच्या प्रतवारीत प्रादेशिक भिन्नता आढळते. महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई, जावळी व पाटण तालुक्यांच्या पश्चिम भागात जांभी मृदा आढळते. डोंगर उतारावरील मृदेच्या थराची जाडी कमी आहे परंतु पावसामुळे डोंगराळ भागातून वाहत आलेल्या वनस्पतीजन्य पालापाचोळ्यामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेल्या खाचरांमध्ये सुपीक मृदा तयार झाल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी, कोयनाव केरा नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. कृष्णा खोऱ्यातील मृदा ही दख्खनच्या पठारावरील विशेष सुपीक मृदा समजली जाते. त्यांपैकी सातारा व कराड तालुक्यांतील कृष्णा काठच्या जमिनी अत्यंत सुपीक आहेत. नीरा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील मृदा चांगल्या प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव तालुक्यांच्या डोंगरी परिसरातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंतनि कृष्ट आहे. ओढे, नाले यांच्या दरम्यान माळरानाचे पट्टे आढळतात.
नद्या : सह्याद्रीच्या मूळरांगेपासून लहानलहान फाटे पूर्वेस किंवा आग्नेय दिशेस पसरलेले आहेत. त्यांना अनुसरून नद्यांची वेगवेगळी खोरी निर्माण झाली आहेत. सातारा जिल्हा हे प्रामुख्याने कृष्णा नदीचे जलवाहन क्षेत्र असून येथे कृष्णा, येरळा, माणगंगा, नीरा ही प्रमुख चार नदीखोरी आहेत. क्षेत्र महाबळेश्वर येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचे उगम-झरे दाखविले आहेत. या नद्या महाबळेश्वरपासून वेगवेगळ्या दिशांना वाहत जातात. कृष्णाही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर वाई, सातारा, कोरेगाव व कराड या तालुक्यांतून, जिल्ह्याच्या साधारण मध्य भागातून सु. १६० किमी. अंतर वाहत जाऊन ती सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. वाई व कराड ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्राव्यतिरिक्त कुडाळी, वेण्णा, उरमोडी, तारळी व कोयना ह्या उजवीकडील आणि वसना व येरळा ह्या डावीकडील उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचा कृष्णानदीच्या बृहत् पाणलोट क्षेत्रात समावेश होतो. कुडाळी ही कृष्णेची एक लहानशी उपनदी जावळी व वाई तालुक्यांतून वाहते. महाबळेश्वर येथेच उगम पावणारी वेण्णा नदी साताऱ्याजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते. जावळी व सातारा तालुक्यांतून वाहणारी उरमोडी नदी वेणेगाव येथे कृष्णेला मिळते. पाटण व कराड तालुक्यांतून वाहणारी तारळी नदी उंब्रजजवळ कृष्णेला मिळते. कृष्णा नदीवर वाई तालुक्यात धोम गावाजवळ धोम धरण बांधण्यात आलेले आहे.
कोयना ही कृष्णेची जिल्ह्यातील सर्वांत मोठी उपनदी आहे. महाबळेश्वर येथील उगमानंतर जावळी व पाटण तालुक्यांतून दक्षिणेस हेळवाकपर्यंत ती वाहत जाते. त्यानंतर ती पूर्ववाहिनी होते व कराड शहराजवळ कृष्णेला मिळते. हे संगमस्थान प्रीतिसंगम म्हणून प्रसिद्घ आहे. कोयना नदीवरील कोयना धरण वीजनिर्मितीसाठी विशेष प्रसिद्घ आहे. सातारा जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी नीरा नदी पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. माणगंगा ही भीमा नदीची उपनदी माण तालुक्याच्या वायव्य भागात उगम पावून आग्नेय दिशेस वाहत जाते व पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. म्हस्कोबाच्या डोंगराळ भागात उगम पावणारी येरळा नदी कोरेगाव व खटाव या तालुक्यांतून वाहत जाऊन पुढे सांगली जिल्ह्यात प्रवेश करते.
हवामान : जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने तेथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३५ सेंमी. असून जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋर्त्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. पावसाचे वितरण बरेच असमान आहे. महाबळेश्वर येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. ६२५ सेंमी. असून खटाव, माण यांसारख्या पूर्वेकडील तालुक्यांत ते सु. ६० सेंमी.पेक्षाही कमी आहे. पश्चिमेकडील महाबळेश्वर, जावळी व पाटण हे तालुके अधिक पावसाचे आहेत.
