ऑलिंपिया – १ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वायव्येकडील वॉशिंग्टन राज्याची राजधानी. लोकसंख्या २३,१११ (१९७०) पॅसिफिकच्या ‘प्यूजित साउंड’ फाट्याच्या दक्षिण टोकाशी, डेश्यूट नदीच्या मुखाशी वसलेले हे शहर सीॲटलच्या नैर्ऋत्येस ९६ किमी. आहे. उत्तरेकडे ऑलिंपिक पर्वत व पूर्वेस कॅस्केड पर्वतरांगा असल्याने जंगलपदार्थ तसेच प्यूजित साउंडमुळे मत्स्योद्योग यांकरिता ऑलिंपिया प्रसिद्ध आहे. जहाजबांधणी, लाकूडकाम, प्लायवूड, फर्निचर, पदार्थ डबाबंद करणे, धातुकाम, शेतीची अवजारे बनविणे हे येथील प्रमुख उद्येग असून लाकूड व मासळी यांची निर्यात येथून मोठ्या प्रमाणावर होते. त्यातही ऑइस्टर मासे हे येथील वैशिष्ट्य होय. येथून जवळच आग्नेयीस मौंट रेनिअर हे कॅस्केडचे सर्वोच्च शिखर (४,३९२ मी.) आहे. रेनिअर राष्ट्रीय उद्यान आणि ऑलिंपिक राष्टीय उद्यान यांसाठी ऑलिंपियामध्ये प्रवाशांची वर्दळ असते.

शाह, र. रू.