साउथॅम्प्टन : इंग्लंडमधील एक नैसर्गिक बंदर, औद्योगिक शहर आणि प्राचीन अवशेषांचे स्थळ. पूर्वाश्रमीच्या या कौंटी बरोचे शहरात रूपांतर झाले असून आता ते हॅम्पशर कौंटीत आहे. लोकसंख्या २,३९,७०० (२०१०). ते दक्षिण इंग्लंडमध्ये, इंग्लिश खाडीवर वसले असून लंडनच्या नैर्ऋत्येस १२१ किमी.वर आहे. टेस्ट व आयचेन नद्यांच्या नदीमुखखाड्यां मुळे त्यांच्या दरम्यान निर्माण झालेल्या द्वीपकल्पावर, साउथॅम्प्टन वॉटर नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेस्ट नदीच्या नदीमुखखाडीच्या शिरोभागी हे शहर वसले आहे.
रोमनांनी इ. स. ४० मध्ये ब्रिटनवर आक्रमण करून तेथील आयचेन नदीच्या पूर्व तीरावर क्लॉझेंटम नावाची वसाहत स्थापन केली. येथील पुरातत्त्वीय उत्खननांत रोमनकालीन कोरीव लेख, नाणी, मृत्पात्रे आणि हस्तनिर्मित वस्तू उपलब्ध झाल्या. त्यानंतर पाचव्या शतकापर्यंत ते रोमनांच्या आधिपत्याखाली होते (इ. स. पू. ४१०). पुढे अँग्लो-सॅक्सन जमातींनी त्यावर वर्चस्व मिळविले. १०८६ पूर्वी याला शाही बरोचा दर्जा होता. त्यावेळी ते सॅक्सन हॅम्तून सुहाम्फॉन नावाने प्रसिद्घ होते. त्यावरूनच पुढे त्याचे साउथॅम्प्टन हे नाव झाले असावे. राजा हेन्री दुसरा याने ११५४–५५ दरम्यान या नगराविषयी पहिली सनद काढली परंतु १४४५ पर्यंत त्यास बरोचा दर्जा नव्हता. सहाव्या हेन्रीने १४४७ मध्ये साउथॅम्प्टनलाच कौंटीचा दर्जा दिला. याविषयीची पहिल्या चार्ल्स राजाने १६४० मध्ये नूतनीकरण केलेली सनद १८३५ पर्यंत कार्यवाहीत होती. मध्ययुगात ते इंग्लंडमधील एक महत्त्वाचे बंदर होते. येथून पृष्ठप्रदेशातील लोकर व चामड्याची निर्यात होई आणि फ्रान्समधील बॉर्दो शहरातून मद्याची (वाईन) आयात होत असे. पहिला रिचर्ड (कार. ११८९–९९) व नंतर पाचवा हेन्री (कार. १४१३–३३) याच्या नेतृत्वाखालील धर्मयुद्घातील सेनेने १४१५ मध्ये या बंदरातूनच कूच केले. भारताकडे समुद्रमार्गाने जाण्याचा दुसरा मार्ग ज्ञात होईपर्यंत पौर्वात्य देशांकडे येथून जहाजे निघत असत. इ. स. १६२० मध्ये मेफ्लॉवर जहाजातून उत्तर अमेरिकेकडे वसाहतीसाठी गेलेला पिलग्रीम फादर्स याने याच बंदरातून जलप्रवासास प्रारंभ केला. पुढे सतराव्या-अठराव्या शतकांत मात्र या बंदराचे महत्त्व कमी झाले. नेपोलियनबरोबरच्या लढाया, लंडन साउथॅम्प्टन लोहमार्ग (१८४०) आणि वाफेवर चालणाऱ्या बोटींचा शोध यांमुळे एकोणिसाव्या शतकात यास पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्घाच्या वेळी जर्मनीने त्यावर अनेक बॉम्ब हल्ले करून शहर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. १९६४ मध्ये त्याला शहराचा दर्जा प्राप्त झाला.
प्राचीन काळी नगराला चुनखडी दगडात बांधलेली नॉर्म न तटबंदी होती. तिचे भग्नावशेष अवशिष्ट स्वरूपात असून उत्तरेकडील द्वार (बारगेट), त्याची कमान आणि मनोरे तसेच त्यावरील दिवाणखाना (गिल्ड हॉल) प्रेक्षणीय आहेत. त्यांची डागडुजी केली आहे. याशिवाय शहरात मध्ययुगीन सेंट मायकेल चर्च (अकरावे शतक), जॉन राजाचा राजवाडा (बारावे शतक) इ. वास्तू आढळतात. साउथॅम्प्टन विद्यापीठाची इमारत एकोणिसाव्या शतकातील (१८६२) आहे. साउथॅम्प्टन कलावीथी हे प्रमुख नागरी केंद्र आहे.
पुरेसे खोल असलेले नैसर्गिक बंदर आणि विस्तीर्ण गोद्या यांमुळे अटलांटिक महासागरी मार्गावरील हे एक प्रमुख बंदर ठरले आहे. पुरेशा खोलीमुळे मोठमोठी जहाजे येथपर्यंत येऊ शकतात. बंदराचे आधुनिकीकरण केले असून बंदराच्या जवळच समुद्रात असलेल्या वाईट बेटामुळे दुहेरी लाटांचा या बंदराला फायदाच झाला आहे. बंदरातून प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. शहरात जहाजबांधणी दुरुस्ती व तत्संबंधी सेवा हा पूर्वापार चालत आलेला मोठा व्यवसाय आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस येथे व्यापारी व औद्योगिक विकासाने गती घेतली. तेलशुद्घीकरण, इलेक्ट्रि क व इलेक्ट्रॉनिकी साहित्य आणि तारा, मोटारी, विमाने, स्वयंचलित यंत्रे, पेट्रोरसायन, तंबाखूप्रक्रिया, पीठगिरण्या इ. उद्योगधंदे येथे चालतात. हे इंग्लंडमधील दुसऱ्या क्रमांकाचे बंदर असून (१९८०) येथून यूरोपीय देश, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडआदी देशांशी बारमाही सागरी वाहतूक चालते.
देशपांडे, सु. र.