वनस्पती व प्राणी : सातारा जिल्ह्यातील १,५२४ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यांपैकी १,३६९ चौ. किमी. राखीव, ४८ चौ. किमी. संरक्षित व १०७ चौ. किमी. क्षेत्र अवर्गीकृत वनांखाली आहे. महाबळेश्वर, जावळी व पाटण तालुक्यांत तसेच वाई तालुक्याच्या पश्चिम भागात ही वने एकवटलेली आहेत. सह्याद्रीच्या उतारावर सदाहरित वने, तर सह्याद्रीच्या पायथ्याशी मिश्रवने आहेत. कोयना खोऱ्यात व जावळी तालुक्यात सु. ४२४ चौ. किमी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात व एकूणच जिल्ह्यातील दाट वनांमध्ये बिबळ्या, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर इ. प्राणी आहेत. मायणी तलावाच्या परिसरात पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
कोयना नदीचे खोरे व कोयना धरणाचा परिसर, महाबळेश्वर, पाचगणी व पाटण परिसरात असलेली वनसंपदा, त्याच्या माध्यमातून होऊ घातलेला व्याघ प्रकल्प, कास, बामणोली, तापोळा परिसर आणि त्या भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पती या सर्व सातारा जिल्ह्याच्या वैभवाच्या बाबी आहेत. जगभरातील जैव विविधता असलेल्या स्थळांना मानवाकडून धोका आहे. त्यात पश्चिम घाटातील विविध स्थळांबरोबरच सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीचाही समावेश होतो. येथील धोक्यात येत असलेली पर्यावरणीय परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील जैव विविधतेने नटलेला हा भाग पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसर (इको सेन्सेटिव्ह झोन) होणे ही काळाची गरज आहे.
पश्चिम घाटातील विविध स्थळांचा ‘जागतिक वारसा स्थळांत’ (वर्ल्ड हेरिटेज साइट) समावेश होण्यासाठी भारताच्या केंद्रीयवन आणि पर्यावरण मंत्रालयाने याबाबतचा प्रस्ताव ‘दि युनायटेड नेशन्स एज्युकेशनल ॲन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन’ला (युनेस्को) पाठविला होता. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोच्या द्विसदस्यीय तज्ज्ञ पथकाने पश्चिम घाटातील जवळपास ३५ स्थळांना भेट दिली. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पुष्प पठार म्हणून नावलौकिक मिळालेले कास पठार, कोयना वन्य जीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान या स्थळांची डॉ.स्ट्राहम व डॉ. फर्ज या युनेस्कोच्या सदस्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये पाहणी केली. युनेस्कोच्या मंजुरीमुळे (२०१२) सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्य, कासपठार, चांदोली राष्ट्रीय उद्यान या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण औषधी व दुर्मी ळ वनस्पती, जंगली व सरपटणारे प्राणी, कीटक आदींचे अधिक शास्त्रीय पद्घतीने संरक्षण-संवर्धन करणे शक्य होणार आहे. नैसर्गिक वारसा जपण्याबरोबरच जागतिक पर्यटकांचे लक्ष वेधल्याने निसर्गपूरक पर्यटनास चालना मिळू शकेल.
चौधरी, वसंत
इतिहास : अश्मयुगीन व ताम्र पाषाणयुगीन काही लघु-अश्म हत्यारे व मृत्पात्रे कृष्णा-कोयना नदीखोऱ्यात आढळली. त्यांवरून या जिल्ह्यात प्रागैतिहासिक काळात मानवी वस्ती होती मात्र जिल्ह्यात विस्तृत उत्खनन व शास्त्रीय दृष्ट्या अन्वेषण झालेले नाही. सातवाहनांची (इ. स. पू. सु. २००– इ. स.३००) सत्ता या प्रदेशावर होती. तत्कालीन वरवंटे, जाती, खापरे इ. अवशेष वाईच्या किवरा ओढ्याच्या परिसरात आढळले आहेत. तसेच या काळात काही हीनयान बौद्घलेणी कराड-वाई (लोहारे) येथे खोदली असून शिरवळ, कुंडल, भोसे, माळेवाडी आदी ठिकाणी त्याकाळी गुंफा खोदल्या होत्या. भारहूत (मध्यप्रदेश) स्तूपाच्या अभिलेखात करहाटक (कराड) येथील यात्रेकरूं नी अनुदान दिल्याचा उल्लेख आढळतो.
