सॅन साल्वादोर : मध्य अमेरिकेतील एल् साल्वादोर देशाची राजधानी व देशातील मोठे औद्योगिक शहर. लोकसंख्या ३,१६,०९० उपनगरांसह १५,६६,६२९ (२००७). सॅन साल्वादोर या ज्वालामुखीपासून ११ किमी. वर हमॉक्स खोऱ्यात सस.पासून सु. ६८२ मी. उंचीवर हे शहर वसले असून ते ग्वातेमाला शहराच्या आग्नेयीस सु. १९५ किमी. व ला लिबेर्ताद या पॅसिफिक महासागर किनाऱ्यावरील बंदरापासून ३२ किमी. वर आहे. हे एक योजनाबद्घ वसविलेले शहर असून येथे प्रशस्त चौक, रुंद रस्ते व जागोजागी सुंदर उद्याने आहेत. भूकंपाच्या वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे घरे एक्रमजली, बुटकी आहेत व त्यांभोवती प्रशस्त प्रांगण आहे. शहरात आधुनिक शासकीय इमारती असून मोजक्याच भव्य वास्तू आढळतात. त्यांपैकी नॅशनल पॅलेस (विधान मंडळ), राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान (कॅसाब्लांका), कॅथीड्रल, नॅशनल युनिव्हर्सिटी (१८४१) व तेथील वेधशाळा, अमेरिकन युनिव्हर्सिटी (१९६५) इ. भव्य वास्तू आहेत.
स्पॅनिश वसाहतवाल्यांच्या आगमनापूर्वी येथे पिपिल इंडियन जमातीचे वर्चस्व होते. मेक्सिको विजेता कोर्तेझ याच्या पेद्रो द आल्व्हारादो या अधिकाऱ्याने कूस्कातलान या जुन्या राजधानीजवळ १५२५ मध्ये वसाहत स्थापन केली. पुढे या वसाहतीपासून नैर्ऋत्येस सु. ३२ किमी. वर विद्यमान स्थळी ती १५२८ मध्ये हलविण्यात आली. १५४६ मध्ये तिला शहराचा दर्जा मिळाला. एल् साल्वादोर स्पॅनिश जोखडातून स्वतंत्र होऊन मेक्सिकन साम्राज्यात सामील झाल्यानंतर (१८२१) काही काळ (१८३४-३९) सॅन साल्वादोर येथे मध्य अमेरिकेतील संयुक्त प्रांतांची राजधानी होती. १८३९ पासून ती साल्वादोरची व पुढे १८५९ पासून एल् साल्वादोर या देशाची राजधानी झाली. १८५४, १८७३, १९१७ आणि १९८६ या सालांतील भूकंपांनी शहराचे अतोनात नुकसान झाले. यांपैकी १९८६ चा भूकंप तीव्र होता. त्यात वित्त व जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊन सु. हजार लोक मरण पावले. १९३४ मध्ये महापुराने शहराचे नुकसान झाले. १९७० च्या दशकात शासन व साम्यवादी पक्षातील बंडखोर यांच्यात संघर्ष होऊन यादवी युद्घसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
हे देशातील वित्तीय, व्यापारी तसेच औद्योगिक व वाहतूक मार्गांचे प्रमुख केंद्र आहे. ज्वालामुखींमुळे शहराच्या परिसरात सुपीक जमीन निर्माण झाली आहे. त्यातून मुख्यत्वे कॉफीचे उत्पादन घेतले जाते. त्याखालोखाल कापूस, ऊस, तंबाखू , नीळ इ. पिके होतात. येथून साखर व कॉफी यांची निर्यात होते. शहरात तेल व पोलाद शुद्घीकरण कारखाने असून रबर, साबण, सिमेंट, कापड, सिगारेटी, चामड्याच्या वस्तू, लाकूड उत्पादने, औषधे, मद्य (विशेषतः बिअर) यांच्या निर्मितीचे उद्योग चालतात. शिवाय अन्नप्रक्रिया, मांस डबाबंदीकरण हेही व्यवसाय येथे आहेत. महामार्ग व लोहमार्गांनी हे पॅसिफिक किनाऱ्यावरील प्रमुख बंदरांशी जोडलेले आहे.
सॅन साल्वादोरमधील नॅशनल म्यूझीयम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री (१८८३) आणि नॅशनल म्यूझीयम ऑफ एल् साल्वादोर (१९४०) ही संग्रहालये प्रसिद्घ असून दुसऱ्या वस्तुसंग्रहालयात माया संस्कृतीतील अनेक कलात्मक अवशेष ठेवलेले आहेत. सॅन साल्वादोर येथे १९७० च्या दशकात नवीन विमानतळ बांधण्यात आला आहे. लेक इलोपांगो हे उन्हाळी आरोग्यधाम शहराच्या पूर्वेस सु. १९ किमी.वर असून पर्यटकांचे ते आकर्षणस्थळ आहे. येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एल् साल्वादोर (१८४१), ‘होसे सीमेऑन कानास’ (१९६५) ही विद्यापीठे प्रसिद्घ आहेत. शहराभोवती उपनगरांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे.
देशपांडे, सु. र.
“