सांत्यागो दे लोस काबायेरोस : डोमिनिकन प्रजासत्ताकातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व सांत्यागो प्रांताची राजधानी. लोकसंख्या ६,२२,१०१ (२००२). देशाच्या उत्तरमध्य भागातील व्हेल देल सीबाऊ या सुपीक खोऱ्यातील याके देल नॉर्ते नदीकाठी हे वसले आहे. अटलांटिक किनाऱ्यावरील प्वेर्तो प्लाता या देशातील प्रमुख बंदराच्या दक्षिणेस सु. ५६ किमी. वर हे शहर आहे. काहींच्या मते त्याची स्थापना क्रिस्तोफर कोलंबसने १४९४ मध्ये केली तर काही तज्ज्ञ क्रिस्तोफरचा भाऊ बार्थोलोम्यू याने १४९५ मध्ये याची स्थापना केल्याचे मानतात. यूरोपियनांच्या अमेरिकेतील सर्वांत पहिल्या वसाहतींपैकी ही एक आहे. सेंट जेम्स (सांत्यागो) संप्रदायातील सु. ३० स्पॅनिश काबायेरोसांनी (सभ्य गृहस्थांनी) इ. स. १५०४ मध्ये ला इझाबेलातून सांत्यागोला प्रस्थान ठेवले, म्हणून त्याचे नाव सांत्यागो दे लोस काबायेरोस झाले. १५६२ मधील भूकंपाने या नगराचा विध्वंस झाला, तेव्हा मूळ शहराच्या जवळ निबाजे ओढा याके नदीला जेथे मिळतो, तेथे नवीन शहर वसविण्यात आले. अद्याप सान फ्रान्सिस्को दे जॅकॅग्वा जिल्ह्यात जुन्या शहराचे अवशेष आढळतात. त्यानंतरही शहराने अनेक भूकंपाचे धक्के सहन केले. भूकंपाचे धक्के, आगी, दंगेधोपे इ. संकटांतूनही या शहराने आपले अस्तित्व टिकवून ठेवले असून आज ते देशातील दुसऱ्याक्रमांकाचे शहर बनले आहे. १८४४ मधील डोमिनिकन प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्ययुद्घाची ही मुख्य भूमी होती.

शहराच्या परिसरात तंबाखू, भात, ऊस, कापूस, काकाओ, कॉफी, उष्णकटिबंधीय फळे इ.कृषी उत्पादने होत असून त्या उत्पादनांवरील प्रक्रिया, त्यांचे वितरण व त्यांच्या बाजारपेठेचे हे एक प्रमुख केंद्र आहे. शहरात सिगारेटी, मद्य, फर्निचर, साबण, औषधे, मेण, चामड्याच्या वस्तू इ. च्या निर्मितीचे छोटे उद्योग चालतात. रस्ते व लोहमार्ग वाहतुकीचे हे देशातील प्रमुख केंद्र आहे. शहराचा परिसर हा देशातील दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. शहरात सान लूईस किल्ला, युनिव्हर्सिटी ऑफ द कॅथलिक मदर अँड टीचर (१९६२), तंत्रविद्या विद्यापीठ (१९७४), अनेक राजप्रासाद, सांत्यागो एल् मेयर कॅथीड्रल, नगर उद्यान इ. उल्लेखनीय आहेत.

देशपांडे, सु. र.