सातवाहनांनंतर चौथ्या शतकात हा प्रदेश पूर्वकालीन राष्ट्रकूटांच्या अंमलाखाली होता. त्या वंशाचा मूळ पुरुष मानांक (कार. इ. स. ३५०–७५) याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली होती हे मानपूर म्हणजेच सातारा जिल्ह्यातील माण असावे. या वंशाच्या अंमलाखालचा प्रदेश प्राचीन कुंतल देशात अंतर्भूत होत असल्याने येथील राजास कुन्तलेश्वर किंवा कुंतलाधिपती म्हणत. कुंतल देशात कृष्णवर्णा किंवा कृष्णा नदीकाठच्या प्रदेशाचा अंतर्भाव होत असे. ‘करहाटक ४०००’ या प्रदेशाचा कुंतल देशात समावेश होता. या राजांना उत्तरेतील गुप्तसम्राटांचा पाठिंबा होता. राजशेखर, भोज, क्षेमेंद्र इ. संस्कृत ग्रंथकारांनी उल्लेखिलेल्या परंपरेप्रमाणे गुप्तराजा दुसरा चंद्रगुप्त-विक्रमादित्य याने स्वकालीन राष्ट्रकूट राजाच्या म्हणजे मानांकाचा पुत्र देवराजच्या दरबारात कविकुलगुरू कालिदास याला आपला दूत म्हणून पाठविले होते. नंतर या घराण्याचे विदर्भातील वाकाटकांशी विवाहसंबंध झाले आणि पुढे ते त्यांचे सामंत झाले. या काळात उदयास आलेल्या विष्णुकुंडिन वंशातील दुसरा माधव वर्मा (सहावे-सातवे शतक) याच्या खानापूर ताम्र पटात रेठ्ठूरक (रेठरे बुद्रुक) या गावचा उल्लेख असून त्याच्या स्तंभाच्या निर्देशात राजमाची, शेणोली, कोला व मलखेट या गामांचा उल्लेख आहे. शिवाय दानपत्रातील बेलवाटिका व वठ्ठरिका म्हणजे अनुक्रमे बेलवंडे व वाठार हेही स्पष्ट आहे. यावरून काही काळ या वंशाचा या प्रदेशावर अंमल असावा. चालुक्य दुसरा पुलकेशीने हे राज्य खालसा करून (६३१) तिथे आपलाभाऊ विष्णुवर्धन याची काही काळ नियुक्ती केली. बादामीच्या चालुक्यांच्या पतनानंतरचा या प्रदेशाचा इतिहास सुस्पष्ट नाही तथापि तो नंतरच्या राष्ट्रकूट (७५३–९७५) घराण्याच्या साम्राज्यात अंतर्भूत झाला असावा आणि त्यांनी त्यावर एखाद्या सामंताची नेमणूक केली असावी. या काळातील त्यांची राजधानी सातारा जिल्ह्यातील कराड येथे असावी. कर्नाटकातील उत्तरकालीन सिंदराजे आपल्याले खात स्वतःचा ‘करहाटपूर वराधिश्वेर’ असा निर्देश करतात, यावरून ते मूळचे करहाटचे होते, हे निश्चित. कर्नाटकातील काही सिंदराजांच्या लेखांत ते मूळचे करहाटकचे होते, असे उल्लेख येतात. यावरून सिंदनृपती आदित्यवर्मा याची राजधानी करहाटकच असावी असे वाटते. नंतर शिलाहार द्वितीय जतिग याने तो प्रदेश जिंकून करहाटक येथे आपली राजधानी केली असावी. या शाखेचा पहिला ज्ञात लेख मारसिंहाचा (१०५८) मिरज ताम्रपट होय. मारसिंह (कार. १०५०–७५) याच्या ताम्र पटात द्वितीय जतिगाचा मुलगा व उत्तराधिकारी गोंक याचे वर्णन असून तो करहाटक, कुण्डी, मिरिज देश यांचा अधिपती असल्याचा उल्लेख आहे. गोंकानंतर त्याचा मुलगा मारसिंह गादीवर आला. त्यावरून शिलाहारांची आरंभीची राजधानी करहाटक असावी.
शिलाहारवंशी राजकन्या चंद्रलेखा हिच्या चालुक्य राजा सहाव्या विक्रमादित्याबरोबरच्या करहाटक येथील स्वयंवराचे वर्णन बिल्हणाच्या विक्रमांकदेवचरितात आहे. तिच्या पित्याचे नाव करहाटपती असे त्यात आले आहे. राजा मारसिंह हा तिचा पिता असावा. या शाही विवाहानंतर शिलाहारांनी आपली राजधानी करहाटकहून कोल्हापुरास हलविली असे दिसते तथापि करहाटक येथे चालुक्य राजपुत्र मल्लिकार्जुन (चंद्रलेखेचा पुत्र) आणि सहाव्या विक्रमादित्याचा मांडलिक जोगम हे काही वर्षे राज्य करीत होते, असे कोरीव लेखांत उल्लेख आढळतात. कोल्हापूर व त्याच्या आसमंतात सापडलेल्या अनेक कोरीव लेखांत व वाङ्मयातही त्यांचा उल्लेख ‘करहाटाधिपती’ असाच आढळतो. शिलाहार वंशातील दुसरा भोज (कार. ११७५–१२१२) हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात १०–१२ किल्ले बांधले. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), चंदन-वंदन वगैरे काही प्रसिद्घ किल्ले होत. यादव राजा सिंघण (कार. १२१०–४६) याने भोजाचा पराभव केला. त्यानंतर हा प्रदेश यादवांच्या आधिपत्याखाली आला. या काळातील कोरीव लेखांत या प्रदेशाविषयी उल्लेख नाहीत. मात्र यादव वास्तुशिल्प शैलीतील मंदिरे फलटण (जबरेश्वर), परळी (शिवमंदिर व वीरगळ), कातरखटाव (कातरेश्वर), देऊर (विठ्ठल-रुक्मिणी), खटाव (नागनाथ), किकली (भैरवनाथ), शिंगणापूर (महादेव) इ. ठिकाणी आहेत. यांपैकी किकलीच्या भैरवनाथ मंदिरासमोर एक अस्पष्ट कोरीव लेख असून त्यातील ‘सिंघणदेव’ ही पुसट अक्षरे यादव वंशाच्या आधिपत्याचा निर्देश दर्शवितात.
