श्वेतांबर पंथ : जैन धर्मातील एक प्रमुख पंथ. आचार्य ⇨भद्रबाहू आणि आचार्य स्थूलभद्र यांच्यातील मतभेदांतून जैन धर्मात दिगंबर व श्वेतांबर असे दोन प्रमुख पंथ निर्माण झाले. साधारणपणे इ. स. पहिल्या शतकात या दोन पंथांतील वेगळेपणा स्पष्ट होऊन उत्तरोत्तर प्रत्येकाचे स्वतंत्र स्वरूप निश्चित होत गेले. श्वेतांबरप्रणीत ४५ आगम दिगंबर पंथीयांना मान्य नाहीत. त्यांच्या मते मूळ आगमगंथ कालोदरात नष्ट झाले आहेत. भगवान महावीरांनंतरची इंद्रभूती गौतम, सुधर्मा व जंबूस्वामी यांच्यापर्यंतची परंपरा या दोन्ही पंथांना मान्य आहे तथापि त्यानंतरच्या आचार्यपरंपरा मात्र या दोन पंथांत वेगवेगळ्या मानल्या जातात. श्वेतांबरपरंपरेत प्रभव, शय्यंभव, यशोभद्र, संभूतविजय व भद्रबाहू हे श्रूतकेवली मानले जातात. दिगंबर पंथीय हे मुख्य साधूस ‘भट्टारक’ म्हणतात, तर श्वेतांबर ‘सूरि’ म्हणतात. स्त्रीजन्मात जीवाला मोक्ष मिळत नाही, असे दिगंबर पंथीयांचे मत आहे तर स्त्री जीवातही मोक्ष मिळू शकतो, असे श्वेतांबर पंथीय मानतात.
श्वेतांबर पंथाचे साधू श्वेत वस्त्रे धारण करतात. पात्र, पात्रबंध, पात्रप्रमार्जनिका, रजस्त्राण, दोन चादरी, कांबळे, मुखवस्त्र इ. चौदा उपकरणे ते जवळ बाळगतात. सुरूवातीला उपकरणांची संख्या कमी होती व जरूरी असेल तेव्हाच कटिवस्त्र धारण करीत. पुढे कटिवस्त्राचा विस्तार होत गेला. मूळच्या जिनप्रतिमा नग्नस्वरूपात होत्या परंतु मंदिरासंबंधी व मूर्तीसंबंधी वाद होऊ लागले, तेव्हा श्वेतांबर पंथीय अनुयायी वस्त्रांकित मूर्तीची पूजा करू लागले व मूर्तीवर पूजेच्या वेळी इतर अलंकारही घालू लागले. दिगंबरांच्या मंदिरात पुजारी जैन धर्मीय असतो परंतु श्वेतांबर मंदिरामध्ये अन्य धर्मीयही मूर्तीची पूजा करू शकतो. आंघोळ करून व धुतलेली वस्त्रे नेसून जैन ⇨श्रावक मूर्तीची जलपूजा, चंदनपूजा आणि पुष्पपूजा करतो. धूपपूजा, दीपपूजा, अक्षतपूजा, नैवेद्यपूजा आणि फलपूजा हे पूजेचे इतर प्रकार श्रावक किंवा श्राविका साध्या पोशाखातसुद्धा करू शकतात. विशेष प्रसंगी सवाल धरून पूजा करण्याचा मान मिळविला जातो. संध्याकाळी मंदिरामध्ये आरती केली जाते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी – उदा., अबू , गिरनार, शत्रूंजय इ. ठिकाणी – मोठया ऐश्वार्याने पूजा केली जाते व ती अधिक पुण्यकारक समजली जाते.
श्वेतांबर संप्रदायात वनवासी व चैत्यवासी असे साधूंचे दोन वर्ग पडले. या दोन वर्गांचे रूपांतर पूढे ‘संवेगी’ मुनी व यती या प्रकारांत झालेले आहे. मूर्तिपूजक श्वेतांबरामध्ये अनेक गच्छ उत्पन्न झाले. त्यांपैकी खरतरगच्छ, तपागच्छ व आंचलिकगच्छ हे अस्तित्वात आहेत.
भारतामध्ये श्वेतांबर पंथीय लोक मुख्यत्वेकरून गुजरात व राजस्थान प्रांतांत आहेत. साधारणपणे ते व्यापार व्यवसायात असून सधन आहेत. दानधर्माबद्दलही ते प्रसिद्ध आहेत.
पहा : जैन धर्म जैनांचे धर्मपंथ दिगंबर पंथ.
पाटील, भ. दे.