साउथ डकोटा : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य संयुक्त संस्थानांच्या उत्तर भागात असलेल्या या राज्याच्या उत्तरेस नॉर्थडकोटा राज्य, पूर्वेस मिनेसोटा व आयोवा राज्ये, दक्षिणेस नेब्रॅ स्का तरपश्चिमेस वायोमिंग व माँटॅना ही राज्ये आहेत. राज्याच्या आग्नेय भागातसाउथ डकोटाची आयोवा राज्याशी असलेली सरहद्द बिग सू नदीनेतर नेब्रॅ स्का राज्याशी असलेली काही सरहद्द मिसूरी नदीने निर्माणकेलेली आहे. सामान्यपणे आयताकृती असलेल्या या राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ६१० किमी. व उत्तर-दक्षिण विस्तार ३९५ किमी.आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ १,९६,५४१ चौ. किमी. व लोकसंख्या८,२४,०८२ (२०११ अंदाज) आहे. पिअर (लोकसंख्या १३,६४६–२०१०) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. ‘सनशाइन स्टेट’ याटोपणनावाने या राज्याला ओळखले जाते. 

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या साउथ डकोटाची विभागणी मुख्य तीनप्रदेशांत करता येते. (१) पूर्वेकडील सखल प्रेअरी प्लेन्स, (२) पश्चिमेकडील ग्रेट प्लेन्स व (३) ब्लॅक हिल्स. पिअरी हिल्स नावानेओळखला जाणारा ईशान्येकडील टेकड्यांचा प्रदेश वगळता पूर्वेकडील‘प्रेअरी प्लेन्स’ हा हिमानी क्रियेतून निर्माण झालेला सखल मैदानीप्रदेश आहे. हा संपूर्ण प्रदेश लोम मृदेने व्यापला आहे. या प्रदेशातवार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५७ ते ६६० मिमी. च्या दरम्यान असते.येथे उंच गवत आढळते. येथून मका व इतर अन्नधान्यांचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर मिळते. यातील जेम्स नदीचे खोरे या उत्पादनांसाठी विशेषमहत्त्वाचे आहे. राज्यातील सर्वांत कमी उंची (२९३ मी.) ईशान्यभागातील बिग स्टोन सरोवराजवळ आहे. 

पश्चिमेकडील ग्रेट प्लेन्स या प्राकृतिक विभागात हिमानी क्रियाआढळत नाही. यात उंच ब्यूट, ओबडधोबड खोल कॅन्यन, सपाट पठारीभाग (टेबल लँड) व उत्खातभूमी(बॅडलँड्स) प्रदेश आढळतात. प्रेअरीप्लेन्स व ग्रेट प्लेन्स या प्रदेशांदरम्यानचा भूमिस्वरूपीय आणि जलवायुमान दृष्ट्या जोडणारा दुवा म्हणजे‘मिसूरी हिल्स’ प्रदेश होय.पिअरी मैदानी प्रदेशापेक्षा मिसूरी हिल्स प्रदेश सामान्यपणे ओबडधोबडव शुष्क आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीने हा प्रदेश विशेष उपयुक्तनसला तरी गवताळ प्रदेशामुळे पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.मिसूरी नदीच्या काठालगत कृषी प्रदेश आहे. शतकानुशतके झालेल्यागाळाच्या संचयनामुळे मिसूरी खोऱ्यात गम्बो ही अतिशय सुपीक मृदाआढळते. ग्रेट प्लेन्स प्रदेश एकसारखा आढळत नसला तरी तेथे शेलखडकांच्या विदारणातून निर्माण झालेला तपकिरी व करड्या-तपकिरीमृदेने हा प्रदेश व्यापला आहे. हा राज्यातील सर्वाधिक तापमानकक्षाअसलेला प्रदेश आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३५५-४५७मिमी.च्या दरम्यान आढळते. आखूड ग्रामा, बफालो व गहू गवतासाठीतसेच अन्नधान्य पिकांच्या वाढीच्या दृष्टीने हा भाग अनुकूल आहे. 

 

राज्याच्या नैऋत्य भागात वायोमिंग सरहद्दीवर ब्लॅक हिल्स हाघुटाकार पर्वतीय प्रदेश आहे. येथील हार्ने पीक (उंची २,२०७ मी.)हे सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे. ब्लॅक हिल्सच्या पूर्वेस उत्तरेकडीलशाइआन व दक्षिणेकडील व्हाइट व बॅड नद्यांदरम्यानच्या खोऱ्यातउत्खात भूमीप्रदेश आहे. वारा, वाहते पाणी या कारकांच्या कार्यामुळे वज्वालामुखीक्रियेमुळे हा भाग निर्माण झालेला आहे. 