यादवांच्या पतनानंतर (१३१८) दक्षिण हिंदुस्थानात राजकीय अनागोंदी होती. बहमनी सत्तेखाली (१३४७–१५३८) गुलबर्गा तरफाचा सातारा भाग होता. कोकण भाग वगळता अन्य प्रदेश बहमनी साम्राज्यात होता. मुहंदशाह बहमनी (कार. १३५८–७५) याने खुद्द सातारा किल्ल्याची डागडुजी करून परिसरात अनेक किल्ले बांधून संरक्षण व्यवस्था भक्कम केली. यानंतर हुमायूनशाह जालीम (कार. १४५८–६१), निजामुद्दीन (कार. १४६१–६३) आणि तिसरा मुहंदशाह (कार. १४६३–८२) हे सुलतान झाले. या काळात वाई व माण ही दोन प्रमुख लष्करी ठाणी होती. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाही अंमलाखाली आला. याकाळात जावळीचे चंद्रराव मोरे, फलटणचे राव नाईक निंबाळकर, मलवडीचे झुंझारराव घाटगे, म्हसवडचे माने आदी मातब्बर मराठा मांडलिक घराणी वंशपरंपरेने आपल्या जहागिरीच्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्या जीवावरच आदिलशाही सत्ता कोकणात स्थिरावली आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आपली सत्ता दृढतर केली. याचकाळात छ.शिवाजी महाराजांनी जावळी व परिसर पादाक्रांत करून (१६५६) रायरी (रायगड) घेतला आणि पुढे अफजलखानाचा निःपात करून (१६५९) वाई देश जिंकला. शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंत व नंतरही किरकोळ अपवाद सोडता सातारा किल्ला व त्याचा परिसर मराठ्यांच्या अंमलाखाली होता. पुढे छ.राजारामांनी सातारा ही मराठ्यां ची राजधानी केली. औरंगजेबाने सातारा-परळी किल्ल्यांसह बराच भाग मोगल सत्तेखाली आणला (१६९९). त्याच्या मृत्युनंतर (१७०७) तो छ. शाहूंच्या अखत्यारीत आला आणि ⇨सातारा संस्थानची निर्मिती झाली. ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८–३९) यांच्या कारकीर्दीत सातारा शहर व जिल्ह्यात अनेक सुधारणा झाल्या. हा प्रदेश पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) मराठी सत्तेखाली होता पुढे सुरूवातीस बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे त्यावर वर्चस्व होते (१८५८) नंतर तो अव्वल इंग्रजी अंमलाखाली भारत स्वतंत्र होईपर्यंत होता (१९४७).
स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनांत जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिरोड्याच्या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक सत्याग्रही सामील झाले होते. काँग्रे स समितीने ‘छोडो भारत’चा ठराव मंजूर केला. त्याच दिवशी मुंबईतच सातारकरांच्या भूमिगत कारवायाचा प्रारंभ झाला. भूमिगत झाल्याने बहुसंख्य आंदोलक अटक टाळू शकले, त्यामुळे या जिल्ह्यातील आंदोलन दीर्घकाळ टिकून राहिले. गनिमी काव्याच्या युद्घतंत्राचा येथे उपयोग करण्यात आला. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसनवीर, वसंतदादा पाटील, बाबुराव चरणकर, बरडे मास्तर, बाबुराव पाटणकर इत्यादींचे नेतृत्व या आंदोलनाला लाभले होते. नाना पाटील यांनी प्रतिसरकारची (पत्री सरकारची) योजना आखली. महाराष्ट्रातील भूमिगत आंदोलनांचे सर्वांत दैदीप्यमान शिखर म्हणजे साताऱ्याचे प्रतिसरकार होय.
स्वातंत्र्योत्तर काळात औंध, फलटणबरोबरच सांगली, मिरज, जत ही संस्थानेही सातारा जिल्ह्यातच समाविष्ट करण्यात आली. परिणामी सातारा जिल्हा आकारमानाने मोठा होऊन प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला. त्यामुळे १ ऑगस्ट १९४९ रोजी तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात, तर उत्तर सातारा जिल्ह्याचे रूपांतर सातारा जिल्ह्यात करण्यात आले.
देशपांडे, सु. र.
आर्थिकस्थिती : कृषी : जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी १३% क्षेत्र वनांखाली, ६.९९% चराऊ कुरणांखाली, २.६१% बिगर शेतीसाठी, ४% क्षेत्र लागवडीलायक पण पडीक जमिनीचे आहे. महसूल खात्याच्या गावपत्रकानुसार १९९८-९९ मध्ये ७.२६ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक होते. त्यापैकी निव्वळ कसलेले क्षेत्र ५.८० लाख हेक्टर होते. एकूण ओलीत क्षेत्र २,२६,००० हे. होते. जिल्ह्यातील सु. ५७% खातेदार एक हेक्टरपेक्षा कमी जमिनीचे क्षेत्र असणारे होते. सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते. कराड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांत खरीप संकरित ज्वारीचे, तर फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. पाटण, कराड, जावळी, महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्घ आहेत. माण, खटाव, खंडाळा, फलटण व कोरेगाव तालुक्यांतील कमी पावसाच्या पदेशांत बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक प्रमाणात पिकविला जातो. हरभऱ्यांचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते. फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळिंबाच्या बागा आहेत. कराड तालुक्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्या च्या तर माण,फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्घ आहेत. ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. हळद, आले ही पिकेही येथे घेतली जातात. खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्र (१९३२),महाबळेश्वर येथील गहू गेरवा संशोधन केंद्र (१९४०), कराड येथील एकदल व गळितांच्या पिकांच्या जातीव्रर संशोधन करणारे केंद्र (१९४८), रहिमतपूर येथील आले संशोधन केंद्र ही जिल्ह्यातील प्रमुख कृषिशिक्षण व संशोधन केंद्रे आहेत.
