श्री श्री रविशंकर : (१३ मे १९५६). भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एक थोर जगद्गुरू आणि ‘ आर्ट ऑफ लिव्हिंग’ (जीवन जगण्याची कला) या विख्यात प्रतिष्ठानचे संस्थापक. त्यांचा जन्म तमिळनाडू राज्यातील श्री श्री रविशंकरपापनाशम ह्या गावी एका सुसंस्कृत, संपन्न कुटुंबात झाला. त्यांचे वडील रतनानंद आणि माता विशालाक्षी. रतनानंद हे व्यवसायाने अध्यापक-आचार्य होते, तर विशालाक्षी धर्मशील गृहिणी होत्या. रविशंकर यांच्या बालपणीच त्यांचा अध्यात्माकडील ओढा दिसून येत होता. वयाच्या चौथ्या वर्षी भगवद्‌गीते तील श्लोक त्यांनी म्हणून दाखविले. विलक्षण नैसर्गिक बुद्घिमत्ता लाभलेला हा मुलगा भविष्यात काहीतरी भव्यदिव्य करेल, असा विश्वास त्यांच्या मातापित्यांच्या ठायी निर्माण झाला. पंडित चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण सुरू झाले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी ऋग्वेद मुखोद्‌गत केला. त्यानंतर पुढे त्यांनी वेदाभ्यासाबरोबरच आधुनिक शास्त्रे यांचे औपचारिक शिक्षण घेऊन बंगलोरच्या सेंट स्टीफन महाविदयालयातून भौतिकशास्त्रातील बी.एस्‌सी. पदवी संपादन केली (१९७५). त्यांच्यातील विद्वत्ता व वक्तृत्वगुण ओळखून महर्षी महेश योगी यांनी त्यांना भौतिकशास्त्र व वेद या विषयांवर व्याख्याने देण्यासाठी पाचारण केले. त्यांनी अनेक वर्षे भारतभर तसेच परदेशात भमण केले अनेक शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित यांच्या विचारपरिप्लूत चर्चेत भाग घेतला. त्याअगोदर त्यांनी काही ज्ञानसंपन्न गुरूंकडून अध्यात्मविदया आत्मसात केली होती. माता आनंदमयी या थोर साध्वींशी, तसेच अनेक संत-महंतांशी त्यांचा परिचय घडून आला होता. ते एकांत साधना करत व साधना शिकविण्यासाठी प्रशिक्षणशिबिरे आयोजित करून व्याख्यानेही देत. १९८२ मध्ये कर्नाटकातील शिमोगा येथे त्यांनी मौनवत स्वीकारून दहा दिवस चिंतन-मननात व्यतीत केले. अत्यंत खडतर तपश्चर्येनंतर त्यांना ‘सुदर्शनक्रिया ’ या संकल्पनेचा साक्षात्कार झाला. तिच्या यशस्वी प्रकियेसाठीच त्यांनी ‘ आर्ट ऑफ लिव्हिंग ’ या प्रतिष्ठानची स्थापना केली (१९८४).

