पेट्रोझाव्होट्स्क : यूरोपीय रशियाच्या वायव्य भागातील कारेलिया प्रजासत्ताकाची राजधानी, ओनेगा सरोवरावरील बंदर व मुरमान्स्क-लेनिनग्राड लोहमार्गावरील महत्त्वाचे प्रस्थानक. लोकसंख्या २.२० लक्ष (१९७७). ते लेनिनग्राडच्या ईशान्येस २९८ किमी. आहे. मध्ययुगात नॉव्हगरॉडियन लोक पेट्रोझाव्होट्स्कच्या आसमंतात लोहखनिजाचा खाणव्यवसाय करीत असत. पेट्रोझाव्होट्स्कचा अर्थ ‘पीटरचा कारखाना’ असा असून शहराची स्थापना पीटर द ग्रेटने १७०३ मध्ये केली. सेंट पीटर्झबर्ग या आपल्या नव्या राजधानीला दारूगोळ्याचा पुरवठा व्हावा म्हणून पीटरने पेट्रोझाव्होट्स्कमध्ये एक लोखंडाचा कारखाना उभारला होता. दुसऱ्या महायुद्धकाळात, १९४० मध्ये येथे रशियाचा लष्करी तळ होता, तर १९४१-४४ यांदरम्यान हे शहर फिनिश व नाझी सैन्यांच्या ताब्यात होते. त्या वेळी शहराचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर मात्र त्याचे वेगाने पुनरुज्जीवन करण्यात आले. शहरात लाकूडकाम, कागद, अवजड यंत्रे व त्यांचे सुटे भाग, उच्च प्रतीचे पोलाद, खाद्यान्ने, मच्छीमारी बोटी, घसरजोडे, सेल्यूलोज इत्यादींचे निर्मितिउद्योग असून विद्यापीठ, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, इतर उच्च शिक्षणसंस्था, सोव्हिएट विज्ञान अकादमीची शाखा इ. शैक्षणिक सोयी आहेत. शहरात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालयही आहे.

लिमये, दि. ह.