फरीदपूर : (१) बांगला देशातील डाक्का प्रशासकीय विभागातील फरीदपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २८,३३३ (१९७१ अंदाज). हे पद्मा नदीच्या उजव्या बाजूस वसले असून कुश्तिया आणि जेसोर यांच्याशी सडकांनी जोडलेले आहे. तसेच ग्वालंदो घाट-कलकत्ता या रेल्वे फाट्यावरील ते अंतिम स्थानक आहे.

फरीदुद्दीन मसूद या मुस्लिम अवलियाच्या नावावरूनच शहरास हे नाव पडले असून येथे त्याची कबरही आहे. शहरात नगरपालिका (स्थापना १८६९) असून औष्णिक वीजकेंद्र, तागगिरण्या आणि डाक्का विद्यापीठाशी संलग्न असलेली पाच शासकीय महाविद्यालये आहेत.

(२) उत्तर प्रदेश राज्याच्या बरेली जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १७,९५५ (१९७१). हे बरेलीच्या आग्नेयीस सु. २० किमी. असून लखनौ-बरेली राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ आहे. पूर्वी ‘पूरा’ या नावाने ओळखले जाणारे हे शहर बरेलीहून हद्दपार केलेल्या कठेरिया राजपुताने १६५७-७९ च्या दरम्यान केव्हातरी वसविले, असे म्हणतात. शेख फरीद या मुस्लिम साधुपुरुषाच्या नावावरून किंवा त्याच नावाच्या एका सुभेदाराने रोहिला-अंमलात (१७४८-७४) येथे किल्ला बांधला म्हणूनही फरीदपूर हे नाव पडले असावे. येथे अमेरिकन मेथडिस्ट मिशनची एक शाखा व अनेक मशिदी, दर्गे तसेच हिंदू मंदिरे आहेत. शहराच्या आसमंतात भुईमूग, बटाटे, ऊस इ. महत्त्वाची पिके आढळतात.

कापडी, सुलभा.