 

राज्यात सोने, चांदी, फेल्स्पार, अभ्रक, वैदूर्य, युरेनियम, चुनखडक, ग्रॅनाइट, मँगॅनीज, लिग्नाइट, कोळसा, बेंटोनाइट, चिकणमाती, वाळू , रेती ही खनिजद्रव्ये आढळतात. सोन्याचे फार मोठे साठे ब्लॅक हिल्सप्रदेशांत आहेत. 

नद्या व सरोवरे : राज्याच्या साधारण मध्यातून दक्षिणेस वआग्नेयीस वाहणाऱ्या मिसूरी नदीमुळे राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोनभाग झाले आहेत. पूर्व भागाचे जलवाहन बिग सू , व्हर्मिलिअन व जेम्सया मिसूरीच्या उपनद्यांनी केले आहे. हिमानी क्रियेतून निर्माण झालेल्याखोऱ्यांमधून या नद्या दक्षिणेस वाहत जाऊन मिसूरीला मिळतात. पश्चिमभागाचे जलवाहन ग्रँ ड, मोर, शाइआन, बॅड व व्हाईट या मिसूरीच्या पूर्ववाहिनी उपनद्यांनी केलेले आहे. 

साउथ डकोटामध्ये अनेक लहानमोठी नैसर्गिक सरोवरे आहेत. मिसूरीनदीच्या पूर्वेकडील सरोवरे प्रामुख्याने प्राचीन हिमानी क्रियेतून निर्माणझालेली असून या सरोवरांना वसंत ऋतूत भरपूर पाणीपुरवठा होतो, तरशरद ऋतूत ती कोरडी पडतात. मिसूरी नदीतील कृत्रिम सरोवरांनाहीफार महत्त्व आहे. पूरनियंत्रण, जलसिंचन, विद्युत्निर्मिती इ. उद्देशांनीमिसूरी नदीवर बांधलेल्या ओआहे, बिग बेंड, फोर्ट रांदल, गॅव्हिन्सपॉईंट या धरणांमुळे मोठमोठी सरोवरे निर्माण झालेली आहेत. सरोवरां च्या परिसरात समृद्घ वन्य प्राणिजीवन आढळते. तसेच ही सर्वप्रकारची सरोवरे प्रमुख पर्यटनस्थळे बनली आहेत. याशिवाय राज्यात शेकडो लहानलहान धरणे बांधण्यात आलेली आहेत. 

हवामान : साउथ डकोटाचे हवामान समशीतोष्ण परंतु खंडीय प्रकारचेआहे. खंडांतर्गत स्थानामुळे उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानातबरीच तफावत आढळते. सातत्याने वाहणारे वारे, कमी वृष्टीमान व कमीआर्द्रता ही येथील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. राज्याचे वार्षिक सरासरीतापमान ७° से. असते. ब्लॅक हिल्समधील रॅपीड सिटी येथील जानेवारीव जुलैचे सरासरी तापमान अनुकमे ५°से. व २२° से. असते. राज्याच्या पूर्व सरहद्दीजवळील सिओक्स फॉल्स येथे हेच तापमानअनुकमे १०° से. व २३° से. असते. वार्षिक सरासरी वृष्टिमान ३५६मिमी. किंवा वायव्य भागात त्यापेक्षा कमी असून पूर्व सरहद्दीवर ते६१० मिमी. असते. पाऊस प्रामुख्याने वसंत ऋतूत व उन्हाळ्यातपडतो. राज्यातील एकूण सु. १६,१९,००० एकर क्षेत्र अरण्यांखालीअसून त्यांपैकी ९,७९,००० एकर क्षेत्र राष्ट्रीय अरण्याखाली आहे.कॉटनवूड, विलो, पाईन, एल्म, स्प्रूस, सीडार, ओक, एल्डर, ॲस्पेन हेवृक्षप्रकार येथे आढळतात. कॉयॉट, हरीण, बॉबकॅट, बीव्हर, रॅकून, प्रेअरी डॉग, बॅजर, मस्करॅट, वीझल इ. प्राणी येथे आढळतात. 


