सांकाश्य : संकिश-वसंतपुर. उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन बौद्घ तीर्थक्षेत्र. ते कनौजच्या वायव्येस सु. ७३ किमी. व फतेगढच्या पश्चिमेस ३७ किमी.वर फरूखाबाद जिल्ह्यात, काळी (इक्षुमती) नदीकाठी वसले आहे. संकिशा (सा), कपिथा, सकसपुर इ. भिन्न नावांनीही त्याचा पाली बौद्घ ग्रंथांत उल्लेख आढळतो. रामायण महाकाव्यात या नगरीमध्ये कुशध्वज हा जनक राजाचा भाऊ राज्य करीत होता असा उल्लेख आहे. या स्थळाला चिनी प्रवासी फाहियान आणि ह्यूएनत्संग यांनी भेट दिली होती. त्यांनी लिहिलेल्या प्रवासवृत्तांतांत येथील वास्तू व वस्ती यांविषयी माहिती मिळते. भगवान बुद्घ त्रयास्त्रिंश नावाच्या स्वर्गातून पृथ्वीवर सांकाश्य येथे अवतरले, अशी परंपरागत समजूत आहे. यामुळे येथे बौद्घ धर्मीय राजांनी व धनिकांनी अनेक बौद्घ विहार, चैत्य, स्तूप इ. वास्तू बांधल्या होत्या पण सद्यःस्थितीत त्यांचे फारच थोडे अवशेष भग्नावस्थेत दृष्टोत्पत्तीस येतात. सम्राट अशोकाने सांकाश्य येथे एक स्तंभ उभारला होता, पण त्याचा गजमुखी शिरोभाग फक्त अवशिष्ट आहे. येथे विसहरी देवीचे एक मंदिर सुस्थितीत आहे. जैन धर्मीय लोकही या स्थळाला तीर्थक्षेत्र मानतात. त्यांच्या मते विमलनाथ ह्या तेराव्या तीर्थंकरांना सांकाश्य येथे केवलज्ञान प्राप्त झाले होते त्यामुळे हे जैन धर्माचे भरभराटीचे-समृद्घीचे क्षेत्र मानले जाते.
देशपांडे, सु. र.