षृनाइ-आन (शिरनाइ-आन) : (चौदावे शतक). विख्यात चिनी कादंबरीकार. चिनी साहित्यातील Shui Hu Chaun (इं. शी. स्टोरीज अलाँग द वॉटर व्हर्ज) ह्या अत्यंत लोकप्रिय कादंबरीचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही परंतु युआन घराण्याच्या राजवटीत (१२०६-१३६७) तो होऊन गेला असावा. मंगोलांच्या प्रशासनात त्याने काही काळ नोकरी केली होती, असे दिसते.
त्याच्या वरील कादंबरीची शंभर प्रकरणे असून तिची पहिली सत्तर प्रकरणे षृ नाइ-आनने, तर नंतरची तीस प्रकरणे अन्य व्यक्तीने लिहिली, असे एक मत आहे. ह्या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीची एकही प्रत उपलब्ध नाही. पुढे तिच्या अनेक आवृत्या निघाल्या. तिच्या मूळ संहितेत अनेक प्रक्षिप्ते अंतर्भूत झाली आणि त्या कादंबरीचे केवळ अनुकरण करणाऱ्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या.
छत्तीस बंडखोरांच्या जीवनांभोवती ह्या कांदबरीचे संविधानक गुंफलेले आहे. बंडखोरही माणसेच असतात त्यांनाही कुटुंब, मित्र, प्रेमभावना आणि महत्वाकांक्षा असते इतरांप्रमाणेच त्याच्यांही जीवनाच्या काही गरजा असतात त्यांनाही कायदा पाळावसा वाटतो परंतु अन्यायकारक परिस्थितीमुळे ते कायद्याला आव्हान देण्यासाठी उभे राहतात. असा या कादंबरीचा संदेश आहे. त्या दृष्टीने पाहता, हे सर्व बंडखोर म्हणजे चिनी रॉबिनहूड होत, असे म्हणता येईल.
चिनी साहित्य हे अनेक शतके दरबारी जीवन आणि सत्ताधारी वर्गातील व्यक्ती, ह्याच्याशीच निगडीत होते तथापि षृ नाइ-आनच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीही साहित्यनिर्मिती करू लागल्या होत्या. ह्या वस्तुस्थितीचा प्रभाव साहित्यावर पडणे अपरिहार्य होते तथापि सामाजिक अन्यायाविरूद्ध बडखोरांच्या रूपाने उभ्या राहणाऱ्या एका शक्तीवर गद्य महाकाव्यासारखी कादंबरी लिहिणारा षृ नाइ-आन हा पहिला चिनी साहित्यिक. त्याच्या ह्या कादंबरीने साहित्याच्या वर्तुळात खळबळ उडविलीच पण सर्वसामान्यानाही अतिशय प्रभावित केले. जपानी तसेच काही आशियाई साहित्यावरही तिचा प्रभाव पडल्याचे म्हटले जाते.
व्हांग इ. शू (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)