साऊँ पाउलू : ब्राझीलमधील साऊँ पाउलू राजधानीचे ठिकाण आणि देशातील अग्रेसर औद्योगिक केंद्र. दक्षिण अमेरिका व ब्राझीलमधील हे सर्वांत मोठे शहर असून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी हे एक आहे. ब्राझीलच्या आग्नेय भागात वसलेले हे शहर रीओ दे जानेरोपासून नैर्ऋत्येस ३५० किमी.वर तर अटलांटिक किनाऱ्यावरील सँतुस बंदरापासून ४८ किमी. आत आहे. लोकसंख्या ७,८५,६४० महानगरीय १,७८,३३,७५७ (२०००). हे शहर ब्राझीलियन उच्चभूमीच्या कडेवर असणाऱ्या सेरा दू मार या टेकड्यायुक्त पठारी प्रदेशात सस.पासून ८२० मी. उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे मकरवृत्तावर असूनही अन्य ठिकाणांच्या तुलनेत येथील हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. वार्षिक सरासरी तापमान १९० से. असले तरी हिवाळ्यात गोठणबिंदूपर्यंत तर उन्हाळ्यात ३०० से. पर्यंत अशी येथील तापमानात तफावत आढळते. सेरा द कँटँरेइराकडून येणाऱ्या मंद वाऱ्यांमुळे येथील हवामान मध्यम स्वरू पाचे राहते. टिएटे व पिन्हेइरॉस नद्यांचे छोटे प्रवाह शहराच्या मधून वाहतात.
पोर्तुगीज जेझुइट धर्मप्रचारकांनी २५ जानेवारी १५५४ रोजी या जागी एक लहानशी वसाहत स्थापन केली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत ही वसाहत लहानच होती. पोर्तुगीज शाही घराण्यातील दों पेद्रू यांनी १८२२ मध्ये पोर्तुगालपासून ब्राझीलला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीचे हे मुख्य केंद्र म्हणून निवडले होते. अधिक उंची व थंड हवामान यांबरोबरच सधन भांडवल पुरवठादार यांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात देशाच्या अंतर्गत भागात कॉफी मळ्यांचा विस्तार होत गेला. त्यामुळे साऊँ पाउलू शहरात कॉफीवरील प्रक्रियाउद्योग भरभराटीस आला. कॉफी मळ्यांत काम करण्यासाठी यूरोप व आशियाई देशांतून फार मोठ्या संख्येने लोक येथे आले. त्यांतील बहुसंख्य साऊँ पाउलू शहराकडे वळले. इ. स. १८९० मध्ये साऊँ पाउलू हे कॉफीच्या व्यापाराचे अगेसर केंद्र बनले. परदेशातून आलेल्या बहुतांश लोकांनाही या उद्योगांत सामावून घेतले गेले.
साऊँ पाउलूची अर्थव्यवस्था विविधांगी असून अलीकडे तिची वाढ सेवा व्यवसाय आधारित दिशेने होत आहे. वस्त्रनिर्माण, उपभोग्य वस्तू, यांत्रिक व विद्युत् साहित्य, मोटारगाड्यानिर्मिती, वाहतूक सामगी, फर्निचर, रसायने, औषधनिर्मिती, कागद, कृत्रिम रबर, सिमेंट, प्लॅस्टिक, खाद्यपदार्थ, तंबाखू उत्पादने इ. उद्योग शहरात चालतात. लगतच्या कुबाताऊँ व कॅपुआव्हा येथे तेलशुद्घीकरण कारखाने तर, तौबाते येथे अवजड धातुकर्म उद्योग आहेत. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनांपैकी जवळजवळ निम्मे उत्पादन साऊँ पाउलू शहर व परिसरातून मिळते. शहरात घाऊक व किरकोळ तसेच कृषी मालाचा मोठा व्यापार चालतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बँक व्यवसायाचे हे प्रमुख केंद्र आहे. ब्राझीलमधील सर्वांत महत्त्वाच्या तीन लोहमार्गांवरील हे एक प्रमुख प्रस्थानक असून सँतुस बंदराशी ते रस्ते व लोहमार्गांनी तर इतर राज्यांशी महामार्गांनी जोडलेले आहे. काँगॉनहस, कंबिका व व्हिराकोपोस हे येथील गजबजलेले विमानतळ आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण महानगराची वेगाने अनियंत्रित वाढ होत गेल्याने १८८९ मध्ये शहराची नियोजनबद्घ रचना करण्यात आली व शहराच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात आले परंतु सातत्याने परदेशातून तसेच देशाच्या इतर भागांतून मोठ्या संख्येने लोक येत राहिल्याने पाणीपुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट, वीज इ. सार्वजनिक सेवा मागणीच्या तुलनेत फारच कमी पडू लागल्या असून वाहतुकीची कोंडी, प्रचंड गुन्हेगारी, प्रदूषण, दारिद्र्य इ. स्वरूपाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरातील बरेच लोक झोपड्यांमध्ये राहतात.
साऊँ पाउलू युनिव्हर्सिटी (स्था. १९३४) हे देशातील सर्वांत मोठे विद्यापीठ तसेच विविध अभ्यास शाखांची अनेक महाविद्यालये येथे आहेत. सर्प व प्रतिविषविषयक संशोधनासाठी जगप्रसिद्घ बुटांटा संस्था येथे आहे. शहरात मोठी ग्रंथालये, रंगमंदिरे व वस्तुसंगहालये आहेत. अजूनही काही जुन्या चर्चच्या इमारती येथे आढळतात. शहरात अनेक उद्याने असून आयबिराप्वेरा उद्यान सुंदर आहे. सँतो आमारो सरोवरप्रदेश आकर्षक स्थळ म्हणून प्रसिद्घ आहे.
चौधरी, वसंत
“