सांत्यागो दे कॉम्पोस्तेला : स्पेनमधील ख्रिस्ती धर्मीयांचे एक पवित्र स्थळ. लोकसंख्या ९५,०९२ (२००९). वायव्य स्पेनमधील गॅलिशिया प्रदेशात सार आणि सारले नद्यांच्या संगमाजवळ हे शहर वसले आहे. शहर लहानलहान टेकड्यांनी वेढलेले आहे. ला कऱ्यून्या शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५१ किमी., तर अटलांटिक किनाऱ्यापासून आत सु. २५ किमी. वर हे शहर आहे. सेंट जेम्स या ख्रिस्ती संताच्या नावाचे सांत्यागो हे स्पॅनिश रूप होय. या संताचे स्मृतिस्थळ म्हणून ते नावलौकिकास आले. इ. स. ४४ मध्ये जेरुसलेम येथे धर्मप्रचारार्थ असताना सेंट जेम्स द ग्रेट याने स्वमतार्थ प्राणार्पण केले. पुढे ख्रिस्ती परंपरा, वदंता आणि एका दंतकथेनुसार त्याचा मृतदेह एका बोटीत सोडण्यात आला. ती बोट प्रवाहाधीन होऊन गॅलिशियाच्या किनाऱ्याला लागली. तिथे त्याच्या अस्थींचे दफन करण्यात आले कारण त्यावेळी अशी वदंता होती की, जेम्स याने स्पेनमध्ये धर्मप्रचाराचे कार्य केले होते. पुढे इ. स. ८१३ मध्ये आश्चर्यकारक रीत्या त्याचे थडगे या ठिकाणी उपलब्ध झाले. त्या सुमारास स्पॅनिश ख्रिश्चन व मूर यांच्यात सतत युद्घे होत. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांना एकत्र आणण्यासाठी हे निमित्त मिळाले. शहराची वाढ या थडग्याभोवती होऊन त्यास सांत्यागो हे नाव देण्यात आले. ऑस्ट्रियाचा राजा दुसरा आफांसो याने या थडग्याच्या जागेवर मृत्तिकामय चर्च बांधले. तिसऱ्या आफांसो राजाने दगडी बांधकाम करून ती वास्तू अधिक आकर्षक केली. कॉर्दोव्हा येथील उमय्या खिलाफतीच्या अबू अमीर अल्-मन्सूर (आलमांझोर) या लष्करी अधिपतीने इ. स. ९९७ मध्ये हे नगर उद्ध्वस्त केले मात्र या चर्चला हात लावला नाही. सहावा आफांसो या राजाच्या आदेशानुसार इ. स. १०७८ मध्ये विद्यमान कॅथीड्रलच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला. ही रोमनेस्क वास्तू इ. स. १२११ मध्ये पूर्ण झाली. पुढे मध्ययुगात तीत अनेक कलात्मक बदल व सुधारणा करण्यात आल्या. प्लाझा मेयर या प्रमुख चौकाकडे या वास्तूचे प्रमुख प्रवेशद्वार असून आतील बाजूस पोर्तिको द ला ग्लोरिया (दर्शनी ओसरी किंवा ढेलज) यावर अखेरच्या निवाड्यातील (लास्ट जज्मेंट) दृश्ये कोरली आहेत. हे अपोत्थित उत्कृष्ट शिल्पकाम मॅएस्तो मॅतिओ या मध्ययुगीन प्रसिद्घ शिल्पज्ञाने केलेले असून त्यासाठी गॅलिशियन ग्रॅनाइट हा दगड वापरला आहे. या रोमनेस्क वास्तुशिल्पात गॉथिक कलेच्याही काही छटा दिसतात. या प्रमुख कॅथीड्रलव्यतिरिक्त शहरात तेराव्या शतकातील ॲसीसीचा सेंट फ्रान्सिन्स याच्या नावाचा ‘सान फ्रान्सिस्को मठ’ आणि ‘सांता मारिया सॅलोम चर्च’ व ‘कॉलेजिएट चर्च ऑफ सांता मारिया’ या वास्तू आहेत. यांशिवाय शहरात लहानमोठी सु. ४० चर्च, ख्रिस्ती मठ, पाठशाळा व रुग्णालये आहेत. मध्ययुगीन काळात ख्रिश्चनांचे पवित्र स्थळ म्हणून जेरूसलेम व रोम खालोखाल या स्थळाला महत्त्व होते, ते अद्याप टिकून आहे.
शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. शहरात चांदीच्या व लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंचे उत्पादन होते. याशिवाय तलम कापड, मद्य, कागद, फर्निचर, काड्यापेट्या, साबण, औषधे, टायर, चामड्याच्या वस्तू इत्यादींच्या निर्मितीचे छोटे कारखाने आहेत. शहरातील एक विद्यापीठ (स्था. १५३२) तसेच सान जेरोनिमो (१५०१), फॉन्सेका (१५३०) आणि सान क्लेमेन्ते (१६०१) ही मध्ययुगीन महाविद्यालये ख्रिस्ती धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी प्रसिद्घ आहेत. येथील सान मार्तीन पिनॅदिओची मोनॅस्टरी (मठ) दहाव्या शतकातील असून सध्या तेथे रोमन कॅथलिक पाठशाळा आहे.
देशपांडे, सु. र.