आर्ट ऑफ लिव्हिंग या प्रतिष्ठानचे कार्य प्रामुख्याने व्यक्तिविकास व समाजविकास या दोन स्तरांवर चालू आहे. मुख्यत: साधना, सेवा, सत्संग या तत्त्वत्रयींवर हे कार्य आधारले आहे. समाजाचा केंद्रबिंदू हा व्यक्ती असल्याने आधी एकेका व्यक्तीचा विकास घडून आल्यास समाजविकासाचे कार्य आपातत: होईल, असे श्री श्री यांना वाटते. निरोगी शरीर आणि तणावमुक्त मन हा प्रत्येक मानवाचा हक्क आहे, असा त्यांचा आग्रह असून तो वास्तवात उतरविण्यासाठी त्यांनी बेसिक कोर्स, निवासी ॲड्व्हान्स कोर्स, सहज समाधी योग, दिव्य समाज निर्माण (डीएस्एन्), टिचर्स ट्रेनिंग कोर्स, ब्लिस् फाउन्डेशनमार्फत ‘ कॉर्पोरेट कोर्स ’, तसेच मुलांसाठी आर्ट एक्सेल (ऑल राउन्ड ट्रेनिंग इन एक्सलन्स) व यंग ॲडल्ट्स असे अभ्यासक्रम बनविले आहेत. यांपैकी पहिला ‘बेसिक कोर्स’ हा मूळ पायाभूत कार्यक्रम आहे. यामध्ये शरीर, मन हे निसर्गाच्या लयीमध्ये आणण्यासाठी ‘सुदर्शनक्रिया ’ शिकविली जाते. सुदर्शनक्रिया म्हणजे विशिष्ट लयीत, विशिष्ट गतीने, विशिष्ट आसनात बसून सतर्कपणे केलेली श्वसनक्रिया. श्वासाव्दारे मानवी शरीराचे स्वास्थ्य साधणे, हा या क्रियेचा मुख्य हेतू. त्रिस्तरीय प्राणायाम, भस्रिका, ओम् उच्चरण, सुदर्शनक्रिया, ध्यान इ. श्वासोच्छ्‌वासावर आधारित क्रिया या कोर्समध्ये शिकविल्या जातात.

रविशंकर यांच्या प्रेरणेने भारतातील प्रामुख्याने पुढील सात क्षेत्रांतील प्रगती व विकास साधण्याच्या दृष्टीने आर्ट ऑफ लिव्हिंग हे प्रतिष्ठान सक्रिय आहे : ती म्हणजे-(१) पर्यटन उदयोग, (२) योग आणि ध्यान, (३) आयुर्वेद, (४) संगीत आणि नृत्यक्षेत्र, (५) खाद्यपदार्थ, (६) वस्तू आणि अलंकार, (७) सूचना औदयोगिकी आणि अंतर्मनाचा बदल. यांशिवाय या संस्थेतर्फे अनेक सेवाप्रकल्प व योजना जगभरामध्ये राबविल्या जातात. त्यांमध्ये ‘ फाइव्ह एच् प्रोग्रॅम ’ म्हणजे हेल्थ (आरोग्य), हायजिन (सार्वजनिक आरोग्य), होम्स फॉर होमलेस (बेघरांसाठी घरे), ह्यूमन व्हॅल्यूज (मानवी मूल्यांचा विकास), हार्मनी इन डायव्हर्सिटी (विविधतेत एकात्मता) या पाच तत्त्वांवर आधारित सेवा-कार्यक्रम वाय्. एल्. टी. पी. (यूथ लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम), नवचेतना शिबीर, प्रिझन स्मार्ट प्रोग्रॅम, श्री श्री आयुर्वेद, डिव्हाइन सर्व्हिसेस, नैसर्गिक शेती इत्यादींचा समावेश आहे. यांशिवाय श्री श्री रविशंकर विदयामंदिर, आदिवासी शाळा, गुरूकुलपद्धतीवर संस्कृत पाठशाळा इ. प्रकल्प कार्यरत आहेत. दुष्काळ, भूकंप, त्सुनामी लाटा, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती ओढविलेल्या आपद्‌ग्रस्त भागांत तसेच युद्धग्रस्त भागांत जाऊन आपद्‌ग्रस्तांना सर्व प्रकारे मदत करण्यात हे प्रतिष्ठान अग्रेसर आहे. बाँब हल्ल्याने उद्ध्वस्त झालेल्या लोकांचे मनोधैर्य उंचावून त्यांनाही स्वास्थ्य देण्याचा प्रयत्न या संस्थेने केला आहे.

भारतातच नव्हे, तर जगातील सु. १५० देशांमध्ये रविशंकर यांनी जीवन जगण्याची ही कला शिकविली आहे. जर्मनी, कॅनडा, अमेरिका, रशिया, इंडोनेशिया, फ्रान्स इ. देशांमध्ये या प्रतिष्ठानची केंद्रे आहेत. सर्व धर्मांतील आणि संस्कृतींमधील लोकांना एकत्र येऊन उत्सव करण्यास, सेवा करण्यास ते प्रोत्साहित करतात. अध्यात्माकडे पाहाण्याची उत्सवी व आनंदमयी दृष्टी त्यांच्यामुळे अनेकांना प्राप्त झाली आहे. भारतात बहुतेक सर्व ठिकाणी या संस्थेची केंद्रे आहेत.

