श्रीपाद श्रीवल्लभ : ( चौदावे शतक ). दत्तात्रेयांचे पहिले ऐति-हासिक अवतार मानले जाणारे महापुरूष. त्यांचा काळ १३२० ते १३५० असा असावा.⇨गुरूचरित्रा च्या पाच ते दहा अध्यायांत त्यांची जीवनकथा श्रीपाद श्रीवल्ल्भ : पारंपरिक चित्र.सांगितलेली आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापुरम् येथे झाला. हेराजमहेंद्रीच्या उत्तरेस गोदावरीच्या मुखप्रदेशाजवळ आहे. पीठापुरी, पिष्टपुरम् अशी ह्या ठिकाणाची नावे प्राचीन शिलालेखांत आढळतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या वडिलांचे नाव आपळराज आईचे सुमता. आपळराज हे आपस्तंबशाखीय ब्राह्मण होते. श्रीपाद श्रीवल्ल्भांच्या जन्माविषयी असे सांगतात, की एका अमावास्येला त्यांच्या घरी श्राद्धविधी असताना ब्राह्मणभोजनापूर्वी एक अवधूत दारात आला. सुमता ही आतिथ्यधर्म भक्तिभावाने पाळणारी असल्यामुळे तिने त्याला भिक्षा घातली. त्यामुळे संतुष्ट झालेल्या त्या अवधूताने सुमतेला तिच्या मनात जी इच्छा असेल, ती तिने सांगावी, ती सफल होईल असे म्हटले. सुमतेला झालेल्या पुत्रांपैकी अनेक मरण पावले होते आणि जे जगले होते, ते ‘ अक्षहीन, पादहीन ’ म्हणजे आंधळे, पांगळे होते. त्यामुळे तिने तिला ज्ञानवंत व जगद्वंदय असा पुत्र मिळावा, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर तापसी, वंशाचा उद्धार करणारा, कलियुगात ख्यातिवंत होणारा, दैन्यहारक आणि ‘ ज्ञानमार्गे अतुर्बळी ’ असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल, असा आशीर्वाद देऊन तो अवधूत अदृश्य झाला. ह्या आशीर्वादानुसार सुमतेला पुत्र झाला. त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत त्यांचे वेदाध्ययन पूर्ण झाले होते. तत्कालीन परंपरेनुसार सोळाव्या वर्षी त्यांच्या लग्नाचा विचार सुरू झाला पण विवाहबंधनात अडकण्यास नकार देऊन ते उत्तरयात्रेस निघाले. तत्पूर्वी आपल्या दोन अपंग बंधूंना आपल्या अमृतदृष्टीने त्यांनी अव्यंग आणि प्रज्ञावंत केले आपल्या आईवडिलांना त्यांच्या वृद्धापकाळी आधार मिळावा अशी व्यवस्था केली.

पीठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्ल्भांनी जगन्नाथपुरी, काशी आणि बद्रीकेदार ह्या तीर्थस्थानांना भेटी दिल्या. त्यानंतर ते दक्षिणेत गोकर्ण महाबळेश्वरी आले आणि तेथे गुप्तपणे तीन वर्षे राहिले. त्यानंतर ते श्रीशैलम् येथे चार महिने राहिल्यावर निवृत्तिसंगमावर कृष्णाकाठी असलेल्या कुरवपूर ह्या गावी आले.

कुरवपूर येथे दोन घटना घडल्याचे गुरूचरित्र कार सांगतात. त्यांपैकी पहिली एका वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणाची अंबिकानामक विधवा पत्नी आणि तिचा मूढ मुलगा ह्यांची. ह्या मुलाच्या मूढपणामुळे त्या स्त्रीला समाजात फार मानहानी सहन करावी लागत होती. त्यामुळे त्या मायलेकरांनी कृष्णेच्या प्रवाहात उडी मारून जीव देण्याचे ठरविले. त्या तयारीत असतानाच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ कृष्णेत स्नान करताना दिसले. त्यांना नमस्कार करून आत्महत्येच्या दोषातून मुक्त होण्यासाठी तिने त्यांचा आशीर्वाद मागितला. श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला शनिप्रदोषवताचे माहात्म्य सांगून ते वत आचरल्यास तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे सांगितले. अंबिकेच्या दोन इच्छा होत्या. एक, ह्या जन्मी आपल्याला झालेला मूढ पुत्र ज्ञानसंपन्न व्हावा आणि पुढील जन्मी श्रीपाद श्रीवल्लभांसारखाच जगत्रयाला पूज्य असा पुत्र व्हावा. श्रीपाद श्रीवल्लभांनी तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण केल्या. ही अंबिका म्हणजेच लाडकारंजाची अंबाभवानी असून तिला उत्तरजन्मी झालेला पुत्र म्हणजेच दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे उत्तरावतार ⇨नरसिंहसरस्वती हे होत, अशी गुरूचरित्र कारांची श्रद्धा आहे.

दुसरी घटना अशी : श्रीपाद श्रीवल्ल्भ कुरवपूर येथे कृष्णेत स्नान करावयास जात, तेव्हा तेथे कपडे धुणारा एक धोबी त्यांना नेहमी वंदन करीत असे. त्याने एकदा एका म्लेंच्छ राजाला आपल्या परिवारासह नदीत नौकाविहार करताना पाहिले. ह्या राजासारखे वैभव आपल्याला मिळावे, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती जाणून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, तुला असे राजवैभव मिळेल व पुढल्या जन्मी म्लेंच्छ होऊन तू ते भोगशील पण वैभव मिळाले, तरी गुरूंचा वियोग होईल ह्या जाणिवेने त्या धोब्याला वाईट वाटले. त्यावर श्रीपादगुरूंनी त्याला आश्वासन दिले, की नरसिंहसरस्वती ह्या नावाने आम्ही तुला भेटू. त्याप्रमाणे पुढील जन्मी हा धोबी बीदरचा मुसलमान बादशहा झाला आणि नरसिंहसरस्वतींचा तो उपासक बनला.

श्रीपाद श्रीवल्लभांनी संन्यास घेतलेला नव्हता, पण ते अवधूतवेषाने राहत असावेत.

कुरवपूर येथेच त्यांनी निजानंदी गमन केले ( आश्विन वदय १२, मघा नक्षत्र, सिंहराशी ). ही गुरूव्दादशी श्रद्धेने पाळली जाते.

पहा : दत्त संप्रदाय दत्तात्रेय.

संदर्भ : १. गोसावी, र. रा. पाच भक्तिसंप्रदाय, पुणे, १९७४.

            २. ढेरे, रा. चिं. दत्तसंप्रदायाचा इतिहास, पुणे, १९६४.

कुलकर्णी, अ. र.