श्रद्धा : संस्कृत भाषेतील श्रत् (म्हणजे सत्य) या नामाला धा (म्हणजे ठेवणे) हा धातू जोडून ‘ श्रद्धा ’ हा शब्द तयार होतो. त्याचा व्युत्पत्यर्थ जिच्यात सत्य ठेवलेले असते ती (श्रत् सत्यम् । तत् सत्यमस्यां धीयते सा श्रद्धा ।  दुर्गाचार्य). एखादया वस्तूचे अस्तित्व निसर्गनियमाच्या पुराव्याच्या आणि तर्काच्या आधारे स्वीकारणे ही श्रद्धा नसून ते प्रमाणित ज्ञान आहे, म्हणून वैज्ञानिक सत्याचा स्वीकार हे प्रमाणाधिष्ठित ज्ञान आहे श्रद्धा नव्हे. परंतु ‘प्रत्येक घटनेला कारण असते ‘, किंवा ‘ निसर्ग नियमबद्ध आहे’, अशा प्रकारच्या विज्ञानाच्या गृहीतांचा स्वीकार हे प्रमाणित ज्ञान नसून त्या वैज्ञानिक श्रद्धा आहेत, असे म्हटले जाते. तथापि यांना श्रद्धा म्हणण्यापेक्षा गृहीते (प्रीसपोझिशन्स) म्हणणे अधिक सयुक्तिक दिसते. धार्मिक, नैतिक जीवनव्यवहारासाठी जी आदरणीय तत्त्वे वा अस्तित्वे निष्ठेने स्वीकारली जातात, त्या श्रद्धा होत. श्रद्धा आणि वैज्ञानिक सत्य तथा गृहीते यांतील भेद पुढीलप्रमाणे : (१) वैज्ञानिक सत्य हे प्रमाणित ज्ञान असते व त्याचा स्वीकार हा बौद्धिक स्वीकार असतो. (२) असा स्वीकार पुरावा व तर्क यांच्या आधारे समर्थनीय असतो. (३) वैज्ञानिक सत्य किंवा ज्याविषयी ते सत्य आहे, तो विषय आदरणीय किंवा पूज्य नसून ते वास्तव असते. याउलट (१) जेव्हा सत्याचा किंवा अस्तित्वाचा स्वीकार श्रद्घेने केला जातो, तेव्हा तो केवळ बौद्धिक स्वीकार नसून, त्यात व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारा भावनिक आणि इच्छाशक्तीचा भागही असतो. ती निष्ठा असते.(२)श्रद्धेने केलेला स्वीकार हा पुरावा व तर्क यांच्यावर अवलंबून नसतो. (३) श्रद्धेय गोष्टी आदरणीय वा पूज्य असतात.

श्रद्धा व धर्मजीवन : श्रद्धा ही संकल्पना लौकिक व्यवहारात आदर, निष्ठा, पूज्यभाव, बांधीलकी, इमानीपणा, भरवसा, विश्वास इ. व्यक्त करण्यासाठी सर्रास वापरली जाते. उदा., ‘ आई, वडील आणि गुरूजन ही माझी श्रद्धास्थाने आहेत ‘ ‘ लोकशाहीवर माझी श्रद्धा (निष्ठा) आहे ‘ ‘ माझी आयुर्वेदावर श्रद्धा (भरवसा, विश्वास) आहे ‘. असे असले, तरी श्रद्धेचे मुख्य क्षेत्र धार्मिक जीवन हेच आहे. श्रद्धा ही संकल्पना धर्मजीवनात केंद्रस्थानी आहे. तो धर्मजीवनाचा आधारस्तंभ आहे, असे मानले जाते. धर्मजीवनात श्रद्धा ही संकल्पना दोन अर्थांनी वापरली जाते : (१) ईश्वर, देवता, आत्मा व त्याचे अमरत्व, परलोक, मोक्ष यांसारख्या इंद्रियानुभव आणि तर्क यांना अगोचर अशा अदृष्ट गोष्टींविषयी आस्तिक्यबुद्धी (श्रद्धा अदृष्टार्येषु कर्मसु आस्तिक्य बुद्धीर्देवतादिषुच ।  शंकराचार्य). (२) सर्व लक्षणसंग्रहां त श्रद्धेचे लक्षण पुढीलप्रमाणे केले आहे : ‘‘ शास्त्र व आचार्य यांनी उपदेशिलेल्या गोष्टींबाबत, अनुभव नसला तरी, ‘ हे असेच आहे ‘ असा विश्वास म्हणजे श्रद्धा ” (शास्त्राचार्योपदिष्टे ऽ र्थे ऽ ननुभूतेप्येवमेवैतदिति विश्वास:।). श्रद्धेचा हा दुसरा अर्थ  म्हणजेच ‘ ईश्वर, प्रेषित, धर्मसंस्थापक, साक्षात्कारी व्यक्ती, शास्त्रगंथ, गुरू इत्यादींच्या वचनांवर दृढ विश्वास म्हणजेच आप्तवचनाचा, शब्दप्रामाण्याचा स्वीकार होय ‘. धार्मिक समाजाची बांधणी समान श्रद्धेतून होते. हिंदू , बौद्ध, जैन, शीख, ज्यू , पारशी, ख्रिस्ती, इस्लाम इ. सर्व धार्मिक समाज आणि पंथोपपंथ समान श्रद्धेने बांधलेले असतात. बालपणापासून होणाऱ्या धार्मिक संस्कारांतून या श्रद्धा व्यक्तिजीवनात मूळ धरतात आणि त्या तिच्या जीवनाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनतात. या अर्थाने ‘ सर्व व्यक्ती श्रद्धामय असतात. जिची जी व जशी श्रद्धा, तशी ती व्यक्ती’ (भगवद्‌गीता- १७.३).