सन २००८-०९ मध्ये जिल्ह्यात प्रमुख कृषि उत्पादने अंदाजित पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन मे. टन) : तांदूळ–१,०९३, गहू–६९१, ज्वारी –२,१४२, बाजरी–३३, मका–२७४, एकूण कडधान्ये–३४७, भुईमूग–७४०, कापूस (सरकीविरहित)–१५, आले–५९५, हळद–१,१६६, बटाटा–२०,६९०. याशिवाय उसाचे उत्पादन ४२,३०० मे. टन झाले.
जिल्ह्यात १० मोठे, १३ मध्यम व ८० लघु जलसिंचन प्रकल्प आहेत. जलसिंचन विकासासाठी कृष्णा खोरे विकास मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत धोम,कण्हेर यांसारखे मोठे प्रकल्प पूर्ण झाले. कृष्णा नदीवरील धोम धरणाचे काम १९७७ मध्ये पूर्ण झाले. या धरणामुळे जिल्ह्यातील २१,२८४ हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. धोम धरणातील पाणी डोंगरातून बोगदा काढून खंडाळा तालुक्यात नेण्यात आले आहे. वेण्णा नदीवर कण्हेर येथे १९८८ मध्ये बांधण्यात आलेल्या कण्हेर धरणामुळे १०,५४८ हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. १९६५ मध्ये नीरा नदीवर बांधलेल्या धरणामुळे २६,७८७ हे. क्षेत्राला पाणी पुरवठा झाला आहे (२००३). कोयना नदीवर पाटण तालुक्यात मोठे कोयना धरण असून त्याच्या जलाशयास ‘शिवाजी सागर’ नाव देण्यात आले आहे. राज्यातील हा सर्वांत मोठा जलविद्युत्निर्मिती प्रकल्प आहे.‘लेक टॅपिंग’चे अभिनव व यशस्वी प्रयोग येथे करण्यात आले. याशिवाय कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प, येवती येथील येवती म्हासोळी प्रकल्प, खोडशी येथील कृष्णा कालवा पाटण तालुक्यातील तारळी नदीवरील तारळी बंधारा, आंबेघर येथील मोरणा प्रकल्प, मानेवाडी येथील उत्तरमांड प्रकल्प, डांगिष्टेवाडी येथील तारळी प्रकल्प, मराठवाडी येथील वांगप्रकल्प सातारा तालुक्यात परळी येथील उरमोडी प्रकल्प खटाव तालुक्यात येरळा नदीवरील नेर तलाव, बनपुरी येथील येराळवाडी धरण माण तालुक्यात वाघेरी नाल्यावरील राणंद तलाव, बोडके येथील आंधळी प्रकल्प, माणगंगा नदीवरील म्हसवड तलाव जावळी तालुक्यात हातगेघर येथील हातगेघर प्रकल्प, महू येथील महू प्रकल्प वाई तालुक्यात नागेवाडी येथील नागेवाडी प्रकल्प व वाळकी नदीवरील बलकवडी येथील धोम-बलकवडी प्रकल्प कोरेगाव तालुक्यातील आरफळ कालवा प्रकल्प इ. प्रकल्प जलसिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील देवघर येथील नीरा देवघर प्रकल्प नीरा नदीवरील वीर धरण ही धरणे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
सन २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील एकूण पशुधन १४.१७ लाख होते. त्यांपैकी ३.५९ लाख गाई व बैल, ३.४७ लाख म्हशी व रेडे, ७.०३ लाख शेळ्या व मेंढ्या आणि उर्वरित घोडे,गाढवे व खेचरे आदी पशुधन होते. मेंढीपालन हा माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यातील एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे. दुधाच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून संकरित गाई पाळल्या जातात. कराड, सातारा, फलटण, कोरेगाव व वाई या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत. दूध संकलनासाठी दुग्धव्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या असून मार्च, २०१० अखेर जिल्ह्यात एकूण १,३४६ दुग्धव्यवसाय संस्था होत्या. त्यांद्वारे प्रतिदिनी सु.६,००,००० लि. दूधसंकलन केले जात होते. जनावरांवरील उपचारासाठी जिल्ह्यात एक रुग्णालय, ६० दवाखाने, १२५ मदत केंद्रे आणि २ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने, १९४ कृत्रिम रेतन केंद्रे होती (२००९-१०).
