माधव सातवळेकर यांचे व्यक्तिचित्र

सातवळेकर, माधव श्रीपाद : (१३ ऑगस्ट १९१५–१६ जानेवारी २००६). सुप्रसिद्घ महाराष्ट्रीय चित्रकार व महाराष्ट्र शासनाचे  भूतपूर्व कलासंचालक. जन्म लाहोर (पाकिस्तान) येथे. त्यांचे वडील पंडित ⇨श्रीपाद दामोदर सातवळेकर  हे सुविद्य, सुसंस्कृत, वेदाभ्यासक, देशभक्त व चित्रकार होते. संस्कारसंपन्न अशा वातावरणात माधवरावांची बालपणापासून जडणघडण झाली. चित्रकलेचा उपजत वारसाही त्यांना वडील पंडितजी व आजोबा दामोदरपंत यांच्याकडून लाभला. वयाच्या तिसऱ्या वा चौथ्या वर्षी ते आपल्या आईवडिलांबरोबर सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात आले. त्यांचे शालेय शिक्षण औंध येथेच झाले. औंधचे संस्थानिक ⇨भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी  हे स्वतः चित्रकार, चित्रसंग्रा हक, विद्या व कलांचे जाणकार आणि आश्रयदाते होते. त्यांनी औंधमध्ये उभारलेल्या कलासंग्रहालयामुळे देश-विदेशांतील दर्जेदार व वैविध्यपूर्ण चित्रे लहानपणापासूनच माधवरावांना पाहावयाला व अभ्यासावयास मिळाली. त्यातून त्यांची कलाभिरुची व कलादृष्टी विकसित झाली. ते बारा-तेरा वर्षांचे असतानाच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक (एलिमेंटरी) व माध्यमिक (इंटरमिडिएट) परीक्षा दिल्या व त्यांत त्यांना निसर्गचित्रणाचे बक्षीसही मिळाले. पुढील चित्रकलेचे रीतसर, औपचारिक शिक्षण घेण्यासाठी १९३२ मध्ये ते मुंबईत आले व चित्रकार सा. ल. हळदणकरांच्या (१८८२–१९६८) वर्गात शिकण्यासाठी दाखल झाले परंतु वारंवार उद्भवणाऱ्या आजारपणांमुळे औंधला परतू न पंडितजींकडेच सराव करू लागले. १९३४ मध्ये त्यांनी मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तत्कालीन प्राचार्य कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी माधवरावांचे चित्रकलेतील प्रावीण्य पाहून त्यांना एकदम चौथ्या वर्षाला प्रवेश दिला. १९३५ मध्ये त्यांनी रंगरेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका मिळविली. पाश्चात्त्य व भारतीय दोन्ही पद्घतींच्या चित्रकलेचे शिक्षण तेथे त्यांना मिळाले. त्याकाळी जे. जे. स्कूलमधील सर्वोच्च समजले जाणारे ‘मेयो’ पदक त्यांना मिळाले. त्यांचे वडील पंडितजी यांनाही हे पदक मिळाले होते. पिता-पुत्र दोघांनाही हा सन्मान मिळण्याची ही घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. वडिलांची चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी यूरोपला जाण्याची अपुरी राहिलेली इच्छा ही माधवरावांनी पूर्ण केली. त्यासाठी त्यांना राजेहाराजांकडून कर्जाऊ शिष्यवृत्ती, तसेच चित्रे काढून त्यांच्या मोबदल्याच्या रूपाने आर्थिक साहाय्यही लाभले. त्यांच्या यूरोपमधील वास्तव्यकाळातील तपशीलवार दैनंदिनी त्यांनी लिहिली. त्यात कलेवर केलेले भाष्य, विश्लेषण यांबरोबरच पाश्चात्त्य कलाजगताचा त्यांचा अनुभवही नोंदविला आहे. ही दैनंदिनी पुरुषार्थ  मासिकातून १९३८ मध्ये क्रमशः प्रसिद्घ झाली. तत्कालीन यूरोपीय कलाविषयक घडामोडींचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज या दृष्टीने या दैनंदिनीचे महत्त्व आहे. यूरोपमधील युद्घजन्य परिस्थितीमुळे मे, १९४० मध्ये ते भारतात परतले. यूरोपमधून परतल्यावर त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन १९४५ मध्ये मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये भरले. त्यांची अंदाजे ७०–७५ चित्रप्रदर्शने झाली असावीत. चित्रे काढण्यासाठी तसेच चित्रप्रदर्शनांसाठी त्यांनी देश-विदेशांत भरपूर भ्रमंती केली. उच्च शिक्षण घेऊन यूरोपमधून परतल्यावर तेथील शिक्षणाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्यांनी ‘इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट’ या कलाशिक्षणसंस्थेची स्थापना १९५४ मध्ये केली. या संस्थेच्या कार्यातून ‘द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूट’ची स्थापना १९६० मध्ये झाली. सतत दहा वर्षे माधवराव या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेच्या बैठका निरनिराळ्या गावी घेतल्या जात व त्यांत कलाशिक्षणविषयक धोरण ठरविले जाई. कलासंस्थांचे प्रश्न शासनापर्यंत संघटितपणे पोहोचविणे, हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. १९६२–६८ या कालावधीत ते ⇨बाँबे आर्ट सोसायटी चे अध्यक्ष होते. विविध कलासंस्थांमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांचे उत्तम प्रशासकीय कौशल्य दिसून आले.