इतिहास : साउथ डकोटामधील मानवी इतिहास सु. २५,००० वर्षेमागे जातो. मानवजातिविज्ञान तज्ज्ञांच्या मते अगदी पहिल्यांदा बेरिंगयेथील भूभागमार्गे आशियाई लोक या नव्या जगात आले असावेत.त्यांनी येथे शिकारी समाज विकसित केला. इ. स. पू. ५००० पर्यंतत्यांचे वास्तव्य येथे होते. त्यानंतर मात्र ते या भागातून नाहीसे झाले.अशा प्रकारे एकामागून एक असे इतर भटके शिकारी येथे आले व गेले.इ. स. ५०० च्या दरम्यान अर्धभटक्या लोकांचे सु. तीन शतके येथीलपिअरी मैदानात वास्तव्य होते. यूरोपियनांचे आगमन होण्यापूर्वी या प्रदेशातडकोटा (सू) इंडियन लोक भटकत असत त्यावरून या राज्याला डकोटाहे नाव पडले असावे. पिअर येथे एक शिशाचे तबक सापडले. त्यावरूनअसे आढळते की १७४२-४३ मध्ये फ्रेंच समन्वेषकांनी या प्रदेशालाभेट दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रदेशावर फ्रान्सचा हक्क सांगितला होता.  

 

इ. स. १७६३ मध्ये मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील संपूर्ण फ्रेंचभूमी स्पेनच्या ताब्यात आली. नेपोलियन युद्घकाळात फ्रान्सने पुन्हायाचा ताबा घेईपर्यंत यावर स्पेनची सत्ता होती. इ. स. १८०३ मध्ये‘लुइझिआना परचेस’ चा एक भाग म्हणून फ्रान्सने ही भूमी संयुक्तसंस्थानांना विकली. इ. स. १८०४ मध्ये मिसूरी नदीला अनुसरूनवायव्येस पॅसिफिककडे गेलेल्या मेरीवदेर लेविस व विल्यम क्लार्कयांच्या सफरीचे साउथ डकोटामध्ये सात आठवडे वास्तव्य होते. १८५६मध्ये मिसूरी नदीकाठावर रांदल किल्ला बांधण्यात आला. तोपर्यंत केवळयूरोपियन फासेपारधी व फरचे व्यापारी येथे सक्रीय होते. १८६१ मध्येनॉर्थ व साउथ डकोटा मिळून एकत्रित असा ‘डकोटा प्रदेश’ होता.त्यावेळी केवळ आग्नेय भागातच वस्ती होती परंतु १८७५-७६ मध्येसोन्याच्या खाणींचा शोध लागल्यानंतर मात्र येथील लोकसंख्या वेगानेवाढली. १८८९ मध्ये नॉर्थ व साउथ डकोटा असे विभाजन होऊन२ नोव्हेंबर १८८९ रोजी चाळीसावे राज्यम्हणून साउथ डकोटा संयुक्तसंस्थानांत समाविष्ट झाले. १९०४ मध्ये पिअर हे राज्याच्या राजधानीचेठिकाण म्हणून कायम करण्यात आले. 

आर्थिक स्थिती : साउथ डकोटामध्ये अगदी सुरुवातीला ज्यागोऱ्या लोकांच्या वसाहती होत्या त्यांपैकी मिसूरी नदीच्या पूर्वेकडेराहणाऱ्यांचा शेती हा व्यवसाय होता, तर नदीच्या पश्चिमेस राहणाऱ्यालोकांचे पशुपालन व खाणकाम हे व्यवसाय होते. राज्यातील बहुतांशभूमी शेती व गुरेचराईसाठी वापरली जाते. साउथ डकोटाची अर्थव्यवस्थाप्रामुख्याने कृषी व्यवसायावर आधारित असून त्या अनुषंगानेचकारखानदारी, व्यापार व सेवा व्यवसाय विकसित झाले आहेत. गहू, मका, राय, अंबाडी, अल्फाल्फा ही येथील प्रमुख पिके आहेत. राज्यातील शेताचा सरासरी आकार १,३५४ एकरांचा आहे (२०००). इ. स.२००५ मध्ये कृषी पिकांपासून २,२६२ द. ल. डॉलर उत्पन्न मिळाले. 

 

पिकांच्या उत्पन्नापेक्षाही प्राणिज उत्पादने व मांस प्रक्रिया व्यवसायांपासून अधिक रोकड उत्पन्न मिळते. गुरे व डुकरांच्या पैदाशीमध्ये राज्य अग्रेसर आहे. राज्यात ३.९ द. ल. गुरे, ३,७६,५०० शेळ्या-मेंढ्याव १.४ द. ल. डुकरे असे पशुधन आहे (२००२). इ. स. २००५मध्ये पशुधनापासून २,६०१ द. ल. डॉलर उत्पन्न मिळाले. 