उद्योग : औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल चालू आहे. सातारा, कराड, फलटण, वाई येथे औद्योगिक वसाहती आहेत. सन २००९ अखेर कारखाना अधिनियमांतर्गत नोंदविलेले एकूण ५३४ उद्योग होते. जिल्ह्यात थेट विदेशी गुंतवणूक असलेले २३ प्रकल्प कार्यरत आहेत. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा डीझेल एंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे. युनिव्हर्सल लगेज या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योग ही सातारा येथे आहे. कराड येथे किर्लोस्कर बदर्सचा हेमेटिक सील्ड कॉम्प्रेसर हाइड्रोलिक प्रॉडक्ट कारखाना आहे.
पाटण तालुक्यात दौलतनगर, कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक (शिवनगर), यशवंतनगर व शेवाळेवाडी येथे, तर वाई तालुक्यात किसन वीर नगर (जांब), फलटण तालुक्यात फलटण येथे, सातारा तालुक्यात शेंद्रे (शाहूनगर), जावळी तालुक्यात कुडाळजवळ असे जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत. याशिवाय फलटण तालुक्यात साखरवाडी व कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४८.११ लाख मे. टन उसाचे गाळप होऊन त्यापासून ५७४ हजार मे. टन साखर उत्पादन झाले. याशिवाय खटाव, माण व फलटण तालुक्यांमध्ये घोंगड्या विणण्याचा उद्योग प्रस्थापित असून कोरेगाव तालुक्यात तेल गाळण्याचा उद्योग चालतो. महाबळेश्वर येथे मधुक्षिका पालन उद्योग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारच्या मिळून ६,३९५ सहकारी संस्था असून त्यांपैकी २,५४१ उत्पादन संस्था आहेत (२०१०). सातारा येथे रोजगार विनिमय केंद्र आहे. जावळी तालुक्यातील सु. २० व पाटण तालुक्यातील ३० गावांच्या परिसरात थोड्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. इमारतीचा दगड, चुनखडी व विटेसाठी उपयुक्त माती ही अन्य खनिजे जिल्ह्यात उपलब्ध आहेत. यांव्यतिरिक्त इतर महत्त्वाची खनिज संपत्ती जिल्ह्यात नाही. सातारा जिल्ह्यातील वनकुसवडे पठारावर महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा) तर्फे उभारलेला पाचशे मेवॉ. क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प हा राज्यातील सर्वांत मोठा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प ठरणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात इतरत्र ही पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत.
पुणे–बंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जिल्ह्यातून जातो. शिरवळ, खंडाळा, सुरूर, पाचवड, सातारा, उंब्र ज व कराड ही या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. या महामार्गाची जिल्ह्यातील लांबी १३१ किमी. आहे. सातारा या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून चोहोदिशांना रस्ते गेलेले आहेत. याशिवाय सर्व तालुका ठिकाणे तालुक्यातील सर्व खेड्यांशी रस्त्याने जोडली आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी ९,७०७ किमी. असून त्यांपैकी ५,३९७ किमी. रस्ते डांबरी, २,७४७ किमी. खडीचे आणि १,५६३ किमी. इतर रस्ते आहेत. नोंदणीकृत वाहनांची संख्या ४,१०,१४८ होती (२०१०). कोल्हापूर–मुंबई हा दक्षिण मध्य रेल्वेचा १२४ किमी. लांबीचा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. लोणंद, वाठार, सातारा (माहुली), कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कराड ही या लोहमार्गावरील प्रमुख स्थानके आहेत. जिल्ह्यात एकूण ६६५ डाकगृहे व १८८ तारगृहे आहेत. दूरध्वनींची संख्या ९१,३९७ (२००९-१०) होती. भ्रमणध्वनीचा प्रसार व लोकप्रियता अधिक वेगाने वाढल्याचे आढळते.
लोक व समाजजीवन : सातारा जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ३०,०३,९२२ असून त्यांपैकी १५,१२,५२४ पुरुष व १४,९१,३९८ स्त्रिया होत्या. २००१–२०११ या दशकात ६.९४% एवढी लोकसंख्यावाढ झाली. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २८७ व्यक्ती इतकी आहे. दर चौ. किमी.स ५०९ ही सर्वाधिक घनता कराड तालुक्यात, तर दर चौ. किमी.स १३९ ही सर्वांत कमी घनता माण तालुक्यात आहे. एकूण लोकसंख्येपैकी सु. ८१% लोक ग्रामीण भागात व केवळ १९% नागरी भागात राहतात. जिल्ह्यात एकूण १,७३९ खेडी व १५ नगरे आहेत. एकूण खेड्यांपैकी १८ खेडी ओसाड आहेत. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९८६ आहे. चरितार्थासाठी अन्यत्र काम करणाऱ्या या पुरुषांचे प्रमाण बरेच असल्यामुळे राज्याच्या व देशाच्या तुलनेत या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर जास्त आहे. ९.५१% लोकसंख्या अनुसूचित जातीची व ०.७५% अनुसूचित जमातीची होती. एकूण लोकसंख्येपैकी सु.३५% लोकसंख्या ० ते १४ वर्षे वयोगटातील, ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील सु.९% आणि उर्वरित ५६% १५ ते ५९ वयोगटातील होती. काम करणाऱ्या या व्यक्तींची संख्या ८.९६ लाख (३६.५६%) आहे. एकूण काम करणाऱ्यांपैकी ७०.८६% कामकरी हे शेतकरी व शेतमजूर असून उर्वरित २९.१४% खाणकाम, वस्तुनिर्माण उद्योग, बांधकाम, व्यापार, वाहतूक व अन्य सेवाक्षेत्रात गुंतलेले आहेत. साक्षरतेचे प्रमाण ८४.२०% असून पुरुषांच्या बाबतीत ९२.०९% व स्त्रियांच्या बाबतीत ७६.२९% आहे.
