श्री कृष्णदेवराय विदयापीठ : आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपूर येथे स्थापन झालेले एक विदयापीठ. २५ जुलै १९८१ रोजी याला विदयापीठाचा दर्जा मिळाला. आंध प्रदेश राज्याचे राज्यपाल हे या विदयापीठाचे कुलपती असतात. सोळाव्या शतकातील विजयानगर सामाज्याचा सम्राट श्री कृष्णदेवराय याच्या नावावरून या विदयापीठास हे नाव देण्यात आले. या विदयापीठाच्या स्थापनेमुळे रायलसीमावासीयांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार झाले आहे. १९६८ मध्ये श्री वेंकटेश्वर विदयापीठात सुरू करण्यात आलेल्या पदव्युत्तर शिक्षणाचे हे एक केंद्र होते. त्यानंतर १९७६ मध्ये श्री वेंकटेश्वर विदयापीठ पदव्युत्तर केंद्राला स्वायत्ततेचा दर्जा मिळाला व १९८१ मध्ये श्री कृष्णदेवराय विदयापीठ हे स्वतंत्र विदयापीठ म्हणून अस्तित्वात आले. १९८७ मध्ये १.२ कोटी रूपये इतका भांडवली खर्च करून विदयापीठ अनुदान आयोगाच्या अनुदानातून श्री कृष्णदेवराय व्यवस्थापन संस्था सुरू करण्यात आली. एकीय निवासी संस्था म्हणून  अस्तित्व असलेली ही संस्था १९८८ मध्ये पूर्णत: विदयापीठाशी संलग्न  बनली. विदयापीठाच्या इतिहासातील दुसरी महत्त्वपूर्ण घटना म्हणजे श्री वेंकटेश्वर विदयापीठाच्या अधिकारक्षेत्रातील कुर्नूल येथे असलेले पदव्युत्तर शिक्षणकेंद्र १९९३ मध्ये श्री कृष्णदेवराय विदयापीठाला जोडले गेले. अनंतपूरमधील श्री वेंकटेश्वरपुरम् भागात सु. २०२ हे. क्षेत्रात हे विदयापीठ विस्तारलेले आहे.

राज्यात श्री कृष्णदेवराय विदयापीठाशी संलग्न असलेली ९१ महाविदयालये आहेत : त्यांपैकी २६ शासकीय महाविदयालये, ६ महिला महाविदयालये, १२ शिक्षणशास्त्र महाविदयालये, ३ प्राच्यविदया शिक्षण महाविदयालये, २ विधी महाविदयालये व एक अभियांत्रिकी महाविदयालय आहे. एकूण विदयार्थिसंख्या ५२,००० होती (२००६). १६ संलग्न महाविदयालयांत पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. काही महाविदयालयांनी व्यवसायाभिमुख शिक्षण तर ६ महाविदयालयांनी स्वायत्ततेचा दर्जा मागितला आहे. विदयापीठात एम्.ए., एम्.कॉम., एम्.एस्सी. एम्.बी.ए., एम्.सी.ए., एम्.एस्.डब्ल्यू., एम्.एल्., एम्.पी.एड्. इ. पदव्युत्तर वर्गांचे वेगवेगळ्या विषयांतील शिक्षण दिले जाते. शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असून विदयापीठात पुढील विदयाशाखा आहेत : आंध्र भारती, अर्थशास्त्र, इंग्रजी, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र व सार्वजनिक प्रशासन, ग्रामीण विकास व सामाजिक कार्य, समाजशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन ( श्री कृष्णदेवराय संस्था ), विधी, प्रौढ-निरंतर शिक्षण व विस्तार, उपयोजित गणित, जीवरसायनशास्त्र, जीवतंत्रशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिकी, साधन सिद्धताशास्त्र, गंथालय व माहितीविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, भौतिकशास्त्र, बहुवारिक विज्ञान व तंत्रज्ञान, सांख्यिकी इत्यादी. विदयापीठाच्या गंथालयात ६३,००० गंथ व ५०० नियतकालिके होती (१९९५). कुर्नूल येथील श्री कृष्णदेवराय पदव्युत्तर शिक्षण केंद्र हे या विदयापीठाचे विदयापीठीय घटक महाविदयालय आहे. श्री कृष्णदेवराय विदयापीठातील काही शाखा स्वयं निधीवर चालविल्या जातात. काही विदयाशाखांसाठी सत्रपद्धती अवलंबिली जाते. पी.जी.डी.बी.ए., पी.जी.डी.एम्.एम्., पी.जी.डी.आर्.डी. या अभ्यासक्रमांचे हे दूरस्थ शिक्षणकेंद्र आहे.

चौधरी, वसंत