सांद, झॉर्झ : (१ जुलै १८०४–८ जून १८७६). फ्रेंच कांदबरीकर्त्री. मूळ नाव आमांदीन-ऑरॉर-ल्यूसील द्यूपँ (मादाम द्यूदव्हाँ). झॉर्झ सांद हे तिने घेतलेले टोपण नाव. तिचा जन्म उमराव घराण्यात पॅरिस येथे झाला. वडिलांचे नाव मॉरिस द्यूपँ व आई सॉफी देलबोर्द. ती लहान असतानाच तिचे वडील वारले. तिचे बालपण फ्रान्समधील बेरी ह्या प्रदेशातील नोहां ह्या तिच्या आजीच्या गावी गेले. आई व आजीने तिचे संगोपन केले. वयाच्या चौदाव्या वर्षी ती पॅरिसमधल्या एका ख्रिस्ती मठात दाखल झाली होती. तेथे तिची वृत्ती गूढवादाकडे झुकली. त्यातून तिने बाहेर पडावे, म्हणून तिच्या आजीने तिला नोहां येथे परत बोलाविले. तेथील निसर्गाने तिचे मन भारुन टाकले. निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास तिने केला. तत्त्वचिंतनात्मक स्वरूपाचे वाचन केले. फ्रेंच साहित्यातील स्वच्छंदतावादाचा जनक ⇨ फ्रांस्वा रने द शातोब्रीआं हा तिचा विशेष आवडता लेखक. नोहां येथील तिच्या एका शिक्षकाच्या प्रभावातून ती पुरुषी कपडे घालून घोड्यावरून रपेट करी. मुक्त व स्वच्छंद जीवन तिला आवडू लागले. आजीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती वारसाहक्काने तिला मिळाली. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तिने काझीमीर (बॅरन) द्यूदव्हाँ ह्याच्याशी विवाह केला (१८२२). सुमारे आठ वर्षे तिने वैवाहिक जीवन उपभोगले.
सांदच्या कादंबऱ्यांवर तिच्या वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव अपरिहार्यपणे पडलेला आहे. पॅरिसच्या मठातल्या वास्तव्यात गूढवादाकडे झुकलेले तिचे मन त्या प्रभावापासून आयुष्यभर मुक्त होऊ शकले नाही. तिच्या आरंभीच्या कादंबऱ्या या उत्कट प्रेमाच्या असून आदर्श प्रेम आणि त्याच्याशी सुसंगत असा परिपूर्ण पुरुष शोधण्यातून तिच्या वाट्याला आलेल्या व्यथावेदनांची तीव्रता कमी करण्याचा तिचा हेतू त्यांतून जाणवतो. तिच्या इंदिआना, व्हॅलँटाइन (१८३२) ह्या कादंबऱ्या ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. स्वभावतःच स्वातंत्र्यप्रेमी असलेली सांद स्त्रीमुक्तिवादी विचारांनी काहीशी प्रभावित झालेली होती पण तिला अभिप्रेत असलेली स्त्री-पुरुषसमानताही प्रेमाच्या संदर्भातली होती. आपली प्रिय व्यक्ती निवडण्याचे स्वातंत्र्य पुरुषाइतकेच स्त्रीलाही असले पाहिजे, अशी तिची धारणा होती. स्त्रियांच्या राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार तिने कधी केला नाही. सर्वसामान्य लोकांच्या साध्यासुध्या वर्तनाची आणि सद्गुणांची प्रशंसा तिच्या कादंबऱ्यातून अनेकदा आढळते. मानव हा जन्मतः चांगलाच असतो पण सत्प्रवृत्त असलेला मनुष्य जसजशी संस्कृती निर्माण करू लागला, तसतसा तो बदलत चालला. सदोष सामाजिक-सांस्कृतिक संस्थांनी त्याला अधोगतीला नेले, ह्या रूसोच्या विचाराशी मिळतेजुळते असे तिचे विचार होते. बेरी ह्या तिच्या मूळ प्रदेशातील कामगार व शेतकरी ह्यांच्या व्यक्तिरेखा तिने तिच्या कादंबऱ्यातून साकारल्या. ला मार ओ दियाब्ल (१८४६, इं. भा. द हाँटेड पूल, १८९०), फ्रांसिस द वेफ (१८५०, इं. भा. १८८९), ले मॅत्र सॉनर (१८५२, इं. शी. ‘मास्टर म्यूझिशिअन्स’’) ह्या ग्रामीण कादंबऱ्या ह्या संदर्भात निर्देशिता येतील. फ्रेंचमधील प्रादेशिक कादंबरीचे जनकत्व तिला दिले जाते. कादंबऱ्यांबरोबरच तिने नाटके व मुलांसाठी काही कथा लिहिल्या. ‘स्टोरी ऑफ माय लाइफ’ (१८५४-५५, इं. शी.) हे तिचे आत्मचरित्र असून ‘टेल्स ऑफ ए ग्रँडमदर’ (१८७३, इं. शी.) हा तिने नातवंडांसाठी लिहिलेला कथासंग्रह होय. तिचे संपूर्ण लेखन १०५ खंडांत (१८६२–१९२६) संकलित करण्यात आले आहे.
संदर्भ : 1. Barry, Joseph, The famous Woman : The Life of George Sand, 1977.
2. Cate, Curtis, George Sand, 1975.
3. Jordon, Ruth, George Sand, 1976.
4. Maurois, Andre, Lelia : The Life of George Sand, 1977.
कुलकर्णी, अ. र.