राज्य शासन, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा संस्थांतर्फे वैद्यकीय सेवेचा लाभ जनतेस दिला जातो. जिल्ह्यात २००९-१० साली सार्वजनिक क्षेत्रातील १८ रुग्णालये, १७ दवाखाने, ८ प्रसूतिगृहे, ७१ आरोग्य केंद्रे व ८६ कुटुंबनियोजन केंद्रे होती. या सर्व संस्थांमध्ये १९२ डॉक्टर, ७५३ परिचारिका व १,१११ खाटा होत्या.
केंद्रशासनाचे अर्थसाहाय्य उपलब्ध असणारी एकात्मिक ग्रामीण विकास योजना जिल्ह्यातील सर्व म्हणजे ११ पंचायत समित्यांमध्ये कार्यान्वित आहे. २००२-०३ मध्ये या योजनेअंतर्गत ८०४ कुटुंबांना लाभ झाला. अवर्षणप्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम खटाव, खंडाळा, कोरेगाव व माण या तालुक्यांना लागू आहे. पश्चिम घाट विकासही केंद्र पुरस्कृत योजना सातारा, वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण, कोरेगाव, खंडाळा व खटाव या तालुक्यांना लागू आहे. या योजनेअंतर्गत वनीकरण, मृद्संधारण, लघुपाटबंधारे, रस्त्यांचा, फळबागांचा विकास, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, मधुक्षिकापालन व रेशीम उत्पादन विकास या योजना राबविल्या जातात. रोजगार हमी योजनेअंतर्गत १,२५९ कामांचे नियोजन करण्यात आले होते (२००१-०२). याशिवाय विशेष घटक योजना, जवाहर रोजगार योजना, स्थानिक विकास कार्यक्रम इ. योजना जिल्ह्यात राबविल्या जात आहेत. १००% खेड्यांचे विद्युतीकरण झालेले आहे.
जिल्ह्यातील ३,०५८ प्राथमिक शाळांत ३,०९,७५६ विद्यार्थी व ११,९२२ शिक्षक, ६३६ माध्यमिक शाळांत २,७९,३०८ विद्यार्थी व १७,८८९ शिक्षक, १६३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये ६३,६७८ विद्यार्थी व १,२६४ शिक्षक होते (२००९-१०). सामान्य शिक्षणाची ४९ महाविद्यालये, पाच बी.एड. महाविद्यालये, दोन विधी महाविद्यालये, वैद्यकीय, आयुर्वेद व होमिओपॅथी यांचे प्रत्येकी एक महाविद्यालय, दोन अभियांत्रिकी महाविद्यालये, चार तंत्रनिकेतने, पंधरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अकरा डी. एड्. महाविद्यालये होती (२०००-०१). सातारा येथील ‘ सैनिक स्कूल’ (स्थापना १९६१) हे भारतातील सर्वांत जुन्या सैनिकी शाळांपैकी एक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय आजही सातारा येथे आहे.
महत्त्वाची स्थळे : सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. ⇨सातारा शहर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या या शहरालगत शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने इ. स. ११९० मध्ये बांधलेला ‘अजिंक्यतारा’ हा किल्ला आहे. १६७३ मध्ये शिवरायांनी या किल्ल्यावर कबजा मिळविला. शिवपुत्र छत्रपती राजाराम यांच्या कारकीर्दीत साताऱ्यास मराठेशाहीच्या राजधानीचे स्थान लाभले. येथील छत्रपती वस्तुसंग्र हालय, चार भिंती, हुतात्मा स्मारक, नटराज मंदिर इ. उल्लेखनीय आहेत. सातारा शहरापासून एक किमी. अंतरावर जुन्या सातारा–कोल्हापूर रस्त्यावर कुरणेश्वर (खिंडीतील गणपती) हे स्थान आहे. येथील ऐतिहासिक गणेश व शिवमंदिर प्रसिद्घ आहे. शहरापासून पाच किमी. कोरेगाव रस्त्यावर कृष्णा-वेण्णा यांचे संगमस्थान असलेले संगम माहुली हे ठिकाण पेशवाईतील प्रसिद्घ न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांचे जन्म स्थळ म्हणून प्रसिद्घ आहे. सातारा शहरापासून ११ किमी. सातारा–सोलापूर रस्त्यावरील त्रिपुटी येथील संतगोपालनाथ महाराजांचे समाधी मंदिर, सातारा–मेढा रस्त्यावर वेण्णा नदीवरील कण्हेर धरण, धावडशी येथील बह्मेंद्रस्वामींची समाधी व भार्गव राममंदिर, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींची समाधी इ. प्रसिद्घ ठिकाणे आहेत. याशिवाय अलीकडच्या काळात पर्यटकांचे आकर्षण बनलेले कास पठारावरील कास तलाव हे स्थळ सस.पासून १,०६६ मी. उंचीवर आहे. १८४४ मध्ये येथील तलाव बांधण्यात आला असून सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा हा प्रमुख स्रोत आहे. सातारा शहरापासून पाच किमी. अंतरावर, कास मार्गावर असलेले यवतेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्घ आहे. शहरापासून ३६ किमी.वर असलेला ठोसेघर येथील धबधबा व परिसरातील सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथेच १०० चौ.किमी. विस्ताराचे तसेच सस.पासून ९१४ मी. पेक्षा अधिक उंचीवरील चाळकेवाडी पठार आहे. पवन ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने हे आदर्श पठार असल्याने अनेक पवनचक्क्या येथे उभारल्या आहेत.
