श्रमण : सर्वसंगपरित्याग केलेल्या जैन आणि बौद्घ मुनींना वा भिक्षूंना श्रमण म्हणतात. ‘ जो श्रमतो तो श्रमण ’ किंवा ‘ सम मन ज्याचे आहे, तो समण ( श्रमण )’ असे ‘ श्रमण ’ ह्या शब्दाचे अर्थ लावले जातात. कायाक्लेशात्मक तपाला जैन धर्मात प्राधान्य आहे. उग्र तपश्चर्या करून श्रमण धर्माचा आदर्श निर्माण करणारे वर्धमान महावीर ह्यांचा ‘ श्रमण-भगवान ’ ( समणे भगवं महावीरे ) असा निर्देश जैन गंथांतून अनेकदा केलेला आढळतो त्याचप्रमाणे जैनांची श्रमणसंस्था व त्यांचा आचारधर्म ह्यांचीही माहिती मिळते. ह्या आचारधर्मात पाच महावते अतिशय महत्त्वाची आहेत. ती थोडक्यात अशी : (१) शरीरात जीव असेपर्यंत हिंसा न करणे, (२) कोणत्याही प्रकारचे असत्य भाषण न करणे, (३) कोणतीही वस्तू कोणी दिल्याशिवाय न घेणे, (४) कोणत्याही प्रकारे स्त्रीशी संबंध न करणे, (५) कोणत्याही प्रकारचा परिग्रह जवळ न ठेवणे. ही सर्व व्रते मनाने, वाणीने आणि शरीराने पाळावयाची असतात. हे पाच महावतांमध्ये जे करू नये म्हणून सांगितले आहे, ते स्वत: तर करावयाचे नाहीच पण दुसऱ्याकडूनही करवावयाचे नाही आणि कोणी ते करण्याची संमती मागायला आला, तर ती द्यावयाची नाही. ही पाच महावते म्हणजे श्रमण धर्माचा गाभा समजला जातो. श्रमणांकडून काही आचारभंग झाल्यास त्यांना काय प्रायश्चित्त द्यावे, हे जैन ‘ छेदसूत्रां’त सांगितले आहे.‘ छेद ’ म्हणजे अपराधी.

नैष्ठिक बह्मचर्य किंवा संन्यास हे मोक्षाचे मुख्य साधन आहे, हा जैनांप्रमाणेच बौद्धांचाही मुख्य सिद्धांत आहे तथापि बौद्घ धर्माला आत्यंतिक देहदंडाचा, आत्मक्लेशाचा मार्ग मान्य नाही. त्याचप्रमाणे वैदिक काम्यकर्मकांडाचा, सांसारिक सुखांच्या आत्यंतिक उपभोगाचा मार्गही मान्य नाही. ह्या दोन टोकांतील मधला मार्ग - मध्यमा प्रतिपद् – त्याने काढला. सम्यक आचरण करणारा, शांत, दांत, नियत् ब्रह्मचारी व सर्व भूतांच्या बाबतीत दंडत्याग केलेला असा जो असतो, तोच श्रमण, भिक्षू वा ब्राह्मण होय, असे ⇨धम्मपदात म्हटले आहे.

बौद्घ भिक्षु-भिक्षुणींचे आचारनियम एकत्रित स्वरूपात आणून शिस्तीबद्दल मार्गदर्शन करणे हा बौद्धांच्या ⇨ विनयपिटका चा हेतू होय. विनयपिटक हे बौद्घ संघाचे संविधान मानले जाते. विनयपिटकांच्या ⇨ पातिमोक्ख ह्या महत्त्वपूर्ण भागात भिक्षु-भिक्षुणींकडून घडू शकणाऱ्या अनेक अपराधांचा निर्देश केलेला असून, कोणत्या अपराध्यास कोणते शासन करावे, हेही सांगितले आहे.

श्रमणसंस्कृती अशी संज्ञाही रूढ आहे. वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधारित श्रमणसंस्कृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्‌मयावरून दिसते. इंद्रियनिगह, परिग्रह-त्याग, आत्मशुद्घी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्घ व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत.

पहा : जैन धर्म जैन संघ.

संदर्भ : १. कोसंबी, धर्मानंद, बौद्घ संघाचा परिचय, मुंबई, १९२६.

२. मेहता, मोहनलाल, जैन आचार, वाराणसी, १९६६.

३. वैदय, प. ल. जैन धर्म आणि वाङ् ‌मय, नागपूर, १९४८.

कुलकर्णी, अ. र.