कृषी उत्पादनांशी निगडित असे येथील उद्योग आहेत. मांसप्रक्रियाव डबाबंदी व्यवसाय चांगल्याप्रकारे विकसित झाला आहे. राज्यात असलेल्या ९२३ कारखान्यांत ४०,००० कामगार आहेत (२००४). येथील बेकारीचे प्रमाण ४.३ टक्के आहे (२००५). सू फॉल्स हे मांसडबाबंदी व वित्तीय केंद्र म्हणून प्रसिद्घ आहे. राज्यात खाद्यपदार्थांचाठोक व्यापार चालतो. ब्लॅक हिल्समधील लीडजवळ असलेलीहोमस्टेक खाण ही देशातील सोने उत्पादनातील अग्रेसर खाण आहे.अलीकडच्या काळात येथील सोने उत्पादनात घट झालेली आहे. मिसूरीनदीवर चार ठिकाणी धरणे बांधली असून जलविद्युत्निर्मितीचे ते प्रमुखस्रोत आहेत. राज्यात दोन आंतरराज्यमहामार्ग व अनेक लोहमार्गआहेत. रस्त्यांची एकूण लांबी सु. १,३५,००० किमी. असून लोहमार्गसु. २,९६० किमी. लांबीचे आहेत. आकर्षक सृष्टीसौंदर्य, सरहद्दभागातील चालीरीती व परंपरा, ब्लॅक हिल्समधील मनोरंजनाच्या सुविधाइत्यादींशी पर्यटन व्यवसाय निगडित आहे. 

लोक व समाजजीवन : आद्य समाजजीवनातील कला, परंपरा, संस्कृती राज्यभर आढळते. राज्यातील आप्रवासी प्रामुख्याने नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी व रशियातून आलेले आढळतात. येथील इंडियन हे मूळडकोटा इंडियनांचे वंशज असून त्यांचे आजचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७ टक्के आहे. बिगरगोऱ्या लोकांधील हा सर्वांत मोठा गट आहे.ल्यूथरन, रोमन कॅथलिक, मेथडिस्ट, ख्रिस्ती युनायटेड चर्च, प्रेसबिटेरियन, बॅप्टिस्ट व एपिस्कोपलिअन या धार्मिक गटांचे लोक येथे आहेत.निम्म्यापेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात राहतात. अपुऱ्या आर्थिकसंधीमुळे मोठ्या संख्येने तरुण वर्ग इतर राज्यांकडे गेलेला दिसतो. 

राज्यात ६ ते १६ वयोगटातील मुला-मुलींना शाळेतील हजेरीसक्तीची आहे. उच्च व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या अनेक सार्वजनिकसंस्थांना राज्यमदत करीत असते. येथील ७२२ सार्वजनिक विद्यालयांत१,२२,७९८ विद्यार्थी व ९,०६४ शिक्षक (२००४-०५) तर ९५खाजगी शाळांत १०,८१७ विद्यार्थी आणि ९२२ शिक्षक होते(२००३-०४). साउथ डकोटा युनिव्हर्सिटी, ब्रुकिंग्ज, युनिव्हर्सिटी ऑफसाउथ डकोटा, व्हर्मिलिअन (१८८२) नॉर्दर्न स्टेट युनिव्हर्सिटी, ॲबरडीन, ब्लॅक हिल्स स्टेट युनिव्हर्सिटी, स्पिअरफिश, डकोटा स्टेटयुनिव्हर्सिटी मॅडिसन, स्कूल ऑफ माइन्स, रॅपिड सिटी या येथील उच्चशिक्षणसंस्था आहेत. राज्यात ५२ कम्युनिटी रुग्णालये आहेत (२००५).

ब्लॅक हिल्समधील एका ग्रॅनाइटी कड्यात मौंट रशमोअर हे राष्ट्रीयस्मारक असून त्यात जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, थीओडोर रूझवेल्टव अब्राहम लिंकन या माजी राष्ट्राध्यक्षांचे पुतळे कोरण्यात आले आहेत.ब्लॅक हिल्समधीलच उन्हाळी रंगमंदिरांची जगभर ख्याती आहे. मौंटरशमोअर, वुइंड केव्ह व बॅडलँडस् ह्या राष्ट्रीय उद्यानांचे तसेच जेवेलकेव्ह या राष्ट्रीय स्मारकांचे व्यवस्थापन नॅशनल पार्क सर्व्हिस विभागाकडून पाहिले जाते. सू फॉल्स, रॅपीड सिटी, ॲबरडीन, वॉटरटाउन, ब्रुकिंग्ज, मिटचेल, पिअर, यांक्टन, ह्यूरॉन, व्हर्मिलिअन, स्पिअरफिश, मॅडिसन, स्टर्गिस ही राज्यातील प्रमुख शहरे आहेत. त्यांपैकी सू फॉल्स(लोकसंख्या १,२३,९७५–२०००) हे सर्वांत मोठे शहर आहे. 

चौधरी, वसंत