सातारा–पंढरपूर रस्त्यावर गोंदवले, पुसेगाव, म्हसवड, शिंगणापूर ही धार्मिक ठिकाणे आहेत. माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे प्रसिद्घ श्रीराम मंदिर आणि बह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. पुसेगाव हे सेवागिरी महाराजांचे समाधिस्थळ म्हणून प्रसिद्घ आहे. पुसेगावपासून जवळच येरळा नदीच्या काठावर खातगुण हे ठिकाण आहे. खातगुण येथे दरवर्षी पीर राजेवलीचा मोठा उरूस भरतो. म्हसवड येथे बाराव्या शतकातील प्रसिद्घ सिद्घनाथ मंदिर आहे. याशिवाय येथील घोंगड्यांचा व्यापार व गुरांचा बाजार प्रसिद्घ आहे. माण तालुक्यातील शिखर-शिंगणापूर येथे प्राचीन शिवमंदिर असून हे एक जागृत देवस्थान मानले जाते. खटाव तालुक्यात औंध हे ऐतिहासिक ठिकाण आहे. पूर्वीच्या औंध संस्थानची ही राजधानी होती. येथील यमाई देवीचे मंदिर आणि वस्तुसंग्र हालय विशेष प्रसिद्घ आहे. वडूज जवळील प्रसिद्घ मायणी पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. पाटण तालुक्यातील चाफळ येथील संगमरवरात बांधलेले श्रीराम मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याच तालुक्यातील कोयना धरण परिसर हे पर्यटकांचे आकर्षण आहे. कराड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथील कृष्णामाईचे मंदिर, जुन्याकाळचे दोन उंच मनोरे, मशीद तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर ही महत्त्वाची स्थळे आहेत. कराडपासून जवळच असलेल्या आगाशिव डोंगरात बौद्घकालीन लेणी आहेत. पुणे– बंगलोर महामार्गावरील काशीळपासून पश्चिमेस ५.६ किमी.अंतरावर पाल हे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. फलटण येथील श्रीराम मंदिर तसेच यादवकालीन मंदिरांचे अवशेष व महानुभाव पंथीयांची मंदिरे प्रसिद्घ आहेत. सातारा शहराच्या ईशान्येस २१ किमी. सातारा-फलटण मार्गावरील देऊर येथील अकराव्या शतकातील विठ्ठल-रुक्मिणीचे हेमाडपंती मंदिर उल्लेखनीय आहे.
वाई हे तालुक्याचे मुख्य ठिकाण व कृष्णा नदीच्या काठावर वसलेले शहर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. नदीच्या दोन्ही काठांवर अनेक मंदिरे व सुंदर घाट आहेत. येथील गणेश (महागणपती) मंदिर विशेष प्रसिद्घ आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय व केवलानंदांचे स्मारक येथे आहे. वाईच्या जवळच असलेल्या मेणवली येथील नाना फडणीसांचा वाडा, भोगाव येथील वामनपंडितांची समाधी, तर धोम येथील नृसिंह आणि शिवमंदिर तसेच कृष्णा नदीवरील धोम धरण इ. ठिकाणे प्रसिद्घ आहेत. वाईपासून उत्तरेस २२ किमी., सस. पासून १,३७५ मी. उंचीवरील मांढरदेव येथील काळूबाईचे मंदिर प्रसिद्घ आहे. येथे दरवर्षी भरणाऱ्या या जत्रेला भाविकांची प्रचंड गर्दी होते. महाबळेश्वर हे प्रसिद्घ थंड हवेचे ठिकाण आहे. येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे (पॉइंट्स) आहेत. येथे क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक ठिकाण आहे. महाबळेश्वर वरून घाटमार्गे कोकणात पोलादपूरला जाताना कुंभरोशीजवळ प्रतापगड किल्ला आहे. याच गडावर शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. गडावर भवानीमातेचे मंदिर तसेच अफझलखानाची कबर आहे. वाईपासून १३ किमी.वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण असून इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमुळे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले आहे. पाचगणी परिसरातील नैसर्गिक ठिकाणे ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. (चित्रपत्रे).
चौधरी, वसंत
“