श्रद्धात्रयविभाग : संस्कारभिन्नतेमुळे व्यक्ती व समाज भिन्न श्रद्धा स्वीकारतात. त्याचप्रमाणे प्रकृतिधर्मानुसार किंवा स्वभावानुसारही व्यक्तीची श्रद्धा सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारची असते, असा भगवद्गीते चा सिद्धांत आहे (भगवद्‌गीता १७.२४). गीते च्या चौदाव्या अध्यायातील त्रिगुणांच्या प्रतवारीनुसार सात्त्विक श्रद्धा सद्गती किंवा उन्नतीस, राजस मध्यमगतीस आणि तामस अधोगतीस कारण होते. यावरून सर्वच श्रद्धाप्रकार हितकारक नसून व्यक्तीला व समाजाला श्रद्धांबाबत तारतम्य-विवेक करणे आवश्यक ठरते. हितावह श्रद्धा स्वीकारार्ह आहेत, तर हानिकारक श्रद्धांचा त्याग केला पाहिजे म्हणून श्रद्धांचा स्वीकार विवेकपूर्ण असायला हवा. [⟶संस्कार].

विवेकवादाचा आक्षेप : इंद्रियगम्य पुरावा आणि त्यावर आधारित तर्क यांनी प्रमाणित झालेली धारणा स्वीकारणे म्हणजे विवेक, असा विवेकवादी किंवा बुद्धीवादी सिद्धांत आहे. त्यानुसार केवळ वैज्ञानिक उपपत्तीच स्वीकारार्ह ठरतात आणि धार्मिक श्रद्धा स्वीकारणे हे तत्त्वत: अविवेकाचे, बुद्घिहीनतेचे लक्षण मानावे लागते. या दृष्टीने सर्व धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत व म्हणून त्यांचे निर्मूलन करणे हा बुद्धीवादाचा कार्यकम ठरतो. अशा तृहेने बुद्धीवाद अधार्मिक किंवा धर्मनिरपेक्ष, ऐहिक अंधश्रद्धामुक्त जीवनप्रणालीचा पुरस्कार करतो. नीतितत्त्वे, राजकीय तत्त्वप्रणाली, सुजीवनाची कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन यांवरील निष्ठा या अर्थाने ‘ श्रद्धा ‘ हा शब्दप्रयोग बुद्धीवादी ठरू शकतो परंतु धार्मिक-आध्यात्मिक दृष्टीने याला ‘ अश्रद्धावाद ‘ म्हणता येईल. ही ऐकांतिक बुद्धीवादी भूमिका आहे. [⟶ विवेकवाद].