महाराष्ट्र राज्य शासनाचे कलासंचालक म्हणून माधवरावांची १९६९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. १९७५ पर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला. या सहा वर्षांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. कलाशिक्षणाचा सुधारित अभ्यासक्रम तातडीने अंमलात आणण्याची जबाबदारी माधवरावांवर येऊन पडली. हा अभ्यासक्रम जर्मनीतील ⇨बौहाउस  या कलाशिक्षणसंस्थेच्या शिक्षणक्रमाच्या धर्तीवर आखलेला होता. महाराष्ट्रात सरकारमान्य असलेल्या चाळीस खाजगी संस्थांतून हा शिक्षणक्रम त्वरित राबवावयाचा असल्याने, कलासंचालकांच्या अखत्यारीत या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये व महत्त्व विशद करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत चौफेर प्रयत्न करण्यात आले. कलेचा इतिहास  व मूलभूत अभ्यासक्रम  अशी दोन पुस्तकेही आपल्या देखरेखीखाली त्यांनी तयार केली. पूर्वापार चालत आलेल्या राज्य कलाप्रदर्शनांच्या योजनेचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. राज्य -चित्रकलाप्रदर्शने केवळ एकाच जागी न भरवता, जेथे जेथे कलाविद्यालये (आर्ट स्कूल) आहेत, त्या त्या ठिकाणी ती नेण्यात येऊ लागली. वास्तवदर्शी कलाप्रकारांना महत्त्व देण्यात आले. राज्यप्रदर्शनांतून शासनाने चित्रे विकत घेण्याची पद्घत सुरू केली. कलेचा व्यापक दृष्टिकोण व समग्र विचार सातत्याने मनाशी बाळगून माधवरावांनी कलेच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन आपल्या योजनांची चौफेर आखणी व अंमलबजावणी केली. यांखेरीज १९७२ मध्ये औरंगाबाद येथे शासकीय कलाविद्यालय त्यांच्या कारकीर्दीत सुरू करण्यात आले.

चित्रकार म्हणूनही माधवरावांची कारकीर्द भारतीय कलेतिहासात महत्त्वपूर्ण व संस्मरणीय ठरली. व्यक्तिचित्रे, आलंकारिक रचनाचित्रे, निसर्गचित्रे, नग्नाकृतिचित्रे तसेच काही युद्घचित्रे अशा विविध प्रकारांत त्यांनी विपुल चित्रनिर्मिती केली. देश-परदेशांतील आपल्या भ्रमंतीत त्यांनी अगणित रेखांकने (स्केचेस) केली. त्यांत विषय व शैलीदृष्ट्या कमालीचे वैविध्य आढळते. रेखांकन नेमके व पक्के, रेषा ओघवती व आकारांची सुलभता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांच्या सर्वच चित्रांमधून ते दृश्यात्मक सौंदर्य प्रभावीपणे व्यक्त करतात. रंग, रेषा, आकार, पोत (टेक्स्चर), रचना यांचा मनोहर खेळ त्यांतून अभिव्यक्त होतो. सर्वच चित्रांतील रेखांकनात अचूकता, लालित्य व सौष्ठव दिसून येते. भरपूर सरावाने कमावलेले रेखनकौशल्य व सततच्या रियाजाने लखलखीत ठेवलेले तांत्रिक कसब यांचे उच्च प्रतीचे दर्शन त्यांच्या चित्रकलेत घडते. तेजस्वी रंग, पोताचे वैविध्य व सर्वत्र वेढून राहिलेल्या रम्य रेषेचे अनेकविध विभ्रम ही त्यांच्या कलेची खासियत म्हणता येईल. त्यांच्या चित्रांतून प्रकर्षाने दिसणारी निळी रेषा प्रथमतः लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या व्यक्तिचित्रात (१९४०) उमटली. ब्रिटिश प्रभावाखालील पाश्चात्त्य व्यक्तिचित्रणशैली त्यांनी उत्तम रीत्या आत्मसात करून त्यावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला. ⇨पॉल गोगँ, ⇨आंरी  मातीस  या चित्रकारांच्या उमेदवारी काळातील प्रभावातूनही त्यांची स्वतंत्र चित्रशैली घडत गेली. यूरोपमधील उच्च शिक्षणामुळे त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्य संस्कार झाले खरे पण त्यांच्या चित्रांचे विषय व प्रेरणा अस्सल भारतीयच राहिल्या. भारतीय चित्रकलेतील रेषात्मकता, तेजस्वी व लखलखीत रंग हे त्यांच्या शैलीचे अविभाज्य घटक होत. विषय व शैली यांतील अस्सल भारतीयत्वाची मुळे त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत शोधता येतात. आपल्या अंतःप्रेरणांशी प्रामाणिक राहून ते अविचल निष्ठेने व स्थिर वृत्तीने अखेरपर्यंत पारंपरिक वळणाची दर्जेदार निर्मिती करीत राहिले. आधुनिकतेच्या वा प्रायोगिकतेच्या नव्या लाटेला ते कधी शरण गेले नाहीत. काही जाणकारांच्या मते हीच त्यांची मर्यादा ठरली. त्यांनी चित्रकलेवर अनेक व्याख्याने दिली, नियतकालिकांतून लेख लिहिले. कलांचा मर्मज्ञ भाष्यकार ही त्यांची भूमिका त्यातून स्पष्ट होते. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा त्यांच्या स्टुडिओला बसला व त्यात त्यांची अनेक चित्रे दुर्दैवाने नष्ट होऊन अपरिमित नुकसान झाले.

अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. (चित्रपत्र).

संदर्भ : बहुळकर, साधना, चित्रायन, मुंबई, २००५.

बहुळकर, साधना

' जैसलमीर व्हिलेज ', तैलरंगचित्र.' गॉसिप ', तैलरंगचित्र.