आर्ट ऑफ लिव्हिंग या प्रतिष्ठानचे मुख्य केंद्र बंगलोरजवळ निसर्गरम्य परिसरात उभारले आहे. वेदविज्ञान महाविदयापीठ किंवा व्यक्तिविकास केंद्र या नावाने ते प्रसिद्ध आहे. जगातील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रांचे कार्य या मध्यवर्ती केंद्राव्दारे सांभाळले जाते. येथील विशालाक्षी मंडप ही कमळाकृती पाच मजली वास्तू लक्षवेधक आहे. रविशंकर यांच्या मातेचे नाव तिला देण्यात आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग या प्रतिष्ठानचा रौप्यमहोत्सव १७ ते १९ फेबुवारी २००६ दरम्यान बंगलोर येथे साजरा झाला. त्यावेळी ‘ वसुधैव कुटुंबकम् ’ हा संदेश रविशंकर यांनी सर्वांना दिला आणि मानवजातीच्या कल्याणार्थ सर्वांनी वैर बाजूला सारून प्रेमाने एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बंगलोर येथील निमहंस संस्थेमधील वैज्ञानिकांनी संशोधन करून सुदर्शनक्रियेमुळे मनोकायिक व निद्रानाश इ. रोगांवर उपचार होतो, हे स्पष्ट केले आहे. भारतातील व परदेशातील अनेक वैदयकीय संस्था व महाविदयालयांमधून सुदर्शनक्रियेच्या गुणकारी परिणामांवर संशोधन व प्रयोग चालू आहेत.

रविशंकर यांचे आत्म्याची साद-प्रार्थना, हृदयाची भाषा, हिंदू धर्म आणि क्रिश्चन धर्म, अनमोल मोती, नारद भक्ती सूत्र (भाग २), जीवन एक सुंदर उत्सव, भारतीय प्रतीकांचे ज्ञान, मौज प्रिय असे देवाला, मौन-एक उत्सव, हिंदू  धर्म-इस्लाम धर्म, सूज्ञपणा नवीन सहस्रकासाठी, नि:सीम साधकासाठी एक अंतरंग वार्ता (भाग १ ते ७) इ. अनुवादित गंथ व्यक्तिविकास केंद्राद्वारा प्रकाशित झाले आहेत. याशिवाय रविशंकर यांच्या प्रवचनांच्या तसेच भजन, भक्तिसूत्र, पातंजली योगसूत्र, अष्टावक गीता वगैरेंच्या दृक्-श्राव्य फिती साधकांसाठी उपलब्ध आहेत.

रविशंकर यांना त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. त्यांत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचाही समावेश आहे. योग शिरोमणी पुरस्कार (१९९६), महाराष्ट्र राज्य शासनाचा गुरूमाहात्म्य पुरस्कार (२००५), ग्लोबल ह्युमॅनिटेरियन ॲवॉर्ड (२००५), जागतिक शांतता केंद्र व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे यांच्या वतीने संत श्री ज्ञानेश्वर जागतिक शांतता पुरस्कार (आळंदी, २००६) हे त्यांपैकी काही प्रतिष्ठित पुरस्कार होत. कुवेम्पू विदयापीठ (कर्नाटक), ओपन इंटर-नॅशनल युनिव्हर्सिटी फॉर काँप्लिमेंटरी मेडिसीन, श्रीलंका इ. विदयापीठांनी त्यांना सन्मान्य डॉक्टरेट ही पदवी दिली आहे.

चेहऱ्यावर सात्त्विक तेज, सततचे निरागस हास्य, प्रसन्नता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही ठळक वैशिष्ट्ये होत. षड्‌रिपूंपासून अलिप्त असलेल्या महर्षी रविशंकर ह्यांनी आजन्म ब्रह्मचर्य स्वीकारले आहे.

पोळ, मनीषा