श्रद्धांचे प्रामाण्य : श्रद्धेने स्वीकारलेल्या धारणांच्या प्रामाण्यविषयक प्रश्नाला सामान्यपणे तीन उत्तरे दिली जातात : (१) साक्षात्कारवाद, (२) तर्कवाद, (३) श्रद्धावाद. (१) साक्षात्कारवादानुसार धार्मिक तत्त्वे सुरूवातीला जरी आप्तवचनाच्या आधारे स्वीकारली जात असली, तरी योग्य साधनमार्गाने गेल्यास अपरोक्षानुभूतीद्वारा त्यांची साक्षात् प्रचिती घेता येते. या दृष्टीने धार्मिक श्रद्धा प्रचीतिक्षम आहेत. (२) साक्षात्काराची शक्यता न स्वीकारणारे तत्त्ववेत्ते श्रद्धांना पूरक व अनुकूल अशा तार्किक युक्तिवादांच्या आधारे श्रद्धांचे प्रामाण्य दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. धार्मिक श्रद्धा या विज्ञानविरोधी, तर्कविरोधी नाहीत त्यांच्यामध्ये सुसंवाद साधता येतो, एवढेतरी तर्काने दाखविता येते, असे ते मानतात. (३) साक्षात्कारवाद आणि तर्कवाद या दोहोंना न मानणारे तत्त्ववेत्ते ज्ञान आणि श्रद्धा यांची कार्यक्षेत्रे भिन्न असून धार्मिक क्षेत्रात श्रद्धा ही स्वायत्त आहे असे प्रतिपादन करतात. निसर्गविज्ञान, सामाजिक शास्त्रे, गणितशास्त्र ही ज्ञानक्षेत्रात मोडतात, तर धर्म हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. धर्मतत्त्वे अज्ञेय पण श्रद्धेय आहेत. त्यांचे कार्य वास्तवाचे यथार्थ वर्णन हे नसून जीवन नियमित करणे हे आहे. याला ‘ श्रद्धावाद ‘ म्हणतात.

श्रद्धास्वरूपविषयक दोन पक्ष : ईश्वराचे किंवा दिव्यशक्तीच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे ज्ञान करून देणारी श्रद्धा ही ज्ञानशक्ती आहे ती आस्तिक्यबुद्धी आहे हा एक पक्ष आणि दुसरा, ईश्वर आहे की नाही अशा चर्चेत न पडता सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, परमदयाळू ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवणारी श्रद्धा ही इच्छाशक्ती (विल टू बिलिव्ह) आहे. ईश्वर आहे की नाही, या प्रश्नाऐवजी ईश्वर मानायचा की नाही हा प्रश्न आहे. ईश्वर मानण्याचा निर्णय फायदेशीर आहे, हे दाखविण्यासाठी फेंच धार्मिक तत्त्ववेत्ते ⇨ब्लेझ पास्काल असा युक्तिवाद करतात. ईश्वर मानला पण तो जर नसेल, तर नुकसान काहीच नाही पण ईश्वर मानला नाही व तो जर असेल, तर ईश्वरश्रद्धेचे फलित म्हणजे अमरत्व आणि परमसुख यांना आपणास मुकावे लागेल. म्हणून ईश्वर मानण्याचा निर्णय हाच फायदेशीर आहे. ⇨विल्यम जेम्स सारखे तत्त्ववेत्तेही उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून श्रद्धेचे महत्त्व स्वीकारतात.

श्रद्धा व ज्ञान : श्रद्धा-अश्रद्धेचा विचार करताना ईश्वर, आत्मा, मोक्ष इत्यादींविषयी औपपत्तिक व शास्त्रीय ज्ञान आहे की नाही, याचाही विचार महत्त्वाचा ठरतो. यादृष्टीने ‘ अज्ञ व अश्रद्ध ‘, ‘ अज्ञ व सश्रद्ध ‘, ‘ जाणता आणि अश्रद्ध’  आणि ‘ जाणता आणि सश्रद्ध ‘ असे चार वर्ग भगवद्‌गीतेत सांगितले आहेत. अज्ञश्चाश्रद्ध्‌धानश्च संशयात्मा विनश्यति । (४.४०). अज्ञ पण सश्रद्धाला श्रद्धा सात्त्विक, राजस की तामस आहे, त्यानुसार फळ मिळेल. जाणता पण अश्रद्ध मृत्युलोकात खितपत राहील तर जाणता व सश्रद्ध जर संयमी व दंभरहित असेल, तर त्याला सद्‌गती मिळेल. भगवद्‌गीतेनुसार सात्त्विक श्रद्धेला संयम आणि ज्ञानप्राप्तीची कळकळ यांची जोड मिळाली, तर अशा श्रद्धावानाला परमपवित्र आत्मज्ञान प्राप्त होऊन परमशांतीचा लाभ होतो (४.३९). हे ज्ञान म्हणजे विद्वत्ता, व्यावहारिक ज्ञान किंवा औपपत्तिक ज्ञान नसून पारमार्थिक, आध्यात्मिक सुजीवनाचे ज्ञान होय. [⟶ भगवद्‌गीता].

संदर्भ : 1. Abernethy, George. Landford, Thomas A, Eds., Philosophy of Religion, New York, 1968.

            2. Chubb, J. N. Faith Possesses  Understanding, New Delhi, 1983.

            3. Creel, Richard, Religion and Doubt (Toward a Faith of Your Own), New Jersey, 1991.

            4. George, Galloway, The Plilosophy of Religion, Edinburgh, 1956.

अंतरकर, शि. स.