सॅन वॉन : वेस्ट इंडिजमधील प्वेर्त रीको या अमेरिकेच्या स्वतंत्र सहयोगी प्रदेशाची राजधानी, प्रमुख औद्योगिक व व्यापारी शहर आणिबंदर. लोकसंख्या ३,९५,३२६ (२०१० अंदाज). प्वेर्त रीको बेटाच्या उत्तर भागात, अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर हे वसले आहे. शहराचे जुना व नवा असे दोन स्वतंत्र भाग असून जुने शहर बेटाच्याउत्तर किनाऱ्याजवळील लहानशा खडकाळ बेटावर आहे, तर नवीन शहर बेटाच्या मुख्य भूमीवर वसले आहे.
स्पॅनिश दर्यावर्दी पाँसे दे लेआँ याने १५०८ मध्ये आपल्या पन्नास सहकाऱ्यांसह येथे कॅपरानामक मूळ वसाहत स्थापन केली परंतु तेथील रोगट हवामानामुळे स्पॅनिश वसाहतवाल्यांनी स्थलांतर करून बंदराच्या प्रवेशभागाशी असलेल्या खडकाळ द्वीपावर सांप्रतच्या जुन्या नगराची स्थापना केली (१५२१). या नगराच्या संरक्षणार्थ त्यांनी वसाहतीला चहुबाजूंनी संरक्षक तटबंदी केली (१५३३). नंतर त्यांनी एल् मॉरो हा भरभक्कम किल्ला बांधला (१५३९–८४). सोळाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात नव्या जगाच्या शोधार्थ जाणाऱ्या सफरी सॅन वॉनपासून निघत असत. स्पेनने सु. तीन शतके (१५९८–१८९८)हे आपल्या अखत्यारीत ठेवले. दरम्यान इंग्रज दर्यावर्दी सर फ्रान्सिस ड्रेक आणि हॉयकिन्झ यांनी ते घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पुन्हा एकदा ब्रिटिशांनी जॉर्ज क्लिफर्डच्या (अर्ल ऑफ कबरलँड) नेतृत्वाखाली १५९५ मध्ये ते हस्तगत करून काही महिने ताब्यात ठेवले, परंतु पुन्हा ते स्पेनने मिळविले. डचांनीही त्यावर आक्रमण केले (१६२५) परंतु त्यांना यश आले नाही. पुढे १७९७ मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर अमेरिकन नाविक दलाने २५ जुलै १८९८ रोजी ते हस्तगत केले. सुरुवातीस तेथील प्रशासकीय कारभार एका नियुक्त गव्हर्नरद्वारे चालत असे. अमेरिकेच्या अखत्यारित विसाव्या शतकात शहराची वाढ झाली आणि विकास झपाट्याने झाला. वाढत्या लोकसंख्येबरोबर नवीन उपनगरे (डिस्ट्रिक्ट्स) वसली. त्यांपैकी कोंदॉदो, मिरामार, सँतुर्स, मार्तिन पेनँ, हॅतो रे ही प्रसिद्घ आहेत.
सॅन वॉन हे प्वेर्त रीको बेटांवरील प्रमुख औद्योगिक व प्रक्रियाकेंद्र आहे. येथील मद्यार्कनिर्मिती – विशेषतः रमचे उत्पादन – मोठी आहे. यांशिवाय खनिज तेलाचे शुद्घीकरण, साखर, तंबाखूप्रक्रिया, वस्त्रोद्योग, सिमेंट, औषधे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, धातू उत्पादने, जडजवाहिर, सिगार व सिगारेट निर्मिती इ. उद्योग येथे चालतात. साखर, तंबाखू , कॅकॅओ, कॉफी, फळे इ. उत्पादनांची निर्यात या बंदरातून प्रामुख्याने अमेरिकेला होते. कॅरिबियन समुद्रातील हे एक प्रमुख नैसर्गिक बंदर असून आधुनिक सोयी केल्यामुळे येथे मोठ्या बोटींची ये-जा होते. जुने व नवीन शहर चार पुलांनी एकमेकांना जोडलेले आहे. शहराच्या पूर्व भागात आंतरराष्ट्रीय विमानतळ असून कॅरिबियनमधील वर्दळीचा हा विमानतळ आहे.
शहरात उच्च शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ प्वेर्त रीको (१९५६), युनिव्हर्सिटी ऑफ द सेक्रिड हार्ट (१९३५), इंटर-अमेरिकन युनिव्हर्सिटी इ. महत्त्वाची विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था आहेत. ल कासा देल लिबो हे अठराव्या शतकातील दुर्मीळ हस्तलिखिते व पुस्तकांचे जुने ग्रंथालय आहे. वसाहतकालीन वस्तूंचे जतन करणारी दोन संग्रहालये येथे आहेत. ललित कला अभ्यासासाठी येथे स्वतंत्र केंद्र स्थापन करण्यात आले आहे (१९८१).
जुन्या सॅन वॉन शहराला राष्ट्रीय ऐतिहासिक स्थळ (नॅशनल हिस्टॉरिक साइट) म्हणतात. वसाहतिक वास्तुशिल्पशैलीसाठी हे प्रसिद्घ आहे. सॅन वॉन येथील कोंदॉदो समुद्रकिनारा तटबंदियुक्त १९.१३ हे. क्षेत्रफळात जुना भरभक्कम एल् मॉरो किल्ला (१५३९), पाँसे दे लेआँचे थडगे असलेले कॅथीड्रल, लो कॅसा बदँका (१५२७), स्पॅनिश गव्हर्नरचा प्रासाद (जुना ला फॉर्तालेझा किल्ला -१५४०), सान क्रिस्तोबल किल्ला आणि चर्च या सु. २५० वर्षांच्या जुन्या वास्तू आहेत. येथेच स्पॅनिश वसाहतिक राजधानी होती. आजही येथे व्यावसायिक व प्रशासकीय कार्यालये आहेत. सॅन वॉनमध्ये लॅटिन अमेरिकेतील सर्वांत मोठी व ऐषारामी उपहारगृहे असून येथील पर्यटन व्यवसायही महत्त्वाचा आहे.
देशपांडे, सु. र.
“