साउदी, रॉबर्ट : (१२ ऑगस्ट १७७४–२१ मार्च १८४३). इंग्रज कवी. जन्म ब्रिस्टल, ग्लुस्टेशर येथे. त्याचे बरेचसे बालपण बाथ येथे आपल्या आत्याच्या घरी गेले. लंडनच्या वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये त्याने आरंभीचे शिक्षण घेतले. तेथे असतानाच तो लेखन करू लागला तथापि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फटक्यांच्या शिक्षेविरुद्घ शाळेच्या मासिकात त्याने लेख लिहून टीका केल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर ऑक्सफर्डच्या बॅलिअल महाविद्यालयामध्ये तो दाखल झाला पण पदवी न मिळविताच त्याने महाविद्यालय सोडले. त्याचा स्वभाव बंडखोर होता त्यातच फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रभावही त्याच्यावर पडला. ह्याच प्रभावातूनत्याने फ्रेंच क्रांतीकारकांबद्दल सहानुभूती प्रकट करण्यासाठी जोन ऑफ आर्क ही दीर्घ कविता लिहिली (प्रकाशित १७९६). पुढे विख्यात स्वच्छंदतावादी कवी ⇨ सॅम्युएल टेलर कोलरिज ह्याच्याशी त्याची मैत्री झाली. त्या दोघांनी मिळून द फॉल ऑफ रॉबेस्पेअर (१७९४) ही कविता लिहिली (रॉबेस्पेअर हा फ्रेंच राज्यक्रांतीतला एक जहाल क्रांतीकारक नेता होता). बॅलिअल महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर त्याने कोलरिजच्या ‘पँटिसोकसी’ ह्या प्रकल्पात लक्ष घातले (अमेरिकेतील सस्क्वहॅना नदीच्या काठी एक आदर्श कृषक समाजजीवन निर्माण करण्याचा हा प्रकल्प होता) पण साउदीचा या प्रकल्पाबाबतचा उत्साह कमी झाला. ह्याच कारणास्तव कोलरिज आणि साउदी ह्यांच्या स्नेहसंबंधात काही काळ तणावही निर्माण झाले होते.
१७९५ साली साउदी त्याच्या काकाबरोबर पोर्तुगालला गेला. स्पेनमध्येही तो अल्पकाळ होता. तेथे त्याने लिहिलेली पत्रे लेटर्स रिटन ड्युरिंग ए शॉर्ट रेसिडन्स इन स्पेन अँड पोर्तुगाल (१७९७) ह्या नावाने प्रसिद्घ झाली. स्पेन आणि पोर्तुगाल ह्या देशांतल्या वास्तव्यात त्याने ह्या दोन देशांचा अभ्यास केला. ह्या काळात त्याचे क्रांतिकारक विचार मागे पडले आणि तो टोरींच्या विचाराकडे झुकू लागला. १८०३ मध्ये तो केस्विक येथील ग्रेटा हॉल या ठिकाणी राहावयास गेला आणि अखेरपर्यंत तेथेच राहिला. ⇨विल्यम वर्ड्स्वर्थबरोबरीची मैत्री येथेच सुरु झाली. तसेच त्याने आता आपला चरितार्थ लेखनावर चालविण्याचे ठरविले. त्याची बरीचशी उत्तम काव्यरचना ह्या निर्णयानंतर झाली. नियतकालिकांसाठीही त्याने लेखन केले. भाषांतरे केली. इंग्रज कवी ⇨टॉमस चॅटरटन च्या ग्रंथांचे संपादन केले. टोरी पक्षाच्या क्वार्टर्ली रिव्ह्यूसाठी त्याने राजकीय विषयांवर ९५ लेखही लिहिले. पोर्तुगालचा इतिहास त्याने लिहावयास घेतला होता पण तो हा इतिहास कधीच पूर्ण करु शकला नाही, मात्र हिस्टरी ऑफ ब्राझील (३ खंड, १८१०-१९) हा इतिहासग्रंथ प्रसिद्घ होऊ शकला. इतिहासाबरोबरच काही चरित्रग्रंथही त्याने लिहिले. त्याच्या द लाइफ ऑफ नेल्सन (१८१३) ह्या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि आजही एक अभिजात साहित्यकृती म्हणून तो ओळखला जातो. लाइफ ऑफ वेस्ली अँड द राइज अँड प्रोगेस ऑफ मेथडिझम (१८२०) हा त्याचा चरित्रग्रंथही उल्लेखनीय आहे.
इंग्लंडचा राजकवी म्हणून १८१३ मध्ये त्याची नेणूक झाली होती तथापि त्याच्या काही भावकविता आणि बॅलड वगळता त्याची कविता फारशी वाचली जात नाही पण त्याची गद्यशैली मात्र सहजता आणि स्पष्टता ह्या गुणांमुळे उत्कृष्ट मानली गेलेली आहे. त्याच्या उपर्युक्त चरित्रग्रंथांतून तसेच लेटर्स फ्रॉम इंग्लंड : बाय डॉन मान्वेल अल्व्हारेझ एस्प्रिएला (१८०७), द डॉक्टर (७ खंड, १८३४–४७) ह्यांसारख्या ग्रंथांतूनही ती दिसून येते. लेटर्स फ्रॉम इंग्लंड … … मध्ये त्याने एका काल्पनिक स्पॅनिश माणसाची एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळाची काही निरीक्षणे नोंदविलेली आहेत. तो इंग्लंडमधून ही पत्रे लिहीत आहे, अशी कल्पना या पत्रांमागे आहे. द डॉक्टर चे स्वरूप संकीर्ण स्वरूपाचे असून त्यात निरनिराळ्या विषयांवर भाष्ये, उद्धृते आणि दंतकथा आहेत. त्याने शेलाबा द डिस्ट्रॉयर (१८०१) आणि कर्स ऑफ केहामा ही दीर्घकाव्येही लिहिली पण ती फारशी यशस्वी ठरली नाहीत. इंग्रजी साहित्यातील पहिल्या पिढीतला स्वच्छंदतावादी कवी म्हणून विल्यम वर्ड्स्वर्थ आणि कोलरिजबरोबर त्याचा उल्लेख होत असला, तरी तो स्वच्छंदतावादी नव्हता, असेही म्हटले गेले आहे.
१७९५ मध्ये त्याचा पहिला विवाह ईडिथ फिकर हिच्याशी झाला होता. साउदीच्या आयुष्याच्या अखेरी अखेरीस त्याच्या पहिल्या पत्नीचे ढळलेले मानसिक संतुलन, तिच्या मृत्यूनंतर (१८३७) त्याने केलेला दुसरा विवाह, त्यातून निर्माण झालेले कौटुंबिक कलह ह्यांचा त्याच्या मनावर फार ताण आला. इंग्रज कवी लॉर्ड बायरन याच्याकडूनही तो दुखावला गेला होता. त्याची प्रकृती ढासळू लागली होती.
केसविक, कंबरर्लंड येथे तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
“